(मुलाखती व शब्दांकन : अभय नरहर जोशी, प्रज्ञा केळकर -सिंग )
दिवाळी अंकांनी मला खूप काही दिलं, पण
कोरोेनाकाळाचा अनुभवही वेगळाच होता.
लोकही त्या भयातून आता बाहेर येताहेत.
- अभिराम भडकमकर
कोरोनावर ‘काॅमेडी’ करायचीय..
सध्याचा कोरोनाकाळ अनुभवल्यानंतर मी कॉमेडी लिहायचं ठरवलं आहे.. लोकांना आता हसायचं आहे.. कोरोनाकाळ संपायला लागल्यानंतर लोक आता मागं वळून पाहत आहेत अन् ते स्वतःवर हसायला तयार झाले आहेत. आपण त्यावेळी कसे वागलो, यावर त्यांना हसू येऊ लागलंय. लोक हळूहळू त्या काळातून बाहेर पडत आहेत, असं लक्षात यायला लागलं आहे.. मला एकटेपणाची खूप सवय आहे. मी खूपसा घरातच असतो. मला माझ्या आयुष्यात फार विलक्षण बदल झालाय, असं वाटलं नाही. सक्तीचं घरात बसण्याचा मला त्रास झाला. या कोरोनकाळाकडे मागे वळून पाहताना फार काही मोठा बदल माझ्या आयुष्यात झालाय, असं मला वाटलं नाही. माझा मित्रपरिवार फार मोठा आणि वेगवेगळ्या प्रकारचा आहे. त्यांच्याशी मोबाईलद्वारे मी संपर्कात होतो. या काळात घरात कधीतरी वाचायची, अशी घेऊन ठेवलेली पुस्तकं मी वाचली. पहिले साडेतून महिने अगदी स्वयंपाकाचा कंटाळा येईपर्यंत मी मुंबईत राहिलो. ई पास सुरू झाल्यावर मी पुण्यात आलो. कोरोनाचा मानसिक परिणाम माझ्यावर झाला नाही. मी कमी लिहितो. माझी लेखनप्रक्रियाही संथ आहे. या काळात लिहिलं काही नाही. पण वाचलं भरपूर. माझा खूप मोठा काळ कोरोनामुळे वाया गेला, असं मला वाटलं नाही.
माझ्या कादंबऱ्यांविषयी...
माझ्या कादंबरीत दृश्यात्मकता आहे. माझ्या लेखनात नाटकातला बंदिस्तपणा आहे. नाटकातला बंदिस्तपणा हे नाटकाचं बलस्थान आहे. कादंबरीत खुला कॅनव्हास मिळतो, त्याचं स्वतःचं असं बलस्थान आहे. ‘ऍट एनी कॉस्ट’ या कादंबरीचा माझा अनुभव चांगला होता. बऱ्याच जणांची अशी प्रतिक्रिया होती, की पडद्याच्या पाठीमागे असं चालतं हे आम्हाला माहीत नव्हतं. न्यूज चॅनेल इंडस्ट्रीशी संबंधित लोकांनी सांगितलं, की बरं झालं तू मांडलंस. इंडस्ट्रीमध्ये नसलेल्या वाचकांचा जास्त प्रतिसाद मिळाला. अनेकांचा या विश्वावर विश्वास बसायचा नाही. ते विचारायचे, की खरंच असं होतं की तू अतिशयोक्त मांडणी केलीस का, यात नाट्यात्मकता तू आणलीस का, अशी विचारणा अनेक जण करायचे. गांभीर्यानं लिहिणं सोडलंय असं नाही. काॅमेडी सातत्यानं लिहीत आलोय. ‘इन्शाल्लाह’ या कादंबरीचा विषयच असा होता, की त्याला तसंच मांडावं लागलं. ‘ इन्शाल्लाह’ लिहितानाही त्यातील काही टोकाचा विचार करणाऱ्या पात्रांच्या तोंडी एक-दोन वाक्यं मी हसू आणणारी टाकली आहे.
