Uddhav Thackeray on Dharavi Redevelopment : धारावी झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पावरुन महाविकास आघाडीने महायुती सरकारला धारेवर धरलं आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी या प्रकल्पाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. अशातच मी धारावीच्या विकासाआड नाही, धारावीकरांना तिथल्या तिथं घर मिळालंच पाहिजे, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी धारावी पुनर्विकास प्रकल्पाबाबत भाष्य केलं. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांच्याबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नावरही सूचक विधान केलं आहे.
उद्धव ठाकरे हे कुटुंबासह तीन दिवसीय दिल्ली दौऱ्यावर आहेत. यावेळी पत्रकारांशी बोलताना उद्धव ठाकरे यांनी धारावी झोपडपट्टी पुनर्विकासाच्या प्रकल्पावरुन विकसक अदाणी यांच्यावर निशाणा साधला. जो कोणी मुंबईची विल्हेवाट लावेल त्यांच्या विरोधात मी उभा आहे, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी इशारा दिला. यावेळी त्यांनी अदानी माझे शत्रू नाहीत असेही म्हटलं आहे.
मी धारावीच्या विकासाआड नाही, धारावीकरांना तिथल्या तिथं घर मिळालंच पाहिजे. धारावीतल्या लोकांना अपात्र ठरवून मुंबईत एका धारावीच्या २० धारावी करण्याचा डाव अदानींच्या माध्यमातून सरकारकडून सुरू आहे. पण ते आम्ही होऊ देणार नाही. कोणीही आले तर आम्ही मुंबईची विल्हेवाट लावू देणार नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
धारावीत टीडीआर काढला गेला तेव्हा टीडीआर वापरण्याची जबाबदारी अधिकाऱ्यांना देण्यात आली. हा सगळा गैरप्रकार आहे आणि आम्ही कुठलीही चुकीची गोष्ट होऊ देणार नाही. सरकार आल्यानंतरही टेंडरच्या बाहेरच्या गोष्टी होऊ देणार नाही. त्या टेंडरच्या अटी अदानींना जमत नसतील तर त्यांनी सांगावे आणि नव्याने टेंडर काढावे. तसेच आतापर्यंत मिठागरांची जमीन वापरली जात नव्हती. मात्र आता अदानींसाठी धारावीतील लोकांना तिथे पाठवण्याचा घाट घातला जात आहे. अदानी माझे शत्रू नाहीत. पण जो कोणी मुंबईची विल्हेवाट लावेल त्यांच्या विरोधात मी उभा आहे. जो मुंबईचा शत्रू तो माझा शत्रू, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.
यावेळी पत्रकरांनी शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावरील भेटीबाबतही प्रश्न विचारला. शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बैठकीत अदानी यांच्या समुहाचे धारावी पुनर्वसन प्रकल्पाचे तीन बडे अधिकारीही उपस्थित असल्याचे म्हटलं जात आहे. शरद पवारांनी अदानींबद्दल भूमिका स्पष्ट करावी अशी आपली मागणी आहे का? असा सवाल उद्धव ठाकरेंना विचारला गेला. त्यावर बोलताना आपण तिथे नव्हतो असं उद्धव ठाकरे म्हणाले.
"त्या बैठकीत मी तर नव्हतो. त्याबद्दल पवार साहेबच बोलू शकतील. हे बघा, कोणाची भूमिका काय असावी यापेक्षा माझी भूमिका स्पष्ट आहे. मी धारावीकरांच्या विकासाच्या आड आलेलो नाही. धारावीकरांना तिथल्या तिथे घर मिळालं पाहिजे, ही आमची आग्रहाची मागणी आहे, असं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं.