- गजानन दिवाण
देशात जवळपास 55 हजार किलोमीटरचे असे रस्ते आहेत जे संरक्षित जंगल किंवा परिसरातून जातात. यातील अनेक रस्ते वन्यजिवांच्या भ्रमणमार्गात येतात. राष्ट्रीय महामार्ग 44चे उदाहरण घेतल्यास कान्हा, सातपुडा, पेंच, बांधगड, पन्ना व्याघ्र प्रकल्पांना भेदून हा महामार्ग जातो. देशातील दुसरा सर्वात मोठा महामार्ग-6 सुरत ते कोलकाता असून तो मेळघाट, बोर, नागझिरा, सिमलीपाल व्याघ्र प्रकल्पांसह इतर सात राष्ट्रीय उद्याने, अभयारण्यांना भेदून जातो.
अभयारण्ये, राष्ट्रीय उद्याने आणि वन्यजिवांच्या भ्रमणमार्गाला छेदून जाणार्या मार्गावर रस्ते व रेल्वे अपघातांत दरवर्षी मोठय़ा संख्येने वन्यजिवांचा बळी जातो. त्यामुळे अशा क्षेत्रातून जाणार्या महामार्गाला वन्यजीवप्रेमींचा विरोध होतो. वन्यजिवांचा विचार केला, तर मग विकासाचा महामार्ग थांबतो. असा मोठा पेच आतापर्यंत सरकारसमोर असायचा. नागपूर ते जबलपूर महामार्गाचेही असेच झाले. महाराष्ट्रातील पेंच व्याघ्र प्रकल्प आणि मध्यप्रदेशातील कान्हा व्याघ्र प्रकल्पांना जोडणारा प्राण्यांचा भ्रमणमार्ग या महामार्गाच्या चारपदरीकरणामुळे धोक्यात येईल, या भावनेतून मोठा विरोध झाला. जवळपास 10 वर्षे हा लढा चालला. अखेर न्यायालयाने परवानगी तर दिली. मात्र, त्यासाठी वन्यजिवांची हानी होणार नाही, याची अटही घातली. त्यामुळे यावर उपाययोजना कशा असाव्यात, याबाबत अभ्यास करण्याची जबाबदारी डेहराडून येथील भारतीय वन्यजीव संस्थेला देण्यात आली. त्यांच्या सूचनेनुसार महाराष्ट्रातील नागपूर ते जबलपूर या राष्ट्रीय महामार्ग 44 वर पेंच व्याघ्र प्रकल्पाजवळ 16 कि.मी.च्या क्षेत्रात 255 कोटी रुपये खचरून चार लहान पूल, तसेच पाच ‘अंडरपास’ तयार करण्यात आले. अंडरपासचा किती प्राणी वापर करतात हे समोर आले (चौकट पाहा) पण हा अंडरपास नाकारून त्याजवळच काही प्राण्यांनी चक्क मार्गावरून जाणे पसंद केले. याच काळात अंडरपासच्या आजूबाजूला या महामार्गावर चार बिबटे अपघातात मरण पावले. एक वाघ या महामार्गावरून ओव्हरपासवर चालत असतानाचा व्हिडिओ व्हायरला झाला. इतर दोन वाघ अपघातात जखमी झाले. अंडरपासच्या अगदी जवळ घडलेल्या या सर्व घटना आहेत. याचा अर्थ 100 टक्के प्राणी या अंडरपासचा उपयोग करतातच, असे नाही; पण म्हणून हे अंडरपास करायचेच नाहीत, असेही नाही. झालेल्या चुकांमधून सुधारणा करून नवनवीन उपाययोजना केल्या जात आहेत. आधी अंडरपासेस 350 मीटर, 200 मीटर, 100 मीटर, असे होते. प्राण्यांच्या अधिवासानुसार अंडरपासची लांबी आणि रुंदी ठेवण्याची सूचना मान्य करण्यात आली. ओव्हरपास करीत असताना 30 मीटर उंचीचा आणि 45 मीटर उंचीचा, असे दोन ओव्हरपास एकाच क्षेत्रात करण्याचे ठरले. यामुळे प्राणी नेमका कोणता ओव्हरपास वापरतात, याचा अभ्यास करणे सोपे होणार आहे. असे सकारात्मक बदल आता होत असल्याची माहिती राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य किशोर रिठे यांनी दिली. माणूस आणि वन्यप्राण्यांना जोडणारा असाच विकासाचा महामार्ग अनेक ठिकाणी सुरू आहे. आपल्या राज्यात काम पूर्ण झाल्यानंतर सध्या महामार्ग 44चे पुढे मध्यप्रदेशमध्ये काम सुरू आहे. महाराष्ट्रात समृद्धी महामार्ग 115 कि.मी. वनक्षेत्रातून जातो. त्यामुळे या महामार्गावर ओव्हर पासेस आणि अंडरपासेस जास्त आहेत. त्याचेही काम सुरू आहे. मुंबईत तुंगारेश्वेर आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामधील मार्गाचे काम सुरू होणे बाकी आहे. माणूस आणि वन्यजीव यांच्यातील संघर्षाच्या घटना वाढलेल्या असतानाच दोघांना जोडणारा हा विकासाचा महामार्ग असा वाढत राहावा, एवढीच अपेक्षा.
‘क्रॉस’ करणारे प्राणी नागपूर ते जबलपूर : राष्ट्रीय महामार्ग 44 वर पेंच व्याघ्र प्रकल्पाजवळ 16 कि.मी.च्या क्षेत्रात 255 कोटी रुपये खचरून चार लहान पूल, तसेच पाच ‘अंडरपास’ तयार करण्यात आले. 1. मार्च ते डिसेंबर 2019 दरम्यान किती वन्यप्राण्यांनी याचा वापर केला हे पाहण्यासाठी भारतीय वन्यजीव संस्थेने 78 कॅमेरे लावले. यातून एक लाख 32 हजार 532 छायाचित्रे मिळाली. 2. या ‘अंडरपास’मधून दहा महिन्यांत सुमारे पाच हजार 450 वन्यप्राणी गेले. या ‘अंडरपास’चा सर्वाधिक तीन हजार 165 वेळा वापर हरणांनी केला. पाठोपाठ 677 वेळा रानडुकरांनी वापर केला.3. आपला राष्ट्रीय प्राणी वाघानेदेखील 89 वेळा हा ‘अंडरपास’ वापरला. रानमांजर, ससे, साप यासारख्या प्राण्यांनीदेखील त्याचा वापर केला.- याचा अर्थ कुठल्याच वन्यजिवाला विकासाचा हा महामार्ग आपल्या मार्गातील आडकाठी वाटला नाही.
gajanan.diwan@lokmat.com(लेखक लोकमतच्या औरंगाबाद आवृत्तीत उप वृत्तसंपादक आहेत.)