शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
3
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
4
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
5
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
6
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
7
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
8
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
9
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
10
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
11
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
12
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
13
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
14
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
15
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
16
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
17
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
18
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान
19
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
20
'इंडिया आघाडीला मजबूत नेत्याची गरज', TMC ने राहुल गांधींच्या क्षमतेवर उपस्थित केला प्रश्न

जुळी जुगलबंदी

By admin | Published: September 24, 2016 8:36 PM

आत्मा एक आणि शरीरे दोन.- चित्रपटातले कथानक नाही, अगदी खरे आहे हे. आरशातील प्रतिबिंब बघावे इतक्या बिनचूक सारखेपणाने आम्ही जेव्हा नृत्य करू लागलो तेव्हा जाणवू लागले, आम्ही विचारसुद्धा सारखाच करतो, नृत्याबद्दल आणि जीवनाबद्दल. तसे नसते तर जेव्हा नृत्यात एखादी उत्स्फूर्त जागा घ्यायची वेळ येते तेव्हासुद्धा दोघांच्या मनात येणारा तुकडा एकच कसा असतो?

शब्दांकन - वन्दना अत्रे
 
दोन शरीरे आणि एक आत्मा वगैरे वाक्य आपण सिनेमात खूप वेळा ऐकतो. तसे काहीसे प्रत्यक्ष आयुष्यात असते असे तुम्हाला सांगितले तर विश्वास ठेवाल की हसाल या भाबडेपणाला? गंमत अशी आहे की, असे काही प्रत्यक्षात असू शकते हे मान्य केल्याखेरीज आम्ही आमच्याविषयी आणि आमच्या प्रवासाविषयी, रियाजाविषयी बोलूच शकत नाही. केवळ तुमच्याशी नाही तर स्वत:शीसुद्धा बोलणे शक्य नाही. आमचे कथक, आमचा रियाज, आमचे कार्यक्र म आणि त्यातून मिळालेले जगण्याचे उद्दिष्ट हे सगळे-सगळे एकत्रच घडलेले. मग कोणा एकाची साधना, एकाचेच नृत्य किंवा कार्यक्र म याविषयी बोलणे कसे शक्य आहे? देवाने आम्हाला बहुधा जुगलबंदी कलाकार म्हणूनच जन्माला घातले असावे. नाहीतर अगदी एकसारखे दिसणारे आम्ही जुळे, बनारसच्या मातीत कसे जन्माला आलो असतो? इथे जन्माला येणाऱ्या प्रत्येकाला ही माती दोन संस्कार देते. एक, गंगेच्या स्नानाचा आणि दुसरा, स्वरांशी मैत्री करण्याचा. या संस्कारांपासून कोणाचीच सुटका नाही, मग आमची कशी होईल? गंगेचा घाट तरी घरापासून जरा दूरवर, दोन फर्लांग चालण्याच्या अंतरावर होता. पण स्वर आणि ताल? ते थेट घरात होते. चोवीस तास. जशी अखंड वाहती गंगा तशी ही घरात वाहत असणारी नृत्याची गंगा. त्यामुळे गंगामैयाने शरीराला प्रेमाने न्हाऊ घातले आणि घरात चालू असलेल्या या नृत्याने मनाचे पोषण केले. आम्ही नृत्याचा जो समृद्ध वारसा घेऊन जन्माला आलो त्याची बूज राखण्यासाठी म्हणून नृत्याकडे वळलो का? खर सांगायचं तर अजिबात नाही. आमच्या गुणसूत्रातूनच नृत्याची ओढ आम्हाला मिळाली आणि तीच आम्हाला नृत्यापर्यंत घेऊन गेली. 
