- राजा माने
दादांचा जीवनकार्यकालदेशाच्या सामाजिक, राजकीय आणि आर्थिक परिवर्तनाचा काळ होता. त्या परिवर्तनाला सामोरे जाताना समाजहित आणि बदलत्या काळाची मागणी यांची अचूक सांगड घालून भविष्याचा वेध घेणे हे खूप मोठे आव्हान होते. हे आव्हान पेलण्यात ते यशस्वी झाले आणि म्हणूनच जनमानसात ‘दादा’ ही उपाधी प्राप्त करू शकले. मीण विकासाचे मर्म अचूक जाणणारा, सहकार चळवळ गाव पातळीवर पोहोचविणारा, सर्वसामान्यांशी अतूट नाळ जोडू शकलेला, लोकांच्या हृदयात स्थान निर्माण करणारा सच्चा लोकनेता, आपल्या तात्त्विक भूमिकेसाठी मुख्यमंत्रिपदावरही क्षणात पाणी सोडून महाराष्ट्राच्या खऱ्या अस्मितेचे दर्शन घडविणारा कणखर नेता, अल्पशिक्षित असूनही तब्बल चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद भूषविणारा आणि यशस्वी राजकारणी आणि विनाअनुदानित शिक्षण क्षेत्राची द्वारे खुली करणारा अशी स्वर्गीय वसंतदादा पाटील यांची ओळख उभ्या महाराष्ट्राला आहे. विशेषत: एक धुरंधर, मुत्सद्दी आणि लोकप्रिय राजकारणी म्हणूनही वसंतदादा ओळखले गेले. १९९० च्या दशकानंतरच्या पिढ्यांना मात्र त्यांच्याबद्दल किती माहिती आहे, हा संशोधनाचाच विषय ठरावा. राजकीय कार्यकर्ते-नेत्यांनाही ‘शरद पवार आणि ‘पाठीत खंजीर खुपसणे’ या ऐतिहासिक राजकीय वादापलीकडचे वसंतदादा फारसे माहीत नाहीत. सातवीपर्यंत शिक्षण झालेल्या वसंतदादांचे घराणे मूळचे तुळजापूरचे. त्यांचे मूळ आडनाव कदम आणि ते घराणे तुळजाभवानीचे मानकरी होते. त्यांची सहावी पिढी सांगली जिल्ह्यातील पद्माळे या कृष्णा नदीकाठच्या गावी स्थलांतरित झाली व तेथेच शेती करू लागली. पुढे गावची पाटीलकीही त्यांच्याकडे आली आणि आडनावही पाटील हेच रूढ झाले. दादांचे आजोळ जुन्या कोल्हापूर संस्थानातील कागल येथील जगदाळे या कुटुंबातले. १३ नोव्हेंबर १९१७ रोजी दादांचा जन्म कोल्हापुरातील मंगळवार पेठेत दिवाळीच्या अमावास्येदिवशी झाला. त्यांचे मूळ नाव हे यशवंत होते. पण नंतर त्यांचे वसंत हे नाव रूढ झाले व पुढे वसंत बंडू पाटील हे महाराष्ट्राचे वसंतदादा झाले. सोलापूरच्या चार हुतात्म्यांच्या बलिदानाची प्रेरणा घेऊन त्यांनी स्वातंत्र्यसंग्रामात बालवयातच उडी घेतली. पुढे १९४१ चा बिसूरचा सत्याग्रह असो वा त्यानंतर आक्रमक बनून रेल्वे लुटण्यापासून इंग्रजांवर हल्ले करण्याच्या अनेक क्रांतिकारी मोहिमा त्यांनी राबविल्या. सांगली संस्थानचा जेल फोडून ते आपल्या क्रांतिकारी सहकाऱ्यांसह तुरुंगातून पळाले. इंग्रज पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला. त्या पाठलागात त्यांच्यावर झालेल्या गोळीबारात ते जखमी झाले होते. अशा या धाडसी क्रांतिकारकाने स्वातंत्र्यानंतर आपले जीवन विधायक कार्यासाठी वाहिले. वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात स्वत:ला झोकून देऊन इंग्रजांच्या गोळ्या झेलणाऱ्या या क्रांतिकाऱ्यांची ती ओळख ठळकपणे झालीच नाही.वसंतदादांचा जीवन कार्यकाल हा देशाच्या सामाजिक, राजकीय आणि आर्थिक क्षेत्रांतील परिवर्तनाचा काळ होता. त्या परिवर्तनाला सामोरे जाताना समाजहित आणि बदलत्या काळाची मागणी यांची अचूक सांगड घालून भविष्याचा वेध घेणे हे खूप मोठे आव्हान होते. हे आव्हान पेलण्यात ते यशस्वी झाले आणि म्हणूनच लोकांच्या हृदयसिंहासनावर ‘दादा’ ही उपाधी प्राप्त करू शकले. स्वातंत्र्यपूर्व काळात देशप्रेमाने झपाटलेला आक्रमक, कठोर, धाडसी आणि छातीवर इंग्रजांच्या गोळ्या झेलणारा क्रांतिकारक, स्वातंत्र्यप्राप्तीनंतर लोककल्याणाशी स्वत:ची नाळ जोडून विकासाची नवनवी दालने शोधण्यासाठी सतत धडपडणारा संयमी समाजसेवक, स्वातंत्र्यानंतरच्या प्रारंभीच्या काळात देशाच्या व महाराष्ट्राच्या राजकारणाला ‘नवा चेहरा’ प्राप्त होत असताना, स्वत: सत्तेत वाटेकरी न राहता विकास आणि पक्षसंघटना