दर चार वर्षांनी एकदा होणाऱ्या एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकाच्या विजेतेपदासाठी यंदा रंगलेला थरार ' न भूतो न भविष्यती' असा होता. एकदिवसीय क्रिकेटच्या नियमांचे पुस्तक बदलवणारा रोमांचक खेळ इंग्लंड आणि न्यूझीलंड या दोन्ही संघाच्या खेळाडूंनी केला. तांत्रिक नियमाच्या आधारे विश्वचषक भलेही इंग्लंडने मिरवला असेल पण या अंतिम लढतीचं अचूक वर्णन न्यूझीलंडमधल्या एका वर्तमानपत्रानं एका वाक्यात केलं. ते असं - ट्वेन्टी टू हिरोज, बट नो विनर...
-सुकृत करंदीकर
सन १९८३ नंतर ३६ वर्षांनी पहिल्यांदाच इंग्लंडमध्ये एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धा खेळवली गेली. सलग ४६ दिवसांमध्ये ४८ सामने झाले. स्पर्धा सुरु होण्यापुर्वीच क्रिकेट समिक्षकांनी आणि चाहत्यांनी चार संभाव्य विजेत्यांची नावं घेतली होती. पहिली पसंती अर्थातच इंग्लंडला होती. इंग्लंडला घरच्या मैदानावर खेळण्याची संधी होती, एवढंच कारण त्यामागं नव्हतं तर गेल्या चार वर्षात ज्या पद्धतीनं इंग्लंडनं एकामागून एक विजयांचा धडाका लावत एकदिवसीय क्रिकेटमध्ये सातत्य राखलं होतं, त्यामुळं इंग्लंड विजयाचा प्रबळ दावेदार होता. दुसऱ्या क्रमांकावर अर्थातच भारत होता. विराट कोहली, रोहित शर्मा हे जगातले अव्वल फलंदाज आणि जसप्रित भुमरा, भुवनेश्वर कुमार यांच्यामुळं संतुलित झालेली गोलंदाजी, मधल्या फळीला ताकद देणारा महेंद्रसिंग धोनीसारखा जगातला सर्वोत्कृष्ट फिनिशर अशा एकापेक्षा एक सुपरस्टार क्रिकेटपटूंमुळं भारत विजेतेपदाच्या शर्यतीत आघाडीवर होता. सन २०१५ मधले विश्वचषक विजेते ऑस्ट्रेलिया आणि उपविजेते न्यूझीलंड यांना विजेतेपदासाठीची अनुक्रमे तिसरी आणि चौथी पसंती दिली गेली. विशेष म्हणजे याच चारही संघांनी उपांत्य फेरी गाठली.
या विश्वचषकात रोहित शर्माच्या सर्वाधिक म्हणजे ६४८ धावा तडकावल्या. यात पाच शतकांची विश्वविक्रमी माळ त्यानं लावली. तरीही रोहित भारताला विजेतेपदापर्यंत नेऊ शकला नाही. स्पर्धेत सर्वाधिक २७ बळी टिपणाऱ्या वेगवान मिचेल स्टार्कची ऑस्ट्रेलिया उपांत्य फेरीत गारद झाली. विश्वचषकातली सर्वाधिक सात अर्धशतके फटकावणाऱ्या शकीब अल हसनचा बांगला देश आणि स्पधेर्तील सर्वोत्कृष्ट गोलंदाजीचं पृथ:करण (पस्तीस धावा देऊन सहा बळी) नोंदवणाऱ्या शाहिन आफ्रिदीचा पाकिस्तान तर उपांत्य फेरीसुद्धा गाठू शकला नाही. एकट्या-दुकट्याच्या व्यक्तीगत चमकादर कामगिरीच्या बळावर विश्वचषकासारखी दीर्घकाळ चालणारी स्पर्धा जिंकता येत नाही, हेच यातून अधोरेखित झालं. स्पर्धा जिंकण्यासाठी प्रत्येकाला योगदान द्यावं लागतं. १९८३ मधल्या कपिल देवच्या संघात किंवा २०११ तल्या महेंद्र सिंग धोनीच्या संघात एकापेक्षा