- सुरेश भटेवरा
स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षात भारताने पदार्पण केले आहे. स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष आपण साजरे करीत आहोत. आज १४ नोव्हेंबर २१, पंडित जवाहरलाल नेहरूंचा जन्मदिन! भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आधुनिक भारताचे खरे शिल्पकार होते. भारतवर्षाच्या प्राचीन परंपरेला, दीड शतकाहून अधिक काळ, ब्रिटिश सत्तेच्या दुष्टपर्वाने ग्रासले होते. प्राणपणाने संघर्ष करीत, अनेकांनी अनेक वर्षे ज्याची स्वप्ने पाहिली, तो दिवस अखेर १४ ऑगस्ट १९४७ रोजी उजाडला. १५० वर्षांच्या गुलामगिरीतून एक खंडप्राय देश मुक्त होत होता. बारा वाजेच्या दिशेने घड्याळाचे काटे पुढे सरकत होते. कॅलेंडरवर १५ ऑगस्ट १९४७ ची तारीख, फक्त एका नव्या दिवसाची जाणीव करून देणारी नक्कीच नव्हती. कोट्यवधी भारतवासीयांसाठी आपल्या स्वप्नांकित देशाचा तो स्वातंत्र्य दिन होता. भारताच्या काेनाकोपऱ्यात सर्वांच्याच मनात रोमांच उभे राहिले होते. ढोल-ताशे, झांज-नगाऱ्यांचा सर्वत्र दणदणाट सुरू होता. नद्यांच्या तीरावर भाविकांचे शंख वाजत होते. मशिदींच्या कर्ण्यांमधून अजानचे स्वर नेहमीपेक्षा अधिक उत्साहात निघत होते. गरीब असो की श्रीमंत, सर्वांच्याच दारांपुढे रंगीबेरंगी रांगोळ्या सजल्या होत्या. प्रकाशपर्वाची आठवण करून देणारे लखलखते आकाशकंदील सर्वत्र झगमगत होते. सरकारी इमारती विद्युत रोषणाईने उजळल्या होत्या. स्वातंत्र्याचे तोरण बनलेले तिरंगी झेंडे, तमाम भारतवासीयांनी आपापल्या घरांवर उभारले होते. मध्यरात्र असली तरी सारे जण जागेच होते. राजधानी दिल्लीत संसदेची गोलाकार वास्तूही रोषणाईने नटली होती. सेंट्रल हॉलमध्ये उपस्थितांच्या चेहऱ्यावर प्रचंड उत्साह होता. घटना समितीचे सदस्य, देशातले मान्यवर नेते, ज्येष्ठ सभासद सारेच तिथे दाखल झाले होते. प्रेक्षक आणि प्रेस गॅलऱ्या तुडुंब भरल्या होत्या. संथ गतीने पुढे सरकणाऱ्या घड्याळात रात्रीचे १२ वाजले अन् तो ऐतिहासिक क्षण आला. सभागृहात शांतता पसरली. सफेद शेरवानीवर लाल गुलाबाचे फूल, शुभ्र पांढऱ्या रंगाची टोपी परिधान केलेली एक तेजस्वी व्यक्ती पहिल्या रांगेत बसली होती. त्यांचे नाव होते पंडित जवाहरलाल नेहरू.
संसदेच्या सर्वोच्च व्यासपीठावरून, सभागृहाला आणि साऱ्या जगाला उद्देशून पंडित नेहरूंनी बोलायला सुरुवात केली. ‘नियतीशी फार पूर्वी आपण एक करार केला होता. त्या कराराची निष्ठा जागवण्याचा, तो करार पूर्ण करण्याचा क्षण आज आला आहे. आजच्या मध्यरात्री सारे जग जेव्हा शांतपणे झोपले असेल, तेव्हा सचेतन भारत जागा होईल. इतिहासात असे क्षण क्वचितच येतात, जेव्हा अंधारलेले युग संपते आणि नव्या स्वर्गाचे दार गवसते. पारतंत्र्यात बंदिस्त असलेल्या एका राष्ट्राचा आत्मा स्वातंत्र्याचा पहिला श्वास घेतो. हा क्षण जनतेच्या सेवेत झोकून देण्याचा आहे. साऱ्या जगाची अन् मानवतेची सेवा करण्याच्या प्रतिज्ञेचा आहे. आपले भविष्य निश्चितच उज्ज्वल आहे. त्याचे आव्हान मात्र साधे नाही. सतत कार्यरत राहावे लागणार आहे. आपल्याला स्वस्थ बसता येणार नाही. मतभेदांचा अन् हेव्यादाव्यांचा हा कालखंड नाही. ऐक्य, सौहार्द अन् एकात्मतेचा आहे.’
