- डॉ. मनीषा प्रभाकर पाटील
‘अठराव्या शतकाच्या उत्तरार्धातील गंगाराम चिंतामण नवगिरे तांबट यांचे एक स्वत:चे चित्र अर्थात सेल्फ पोर्ट्रेट आणि सोबतच त्यांच्या पुण्याजवळील एका आध्यात्मिक गुरूंचे किंवा बैरागी महाराजांचे चित्र आहे. महाराष्ट्रातील मराठी चित्रकाराचे हे पहिले सेल्फ पोर्ट्रेट असावे. जेम्स वेल्स या इंग्रज चित्रकाराने १७९० च्या दरम्यान पुण्यात शनिवारवाड्यात कला शाळा सुरू केली. त्यात शिकलेला हा मराठी चित्रकार..’
इंग्रजीमध्ये नुकताच एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प साकारला गेला असून, त्याचे नाव आहे, ‘एनसायक्लोपीडिया : व्हिज्युअल आर्ट ऑफ महाराष्ट्र’. या कोशात अशा अनेक नोंदी आहेत. शिवाय, १८५७ मध्ये स्थापन झालेल्या कला परंपरेत शिक्षण घेतलेल्या आणि नावारूपाला आलेल्या तब्बल ३०७ निवडक चित्रकार शिल्पकार आणि उपयोजित चित्रकारांची मौलिक माहिती आहे. भारतात प्रथमच होणाऱ्या या इंग्रजी कोशात पेस्तनजी बोमनजींपासून ते व्ही. एस. गायतोंडेंपर्यंत आणि शिल्पकलेत रवींद्रनाथ टागोरांनी नावाजलेल्या जी. के. म्हात्रेंपासून १९६० पर्यंत जन्मलेल्या अनेक महत्त्वपूर्ण चित्र शिल्पकारांची नोंद घेतलेली आहे. यात रविवर्मा, धुरंधर, दलाल, मुळगावकर आहेतच. त्यासोबतच व्यंगचित्रकलेच्या क्षेत्रातील आर. के. लक्ष्मण व बाळासाहेब ठाकरेही आहेत.
चित्रकार व लेखक सुहास बहुळकर व कला समीक्षक दीपक घारे हे कोशाचे संपादक असून, चित्रकार सुधीर पटवर्धन व दिलीप रानडे हे सहसंपादक आहेत. हा इंग्रजी कोश मुंबईस्थित पंडोल आर्ट गॅलरीचे संचालक दादीबा पंडोल यांनी प्रकाशित केला आहे. या कोशात महाराष्ट्रातील दृश्यकलेचा सुमारे दोनशे वर्षांचा इतिहास प्रथमच इतक्या विस्तृतपणे व पुराव्यांसह मांडला आहे.
सर जमशेटजी जीजीभाय या प्रतिष्ठित पारशी उद्योजकाने आर्ट स्कूलच्या स्थापनेकरिता मोठी देणगी दिली व फलस्वरूप सन १८५७ मध्ये सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टची स्थापना तेव्हाच्या बॉम्बे शहरात (मुंबईत) झाली. प्रारंभीच्या दशकांमध्ये रुजविण्यात आलेला ब्रिटिश (पाश्चात्त्य) पद्धतीचा अभ्यासक्रम कला संस्थेचा महत्त्वपूर्ण पाया ठरला. पुढे अनेक स्थित्यंतरे झाली. कलाप्रवाह बदलले, पण ‘बॉम्बे स्कूल’चा आत्मा मात्र अबाधित राहिला. कोशात बॉम्बे स्कूलचा अर्थ केवळ कला संस्थेपुरता मर्यादित नसून, इथली शिक्षणप्रणाली, कला शाळेतल्या तालमीत तयार झालेले चित्रकार व शिल्पकार तसेच त्यांची कर्तृत्ववान कामगिरी व योगदान, महाराष्ट्रात मुंबईव्यतिरिक्त इतर ठिकाणच्या कलावंतांचे कार्य, मुंबई शहराच्या जडणघडणीत संस्थेचे स्थान असे अनेक पैलू या कोशाला आहेत. सुमारे सात वर्षांपूर्वी साप्ताहिक ‘विवेक’च्या सौजन्याने महाराष्ट्रातील दृश्यकला क्षेत्रात योगदान देणाऱ्या चित्रकार व शिल्पकारांचा कोश मराठीत प्रकाशित झाला. त्यास मराठी वाचक व अभ्यासक यांच्याकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. हा मौल्यवान कोश इंग्रजी भाषेत असल्यास अधिक व्यापकपणे वाचकांपर्यंत पोहचेल या विचारातून संपादकीय मंडळींनी हे कार्य हाती घेतले व त्याचे मूर्तरूप म्हणजेच ‘Visual Art of Maharashtra:Artists of the Bombay School and Art Institutions (Late 18th to Early 21st Century) हा कोश होय. महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, औरंगाबाद, कोल्हापूर, सोलापूर, सांगली, कोकण, नाशिक, नागपूर अशा विविध भागांतील एकूण ३०७ नोंदी यात आहेत. यात कर्तृत्ववान चित्रकार, शिल्पकार व उपयोजित चित्रकारांचा समावेश आहे. यात २७ नोंदी नव्याने घातल्या आहेत.
महाराष्ट्रातील दृश्यकलेचा प्रवास अर्थात आदिमानवाची कला, आदिवासी कला, ग्रामीण कला, अभिजात आणि आधुनिक कला या सर्वांचेच आकलन करून देणारी सुहास बहुळकर व दीपक घारे यांनी लिहिलेली ७६ पानांची प्रस्तावना हे या कोशाचे वैशिष्ट्य आहे. याशिवाय सिंहाचा वाटा असणाऱ्या सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट (१८५७), द बॉम्बे आर्ट सोसायटी (१८८८), द आर्ट सोसायटी ऑफ इंडिया (१९१८) आणि आर्टिस्ट्स सेंटर (१९३९) अशा महत्त्वाच्या चार संस्थांची माहिती या कोशात प्रथमच येत आहे. यासोबतच १,४०७ कृष्णधवल चित्रे व १३२ पानांचा रंगीत चित्रांचा विभाग यांनी या कोशाचे महत्त्व वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. कलाविद्यार्थी, कलाशिक्षक, कलावंत, कला अभ्यासक आणि कला रसिकांसाठी हा कोश अत्यंत उपयुक्त आहे.
२ मार्च २०२१ या दिवशी, अर्थात सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टच्या १६४ व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने मुंबईतील सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टच्या आवारात सर जमशेटजी जीजीभाय यांचे वंशज रुस्तम जीजीभाय यांच्या हस्ते या कोशाचे प्रकाशन करण्यात आले. सहा वर्षांच्या अनेकांच्या अथक परिश्रमांनंतर साकार झालेला हा कोश अनेक पिढ्यांसाठी मार्गदर्शक ठरेल. मी या प्रकल्पात लेखक आणि भाषा संपादक म्हणून सहभागी झाले, याचा मला सार्थ अभिमान आहे.
कोशाच्या अधिक माहितीसाठी books@pundoles.com वर संपर्क साधावा
(सेवानिवृत्त प्राध्यापिका, कला इतिहासकार व चित्रकार)
artreasureindia@gmail.com.