- अनिल भापकर
भारताच्या दक्षिणेला असणारा नितांत सुंदर निसर्गरम्य, हिरवाईने नटलेला एक छोटासा सुंदर देश, श्रीलंका. चहूकडून समुद्राने वेढलेला असल्यामुळे हा देश एक सुंदर बेट आहे. त्याला हिंदी महासागरातील मोती म्हटले जाते. निसर्गाने या देशाला अत्यंत भरभरून दिले आहे याची अनुभूती हा देश फिरताना पदोपदी येते. शहर असो अथवा खेडेगाव, रस्त्याच्या दुतर्फा उभी असलेली झाडं आपले लक्ष वेधून घेतात. इथली अजून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे अत्यंत शिस्तशीर ट्रॅफिक. दुचाकीवर जाणारे कुटुंब आणि त्या सगळ्यांनी घातलेले हेल्मेट हे चित्र येथील वाहनधारकांच्या शिस्तीची प्रचिती देते. अगदी खेडेगावातदेखील दुचाकीवरील प्रत्येकाने हेल्मेट घातलेले दिसते. कोलंबोसारख्या गजबजलेल्या शहरातसुद्धा गरज असल्याशिवाय गाडीचा हॉर्न कोणी वाजवत नाही. तिथलं वास्तव्यात गाडीच्या हॉर्नचा आवाज एकदाही आम्हाला ऐकू आला नाही. आधुनिक काळातही पौराणिक वारसा जपून ठेवण्यात आणि त्याकडे पर्यटकांना आकर्षित करण्यात श्रीलंकेतील नागरिक यशस्वी झाले असल्याचे वारंवार जाणवते. सुंदर आणि स्वच्छतेचा अनुभव देणारे समृद्ध समुद्रकिनारे आणि बौद्धकालिन संस्कृतीच्या जतन केलेल्या खाणाखुणा पर्यटकांना आकर्षित करतात. 1972पर्यंत या देशाला सिलोन म्हणून ओळखले जायचे. त्यानंतर या देशाचे नाव लंका आणि नंतर श्रीलंका असे झाले. श्रीलंकेतील जवळपास 70 टक्के लोक बौद्धधर्मीय आहेत. साक्षरतेचे प्रमाणही जवळपास 92 टक्के! श्रीलंकेतील इंटरनॅशनल रामायणा रिसर्च सेंटरने जवळपास 50 अशी ठिकाणे शोधली आहेत; ज्याचा उल्लेख रामायणामध्ये आहे. सिंहला आणि तमिळ या इथल्या प्रमुख भाषा आहेत. श्रीलंका रुपया हे इथले चलन. व्हॉलिबॉल हा इथला राष्ट्रीय खेळ. मात्र भारताप्रमाणे येथेही क्रिकेटचा लोकांवर प्रचंड पगडा.श्रीलंका टुरिझम प्रमोशन बोर्डाच्या सहकार्याने र्शीलंकेला भेट देण्याचा योग नुकताच आला. त्यावेळी श्रीलंकेचे अनेक पैलू समोर आले. तिथल्या अनेक गोष्टी प्रसिद्ध तर आहेतच, पण आपल्याही मनावर त्या गारुड करतात.सीता अम्मान मंदिर (सीता मातेचे मंदिर)रामायणामध्ये लंकेचा अर्थात आजच्या श्रीलंकेचा थेट उल्लेख असल्यामुळे आपल्याला या देशाबद्दल नेहमीच आकर्षण वाटत आले आहे. श्रीलंका हा भारताचा सख्खा शेजारी. याच श्रीलंकेने नुकताच ‘रावण-1’ नावाचा उपग्रह अवकाशात सोडला आहे. काव्य आणि संगीतात निष्णात असलेला लंकाधिपती रावण विज्ञान-तंत्रज्ञानातही कुशल होता, अशी इथल्या लोकांची धारणा असल्यामुळेच त्याचे नाव या उपग्रहाला देण्यात आले आहे. नुवारा एलियापासून फक्त पाच किलोमीटर अंतरावर रस्त्यालगत सीता अम्मान अर्थात सीता मातेचे मंदिर आहे. यालाच अशोकवाटिका असे म्हणतात. दक्षिण भारतीय शैलीतील बांधकाम असलेले हे मंदिर आहे. या ठिकाणी राम, लक्ष्मण आणि सीता यांच्या प्राचीन मूर्ती पाहावयास मिळतात. पौर्णिमा, हनुमान जयंती, रामनवमी आणि मकरसंक्रांतीला या मंदिरात विशेष पूजा केली जाते, असे या मंदिराचे व्यवस्थापक र्शी. जीवराजा यांनी सांगितले. या ठिकाणी सीता