- नम्रता भिंगार्डे‘आमचं गाव वनक्षेत्नात येतं. काही दिवसांपूर्वी वनखात्याचे लोकं जंगलात एक डोह खणत होते आणि मे महिन्यात त्या डोहाला पाणी लागलं. ते पाणी बघण्यासाठी आमच्या गावातले झाडून सगळेजण गोळा झाले होते. दिवसभर त्या पाण्याच्या अवतीभवती राहिले. ताई, आमच्या गावात टँकर येतोय रोज. लहान पोरांपासून काठी टेकत चालणार्या म्हातार्यांपर्यंत पाणी भरण्यासाठी पायपीट करत आहेत. जवळपास कुठेही जनावरांसाठीही पाणी नाही. अशावेळी त्या डोहात पाणी लागल्यावर आमचे गावकरी आशेने ते पाणी पाहण्यासाठी गेले. असं नातं हाय आमचं पाण्याशी.. दुरून ते पाणी नुसतं पाहूनही आम्हाला सुख लागलं.’ - पुसद तालुक्यातल्या चिरंगवाडी गावातले तोरबा चिरंगे सांगत होते..आजची पहाट चिरंगवाडीसाठी वेगळी होती. गावातले सगळेजण देवळाच्या पाराजवळ जमत होते. तोरबा चिरंगे घरचं कार्य असल्यासारखं इथून तिथे करत होते. आपापली कुदळ, फावडं आणि टोपलं सांभाळत गावकरी जमले आणि अतिशय शिस्तबद्ध रांगेत निघाले. दरवर्षी टँकरच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या या गावाने एक अविश्वसनीय निर्णय घेतला होता. टेकडीपलीकडे असलेल्या गंगनमाळ गावात सुरू असलेल्या जलसंधारणाच्या कामाला हातभार लावण्यासाठी हे सगळे गावकरी पहाड चढायला लागले.यवतमाळ जिल्ह्यातले एकमेकांना लागून असलेले दोन तालुके.. उमरखेड आणि पुसद. पानी फाउण्डेशनची जलचळवळ उमरखेड तालुक्यात चांगलीच परिचित झाली आहे, मात्न पुसद तालुका वॉटरकप स्पर्धेसाठी निवडला गेलेला नव्हता.पुसद तालुक्यातलं चिरंगवाडी आणि उमरखेड तालुक्यातल्या गंगनमाळ या दोन गावांमध्ये एक मोठी टेकडी आहे. टेकडीच्या खाली चिरंगवाडी तर टेकडीवर गंगनमाळ अशी भौगोलिकदृष्ट्या वेगवेगळी असलेली ही दोन्ही गावं पाणीटंचाईच्या बाबतीत मात्न समान आहेत. शेजारचं गाव गेल्या दोन वर्षांपासून दुष्काळाशी लढण्यासाठी र्शमदानातून जलसंधारणाची कामं करत आहे हे कळल्यानंतर चिरंगवाडीमधल्या गावकर्यांनी एकमताने ठरवलं आणि एका सकाळी तब्बल 150 चिरंगवाडीकर आपापल्या घरातून बाहेर पडले. उगवणार्या सूर्यासोबत शिस्तबद्ध पद्धतीने सगळेजण रांगेत टेकडी चढू लागले. मुलांची टोळी टणाटण उड्या मारत मोठय़ा आनंदात चढत होती, त्यांच्यामागे डोक्यावर टोपलं घेऊन झपाझप चालणार्या बायका आणि सर्वात शेवटी खांद्यावर कुदळ किंवा फावडं घेऊन चालणारी काटक माणसं.. पानगळीमुळे उघडी बोडखी आणि पिवळट झालेली टेकडी बायकांच्या विविध रंगांच्या साड्या आणि टोपल्या यांच्यामुळे खुलून दिसायला लागली.‘पाणी म्हणजे सुख हाये ताई, घरात लग्नकार्य आसलं, आजारपण आसलं तरी आम्हाला डोक्यावरनं पाणी आणनं चुकलं नाई. हाफशी पाशी जाऊन बसायचं हांडे घेऊन. थोडं थोडं पाणी जमा करण्यात दिवस घालवायचा. स्वत: उपाशीपोटी राहून घरात स्वयंपाक करून घालायचा आणि परत पाण्यामागे धावायचं.’ मोठा चढ चढल्यानंतर पाणी पिण्यासाठी सावलीला थांबलेल्या 27 वर्षांच्या सुमित्नाताई चिरंगे मनातलं बोलत होत्या. ‘आमच्या गावाच्या आसपास टेकड्या आहेत; पण पाणी पडलं की तसंच वाहून जातंय. कुठं थांबलं, मुरलं, साठून राह्यलं तर आम्हाला उन्हाळ्यात पाणी मिळेल ना? मग त्यासाठी कायतरी उपाय करायला पाह्यजेत हे आत्ता आत्ता आम्हाला माहीत झालं. आज आम्ही गंगनमाळला र्शमदानात मदत करू तर उद्या ते आमच्याही मदतीला येतील आणि आमच्यापण गावात असं काम होईल. आमच्या गावातपण पाणी आलं तर आम्ही सुखी होऊ.’ सुमित्नाताईंच्या या बोलण्याला होकार देत रत्नकला डफडी आणि यांच्यासोबतच्या इतर बायकांनी पुढे चालायला सुरुवात केली. सूर्य आणखी वर आला होता. टेकडी चढून आलेल्या गावकर्यांना गंगनमाळच्या वेशीवर पोहोचायला सकाळचे 9 वाजले.गंगनमाळचे सर्व गावकरी कौतुकाने चिरंगवाडीतून आलेल्यांची गळाभेट घेण्यासाठी वेशीवरच थांबून राहिले होते. पैदल आलेल्या गावकर्यांचे पाय धुवून त्यांचं स्वागत केलं. र्शमदानासाठी दोन्ही गावातले गावकरी एकत्न निघाले. ‘गंगनमाळ गावाचं हे तिसरं वर्ष आहे वॉटरकपमध्ये भाग घ्यायचं. दोन वर्ष आमची अशीच गेली. कोणी काम करायचं, कोणी नाही. मागच्या दोन वर्षात झालेल्या थोड्याफार कामाचा फायदा दिसायला लागल्यानंतर यंदा सगळ्या गावकर्यांनी एकजुटीनं काम करायचं मनाशी ठरवलं. आज आमच्या गावात पाणी येण्यासाठी एवढय़ा दूर पहाड चढून लोकं आले. आम्ही गावकरीही त्यांच्या गावात हेच काम करण्यासाठी जाणार आणि त्यांच्या या कृतीची परतफेड करणार !’ र्शमदानासाठी आलेल्या महिलांचे पाय धुवून स्वागत केलेल्या गंगनमाळ गावच्या संगीता बावळे भावुक होऊन बोलत होत्या. दोन्ही गावांमधले रहिवासी तेंदूपत्ता गोळा करून त्याच्या विक्र ीतून उपजीविका करतात. आज र्शमदान करण्यासाठी दुसर्या गावात जायचं म्हणून चिरंगवाडीचे गावकरी तेंदूपत्ता गोळा करायला जंगलात गेले नाहीत आणि र्शमदानासाठी दुसर्या गावातून लोक येणार म्हणून गंगनमाळमधल्या गावकर्यांनीही तेंदूपत्ता गोळा करायला न जाता त्यांची वाट पाहणं पसंद केलं. ज्या वनडोहाच्या पाण्यामुळे चिरंगवाडी गावाला र्शमदानासाठी चढावरच्या गावात जावं वाटलं त्या वनडोहाच्या कामाची जबाबदारी असलेले उमरखेडचे वनपरिक्षेत्न अधिकारी विठ्ठल मळघणे सातत्याने तिथल्या अनेक गावांमध्ये फिरत असतात.‘रोजमजुरी, तेंदूपत्ता आणि डिंक गोळा करणे अशी इथली उपजीविकेची साधनं आहेत. पण रोजगारापेक्षा इथला पाण्याचा प्रश्न जास्त जटिल आहे. त्यामुळेच पाणी या सार्वजनिक प्रश्नावर ही दोन गावं एकत्न आली. आम्ही वनखात्यातर्फे अनेक कामं करत असतो, मात्न त्यात गावकरी सहभाग घेत नाहीत, उलट दुर्लक्ष करतात. मात्न स्पर्धेच्या निमित्ताने हा जो काही लोकसहभाग या जलसंधारणाच्या कामाला मिळाला आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. एकंदरच पाण्यासाठी एकत्न आलेले हे सगळेजण आत्मीयतेने ही कामं करत आहेत.’ वनखात्यातल्या आपल्या संपूर्ण स्टाफसह विठ्ठल मळघणे यांनीही गावकर्यांच्या सोबत र्शमदान केलं.पाणी मिळवण्यासाठी एकमेकांशी भांडणारी एकाच गावातली कुटुंबं पाहिलेले अनेकजण भेटतील, मात्न शेजारच्या गावाला पाणी मिळावं म्हणून तीन किलोमीटरची टेकडी चढून त्या गावाच्या शिवारात र्शम करण्यासाठी जाणारं गाव आणि गावकरी क्वचितच पहायला मिळतात. namrata@paanifoundation.in(लेखिका पानी फाउण्डेशनच्या सोशल मीडिया मॅनेजर आहेत.)
दोन गावं, एक गोष्ट!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2019 6:01 AM
पुसद तालुक्यातलं चिरंगवाडी आणि उमरखेड तालुक्यातलं गंगनमाळ. या दोन गावांमध्ये एक मोठी टेकडी आहे. शेजारचं गाव गेल्या दोन वर्षांपासून दुष्काळाशी लढण्यासाठी श्रमदानातून जलसंधारणाची कामं करत आहे हे कळल्यानंतर चिरंगवाडीमधल्या गावकर्यांनीही एकमताने ठरवलं आणि एका सकाळी तब्बल 150 चिरंगवाडीकर आपापल्या घरातून बाहेर पडले..
ठळक मुद्देशेजारच्या गावाला पाणी मिळावं म्हणून टेकडी चढून श्रमदानाला जाणारं गाव.