शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत मोदींच्या सभेसाठी वाहतूक मार्गात बदल; निवडणुकीसाठी काही रस्त्यांवर सहा दिवस नो पार्किंग!
2
आजचे राशीभविष्य - १४ नोव्हेंबर २०२४, सगळ्या कामात यश मिळाल्याने खूप आनंदी आणि प्रसन्न व्हाल
3
धक्कादायक! जळगावात गरोदर महिलेला घेऊन जाणाऱ्या ॲम्बुलन्समध्ये ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट; १५० फूट उंच उडाल्या चिंधड्या
4
शिवाजी पार्कवर आवाज कुणाचा?; १७ नोव्हेंबरला सभेसाठी मनसेला मंजुरी मिळण्याची शक्यता
5
मुंबईत प्लास्टिकच्या डब्यात तुकडे करून टाकलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले; प्रेमसंबंधाच्या विरोधातून हत्या!
6
नागपुरात कार्यकर्तेच बनले फडणवीसांच्या प्रचार मोहिमेचे सारथी
7
मार्कोची फास्टर फिफ्टी; पण शेवटी सूर्याची सेना जिंकली! आता फक्त टीम इंडियालाच मालिका विजयाची संधी
8
"आत टाका म्हणजे पक्षात टाका हे लोकांना कळलंच नाही"; ईडी कारवायांवरुन राज ठाकरेंची मिश्किल टिप्पणी
9
IND vs SA : विक्रमी धावसंख्येसह टीम इंडियाच्या नावे झाला सर्वाधिक शतकांचा खास रेकॉर्ड
10
IND vs SA: फ्लॉप शोचा सिलसिला संपला! Abhishek Sharma नं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा
11
BJP च्या विजयासाठी RSS ने आखली योजना; प्रत्येक मतदारसंघासाठी बनवला 1-2-3 चा फॉर्म्युला
12
"रोज उठतात अन्..."; ओ मोठ्या ताई, महासंसद रत्न, कुठलं बी टाकलं होतं? म्हणत चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल
13
केंद्र सरकारनं मणिपूरमध्ये रातोरात पाठले 2000 CAPF जवान, आता कशी आहे जिरीबाम मधील स्थिती?
14
शेतकऱ्यांना मोठा दिलासा! हंगामाच्या सुरुवातीलाच धानाला विक्रमी दर, केंद्र सरकारने 'ड्युटी' रद्द केल्याचा परिणाम
15
गौतम अदानी यांची मोठी घोषणा; अमेरिकेत करणार तब्बल ₹ 84 हजार कोटींची गुंतवणूक...
16
अन्... योगी आदित्यनाथांची सभाच रद्द झाली; भाईंदरचे भाषण ऐकविण्याचा प्रयत्न, नागरिक ३ तास ताटकळले
17
"पहिलं बटण दाबा, बाकीची खराब आहेत"; शिंदे गटाच्या कार्यकर्त्याकडून EVM बाबत चुकीचा प्रचार
18
सलग २ सेंच्युरीनंतर भोपळ्यावर भोपळा! Sanju Samson च्या नावे झाला लाजिरवाणा रेकॉर्ड
19
साहेब रिटायर झाल्यानंतर तुमच्याकडे कोण बघणार? अजित पवार म्हणाले,"मलाच आता..."
20
बाप डोक्यावर आणि मुले खांद्यावर घेऊन जगायची वेळ येईल...; उद्धव ठाकरेंची राणे पिता-पुत्रांवर टीका 

समाजभानाची दोन रुपं

By admin | Published: October 25, 2014 2:44 PM

श्रीमंताच्या मुलाचं लग्न म्हणून सामाजिक बांधिलकी दाखवण्यासाठी गावातील आश्रमशाळेतील मुलांना जेवण द्यायचे ठरले खरे; परंतु दातृत्वाची जाणीव न करून देता केलेले दान श्रेष्ठ असते. माणूस म्हणून मुलांना जवळ करा; भिक्षेकरी म्हणून नको, याची मात्र जाणीव करून द्यावी लागली.