‘इन्शाल्लाह’ ही कादंबरी मला लिहावीशी वाटली, कारण माझं सगळं लहानपण मुस्लिम वस्तीत गेलं आहे. मुस्लिम समाजाकडे पहाण्याचे आपल्याकडे सरळ सरळ दोन दृष्टिकोन आहेत. एक तर संशयानं पहायचं, किंवा उर्वरित समाजाकडून त्यांच्यावर फार अन्याय होतोय, म्हणून तो असुरक्षित आहे, या दृष्टीनं पाहायचं. मला असं वाटतं, की मुस्लिम समाजासह बहुसंख्याक समाजानंही आत्मपरीक्षण केलं पाहिजे. मुस्लिम समाजातला अंतःप्रवाह मला मांडायचा होता. हे मांडताना मला भीती वाटली नाही. सध्याच्या गढुळलेल्या वैचारिक वातावरणात सर्व प्रकारची कट्टरता आहे. या कादंबरीबाबत मात्र मला जाहीर प्रतिक्रिया मिळाली नाही. मौनच बाळगलं गेलं. ही कादंबरी आवडल्याची प्रतिक्रिया दिल्याचं एखाद्यानं सांगितल्यावर मी त्याला तसं फेसबुकवर जाहीर प्रतिक्रिया द्यायला सांगितली, की संबंधित व्यक्ती ती टाळते. सध्याच्या वैचारिक विश्वाला धक्का देणारी, प्रश्न विचारणारी अशी ही कादंबरी आहे. स्वत:ला आरशात पाहणं सध्याच्या वैचारिक विश्वाला जमत नाही, तेवढा मोकळेपणा आपल्याकडे उरला नाही, हे यानिमित्ताने मला अनुभवायला मिळालं. माझ्या वस्तीतील दोन जणांची प्रतिक्रिया या कादंबरीच्या प्रकाशन सोहळ्यात मी दिली, त्यांच्या पत्नींनी मला आवर्जून प्रतिक्रिया दिली. एका बाजूला अंबरीश मिश्र, विश्वास पाटील, अरुणा ढेरे या मान्यवरांच्या प्रतिक्रिया येतात. त्याच बरोबर फेसबुकवर वाचकांच्या प्रतिक्रिया येतात. त्यामुळे माझ्या या कादंबरीविषयी सकारात्मक वातावरण आहे व ती सर्वदूर पोहोचते आहे.
दिवाळी अंकांमुळेच लेखक समजले
मिशी फुटणं आणि मतं फुटण्याच्या वयात दिवाळी अंकांमुळे इतके चांगले चांगले लेखक परिचित झाले. त्यांचे साहित्य, शब्दसंपदा, विषय आणि आशय दिवाळी अंकांमुळे समजला. त्यामुळे वाचन वाढण्यास मदत झाली. दिवाळी अंकांतील लेखकाचं बाकी काय लेखन आहे, याचं शोध वाचनालयात घेणं हे वर्षभराचं काम होऊन बसायचं. ही सततची प्रक्रिया असल्याने दिवाळी अंकांनी माझ्यातला वाचकही घडवला आणि लेखकही घडवला. जेव्हा माझं लेखन दिवाळी अंकांतून छापून यायला लागलं. तेव्हा दिवाळी अंकांच्या उज्ज्वल परंपरेचा आपण भाग बनल्याची माझी भावना झाली.
- अभिराम भडकमकर
(प्रसिद्ध नाटककार, लेखक आणि रंगकर्मी)
----------------------------------------------------------------------
चमकदार लिहिण्यासाठी मी वेगळा प्रयत्न करत नाही. ते ओघानं येतं.
कोरोनाकाळावरही मला लिहायचंय. पण त्याला वेळ लागेल.
कोरोनाकाळ पूर्ण संपल्यावरच माझ्या लेखनातून ते उतरू शकेल.
- हृषिकेश गुप्ते
‘आजार’ संपावा लागेल!..