जास्त मॅचविनर होते. इंग्लंड आणि न्युझीलंडकडे ते यावेळी होते. इंग्लंडचे सलामीवीर जेसन-जॉनी धमाकेदार सुरुवात करुन देत होते. त्यांच्यातलं कोणी चुकलं तर ज्यो रुट, मॉर्गन डाव सांभाळत होते. तिथं गाडी घसरली तर बटलर-बेन स्टोक्स तडाखे देत होते. तेही फसलं तर अगदी गोलंदाज वोक्ससुद्धा खेळून गेला. गोलंदाजीही अशीच भक्कम. सत्तरी-ऐंशीतल्या फलंदाजाच्या हेल्मेटचा वेध घेणाºया वेस्ट इंडिजच्या भीतीदायक गोलंदाजीची आठवण करुन देणाऱ्या जोफ्रा आर्चरनं इंग्लंडला एक्स फॅक्टर मिळवून दिला. जोफ्राला मिळालेले बळी वीसच आहेत. पण त्यानं स्पर्धेतले सर्वाधिक म्हणजे तीनशेपेक्षा जास्त चेंडू निर्धाव टाकले. त्याच्या वेगापुढं फलंदाज बॅटी म्यान करुन उभे राहात होते. आगामी काळातही जोफ्राचे चेंडू अनेक फलंदाजांच्या हेल्मेटचा वेध घेणार हे नक्की. इंग्लंडच्या पहिल्याच सामन्यात बेन स्टोक्सने घेतलेला अशक्यप्राय झेल हा आताच शतकातील सर्वोत्तम म्हणून गणला जाऊ लागला आहे. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात कुठंच कच्चा दुवा नसलेला इंग्लंडइतका संतुलित संघ स्पर्धेत दुसरा नव्हता. या उप्परही साखळी सामन्यात पाकिस्तान, श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया या तिघांकडून इंग्लंडला पराभव पचवावे लागले. उपविजेता न्युझीलंडही सलग पाच सामने जिंकल्यानंतर पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, इंग्लंडकडून पराभूत झाला. परंतु, सरासरीच्या बळावर त्यांनी अंतिम चार संघामध्ये चौथा क्रमांक पटकावला. त्यानंतर उपांत्य-अंतिम सामन्यातली न्युझीलंडची झुंज जगानं पाहिली.
एकशेदोन षटकांच्या खेळानंतरही विश्वविजेता ठरू शकला नाही. त्यासाठी नियमाचा आधार घ्यावा लागला. कितीही शब्द लिहिले तरी तो त्यातून हा रोमांच व्यक्त होऊ शकत नाही. आकड्यांमधून तो उलगडणार नाही. खरा विश्वविजेता इंग्लंड की न्युझीलंड ही चर्चा अनेक वर्षे झडत राहील. १४ जुनच्या लॉर्डसवरच्या अंतिम सामन्यातला शेवटचा एक तास केवळ क्रिकेटच नव्हे तर एकूणच क्रीडा इतिहासात दीर्घकाळ संस्मरणीय राहील. असा सामना झाला नाही, पुन्हा होणार नाही.एकशेदोन षटकांच्या खेळानंतरही विश्वविजेता ठरू शकला नाही. त्यासाठी नियमाचा आधार घ्यावा लागला. कितीही शब्द लिहिले तरी तो त्यातून व्यक्त होऊ शकणार नाही. आकड्यांमधून तो उलगडता येणार नाही. खरा विश्वविजेता इंग्लंड की न्युझीलंड ही चर्चा अनेक वर्षे झडत राहील. १४ जुनच्या लॉर्डसवरच्या अंतिम सामन्यातला शेवटचा एक तास केवळ क्रिकेटच नव्हे तर एकूणच क्रीडा इतिहासात दीर्घकाळ संस्मरणीय राहील. असा सामना झाला नाही, पुन्हा होणार नाही.
(लेखक पुणे आवृत्तीत सहसंपादक (वृत्त) आहेत.)-----(समाप्त)-----