हेरंब कुलकर्णी
केवळ एक अफवा पसरल्यामुळे चुकीचे आरोप लागून धुळ्याजवळच्या राईनपाडा गावात झालेल्या पाच भटक्यांच्या निर्घृण हत्येनंतर भटक्यांचे जगणे किती विदारक आहे याची निदान जाणीव तरी समाजमनाला झाली असेल, असे गृहीत धरतो. राज्यात लातूर, उस्मानाबाद, बीड, सोलापूर, नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये भटक्यांची पाले सगळ्यात जास्त आहेत. मध्यंतरी दारिद्रय़ाच्या प्रश्नाचा अभ्यास करण्यासाठी मी महाराष्ट्रभर भटकलो तेव्हा अशा कितीतरी पालांवर मी दिवस-रात्र वावरलो-राहिलो आहे. भटके हा महाराष्ट्रातील सर्वात गरीब आणि उपेक्षित समूह ! त्यांच्या प्रश्नांची उत्तरे सोडाच; पण अजून त्यांचे प्रश्नच पुढे आले नाहीत. कोणत्याही जिल्ह्यातल्या कुठल्याही पालावर जा र् वस्त्यांचे प्रश्न तेच असतात. राहायला स्वतर्ची जागा नाही. पक्की घरे नाहीत. रहिवासी दाखला, आधार कार्ड, मतदार यादीत नाव, रेशनकार्ड नाही. मुले शिकत नाहीत, जवळपास भिक्षा मागतात. पुरु ष- महिला पूर्णवेळ जमेल ते काम करतात आणि कसाबसा गाडा रेटत राहातात.पूर्वी भटके गावगाडय़ाचे भाग होते. लोकांच्या धार्मिक श्रद्धेचे ते वाहक असत; पण आता समाजाला या वर्गाबद्दल फार प्रेम राहिले नाही. कुणाही फिरत्या भटक्याशी बोलायला गेले, की आठव्या-दहाव्या वाक्यात तो हेच विषादाने सांगतो, आम्हाला पोट भरायला दुसरा मार्ग नाही आणि आम्हाला जे येते त्याची समाजाला आता कदर उरलेली नाही. गावोगावी शिक्षण पोहचले आहे. लोक पूर्वीसारखे भाबडे राहिले नाहीत. मरिआईचा देव्हारा, भविष्य पाहणे, आयुर्वेदिक जडीबुटी यावर फारसा भरवसा राहिला नाही. टीव्हीवर जवळपास फुकटात ऑलिंपिक आणि उच्च दर्जाचे जिम्नॅस्टिक बघत असलेल्या वर्गाला डोंबार्याच्या खेळात विशेष काही वाटत नाही. रामायण - महाभारताच्या चकचकीत मालिका बघून कधीच्या संपल्यामुळे राम-रावणाची, कौरव-पांडवांचा, कृष्णाची सोंगे घेऊन येणारे भटके आकर्षित करीत नाहीत आणि बहुरूप्याच्या गमतीला फसवून घेण्यातील आनंद घेण्याइतके भाबडे मन समाजाचे राहिले नाही. त्यामुळे पोटापाठी भटकंती होते. रानोमाळ पाले पडतात; पण टाचा घासल्यातरी पैसा पदरी पडत नाही वर पुन्हा ‘हात-पाय धड असताना हे खेळ करून कशाला भीक मागता?’ हे ऐकावे लागते. म्हणून मग महाराष्ट्राच्या बाहेरही काहीजण जातात. भंडारा येथील भटके तर पश्चिम बंगाल, बिहारात जाऊन आलेले होते.भटके विमुक्तात आता खूप थोडे लोक आपला पारंपरिक व्यवसाय करतात. मी गोंधळी, नाथजोगी, मांग गारु डी, गोपाळ, बहुरूपी यांसारख्या जमातीतल्या अनेकांना भेटलो, त्यातले अनेकजण जातीचे व्यवसाय करीत नव्हते. याउलट कान साफ करणे, म्हशी भादरणे, म्हशी सांभाळणे, भंगार गोळा करणे, केस गोळा करणे अशा व्यवसायात अनेकांनी हातपाय मारणे चालू केले आहे. यातून त्यांचे प्रश्न बदलले आहेत.