 प्रा. डॉ. द. ता. भोसले

 
एका ध्येयवादी आणि विद्याप्रेमी शिक्षकाने आपल्या सेवानिवृत्तीनंतर आपल्या वार्धक्याला अधिक सुंदर करण्यासाठी एक आश्रमशाळा स्थापन केली. आदिवासी, भटक्या जाती-जमातीची आणि जिथे प्राथमिक शिक्षणाचीही पुरेशी सोय नाही, अशा डोंगरकपारीच्या मुला-मुलींना त्यांनी प्रेमाने कडेवर घेतले नि या आश्रमशाळेत आणले. त्यांची शिक्षणासह सार्‍या गोष्टींची सोय केली. त्यासाठी प्रारंभी काही वर्ष त्यांनी पोटाला चिमटा देऊन जमवलेली धनसंपदाही खर्च केली. काही वर्षांनी त्यांनीच पुढाकार घेऊन, तिचे संस्थेत रूपांतर केले. गावातली आणि परिसरातील प्रतिष्ठित व मान्यवर मंडळींना संचालक म्हणून घेतले. या आश्रमशाळेचे संस्कार शाळेत रूपांतर करीत असतानाच त्यांचे निधन झाले. शासनाची मान्यता आणि अनुदान मिळताच शाळेसाठी लागणारा सेवकवर्ग नेमला. परिसरातील आणि गावातली धनवान मंडळीही या आश्रमशाळेला कुठल्या कुठल्या निमित्ताने यथाशक्ती मदत करीत.
परीक्षा संपल्या शाळांना सुटी लागली, तरी भटक्या जमातीची अनेक मुले घरी न जाता आश्रमशाळेतच राहिली होती. भूक, भटकंती आणि तुच्छतेची वागणूक यापेक्षा आश्रमशाळेत राहून अभ्यास करणे अनेक मुला-मुलींना चांगले वाटायचे. अशी चांगली तीस-पस्तीस मुले-मुली आश्रमशाळेत रमली होती. आणि एके दिवशी कार्यालयात अधीक्षक आपले काम करीत असतानाच गावातली चांगली तीन-चार सधन मंडळी त्यांना भेटायला आली. चहापान आणि स्वागत झाल्यानंतर त्यातला एक जण म्हणाला, ‘साहेब आपल्या शेटजींच्या थोरल्या चिरंजीवाचा शुक्रवारी विवाह आहे. मोठय़ा थाटामाटात विवाह होणार आहे. सार्‍या गावालाच त्यांनी भोजनाचे आमंत्रण दिले आहे. आपल्या आश्रमशाळेतील सार्‍या मुलांना त्यांनी भोजनाचे आमंत्रण दिले आहे. समक्ष भेटून आमंत्रण देण्यासाठीच त्यांनी आम्हाला पाठविले आहे. या गरीब मुलांना तेवढेच गोडधोड खायला मिळेल.’ असे सांगताच अधीक्षकांचा चेहरा जरा गंभीर झाला. समोरची फाईल बंद करीत ते म्हणाले, ‘तुमच्या आमंत्रणाबद्दल मी मनापासून आभार मानले. पण, अनुभवातून मला जे वाटतं ते बोललो तर क्षमा करावी. एक तर आपला म्हणजे, आपल्या सार्‍या समाजाचा आणि समाजातल्या श्रीमंतांचा असा समज आहे, की अशा समारंभावेळी या उपाशी मरणार्‍या गरीब मुलांना जेवायला घालणे म्हणजे पुण्यप्राप्ती मिळविणे. त्यांच्यावर दया दाखवणे. त्यांच्यावर उपकार करणे. मुळात ही समजच थोडीशी चुकीची आहे. आमची ही मुले कुणाच्या आमंत्रणाची वाट बघत बसलेली नसतात. काहीतरी गोडधोड खाण्यासाठी आसुसलेली नसतात. आणि त्यासाठी हाता भिक्षेचा कटोरा घेऊन कुणाच्या घरासमोर भीक मागत उभी नसतात. नाचणीची अर्धी भाकरी, मूठभर उकडलेला भात आणि अंबाड्याची भाजी मिळाली, तरी ते आनंदाने खातात. तोच त्यांना अमृताचा घास वाटतो. त्यावर ते तृप्त होतात. तेव्हा उपकार म्हणून त्यांना तुमचे उष्टे-खरकटे खायला घालणे, मला माणुसकीचा केलेला अपराध वाटतो. तो ईश्‍वरी अपराध वाटतो. कुत्र्यासमोर टाकले जाणारे अन्न यांच्या ताटात टाकणे म्हणजे औदार्य नव्हे. आजकाल असल्या विकृत औदार्याचा समाजाला रोगच जडल्यासारखा झालाय.’ हे ऐकताच शेटजींकडून आलेलं शिष्टमंडळ एकदम बिथरले. त्यातला म्होरक्या म्हणाला, ‘काय बोलताय तुम्ही? आमच्या शेटजीचा हा अपमान आहे. ही बदनामी आहे. नाहीतरी पन्नास वेळा आम्ही दिलेल्या अन्नावर तुम्ही स्वत: आणि तुमची पोरं वर्षभर जगत असतात. शिवाय, आमच्या शेटजीचा वाईट अनुभव कधी आलाय? सारा गाव तुम्हाला मदत करतो म्हणून तर यांच्या अडचणी दूर होतात. यांच्या अंगाला कपडा मिळतो. आणि तरीही मदत करणार्‍या भावनेला तुम्ही शिव्या देता? नावे ठेवतात. हा नीचपणा झाला. जेवलेल्या ताटात मुतावे अशी गोष्ट झाली ही.’ सारे वातावरण गंभीर झाले. कुणीच बोलेनासे झाले. शिष्टमंडळ तर निखार्‍यासारखं लाल झालेलं होतं. थोड्या वेळानं अधीक्षक शांत व समजावणीच्या शब्दांत म्हणाले, ‘सरपंच, मला तुम्हाला किंवा शेटजींना नावं ठेवायची नाहीत. या मुलांकडे आपला समाज कसा बघतो, हे सांगायचं आहे. दातृत्वाची जाणीव न करून देता केलेले दान श्रेष्ठ असते. उपकाराचे प्रदर्शन न करता उपकार झाला तर माणूस मिंधा होत नाही. माणूस म्हणून त्याला जवळ करा. भिक्षेकरी म्हणून नको. मला माफ करा. पण, मागचा एक अनुभव सांगतो तुम्हाला- आमच्या या मुला-मुलींना असेच एका नाव असलेल्या श्रीमंतानं विवाहानिमित्तानं जेवायला बोलाविलं. अकरा वाजता गेलेल्या मुलांना अन्न मिळालं सायंकाळी पाच वाजता! तेही पत्रावळीवर उरलेलं उष्टं! या मधल्या काळात आमच्या या विद्यार्थ्यांना तिथल्या कारभार्‍यानं पत्रावळी गोळा करायला लावल्या. पाणी देण्यासाठी राबविले. चार-सहा मुलींना भांडी घासायला बसवलं. काहींना खरकटं सांडलेलं झाडायला सांगितलं. काही पोरांना पाहुण्यांच्या आलेल्या गाड्या पुसायला सांगितल्या. या आमच्या मुलांनी निमूटपणे सारे केले. पोटात भूक खवळलली असताना! याला औदार्य म्हणत नाहीत, याला शोषण म्हणतात. गुलामांचं केलेलं शोषण! सरपंच, ही लेकरंसुद्धा ईश्‍वराचाच प्रसाद आहे. ईश्‍वराचंच रूप आहे. यासाठीच मी ईश्‍वराचा केलेला अपराध म्हणतो.’
सरपंचाचा लालभडक झालेला चेहरा सौम्य झाला. तितकाच थंडगारही झाला. हातातल्या किल्लीशी खेळत ते म्हणाले, ‘असं कुणी केलं असेल तर चूक आहे. ते कर्तव्य म्हणून केलं पाहिजे. समाजाचं ऋण फेडण्याच्या भावनेनं केलं पाहिजे. मी तुम्हाला शब्द देतो, आमच्याकडून असं होणार नाही. त्यातूनही तुम्हाला वाटत असेल, तर या सार्‍या मुलांचं जेवण आम्ही इथं आश्रमशाळेत घेऊन येतो. अन् आम्ही स्वत: त्यांना प्रेमानं भरवितो. मग तर झालं?’ त्यावर हसतमुखानं अधीक्षक म्हणाले, ‘तसं नको. तेही बरोबर दिसत नाही. आमच्या मुलांना जो सन्मानानं बोलावतो, सन्मानानं खाऊ घालतो, प्रेमानं आग्रह करून वाढतो तो दाताही या मुलांनी बघायला हवा. कारण, संस्कार हे आचरणातून होतात, केवळ विचारातून नव्हे. त्यांच्या बद्दलची कृतज्ञता आमच्या विद्यार्थ्यांच्या मनात रुजली पाहिजे. उद्या त्यांनाही ही प्रेरणा मिळाली पाहिजे, असं मला मनापासून वाटतं. आमच्या संस्थापक गुरुजींनी हाच आदर्श आम्हासमोर ठेवलेला आहे. शिक्षण आणि संस्कार एकाच वेळी व एकत्रच रुजले पाहिजे. जसे मातीत पेरलेल्या बियाचा एक अंकुर रोप म्हणून भूमीवर येतो आणि दुसरा अंकुर मूळ म्हणून त्याला आधार देण्यासाठी भूमीखाली जातो, त्याप्रमाणे :’ इतका वेळ दाराच्या आडून ऐकत थांबलेला एक दहा-अकरा वर्षांचा पोरगा त्यांच्यासमोर आला नि अधीक्षकांना आर्जवी भाषेत म्हणाला, ‘सर, आम्ही लग्नाच्या ठिकाणीच जेवायला जातो. म्हणजे मला तिथल्या बँडच्या ठेक्यावर नाचून दाखवता येईल. मी आणि माझा वर्गमित्र आमच्या आदिवासी बोलीतील नाचता-नाचता गाणीसुद्धा त्यांना म्हणून दाखवू. फार भन्नाट असतात आमचे नाच. आमची गाणी.’
आणि त्याच्या या वाक्यावर सारे जण खळखळून हसू लागले.
(लेखक ज्येष्ठ साहित्यिक असून, मराठी भाषा, लोकसंस्कृती यांचे ज्येष्ठ अभ्यासक व निवृत्त प्राचार्य आहेत.)