आपण कोरोनाकाळाच्या आता शेवटाकडे आलोय, अशी अपेक्षा आपण ठेवतोय. या काळाचा शेवट झाला अथवा नाहीये, हेआपल्याला माहीत नाही. या काळाच्या पार्श्वभूमीवर मला लगेच काही सुचलेलं नाहीये. या काळातून जाऊन त्या काळाकडे पुन्हा मागं पाहणं अजून झालेलं नाहीये. सुरुवातीच्या लॉकडाऊनच्या काळात मी अर्धवट राहिलेलं बरंच काही लिहून काढलं. नंतरचे दोन-तीन महिने माझ्यासाठी वाईट होते. २४ तास घरात बसून राहणं माझ्यासाठी असह्य होतं. मला लिहिण्यासाठी मोकळीक लागते. ही एक प्रकारे कैदच होती. जे कुणी कैदेत राहतात त्यांच्याविषयी पहिल्यांदाच मला सहानुभूती वाटली. एखाद-दोन तास सामान आणायला बाहेर पडलो तरी पुन्हा घरात बसावं लागायचं. हा वाईट काळ होता.
माझा इंजिनीयरिंगचा व्यवसाय आहे. मी डिझायनिंग करतो. या व्यवसायातील नुकसान वेगळाच भाग होता. आपल्या घरच्यांबरोबर २४ बाय ७ राहण्याची वेळ येते, ते इतरांनी कसं घेतलं मला ठाऊक नाही. माझ्यावर ताण आला. मला कोरोनाकाळावर सुचलंय असं काही नाही. लॉकडाऊनमध्ये दिवाळी अंकांसाठी लिहिण्याचे प्रयत्न केले. काही वेगळ्या गोष्टींमुळे ते पूर्ण झालं नाही. ते लिहितानाही त्या लेखनाची पार्श्वभूमी कोरोनाची कधीच नव्हती. कोरोनाकाळात मी कोरोनाच्या आधीच्या पार्श्वभूमीवरचं कथालेखन केलं. कोरोनाकाळावर मला लिहिण्यासाठी अजून दोन-तीन वर्षे लागतील. या काळावर माझ्याकडून नक्की लिहिलं जाईल. हा काळ पूर्णपणे गेल्यावर त्याचं त्रयस्थपणे अवलोकन केल्यानंतर माझ्या लेखनातून ते उतरेल. ठरवून कोरोना काळावर शासकीय माहिती वगैरे घेऊन कादंबरी लिहायची, असं मला सुचतच नाही. काही लेखकांना तसं जमतं. मी त्या प्रकारचा लेखक नाहीये.
या काळात आजार म्हणून कोरोनाची मला काही भीती वाटली नाही. मात्र, लेखनासाठीचं मनःस्वास्थ्य लाभलं नाही. मी संवेदनशील आहे. मला सगळं जागच्या जागेवर लागतं. कोरोनाकाळात सगळंच विस्कळीत झाल्यानं बराच परिणाम झाला. पहिल्या एक-दोन महिन्यांत मी बरंच लेखन पूर्ण केलं. एक-दोन कादंबऱ्या पूर्ण केल्या. नंतरचे महिने माझ्यासाठी अक्षरशः भीषण होते. लेखकाच्याच दृष्टीनं नव्हे तर सर्वार्थानं ते चांगले नव्हते. या काळात स्थैर्य नव्हतं. या काळाविषयी मला एक-दोन कथाबीजं मला सुचली आहेत. पण ती प्रत्यक्षात येण्यासाठी काही काळ जावा लागेल. नीट मागं बघावं लागेल. चला कोरोनावर लिहायचंय, म्हणून मला लिहिता येणार नाही. आजाराकडे पाहण्यासाठी आपण त्या आजारातून बाहेर यावं लागतं. अजून आपण सर्व एका अर्थानं आजारीच असताना आजाराविषयी कसं लिहिणार?