अकोला जिल्ह्यातील बल्लाळी येथे नाथजोगी म्हैस आणतात. ती आठ महिने सांभाळतात. 1000 रु पये महिना मिळतो. याच वस्तीतील काहीजण वाजंत्नी वाजवायला जातात. गोसावी वस्तीत आता नव्या पिढीची मुले स्टोव्ह, कुकर आणि मिक्सर दुरु स्ती करतात. भंगार गोळा करण्यात सर्वात जास्त भटके आहेत. रोज 150 रु पये मिळतात. भंडारा, उस्मानाबादमध्ये भांडी देऊन केस गोळा करण्याचा व्यवसाय करतात. एक किलो केसांच्या बदल्यात 1500 रु पयाची भांडी द्यावी लागतात. हे एक किलो केस जमायला आठ दिवस लागतात. बार्शीच्या डवरी गोसावी समाजातली तरु ण मुले टिकल्या, बक्कल, चाप, पिना, बांगडी, पीन, साडी अशा वस्तू विकायला रोज किमान 20 किलोमीटर फिरतात. काही महिला बेन्टेक्सचे दागिने विकतात. अन्सारवाडा येथील गोपाळांनी बॅण्ड पार्टी काढली आहे. त्यातून मोठय़ा लग्नाची सुपारी घेतात..पारंपरिक व्यवसाय करणारे जे थोडे लोक आहेत त्यांना कमाई विचारली. दिवाळी, रंगपंचमी आणि पाडवा अशावेळी लोक जास्त पैसे देतात. पण डोक्यावर मरीआईचा 5 किलो वजनाचा देव्हारा मिरवावा लागतो. पारंपरिक घिसाडी कुटुंबातील चार लोक रोज एका गावाला जातात. विळा, खुरपे, कुर्हाड, कडबा, कात्नी, कत्ती, फास या वस्तू लोक बनवून घेतात. दिवसभराच्या कामात चारेकशे रु पये मिळवतात आणि त्यासाठी चार लोक काम करतात. प्लॅस्टिक व फायबरमुळे याही वस्तूंची मागणी खूपच कमी झाली आहे. मांग -गारु डी वस्तीतील अनेक तरु ण लोखंडी कात्नी, विळा, सुरी या वस्तूंना धार लावतात. अन्सारवाडा येथील कैकाडी कुटुंब बांबूपासून टोपल्या विणण्याचे काम करतात.भटक्या विमुक्तांमध्ये अनेक प्रतिभाशाली कलावंत आहेत. पण त्यांच्याही वाटय़ाला हेटाळणी आणि दुर्लक्ष याहून दुसरे काहीही येत नाही.गडचिरोलीत भामरागड तालुक्यात ओतनकार भटके पितळ धातूपासून वेगवेगळ्या वस्तू मोठय़ा कलाकुसरीने बनवतात. पितळेचे कासव, काळवीट असे अत्यंत सुबक तयार करून विकतात; पण भांडवल नाही, बाजारपेठ नाही त्यामुळे ते आपले घरगुती स्तरावर करत राहतात.तुळजापूरजवळ हंगरगा पालावर बहुतेकजण संगीत विशारद आहेत. आम्ही ज्या झोपडीच्या बाहेर बसलो. त्या कुटुंबातील वडील हे तबलावादनाची अलंकार पदवी मिळवलेले होते आणि संगीत विशारद. मुलगा गावोगावी भजनाचे कार्यक्र म करतो. संगीत अलंकार असलेला तो वृद्ध कलावंत एका पालावर बघणे क्लेशदायक होते.जिथे पोटाची आग विझत नाही, तिथे कसले आले आहे कलेचे कौतुक?