डॉ. आशुतोष रारावीकर हे एक नामांकित अर्थतज्ज्ञ. रिझर्व्ह बॅँक ऑफ इंडियात ते संचालकपदावर कार्यरत आहेत. आर्थिक विषयांवर त्यांनी उदंड लेखन केले आहे. त्याबद्दल त्यांना बरेच पुरस्कारही मिळाले आहेत. नुकतेच त्यांनी एक पुस्तक लिहिले आहे. हे पुस्तकही आर्थिक विषयांवरच असेल, असे आपल्याला वाटेल; पण एका अतिशय वेगळ्या विषयावर त्यांनी हे पुस्तक लिहिले आहे. अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेल्या डॉ. रारावीकर यांना योगाभ्यास, अध्यात्म, साहित्य, संस्कृत, पर्यटन, आणि संगीत यात विशेष रुची आणि गती आहे. डॉ. रारावीकर आपल्या मनोगतात सांगतात, ‘माझे वडील प्रा. डॉ. यशवंत रारावीकर हे ख्यातनाम अर्थतज्ञ होते. ते सात्विकतेची आणि करुणेची मूर्तिमंत प्रतिमा होते. माझी आई प्रा. डॉ. सौ. अरुणा रारावीकर ही एक अध्यात्ममूर्ती संस्कृततज्ञ आणि साहित्यिक होती. अर्थशास्त्र हा माझा श्वास आहे, तर अध्यात्म हा माझा प्राण आहे. इतकी वर्षे मी वडिलांची म्हणजे अर्थशास्त्राची भाषा बोललो. या पुस्तकातून मी आता आईची भाषा बोलतो आहे.’त्यांच्या वडिलांचं नाव यशवंत आणि आईचं माहेरचं नाव पुष्पा. म्हणून या पुस्तकाचं नाव ‘यशपुष्प’. डॉ. रारावीकर यांना शेजारीच राहणार्या कुसुमाग्रजांचा प्रदीर्घ सहवास लाभला होता. त्याचबरोबर दोन अध्यात्मिक भाग्यगुरू नारायणकाका ढेकणे महाराज आणि योगगुरू डॉ. एच. आर. नागेंद्रजी तसेच विष्णुमहाराज पारनेरकर यांच्या इश्वरी छायेत त्यांचा अध्यात्माचा प्रवास सुरू झाला.आजवरच्या आयुष्यात डॉ. आशुतोष रारावीकर यांनी ज्या जीवनसूत्रांचा अवलंब केला, विचारांची, जीवनाची जी सूत्रं त्यांना सापडली, ती शब्दरूपात, सुविचारांच्या रूपात त्यांनी गुंफली आहेत. वाचकांसाठी ती प्रेरणादायी आहेत. विचारांची ही सूत्रं आपल्या जगण्याला बळ, विचारांना प्रेरणा देतील. निराशेत आशेची ज्योत, तर अंधारात प्रकाश दाखवतील. भक्ती, शक्ती आणि युक्तीचा संगम या विचारपुष्पांत झाला आहे. एकाच वेळी हे विचार आपले डोळे खाडकन उघडून वास्तवाची वाट दाखवतात, तर लगेच अध्यात्माचाही मार्ग दाखवतात. आपलं बोट धरून वाट दाखवताना आपोआपच चिंतन, आत्मपरीक्षण ते करायला लावतात.‘नैराश्यानं भरलेली प्रत्येक रात्र सूर्याचा लख्ख प्रकाश घेऊन येते आणि एका सोनेरी पहाटेला जन्म देते हे चिरंतन सत्य आहे.’ तसेच ‘काळजी ही घेण्याची गोष्ट आहे, करण्याची नाही’, ‘डोळे उघडे ठेवले तर आपल्याला सगळं ‘ऐकू’ येतं’. ही सूत्रं आपल्याला विचार करायला लावतात, तर ‘विवाह हे एक महाकाव्य आहे. सुरुवातीला रामायण, नंतर महाभारत!’, ‘जिथे बसायला जागा नाही, तिथे झोपायच्या गोष्टी करू नये’ - असं जीवनाचं तत्त्वज्ञानही ते सहज सांगून जातात. ‘हे गुपित कोणाला सांगू नकोस, कारण ते सगळ्यांना माहीत आहे’, ‘तो रिव्हर्स गिअर टाकतो आणि तरीही गाडी पुढे का जात नाही याचा विचार करत बसतो’, अशा प्रकारची सूत्रं सहजपणे आपली फिरकीही घेतात. निद्रावस्थेत जागृतीची अनुभूती असणं हाच चैतन्याचा साक्षात्कार’, असा उजेडाचा साक्षात्कारही ते आपल्याला घडवतात. ‘गंध अंतरीक्षाचा’, ‘स्मितलहरी’, ‘लॉकडाऊनच्या वेळेत’, ‘पुष्पांजली परमेशाला’ अशा चार भागांत विभागलेली ही विचारसूत्रे खूपच वाचनीय आहेत.यशपुष्प : डॉ. आशुतोष रारावीकरई-पुस्तक आवृत्ती, पाने : 260ई-पुस्तक संरचना : शैलेश खडतरेप्रकाशक : ईबु पब्लिकेशन्स
विचारसूत्रे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2020 6:04 AM
विचारांची ही सूत्रं आपल्या जगण्याला बळ, विचारांना प्रेरणा देतील. निराशेत आशेची ज्योत, तर अंधारात प्रकाश दाखवतील.
ठळक मुद्दे‘गंध अंतरीक्षाचा’, ‘स्मितलहरी’, ‘लॉकडाऊनच्या वेळेत’, ‘पुष्पांजली परमेशाला’ अशा चार भागांत विभागलेली ही विचारसूत्रे खूपच वाचनीय आहेत.