माझी लेखन प्रक्रिया
चमकदार लिहिण्यासाठी मी वेगळा प्रयत्न करत नाही. ते ओघानं येतं. आजवरच्या वाचनातून काही शैली मिळाली असेल. माझ्या लेखनातल्या 'बिटविन द लाईन्स'समजणाऱ्या वाचकांच्याच प्रतिक्रिया मला मिळतात. पाच-दहा टक्के वाचकांच्या प्रतिक्रियांत असं असतं, की हे कळलं नाही. याचा शेवट काय आहे, हे असं का झालं, वाचकांना जे कळलेलं नसतं ते अर्धवटच सोडलेलं असतं मी. कथा-कादंबऱ्यांतूनच सगळ्या प्रश्नांची उत्तरं लेखक देत नाही. ज्यांना बिटविन द लाईन्स कळत नाही ते वाचक प्रतिक्रियाच देत नसतील. लेखकाचा वाचन हाच रियाज असतो. गायक किंवा शरीरसौष्ठवपटूला जसा शारीरिक रियाज करावा लागतो, तसा लेखकाला करावा लागतोच असं नाही. लेखनाचा रियाज वाचन हाच आहे. वाक्यरचना, शब्दरचना असतात. मोठ्या प्रमाणात वाचन मी केलंय अन् करत असतो.
माझ्यावरचा प्रभाव
माझ्यावर जयवंत दळवी, श्री. ना. पेंडसेंचा प्रभाव निश्चित आहे. काळीठिक्कर रात्र, घनगर्द जंगल... असे शब्दप्रयोग मी जेव्हा करतो, तेव्हा पूर्वी तसे कुणीतरी केले असतील. तेच मी वापरतो. ही ढोबळ उदाहरणं झाली. भाषा ही आपल्या भावना पोहोचवण्यासाठीच असते. मागची भाषा आपण घेतो. आपली भाषा पुढे दिली जाते. आपल्याकडे जयवंत दळवी म्हटलं की कोकण अशी त्यांची प्रतिमा आहे. माझ्या लेखनात तीव्र लैंगिकता येते. मग हा जयवंत दळवींचा प्रभाव आहे, असं म्हटलं जातं. देवळाचं किंवा गूढ वर्णन आलं, की चिं. त्र्यं. खानोलकर. दळवींनी समुद्राचं वर्णन केलंय. माझ्या लेखनात समुद्राचं वर्णन नाही. खानोलकरांचा माझ्यावर प्रभाव आहे, असं फारशी तुलना न करता म्हटलं जातं. खानोलकारांच्या वाक्यरचना छोटेखानी असायच्या. लांबलचक पल्लेदार वाक्यरचना नसायची. माझ्यावर असला तर श्री. ना. पेंडसेंचा प्रभाव असेल. त्यांचं लेखन माझ्याकडून वारंवार वाचलं जातं. त्यांचं तुंबाडचे खोत मी कधीही वेळ असला तर वाचायला लागतो. हा प्रभाव असल्याचा स्वतंत्र शोध मी घेतलेला नाहीये.
मोठी कादंबरी आगामी काळात येईल. माझा ॲपरेचर हळू हळू मोठा होतोय. मी खूप लिहितो. मी सतत लिहीत असतो. माझ्या दंशकाल कादंबरीला एका कुटुंबाचा पर्स्पेक्टिव्ह आहे. कादंबरीच्या आकारमानावरून ती महाकादंबरीपण ठरत नाही. पेंडसेंची एल्गार ही कादंबरी आहे. ती दीडशे पानीही नसेल. पण तिचा सामाजिक प्रक्षेप मोठा आहे. मी ठरवून लिहीत नाही. मला सुचतं तसंच मी लिहितो. पुढची एक कादंबरी मी लिहितोय. ती महाकादंबरी आहे. एका कुटुंबापलिकडे जाऊन त्यात एका शहराचा प्रक्षेप असेल.
वाचनाचा ५० टक्के भाग दिवाळी अंकांचा
दिवाळी अंक नसते तर कदाचित मी लिहिलंच नसतं. लहानपणी मी गोष्टीची पुस्तकं आणि दिवाळी अंक वाचायचो. ते दिवाळी अंक एप्रिल-मेपर्यंत चालू असायचे. वाचनावर दिवाळी अंकांचा प्रभाव आहेच. वाचनातला ५० टक्के भाग हा दिवाळी अंकांनी व्यापलेला आहे.
- हृषिकेश गुप्ते
(प्रसिद्ध कथालेखक आणि कादंबरीकार