भटक्यांची सुरक्षितता हा एक नव्यानेच उपटलेला प्रश्न आता आणखी जटिल होत चालला आहे. फिरताना होणारे हल्ले ही एक बाजू झाली; पण ज्या गावात ते राहतात तिथेही काही ठिकाणी त्यांच्यावर हल्ले झाल्याचे दिसते. तीन गावात भटक्या विमुक्तांवर हल्ले झाल्याचे आढळले. भंडारा जिल्ह्यात चोरखमारी येथे गोपाळ वस्तीतील एका मुलीने शेतातून वांगी तोडली म्हणून गावातील 50 पेक्षा जास्त लोकांनी वस्तीवर हल्ला केला. बेदम मारहाण केली. झोपडय़ा तोडल्या. पोलिसात गेलात तर खुनाची धमकी दिली. भंडारी जिल्ह्यात साकोली तालुक्यात बहुरूपी वस्तीला गावात घरे मिळणार होती. तेव्हा हे कायमचे गावात राहतील म्हणून त्याच रात्नी वस्ती पेटवून दिली. सरपंचाने गावात राहू द्यायला दोन लाख मागितले म्हणतात. तहसीलदारांनी घरकुलाची जागा नक्की करून दिल्यावर त्याच रात्नी वस्ती पेटवली. जीव वाचवायला सगळे भटके गावातून पळून गेले.तिसरे प्रकरण नागपूर जिल्ह्यात मौंदा तालुक्यातले. भरवाड या गाई सांभाळणार्या लोकांना मारहाण करून बुलडोझरने वस्ती उद्ध्वस्त केली. गायीचा चारा जप्त केला व चारा हवा असेल तर 25 हजार रु पये मागितले. जिल्हाधिकारी, तहसीलदार यांना सांगूनही उपयोग झाला नाही. शेवटी चारा सोडवायचे 10 हजार रु पये द्यावे लागले. - या तीनही प्रकारांत भटक्या विमुक्तांना गावात राहू द्यायचे नाही, घरे मिळवून देऊन कायमचे रहिवासी बनवायचे नाही अशी मानसिकता दिसते. यातून भटक्यांच्या प्रश्नाची तीव्रता व त्यांची उपेक्षा लक्षात येते. शहरी भागात राहणार्या भटक्यांना पोलीस रेल्वे स्टेशनजवळ राहू देत नाहीत. हाकलून देतात. उदगीरला तर त्यांची पाले पेटवून दिली होती. इतका त्नास ते सहन करतात. रहिवासी दाखला, रेशनकार्ड ही साधी कागदपत्ने नसल्याने भटक्यांना किती यातना सहन कराव्या लागतात याची आपण कल्पनाच करू शकणार नाही. रहिवासी पुरावा नसल्याने रेशनकार्ड मिळत नाही. घरकुल मिळत नाही. कोणत्याच शासकीय योजनेचा फायदा मिळत नाही. रहिवासी नसल्याने मतदार यादीत नाव नाही आणि मतदार नाही म्हणून गावातील राजकीय कार्यकर्ते यांना ढुंकून विचारत नाहीत. गोंदियाच्या पालावर भंगार वेचून आलेल्या भटक्या महिला भेटल्या. सकाळपासून गोळा केलेले भंगार विकून 80 रु पये मिळवले आणि त्यातून 25 रु पये किलोचा तांदूळ घेऊन आल्या होत्या. रेशनवर 2 रु पये किलो तांदूळ असतो; पण रेशनकार्ड नसल्याने यांना भंगार विकून 25 रु पये किलोने तो घ्यावा लागतो. गावकरी एकतर घरकुले यांना देत नाहीत आणि मंजूर झाले तर ज्या जागेवर राहतात ती जागा नावावर नसते. त्यामुळे हक्काचे घर मिळत नाही. पाण्याची तर परवड बघवत नाही. जवळच्या नळावर जाऊन, विहिरीवर जाऊन पाणी गयावया करून आणायचे. एका वस्तीत तर एक रु पया हंडा भावाने