मातेचे अकरा महिने वास्तव्य होते असे स्थानिक सांगतात. जेव्हा रामभक्त हनुमानने सीता मातेला या ठिकाणी शोधले तेव्हा र्शीरामाने हनुमानासोबत दिलेली अंगठी हनुमानने सीता मातेला दाखवून आपण र्शीरामाकडून आल्याचा पुरावा दिला अशी आख्यायिका येथे सांगितली जाते. याच मंदिराच्या बाजूने पाण्याचा एक सुंदर झरा वाहतो. त्या ठिकाणी सीता माता स्नान करीत असे अशी लोकांची धारणा आहे. याच झर्याच्या बाजूला पायाचे ठसे पाहायला मिळतात. ते हनुमानाचे आहेत असे मानले जाते. या मंदिराच्या पाठीमागे गर्द झाडींचे अशोक वन आहे. या ठिकाणी दरमहा दोन ते तीन हजार भारतीय भेट देतात, अशी माहिती व्यवस्थापक जीवराजा यांनी दिली.रेडिओ सिलोनश्रीलंकेचा व आपला संबंध तसा रामायणापासूनचा. पण या कलीयुगातही श्रीलंका भारतातील चित्रपटप्रेमींना भावली ती तेथील रेडिओ सिलोन या केंद्रातून ऐकवल्या जाणार्या बिनाका गीतमाला या हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमामुळे. जगातील दुसरे व आशियातील पहिले रेडिओ केंद्र म्हणून ‘रेडिओ सिलोन’ ओळखले जाते. जेव्हा भारतात ‘ऑल इंडिया रेडिओ’वर हिंदी सिनेमा गीतांना बंदी होती तेव्हा ‘रेडिओ सिलोन’ने ती सारी गाणी घराघरांत पोहोचवली. ‘आवाज की दुनिया के भाईयों और बहनों.’ हे शब्द कानी पडताच आजही जुन्या पिढीचे कान टवकारल्याशिवाय राहात नाही. कोलंबोला गेल्यावर सिलोन रेडिओला अर्थात आजच्या र्शीलंका ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनला आवर्जून भेट दिली. तेथील हिंदी विभाग, लायब्ररी अतिशय सुसज्ज आहे. तेथील कर्मचारी सुभाषिनी डी सिल्व्हा यांनी तिथल्या कामकाजाची बारीकसारीक माहिती दिली. तिथे आजही सर्व जुन्या हिंदी गाण्यांच्या कॅसेट्स तबकडीच्या स्वरूपात उपलब्ध आहेत. सर्व गाण्यांचे डिजिटायजेशनचे काम सुरू आहे. काही दुर्मीळ हिंदी गाण्यांच्या कॅसेट्ससुद्धा तिथे ऐकायला मिळाल्या. या केंद्रात आजही दररोज सकाळी सहा ते आठ या वेळेत हिंदी सेवा चालू आहे. विशेष म्हणजे भारतातील काही बातम्यांसाठी ‘लोकमत’ची वेबसाइटही तिथे आवर्जून वाचली, पाहिली जाते. ग्रंथालयाच्या कर्मचार्यांनी त्याला दुजोरा दिला. जेफ्री बावाश्रीलंकेतील गॉल या शहराकडे जाताना रस्त्यात लुनुगंगा नावाचे ठिकाण लागते. हे ठिकाण म्हणजे जगप्रसिद्ध वास्तुविशारद (आर्किटेक्ट) जेफ्री बावा यांनी साकारलेला एक सुंदर प्रकल्प. 1919 साली जन्मलेले जेफ्री बावा यांचे 2019 हे जन्मशताब्दी वर्ष म्हणून जेफ्री बावा ट्रस्टकडून साजरे केले जात आहे. खरं तर व्यवसायाने आणि शिक्षणाने ते वकील. लंडनमधून कायद्याचे शिक्षण घेऊन आल्यावर त्यांनी काही काळ वकिलीची प्रॅक्टिस केली. मात्र त्यांच्या लक्षात आले की वकिली हे आपले क्षेत्र नाही. त्यानंतर वयाच्या 38 व्या वर्षी 1957 मध्ये त्यांनी आर्किटेक्टची पदवी मिळवली आणि वास्तुविशारद म्हणून काम करायला सुरुवात केली. बघता बघता आर्किटेक्ट म्हणून जेफ्री बावा जगभरात नावारूपाला आले. त्यांच्या वास्तुरचनेची एक वेगळी अशी शैली होती. त्यांचे वीकएण्ड होम हीच त्यांची प्रयोगशाळा. या ठिकाणी गेल्यानंतर तेथील बेंटोटा नदीचे सौंदर्य पाहताना स्थळ-काळाचे आपले भान हरवून जाते. जेफ्री बावा यांचे हे घर पर्यटकांचे आकर्षणाचे ठिकाण आहे.