- वंदना अत्रे
अलाउद्दीन आणि मदन मंजिरी यांच्या निकाहला दोन दिवस झाले. रीतीप्रमाणे नवपरिणीत दाम्पत्याची ती पहिली रात्र होती. आपली आठवण लिहितांना अलाउद्दीन तथा बोरो बाबा लिहितात, “मी खोलीचा दरवाजा उघडून आत गेलो, बिवी गाढ झोपली होती. तिच्या गळ्यात नेकलेस होता आणि दंडावर बाजूबंद दिसत होते. मोठ्या सफाईने तिच्या न कळत मी ते काढून घेतले, टेबलवर आणखी काही छोटे-मोठे गहने होते आणि मेहेरची रक्कम असलेला एक बटवा. सगळा ऐवज भराभर कापडात गुंडाळला आणि बाहेर पडलो. निजानीज झालेल्या घरातून बाहेर पडून रातोरात आधी नारायणगंज आणि त्यानंतर कोलकात्याला (तेव्हा कलकत्ता) जाणारी गाडी पकडली. मला माझ्या गुरूकडे, नुलो गोपाल यांच्याकडे जायचं होत !”
- निकाह झाल्याच्या तिसऱ्या रात्री, पत्नीच्या अंगावरचे दागिने काढून घेण्यापुरता तिला स्पर्श करणारे आणि त्यानंतर तब्बल पंधरा वर्ष तिच्याकडे न बघणारे बोरोबाबा म्हणजे मैहर घराण्याचे संस्थापक पद्मभूषण उस्ताद अल्लाउद्दीन खाँ. अधिक सोप्या भाषेत सांगायचे तर पंडित रविशंकर, निखील बॅनर्जी, पन्नालाल घोष यांचे गुरु. उस्ताद अली अकबर खाँसाहेब आणि अन्नपूर्णा देवी यांचे वडील.
कागदाच्या छोट्या-छोट्या तुकड्यांवर त्यांनी आपल्या आयुष्याबद्दल आणि संगीत शिकण्यासाठी केलेल्या, वेड्या वाटाव्या अशा धडपडीबद्दल लिहून ठेवले आहे. त्यांची पणती सहना गुप्ता-खान हिने पुस्तकात संकलित केलेल्या त्या आठवणी वाचतांना वेळोवेळी वाटत राहते, हे खरे आहे की एखादी रोमांचकारी कादंबरी वाचतोय आपण?
गाणे शिकण्यासाठी वयाच्या आठव्या वर्षी घरातून बारा रुपये घेऊन पळून गेलेला हा मुलगा. कलकत्यात दिवसभर वणवण झाल्यावर थकून रात्री हुगळी नदीच्या कोणत्याशा घाटावर, गार वाऱ्याच्या झुळकीने डोळे पेंगुळले तेव्हा खिशात ठेवलेले दहा रुपये चोरट्यांनी उडवले. असहायपणे रडतांना दिसलेल्या या मुलाला नागा साधूंच्या जत्थ्याने वाट दाखवली ती, अंत्यसंस्कारानंतर निमताला घाटावर होत असलेल्या अन्नदानाच्या रांगेची. अंधळे, लंगडे, महारोगी लोकांच्या रांगेत बसून मुलाला द्रोणात डाळ- भात तर मिळू लागला पण त्याच्यासाठी त्यापेक्षा महत्वाचा प्रश्न होता तो, संगीत शिकवणाऱ्या गुरूचा!
कलकत्त्याच्या राज दरबारातील संगीतकार नुलो गोपाल यांनी या मुलाला शिष्य म्हणून स्वीकारले. रियाझाची वेळ पहाटे दोन पासून! दुपारी एकदा भिकाऱ्यांच्या रांगेत बसून जे मिळेल ते जेवायचे आणि रात्री पोट भरण्यासाठी लोटीभर पाणी प्यायचे! पुढे अहमद अली खान यांनी शिष्य म्हणून स्वीकारले पण त्यात शिक्षण चिमूटभर आणि कष्ट डोंगराइतके होते. स्वयंपाक करण्यापासून संडास-न्हाणीघराची सफाई आणि रात्री गुरुचे पाय चेपण्यापर्यंत सगळी कामे एकहाती करण्याचा वनवास. जीव शिणून जायचा. या परिश्रमानंतर गुरूची तालीम मिळायची ती अगदी जुजबी! गुरूचा रियाझ ऐकता-ऐकता अवघड ताना-पलटे आत्मसात करणाऱ्या या शिष्यावर गुरूने आपली विद्या चोरल्याचा आरोप करीत त्याचा पाणउतारा केला तेव्हा तो घोटही निमूटपणे गिळावा लागला...!
कोणत्याही सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेरचे हे हाल, उपासमार आणि कष्ट पण त्यातून मिळवलेले वैभवही असामान्य. एका माणसाच्या दोन ओंजळीमध्ये मावणार नाही एवढे. सरोद,सतार, सूरबहार, व्हायोलीन,कॉरनेट, मृदंग, पखवाज, तबला... जे वाद्य समोर असेल ते बोरोबाबांच्या हातात आल्यावर असे वाजत असे जणू आयुष्यभराची त्या वाद्याची साधना केली असावी...! तरुण वयापर्यंत फक्त हलाखी सहन करणाऱ्या या माणसाने कशासाठी हे केले असावे? भविष्यात पद्मभूषण वगैरे मिळावे यासाठी? त्यांनी निर्माण केलेले हेमंत, मांज-खमाज, शुभावती हे राग एका तराजूच्या एका तागडीत टाकले आणि दुसरीत असे कित्येक पुरस्कार, तर कशाचे वजन नेमके अधिक भरेल? वेदांच्या ऋचांच्या पठणापासून सुरु झालेली आणि निसर्गाचे, त्यातील ऋतूंच्या आवेगी सौंदर्याचे संस्कार घेत संपन्न होत गेलेली आपली गायन परंपरा. देशावर झालेल्या अनेक आक्रमणात कदाचित खुरटून, सुकून गेली असती. तिचा निरपेक्ष सांभाळ केला तो बोरोबाबांसारख्या वेड्या कलाकारांनी आणि गुरुंनी. आपल्या कानावर येत असलेल्या सुरांसाठी कोणीतरी निखाऱ्यांवर चाललेले आहे, याची जाणीव आपल्याला असते तरी का?
(लेखिका संगीत आस्वादक आणि ज्येष्ठ पत्रकार आहेत.)
vratre@gmail.com