पाणी आणावे लागत असलेले मी पाहिले आहे. महाराष्ट्र हागणदारीमुक्त झाल्याची दवंडी पिटली गेली असली, तरी शौचालये नसल्याने भटक्या समाजातल्या महिलांना खूपच संकोचाने जगावे लागते. भटक्यांची सगळ्यात वाईट अवस्था ही आरोग्याची आहे. नागपूर जिल्ह्यात उषा गंगावणे ही महिला पालावर भेटली. उषाबाईंना एकाचवेळी हृदयविकार, अल्सर आणि किडनीचा विकार आहे. त्यांनी जवळच्या पैशाने अॅँजिओग्राफी केली. त्यात त्यांच्या हृदयाची झडप नादुरु स्त आहे.मी पुस्तकी भाषेत म्हणालो की शासन मदत देते ना? त्या शांतपणे हसल्या. शासकीय मदतवगळता आणखी दीड लाख रु पये लागतील. इतकी रक्कम त्यांच्याकडे नाही म्हणून मग आता त्या केवळ गोळ्या घेतात. गोळ्यांच्या खर्चासाठी भंगार गोळा करतात आणि त्यातून औषधे घेतात. कधीकधी गोळ्या घ्यायलाही पैसे नसतात. अशावेळी खूप छाती दुखते. जीव घाबरा होतो.- भटक्यांच्या आरोग्याची परवड सांगायला हे एकच उदाहरण पुरेसे आहे.. या जगण्याच्या लढाईत शिक्षण खूप मागे पडते. उस्मानाबादमधील भटक्यांच्या 150 घरांच्या वस्तीत फक्त 22 मुले शाळेत शिकताना मी पाहिली. सर्वात जास्त शिकलेली मुलगी त्या वस्तीत पाचवीत शिकत आहे. संपूर्ण वस्तीत फक्त 3 मुली शिकतात. प्राथमिक स्तरावर विद्यार्थी शिकण्याचे प्रमाण वाढले आहे. पण माध्यमिक स्तरावर गळती होते आहे. तरीही भटक्यात आता बारावी पास झालेली, अगदी पदवीधर मुलेही आहेत; पण तेवढय़ावर नोकर्या मिळत नाहीत. त्यातून पुन्हा एक नैराश्य पसरते.. आणि जन्मापासून पाठीशी लागलेले भटकेपण संपता संपत नाही.हे असे भटके राज्यात नेमके किती, याची साधी संख्यासुद्धा अजून आपल्या मायबाप सरकारला निश्चित करता आलेली नाही.त्यांचे प्रश्न नेमके काय आहेत, हेच अजून कोणी शोधून पाहिलेले नाही.उत्तरे शोधणे तर अजून खूप दूर आहे..
***
राज्यभरातल्या भ्रमंतीत भटक्यांची दु:खे पाहिली, तशा काही यशोगाथाही भेटल्या...
1. बीड जिल्ह्यातील तिरमलवाडी ही वस्ती ! कार्यकर्ते वाल्मीक निकाळजे यांच्या पुढाकाराने भटक्यांनी अतिक्र मण करून जमिनी पकडल्या. विहिरीच्या पाण्यावर भाजीपाला केला. आम्ही भेट दिली तेव्हा घरासमोर शेतीतून नुकतेच काढलेले कडधान्य वाळवत होते. ज्या भटक्यांच्या पालावर मागून आणलेल्या भाकरी वाळत टाकलेल्या असायच्या, तिथे त्यांच्या कष्टाचे पीक बघणे आनंददायक होते.
2. हिंगोली जिल्ह्यात गणेशपूर गावात 75 टक्के लोक गोपाल आहेत. यातील बहुतेकांनी जमिनी घेतल्या आहेत. त्यात 10 एकरापेक्षा जास्त जमिनी असलेली 25 पेक्षा जास्त कुटुंबे आहेत. काहींना सिंचनाची सोय असल्याने ते दोन पिके घेऊ शकतात. कापूस आणि हळदीचे चांगले उत्पन्न काढणारे शेतकरी आहेत.