आमचे वडील अमरचंद मिश्र हे नामवंत सतारवादक. वडिलांचे वडील म्हणजे आमचे आजोबा भवानी प्रसाद मिश्र हे भारतभरात गाजलेले सारंगीवादक. दुसरे आजोबा, आईचे वडील श्रीचंद मिश्र हे बनारस घराण्याचे गायक. पंडित बिरजू महाराजजी हे मावशीचे यजमान आणि काका रविशंकर आणि माताशंकर हे कथकमध्ये जुगलबंदी करणाऱ्या काही पहिल्या कलाकारांपैकी. अशा वातावरणात आम्ही नृत्याकडे वळणे हे स्वाभाविक असले तरी जुगलबंदी मात्र कोणाच्याच मनात नसणार. 
लहानपणापासून सारखे कपडे, सारखी दप्तरे-वह्या, बूट-चपला असा अनुभव घेत वाढता-वाढता कधी एकत्र नृत्यात उतरलो हे आम्हाला आणि आमच्या कुटुंबालासुद्धा समजले नाही. मग ते नृत्य बघून काका म्हणाले, आता एकत्रच कथक शिका आणि करा.... ! शिक्षण एकत्र सुरू झाले आणि त्यामुळे रियाजसुद्धा. तोडे-तुकडे-परण, चक्र दार करता करता काही वेगळेच घडतेय हे आम्हाला जाणवत होते. 
सौरवने एक छंद सुरू केल्यावर तोच छंद गौरव पुढे नेतो तेव्हा तो छंद करणारा नर्तक आमच्यासाठी एकच असतो. आरशातील प्रतिबिंब बघावे इतक्या बिनचूक सारखेपणाने आम्ही जेव्हा नृत्य करू लागलो तेव्हा जाणवू लागले, आम्ही विचारसुद्धा सारखाच करतो, नृत्याबद्दल आणि जीवनाबद्दल. तसे नसते तर जेव्हा नृत्यात एखादी उत्स्फूर्त जागा घ्यायची वेळ येते तेव्हासुद्धा दोघांच्या मनात येणारा तुकडा एकच कसा असतो? 
आईच्या पोटात असताना एकाच पोषणावर वाढत गेलेलो आम्ही फक्त शरीराने वेगळे झालो की काय? मन आणि विचाराने एकच राहिलो? आम्ही एकत्र नृत्य करणार हे असे नृत्याचे शिक्षण घेता-घेता ठरत गेले. कोणी न सुचवता, कोणीच न सांगता आणि कोणीही जाहीरपणे तसे न बोलता... 
पण तरीही आमचे म्हणून प्रत्येकाचे एक वैशिष्ट्य आहे. नृत्यात दोन अंग असतात. लास्य आणि वेग. लास्य म्हणजे स्त्रीसुलभ सुंदरता, भावदर्शन आणि नृत्यातील वेग. अंगांचे संचलन हे पुरु षाचे वैशिष्ट्य. दोन्ही मिळून अर्धनारी नटेश्वर साकारतो, जी आमच्या नृत्याची देवता आहे. आम्हा दोघांमध्ये गौरवचे भावदर्शन, लास्य अधिक प्रभावी आहे, तर सौरवचा वेग, जोम नृत्याला गती देणारा आहे. ही आमची वैशिष्ट्ये आमच्या रियाजातून आम्हाला समजत गेली. पण ती समजण्यासाठी जी मेहनत करावी लागली ती आमच्या सारख्या तरु ण शिष्यांना पण थकवून टाकणारी होती. शाळा आणि शिक्षण हे सगळे आमच्यासाठी फारच जुजबी, अगदी कामापुरते होते. बाकी आयुष्य म्हणजे फक्त नृत्य आणि त्याचा रियाज. अखंड दीड-दीड तास ततकार. कशासाठी तर पायाचा वेग आणि दमसास दोन्ही वाढण्यासाठी. त्यानंतर मग हस्तक आणि मुद्रा याचं शिक्षण आणि सराव. हाताच्या हालचालींमध्ये डौल येण्यासाठी आणि प्रभावी भावदर्शन होण्यासाठी... 