सामर्थ्यशाली बनविण्यासाठी जिवाचे रान करणारा सच्चा कार्यकर्ता आणि त्यानंतरच्या काळाने जन्माला घातलेल्या सत्ता आणि राजकारणातील नव्या संस्कृतीत स्वत:ची आणि महाराष्ट्राची ‘अस्मिता’ जतन करणारा कणखर, मुरब्बी आणि दिलदार राजकारणी... सार्वजनिक जीवनातील अशा विविध भूमिकांना दादांनी पुरेपूर न्याय दिला. तो देत असताना दुटप्पीपणा आणि कावेबाजपणाला त्यांनी आपल्या बंधुतुल्य मित्र, नेते आणि लाडके ‘साहेब’ यशवंतराव चव्हाण, इंदिरा गांधी आणि राजीव गांधींसारख्या नेत्यांशी ज्या-ज्या वेळी संघर्षाचे प्रसंग उद्भवले, त्या-त्या वेळी ते त्या प्रसंगांना सहज सामोरे गेले. महाराष्ट्राच्या इतिहासात १९७८ हे साल ‘पाठीत खंजीर खुपसणे’ या वाक्प्रचाराने गाजले. पण प्रत्यक्ष दादांनी मात्र स्वत: त्या वाक्प्रचाराचा कधीही आणि कुठेही प्रयोग केला नाही. एकूणच संघर्ष आणि मतभेद बाजूला ठेवून आणि प्रेम, आपलेपणा व विश्वासाने बेरजेच्या राजकारणाची कास त्यांनी आयुष्यभर धरली.सहकार, कृषी, उद्योग आणि शिक्षण क्षेत्रात क्रांतिकारी कार्य उभे करीत असताना, सामान्य माणसांशी असलेले जिव्हाळ्याचे नाते कधीही ढळणार नाही, याची काळजी त्यांनी जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत वाहिली. स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारी स्वातंत्र्योत्तर काळात सहकार क्षेत्राला नवी दिशा देणाऱ्या वसंतदादांनी काँग्रेस पक्षाची प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रीय सरचिटणीस यांसारखी पदे समर्थपणे पेलली. ते राजस्थानचे राज्यपालही होते. आपल्या भूमिकेशी ठाम राहताना त्यांनी राजकीय संन्यास घेण्यासही मागेपुढे पाहिले नाही. शालिनीताई पाटील यांच्याशी झालेल्या विवाहावरून उठलेल्या वादळाचीदेखील त्यांनी तमा बाळगली नाही. प्रकृती साथ देत नसतानाही ते कार्यकर्त्यांच्या प्रेमापोटी १९८९ साली एका कार्यक्रमासाठी सोलापूरला गेले व व्यासपीठावरच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना तातडीने मुंबईला हलविण्यात आले. तेथेच उपचार सुरू असताना १ मार्च १९८९ रोजी ते कालवश झाले. सिंचन घोटाळा नव्हे बचत !ग्रामविकास, सहकार आणि सिंचन हे दादांचे जिव्हाळ्याचे विषय. ते पाटबंधारेमंत्री असताना जायकवाडी प्रकल्पात काम करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी ऐतिहासिक कामगिरी बजावली होती. प्रकल्पाची कामे वेळेत आणि काटेकोरपणे केल्याने खर्चात त्यावेळी १६ टक्के बचत झाली आणि शासनाचे २ कोटी ७० लाख रुपये वाचले. दादांनी त्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना चार लाख रुपयांची बक्षिसे देऊन गौरविले होते.सिनेमाची आवड.वसंतदादा आणि शालिनीताई या दोघांनी मिळून ‘क्लिओपात्रा’ हा सिनेमा मुंबईच्या इरॉस सिनेमागृहात पाहिला. त्यावेळी त्यांच्यासोबत वारणा उद्योग समूहाचे जनक तात्यासाहेब कोरे आणि आबासाहेब खेबूडकरही होते. मदर इंडिया, मुघल-ए-आझम, ममता हे दादांचे विशेष आवडते चित्रपट.जिवंतपणी पुतळा१० मे १९७८ रोजी सांगलीच्या बाजार समिती आवारात वसंतदादा पाटील यांच्या पुतळ्याचे अनावरण त्यांच्याच उपस्थितीत यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते झाले.दादा आणि टुरिंग टॉकीजदादांनी काही काळ कॉन्ट्रॅक्टरकडे रोड कारकुनाची नोकरीही केली होती. त्या काळात त्यांचे मामा जगदाळे-पाटील हे टुरिंग टॉकीज चालवीत असत. त्याही कामासाठी दादांनी अनेक गावांची पायपीट केली होती.दादांनी चहा सोडलासोलापूरच्या चार हुतात्म्यांना फाशी दिल्याचे वृत्त समजताच १३ वर्षांच्या वसंतदादांनी चहा पिणे सोडण्याचा निर्णय घेतला व तिथूनच ते स्वातंत्र्यसंग्रामात सहभागी झाले. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर १५ आॅगस्ट १९४७ रोजी सांगलीत झेंडावंदन करून त्यांनी पुन्हा चहा घेतला.