कँडी-बुद्धाचे दंत मंदिरश्रीलंकेत गेले आणि कँडी शहराला भेट दिली नाही तर श्रीलंका तुम्ही पाहिलीच नाही असे स्थानिक म्हणतात. कोलंबोपासून जवळपास दीडशे किलोमीटर अंतरावर असलेले व उंच डोंगरात वसलेले कँडी शहर हिलस्टेशन आहे. श्रीलंकेच्या मधोमध वसलेले कँडी शहर थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाते. एकेकाळी श्रीलंकेची राजधानी असलेले कँडी शहर श्रीलंकेची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखली जाते. या शहरात फिरताना येथील वैभवाने आपले डोळे दीपून जातात. पुरातन काळातील अनेक सुंदर इमारती या ठिकाणी बघायला मिळतात. या ठिकाणी मुख्य आकर्षण आहे ते गौतम बुद्धाचे दंत मंदिर (टूथ टेंपल). या मंदिरात गौतम बुद्धाचा एक दात जपून ठेवला असल्याने जगभरातील पर्यटक या ठिकाणी भेट देतात. श्रीलंकेतील राजांची अशी र्शद्धा होती की, बुद्धाचा पवित्र दात ज्या राजाजवळ आहे त्याच्या राज्यात भरभराट होणार आणि त्याच्या राज्याला कुठलाही धोका असणार नाही. सतराव्या शतकात बुद्धाचा दात कँडीमध्ये आणला गेला व या शहरात भव्य दंत मंदिर उभारण्यात आलं. आज या दंत मंदिराला जागतिक ठेवा (वर्ल्ड हेरिटेज) म्हणून युनेस्कोने घोषित केले आहे. या ठिकाणी जगभरातील पर्यटक आवर्जून भेट देतात. उदावालावे एलिफन्ट ट्रान्सीट होमउदावालावे नॅशनल पार्कमध्येच एलिफन्ट ट्रान्सीट होम नावाची एक संस्था कार्यरत आहे. 1995 साली श्रीलंका सरकारने त्याची स्थापना केली आहे. जंगलातील हत्तींची अनाथ पिल्ले तसेच आजारी हत्ती आणि काही कारणास्तव कळपापासून दुरावलेल्या हत्तींचा सांभाळ करणे हा या संस्थेचा उद्देश आहे. या ठिकाणी 3 महिन्यांपासून ते 7 वर्षांपर्यंत अशी जवळपास साठपेक्षा अधिक हत्तींची पिल्ले आणि हत्ती आहेत. या हत्तींच्या देखभालीसाठी तीन डॉक्टर व अनेक कर्मचार्यांची कायमस्वरूपी नेमणूक केलेली आहे.या हत्तींना दिवसभरात ठरावीक वेळेस दूध पाजण्यात येते. दूध पिण्याच्या वेळा हत्तींना आणि पिल्लांना आता माहीत झालेल्या आहेत. यावेळी पिल्ले आणि हत्ती अक्षरश: पळतच दूध पिण्यासाठी येतात. हे मनोहारी दृश्य आपल्या कॅमेर्यात टिपण्यासाठी देशोदेशीचे पर्यटक तासन्तास वाट पाहत असतात. आतापर्यंत या ठिकाणी शंभरपेक्षा जास्त हत्तींवर उपचार आणि सांभाळ करून त्यांना परत जंगलात सोडण्यात आले आहे. जंगलात सोडल्यावरदेखील त्यांच्याकडे लक्ष ठेवले जाते. आशियातील सर्वात चांगल्या फिडिंग सेंटर्समध्ये उदावालावे एलिफन्ट ट्रान्सीट होमची गणना होते. या ठिकाणी असलेल्या नॅशनल पार्कमध्ये अनेक हत्ती बघण्यास मिळतात. मोरांची संख्याही इथे बर्याच मोठय़ा प्रमाणावर आढळून येते.श्रीलंका हा आपला शेजारी देश, इथलं निसर्गसौंदर्य तर अद्भुत आहेच, पण इथल्या लोकांची शिस्त आणि सौंदर्यदृष्टी आपल्याही मोहून टाकते.anil.bhapkar@lokmat.com(लेखक लोकमतच्या औरंगाबाद आवृत्तीत माहिती तंत्रज्ञान विभागात उपव्यवस्थापक आहेत.)