गुरू रविशंकरजी फक्त एकच गोष्ट रोज सांगायचे, पाना और दिखाना...! मिळवा, कमवा आणि रसिकांना दाखवा...! आता तर तेच आमच्या आयुष्याचे मक्सद झाले आहे. कुछ नया दिखानेके लिये हररोज कुछ नया पाना पडता है, कमाना पडता है...! आमचे घराणे बनारसचे. पण जसे गायकीने आता आपल्या घराण्यांच्या मर्यादा रुंदावत अनेक आपल्या घराण्याच्या चौकटीबाहेरचे प्रवाह आपलेसे केले आहेत तसेच नृत्यात पण घडते आहे. लखनौ घराण्याच्या बंदिशी पण आता आम्ही आपल्या मानल्या आहेत आणि आता तर शास्त्राच्या पुढे जाऊन आधुनिक काळाला आणि या काळात जगणाऱ्या तरु णांना आवडेल, समजेल अशा नृत्यशैलीचा विचार करावा लागतो. या पिढीला तबल्यापेक्षा ड्रम जवळचा वाटतो, हार्मोनियमपेक्षा गिटार आवडते आणि त्रिताल-चौतालापेक्षा घोड्याची चाल, रेल्वेची धडधड अधिक चटकन समजते. अशावेळी आम्ही परंपरेचे फार स्तोम माजवत नाही आणि आपल्या समृद्ध वगैरे वारशाच्या गोष्टीही त्यांना ऐकवायला जात नाही. आम्ही आमच्या नृत्यात त्याच परंपरागत बंदिशी सादर करतो. फक्त तबल्याऐवजी साथीला ड्रम घेतो. या मागचा विचार काय, तर शास्त्रीय नृत्य आणि त्यातील सुंदरता लोकांपर्यंत पोचणे महत्त्वाचे आहे आणि तेही परंपरेशी फार तडजोड न करता...
आमच्या या जगात आजच्या तरु ण पिढीचे व्हॉट्सअ‍ॅप आणि त्यावरील चॅट नाही, कारण नृत्याच्या पलीकडे आमचे जग नाही. त्या अर्थाने आमचे बनारस घराणे अजून पुरानी तमीज आणि तहजीब मानणारे आहे. बुजुर्ग समोर आल्यावर त्यांच्या पाया पडायचे असते यावर आमचा विश्वास आहे आणि गुरूंनी आखून दिलेल्या मर्यादा ओलांडून एक पाऊलसुद्धा पुढे जायचे नसते ही आमची श्रद्धा आहे भले ती आज कालबाह्य वाटली तरी.. 
वयाच्या अकराव्या वर्षी आम्ही दोघांनी आमचा पहिला जाहीर कार्यक्र म केला तो कशी संगीत सभेत. पद्मविभूषण किशन महाराज यांनी ही संगीत सभा आयोजित केली होती. आमचे नृत्य बघून त्यांनी तेव्हा आमच्या हातात पाचशे रुपयाची नोट आपली सही करून दिली आणि म्हणाले, ही खर्च करू नका. हा तुहाला मी दिलेला आशीर्वाद आहे. असेच एकत्र राहा..! तो आशीर्वाद सतत माथ्यावर आहे हे कधी जाणवते? - कालिदास महोत्सवात नागपूरमध्ये कार्यक्रम होता. त्यात गिरिजादेवीजी यांचे गायनही होते. आमचे नृत्य बघून त्या उत्स्फूर्तपणे म्हणाल्या, ‘चलो, हमारी ठुमरीके साथ जुगलबंदी करेंगे...’ आणि मग त्या त्यांची आवडती ठुमरी गायल्या, सावरिया प्यारा रे मोरी गुईया...! साक्षात गिरिजादेवीजी आमच्याबरोबर गात होत्या आणि आम्ही त्यांच्या कल्पनेतील सावरिया रंगमंचावर साकार करीत होतो..! ज्याक्षणी ही जुगलबंदी थांबली त्याक्षणी सगळा प्रेक्षकवर्ग उभा राहून टाळ्यांचा कडकडाट करीत होता आणि आमच्या डोळ्यात पाणी होते. पाणी झरणारे डोळे भले चार असतील, तो कृतार्थ भाव असणारे मन मात्र एकच होते, सौरव-गौरवचे...
 
सौरव-गौरव
आमचा आत्मा एक आणि शरीर दोन आहेत, पण याचा अर्थ आमच्यामध्ये एकमेकांत स्पर्धाच नसते का? ती जरूर असते. ती असते आमचे नृत्य अधिक बिनचूक, डौलदार आणि सफाईदार होण्यासाठी. त्यासाठी आम्हा दोघांना रंगमंचावर गेल्यावर आपले सर्वस्व द्यावे लागते. आमच्यात स्पर्धा असेल तर ती ही, त्या-त्या क्षणी आतमध्ये जे काही आजवर झिरपत गेले आहे ते सर्व प्राणपणाने व्यक्त करण्याची आणि असे सर्व काही देण्याची. आणि असे प्रत्येक वेळी ‘काळजात साचलेले तुफान’ उधळून देऊन नृत्य करण्याचा जो अनुभव असतो ना, तो बेभान करणारा असतो. त्याची झिंग काही वेगळीच..!