स्वातंत्र्य प्राप्त होण्याआधीच, पंडित नेहरूंनी आधुनिक भारताचे संकल्पचित्र मनाशी रेखाटले होते. दीडशे वर्षे पारतंत्र्यात राहिलेल्या देशाचे आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि वैज्ञानिक उन्नतीसाठी नियोजन कसे असले पाहिजे? विविध क्षेत्रांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आश्वासक आणि वेगवान मार्ग कोणता? याचा प्रागतिक विचार अनेक वर्षे त्यांच्या मनात सुरू होता. वैज्ञानिक पद्धतीने शेतीचा विकास, भाक्रा नानगलसारख्या सिंचनाच्या उत्तम सोयी, वेगवान औद्योगिकीकरण, सार्वजनिक उद्योगांची उभारणी, स्वदेशी उत्पादनांसाठी खाजगी क्षेत्राला उत्तेजन, संमिश्र अर्थव्यवस्था, शैक्षणिक गुणवत्तेला अग्रक्रम, भारतात नवे तंत्रज्ञ, नवे व्यवस्थापन तज्ज्ञ, नवे शास्त्रज्ञ निर्माण व्हावेत यासाठी आयआयटी, आयआयएमसारख्या नव्या शिक्षण संस्थांची उभारणी, आरोग्य व्यवस्थेत सुधारणा, नवी वैद्यकीय महाविद्यालये, एम्ससारख्या अद्ययावत रुग्णालयांची उभारणी, राष्ट्रीय एकात्मतेचा पुरस्कार, सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक सुधारणांचे भान ठेवणारी कार्यपालिका, नि:पक्ष न्यायव्यवस्था, प्रत्येक सज्ञान व्यक्तीला मताधिकार, संसदीय लोकशाही प्रणाली, संघराज्य पद्धतीचा अवलंब, लोकशाहीचे विकेंद्रीकरण, पंचायत राज व्यवस्थेची मुहूर्तमेढ, धर्मनिरपेक्ष भारत, सांस्कृतिक बहुलतावाद व अलिप्ततेचा पुरस्कार, जागतिक महासत्तांचे मांडलिकत्व न पत्करणारे परराष्ट्र धोरण, भारतीय भाषांचा विकास, संगीत, नाटक, ललित कला, चित्रपट, साहित्याचा विकास आणि संस्कृतीचे देशव्यापी आदान-प्रदान... अशा व्यापक कॅनव्हासवर आधुनिक भारताच्या उभारणीचे संकल्पचित्र पंडित नेहरूंनी रेखाटले होते. प्रत्येक पैलूचा त्यांनी सखोल विचार केला होता. पंतप्रधानपदाच्या १७ वर्षांच्या कारकिर्दीत, अविश्रांत परिश्रम घेत १४० पेक्षा अधिक महत्त्वाच्या संस्थांची नेहरूंनी उभारणी केली.
विसाव्या शतकाच्या मध्यातच, पंडित नेहरूंनी अणुऊर्जेचे महत्त्व ओळखले होते. त्यांना खात्री होती की जगात अणुऊर्जा सामाजिक, आर्थिक आणि राजकीय क्रांती घडवू शकेल. स्वातंत्र्य मिळाल्याबरोबर नेहरूंनी लगेच होमी भाभा आणि अन्य शास्त्रज्ञांबरोबर बैठक आयोजित केली. १९४८ साली अणुऊर्जा कायदा (ॲटोमिक एनर्जी ॲक्ट) मंजूर केला. अणुशक्ती व अणुविज्ञानाचे वैज्ञानिक संशोधन करण्यासाठी, १९४८ साली अणुऊर्जा आयोगाची स्थापना केली. नेहरू त्याचे पहिले अध्यक्ष होते. विज्ञान नेहरूंसाठी कल्पकतेचे स्वप्न होते. भारताच्या निर्णय प्रक्रियेत, वेगवान विकासासाठी विज्ञानाचा साधन म्हणून वापर केला तर देशाची दमदार प्रगती होईल, देश स्वावलंबी होऊ शकेल, असे नेहरूंना वाटायचे. बट्राँड रसेल, जे. डी. बर्नाल, जे. बी. एस. हाल्डेन आणि अन्य वैज्ञानिकांच्या मूलभूत संशोधनांबाबत, नेहरूंनी १९३० च्या दशकात वाचन केले. त्यांचे दाखले ते व्याख्यानात द्यायचे. पंडित नेहरू जे बोलायचे, लिहायचे, त्या प्रत्येकवेळी संशोधनवृत्तीने झपाटलेला एक परखड समीक्षक त्यांच्या मनात जागा असायचा. हे असे का, कशासाठी, असे प्रश्न स्वत:लाच ते विचारायचे. त्याची उत्तरे स्वत:च शोधायचे. जुन्या रूढी आणि तथाकथित कर्मकांडांचे वर्चस्व बाजूला ठेवले पाहिजे, वैज्ञानिक समीक्षेची लोकांना सवय लागली तर अनेक प्रकल्प अडथळ्याविना यशस्वीरीत्या उभे राहतील, अशी त्यांची धारणा होती. दारिद्र्य, भूक, निरक्षरता आणि अंधश्रध्देने जोपासलेला वेडेपणा विज्ञानच दूर करू शकेल, यावरही त्यांचा दृढविश्वास होता.
