हा प्रसंग साधारणत: १९८० च्या सुमाराचा असेल. मला चांगले आठवते, त्या दिवशी मुंबईत ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेची अंतिम लढत होती. आमच्या कोल्हापूरच्या गंगावेश तालमीचा मल्ल आप्पा कदम (मूळ गाव नेर्ले, ता. वाळवा) हा या किताबाचा दावेदार होता. मीदेखील त्या कुस्तीसाठी मुंबईला गेलो होतो. त्याच दिवशी माझे थोरले चुलते रामनरेश सिंग हे मुंबईत आले होते. विषय अर्थातच कौटुंबिक वादाचा होता. त्यावेळी आमचा मुंबईत गोरेगावला १५० म्हशींचा तबेला व रिकामी जागा होती.
सगळी मिळून साधारणत: १० गुंठ्यांपर्यंत ही जागा होती. त्याशिवाय तेथून जवळच जवाहरनगर-गोरेगावला दूध डेअरी होती. आमचे एकत्र पाच चुलते. त्यांत राम नरेश हे सर्वांत मोठे. वडील वारल्यानंतर त्यांनीच मला कुस्तीसाठी मुंबईला पाठविले. मला त्या प्रसंगाचीही चांगली आठवण आहे. वडील वारल्यानंतर आमच्या गावातील रामनिहोर सिंग नावाचे ज्योतिष सांगणारे गृहस्थ माझ्याकडे पाहून ‘तुझे वडील वारले; आता तुझ्यावर भीक मागायची वेळ येणार...’ असे म्हणाले होते. त्यांची भविष्यवाणी ऐकून मी चुलत्यांसमोर रडत उभा राहिलो होतो. त्याच्या उलटा प्रसंग आता माझ्यासमोर घडत होता. मला चुलत्यांनी घरी बोलावून घेतले आणि मी तिथे गेल्यावर ते दोन्ही हात जोडून माझ्यासमोर उभे राहिले. त्यांच्या डोळ्यांत अगतिकता होती. माझ्यासमोर ते खूप मोठ्याने रडत होते. मी त्यांना विचारले, ‘आप को क्या चाहिए?’ त्यांनी मला शब्द टाकला. मुंबईतील जागेची वाटणी तू माझ्या मुलासाठी सोड. त्या चुलत्यांनाही एकच मुलगा होता. मी त्यांना त्याक्षणीच शब्द दिला की, मी वाटणी सोडली. उत्तर प्रदेशात कौटुंबिक किंवा सामाजिक वाद निर्माण झाल्यास पंचायत किंवा समाजाची बैठक घेण्याची पद्धत आहे. त्यानुसार समाजाची बैठक बोलाविण्यात आली. त्यातही मी वाटणी सोडल्याचे सांगून टाकले. त्यावर समाजपंच असलेले माझ्यावर चिडले. ‘दीनानाथ, तुला हेच करायचे होतेस तर मग बैठक तरी कशाला बोलावलीस?’ असे त्यांनी मला फटकारले; परंतु माझ्या मनात वेगळीच भावना होती.
मी जेव्हा सहा वर्षांचा होतो, वडील वारले होते व माझ्या आयुष्याचे पुढे काय होणार हे माहीत नव्हते. तेव्हा मला चुलत्यांनी आधार दिला व कुस्तीसाठी दुसऱ्या दिवशी मुंंबईला पाठविले. त्यामुळे मी मुंबईला आलो, कुस्तीसाठी सांगली-कोल्हापूरला आलो, ‘महाराष्ट्र केसरी’ व पुढे ‘हिंदकेसरी’ झालो. ‘हिंदकेसरी दीनानाथसिंह’ ही ओळख मला त्या चुलत्यांनी मुंबईला पाठवून दिल्याने झाली. त्यामुळे त्यांनी त्यावेळी माझ्यावर केलेल्या उपकारांची परतफेड करण्याची संधी मला नियतीने आणून दिली होती. त्यामुळे त्यांनी माझ्याकडे ‘वाटणीचा हिस्सा सोड’ म्हणून मागणी केल्यावर मी क्षणाचाही विलंब न लावता त्यास संमती दिली. त्या जागेबद्दल किंवा माझ्या हिश्श्याबद्दल माझ्या मनात किचिंतही मोह उत्पन्न झाला नाही. मी हक्क सोडल्यावर समाजाच्या बैठकीत मात्र असे ठरले की, मुंबईतील जागेचा हक्क दीनानाथने स्वत:हून सोडला आहे; परंतु आता मला कुस्तीचे रोख बक्षीस म्हणून मिळालेले २ लाख ५० हजार रुपये हे चुलत्यांकडे होते, त्यांनी ते मला द्यावेत.
‘दीनानाथने भावनेच्या भरात येऊन मुंबईतील मालमत्तेचा हक्क सोडला असला तरी कोल्हापूरला गेल्यावर तो जगायचा कसा?’ अशी विचारणा पंचांनी केली. त्यामुळे चुलत्यांनी बक्षिसाची रक्कम द्यायचे मान्य केले. गोरेगावचा १५० म्हशींचा तबेला घेऊनच चुलते थांबले नाहीत. तबेला गोरेगावला आहे; परंतु त्यातील दूध काढून विकणारी आदर्श डेअरी जवाहरनगर-गोरेगाव परिसरात होती. ही डेअरी तर माझ्या नावावरच होती. ‘डेअरी नसेल तर दूध विकणार कसे?’ असा प्रश्न त्यांनी विचारला व डेअरीची जागाही चुलत्यांनी मागितली. मी त्यांना त्याचीही संमती दिली; परंतु समाजाने तिची किंमत ३२ हजार रुपये ठरविली. कुस्तीच्या फक्त बक्षिसाचे २ लाख ५० हजार व डेअरीच्या जागेचे ३२ हजार अशी रक्कम चुलत्यांनी मला द्यायचे मान्य केले. त्यांनी तसा मला स्टॅम्प लिहून दिला; परंतु त्यांनी या दोन्ही रकमांपैकी आजअखेर एक रुपयाही मला दिला नाही; परंतु तरीही माझ्या मनात त्यांच्याबद्दल कटुतेची तीळमात्र भावना नाही. त्यांनी मला मुंबईला पाठविले. त्यामुळेच माझे आयुष्य घडले. त्या काळी त्यांनी मला मुंबईचा रस्ता दाखविला नसता तर हा दीनानाथसिंह उत्तरप्रदेशात मोलमजुरी करूनच संपून गेला असता. त्यांचा होकार हा माझे जीवन बदलून टाकणारा होता; म्हणून त्यांच्यावर अडचणीचा प्रसंग आला तेव्हा क्षणाचाही विलंब न लावता मी जे काही आहे ते त्यांना देऊन टाकले. हा प्रसंग आठवला की आज माझा मला गर्व वाटतो.