3. भटके विमुक्त परिषदेने अन्सारवाडा व निलंगा येथे उद्योग केंद्र उभे केले आहे. गोधडय़ा शिवणे, पिशव्या शिवणे, झोपण्याची उशी शिवणे, गाडीतील कुशन शिवणे अशी सुबक उत्पादने तयार करतात. याच परिषदेने अनेक पालांवर पालावरची शाळा सुरू केल्या आहेत. त्यातून मुले शिकू लागलीत.
भटक्यांच्या पालावर शासन जाईल?
भटक्यांच्या प्रश्नावर काम करणार्या पुण्याच्या संतोष जाधव यांची ‘निर्माण’ संस्था सर्व संघटनांना सोबत घेऊन शासनदरबारी भटक्यांच्या प्रश्नांचा पाठपुरावा करते आहे. त्यांनी सुचवलेले काही मार्ग असे -1 भटके सध्या वास्तव्य करीत असलेल्या ठिकाणाच्या वास्तव्याचे पुरावे व गृहचौकशी अहवालाच्या आधारे त्यांना जातीचे दाखले द्यावेत.2 ज्या गावात ते राहत आहेत, त्या जागेचा 8-अ उतारा ग्रामपंचायतीने द्यावा.3 ग्रामपंचायत, पंचायत समिती स्तरावरच्या निवडणुकीत भटक्या विमुक्तांना आरक्षण ठेवले तर त्यांना राजकीय प्रतिष्ठा मिळेल व गावपातळीवरचे प्रश्न सुटू शकतील.4 एकाच वेळी रेशनकार्ड, रहिवासी दाखला, मतदार यादीत नाव व बँक खाते देण्यासाठी विशेष आठवडा नक्की करून सर्व सरकारी यंत्नणा राबवून ‘शासन तुमच्या पालावर’ ही योजना राबवून हा कागदपत्नांचा विषय एकदाचा निकालात काढावा.5 35 किलो धान्य मिळण्यासाठी तातडीने बीपीएल रेशनकार्ड देण्यात यावे.6 वसंतराव नाईक सबलीकरण व स्वाभिमान योजना प्रभावीपणे राबवावी व वसंतराव नाईक आर्थिक विकास महामंडळात गरजेनिहाय योजना तयार कराव्यात.7 जातनिहाय जनगणना करून भटक्यांची लोकसंख्या निश्चित करावी. 8 कसायला व घर बांधायला जमीन मिळावी.9 अॅट्रॉसिटी कायद्याचे संरक्षण भटक्यांना देण्यात यावे.10 कला सादर करणार्या कलावंतांना लोककलावंत शासकीय मानधन देण्यात यावे.
निधी अखर्चित आणि भटके पालावरच
भटक्या विमुक्तांची संख्या राज्यात 11 टक्के असल्याचे गृहीत आहे; पण अर्थसंकल्पातील तरतूद आहे फक्त 1800 कोटी रुपये ! यातील निम्म्यापेक्षा जास्त रक्कम आश्रमशाळा, शिष्यवृत्ती यातच खर्च होते. रोजगार निर्मितीसाठी काहीच तरतूद नाही. भटक्या विमुक्तांसाठीच्या योजना किती केविलवाण्या बनतात याचे उदाहरण ‘संघर्षवाहिनी’चे दीनानाथ वाघमारे यांनी सांगितले. भटक्यांना घरे मिळावी म्हणून ‘यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना’ 2011 मध्ये सुरू करण्यात आली. दरवर्षी प्रत्येक जिल्ह्यात 20 घरांच्या 3 वस्त्या म्हणजे 60 घरे बांधण्यासाठी 10 कोटींची तरतूद केली. 35 जिल्ह्यात 6 वर्षात 12 हजार 600 घरे व्हायला हवी होती; पण फक्त 2 जिल्ह्यात मिळून 80 घरे बांधली गेली. म्हणजे, निधी अखर्चित आणि भटके पालावरच अशी अवस्था!
(लेखक शिक्षण क्षेत्रातले ख्यातनाम कार्यकर्ते आणि अभ्यासक आहेत.)