पंडित नेहरूंचे व्यक्तिमत्त्व असामान्य होते. तल्लख बुध्दिमत्ता, भूतकाळात डोकावून भविष्याचा वेध घेण्याची कल्पकता, देशाविषयी तरल मनाने जपलेली सप्तरंगी स्वप्ने, ती वास्तवात आणण्यासाठी केलेली पराकाष्ठा, अशा विविध गुणांचा समुच्चय एकाच व्यक्तीत असावा, हा विलक्षण अकल्पित योग आहे. नियती बहुदा पंडित नेहरूंवर फिदा असावी. मानवी ऊर्जेच्या विलोभनीय छटा नेहरूंच्या व्यक्तिमत्त्वात सामावल्या होत्या. स्वातंत्र्यासाठी नेहरूंनी भोगलेला ९ वर्षांचा तुरुंगवास, आधुनिक भारताच्या उभारणीत पंतप्रधान नेहरूंच्या कामकाजाचा विलक्षण झपाटा, भारतात त्यांनी विचारपूर्वक निर्माण केलेल्या अनेक संस्था, उद्योग आणि उपक्रमांचे तपशील न्याहाळले तर ते अक्षरश: थक्क करणारे आहेत. भारताच्या इतिहासात पंडित नेहरूंसारख्या फारच थोड्या व्यक्ती आढळतात.
अलीकडे दुर्दैवाने स्वातंत्र्योत्तर कालखंडातल्या प्रत्येक त्रुटीबद्दल, पंडित नेहरूंना जाणीवपूर्वक जबाबदार ठरवले जाते. सरकारी कारभारात कोणतीही समस्या निर्माण झाली, की साठ वर्षांत काँग्रेसने काय केले, असा एक नादान प्रश्न उभा केला जातो. काही विशिष्ट विचारसरणीचे लोक, सारा दोष नेहरूंच्या माथी मारण्याचा उद्योग करीत असतात. नेहरूंच्या व्यक्तिगत जीवनावर शिंतोडे उडवण्यासाठी समाजमाध्यमांवर तद्दन खोट्या आणि कपोलकल्पित कंड्या पिकवल्या जातात. अशा लोकांच्या मनात बहुदा नेहरूंविषयी पराकोटीचा व्देष जाणीवपूर्वक पेरलेला असतो. सद्सद्विवेक जागा असलेल्यांसाठी अशा बेजबाबदार अपप्रचाराचे खंडण करण्याची आवश्यकता नाही. नेहरूंच्या जीवनातल्या साऱ्या ठळक घटना, प्रसंग आणि वेळोवेळी त्यांनी व्यक्त केलेले विचार इतके बोलके आहेत, की नेहरूंविरोधी अपप्रचाराला तेच परस्पर उत्तर देऊ शकतील.
पंडित नेहरूंचे राजस व्यक्तिमत्त्व, त्यांच्या स्वभावाच्या विविध छटा, भारताचे परराष्ट्र धोरण, काश्मीरचा तिढा, भारत-चीन युध्द, अशा बहुचर्चित विषयांवर नेहरूंच्या भूमिकेविषयी बरेच काही सांगता येण्यासारखे आहे. भारतात त्याविषयी जाणीवपूर्वक अनेक गैरसमज पसरविण्यात आले आहेत, ते नक्कीच दूर होऊ शकतील. स्वतंत्रपणे त्याविषयी पुन्हा कधी तरी !
(ज्येष्ठ पत्रकार)
suresh.bhatewara@gmail.com