- सुलक्षणा महाजन
गेल्या पन्नास-साठ वर्षांत जगातली अनेक शहरे प्रचंड झपाट्याने वाढत असताना त्यांनी आजूबाजूची अनेक खेडी-गावे गिळंकृत केली. बघता बघता शहरांची महानगरे झाली. शेतजमिनींवर उत्तुंग कार्यालयीन आणि हॉटेलांच्या इमारती उभ्या राहिल्या. पायवाटा-बैलगाड्या गेल्या आणि त्यांच्या जागी प्रशस्त रस्ते, मोटारी, बसेस, मोठमोठे मॉल्स, फॅशनेबल सामानांची मोठी दुकाने झगमगली. हे वैभव बघायला देशोदेशीचे पर्यटक घेऊन कंपन्या येऊ लागल्या.पर्यटकांना महानगरांमध्ये जुन्या लहान खेड्यांचाही समावेश असतो हे सहसा दाखवले जात नाही. तरी जगातल्या जवळ जवळ प्रत्येक नव्या-जुन्या महानगरांमध्ये अशी खेडी असतातच असतात. तेथे प्रत्यक्ष गेलो तर तेथील घरांचे, वस्तीचे, लोकांच्या राहणीमानात शिल्लक असलेले खेडेपण किंवा गावपण सहज लक्षात येते. अलीकडे अनेक महानगरांच्या अभ्यासामध्ये आणि नियोजनशास्रामध्ये अशी खेडी जतन करण्यासंबंधी विशेष विषय असतो. स्पेनमधील बार्सेलोना शहरातले गार्सिया हे असेच एक जुने औद्योगिक कामगार वस्ती असलेले खेडे. आता तेथील कारखानदारी शहराबाहेर गेली आहे; पण लोकवस्ती मात्न अबाधित राहिली आहे. भाड्याने घर घेऊन आम्ही मैत्रिणी तेथे मुद्दाम राहिलो. टॅक्सीने तेथे पोहोचलो. एका कोपर्यावर आम्हाला उतरवून टॅक्सीवाला निघून गेला. दुरून बोटाने त्याने आमचे घर दाखवले. तेथील रस्ते अरुंद असल्याने मोटार दोन मिनिटेच उभी राहू शकते. त्यामुळे चालत घर गाठले. पदपथाला आणि एकमेकांना खेटून बांधलेली दोन-तीन मजली नवीन-जुनी घरे जुन्या गावांची आठवण देत होती. तळमजल्यावर दुकाने आणि वर घरे. अरुंद जिना आणि जेमतेम दोन माणसे मावतील अशी लिफ्ट असलेली ती इमारत मात्न नव्याने बांधलेली होती. खाली बेकरी, भाज्या, फळे, वाण्याची दुकाने होती. शिवाय स्थानिक पदार्थ मिळणारी छोटी रेस्टॉरंट्सही होती. अशी शांत, दाट, निवासी वस्ती. दिवसरात्न लोकांची वर्दळ असल्याने एकदम सुरक्षित. एकेदिवशी दुपारी आम्ही तेथील एका लहानशा चौकात मांडलेल्या टेबलावर खात बसलो होतो. बाजूलाच काही मुली खास स्पॅनिश पद्धतीचे लाल पायघोळ झगे घालून नाचण्याची प्रॅक्टिस करीत होत्या. दुसर्या वेळी तेथे एक चित्नकार चित्ने काढीत होता आणि वादक व्हायोलीन वाजवत होता. अशाच प्रकारे आम्ही माद्रिद ह्या स्पेनच्या राजधानीतही एका जुन्या गल्लीमधील घरात राहिलो. ‘एअर-बी-अँण्ड-बी’ ह्या सेवा देणार्या कंपनीच्या माध्यमातून अशी घरे भाड्याने मिळतात. ती स्वस्त, आकाराने लहान असली तरी त्यात आवश्यक ते घरगुती सामान असते. परदेशातील घरात राहण्याचा अनुभव वेगळाच होता. शिवाय जवळच सार्वजनिक बस आणि मेट्रोची सोय होती. नकाशे हातात घेऊन शहरभर मनसोक्त भटकता आले. बार्सेलोना शहरात अशी वीस-पंचवीस खेडी आहेत आणि प्रत्येक खेडे एक वेगळ्याच संस्कृतीचे दर्शन देते. काही ठिकाणी स्थानिक जुने बाजार नव्याने बांधलेले होते, तर मासेमारी करणार्या लोकांच्या वसाहतींमध्ये खास पदार्थ खायला लोक मुद्दाम येत होते. शिवाय अशा ठिकाणी वाहनांना मज्जाव असल्याने रमत गमत, चालत, फिरत जाणारे स्थानिक लोक, बायका, मुले दिसत. स्थानिक संगीताचे सूर कानाला आणि पदार्थांचे वास नाकाला सुखकारक वाटत होते. अतिशय चिंचोळ्या गल्ल्या असणार्या बार्सेलोनामधील एका जुन्या गावातील एका वाड्यात पिकासोच्या चित्नांचे कलादालन होते. आत जाण्यासाठी गल्लीत मोठी रांग लागलेली होती. जुन्या भागातील वास्तूंमध्ये नवे वापर होत होते. जुन्या काळाप्रमाणेच आजही लोक तेथे चालतच जात होते. जुनी गावे आपला वारसा आहे आणि तो जतन केला पाहिजे ह्या भावनेने युरोपमधील बहुतेक सर्व महानगरांमध्ये अशी खेडी जाणीवपूर्वक समाविष्ट केली, जतन केली जात आहेत. चीनमध्ये 1980 सालापासून नागरीकरणाची लाट आली. आधुनिक शेन्झन शहर नव्याने घडविताना अनेक जुन्या खेड्यांवर, तेथील घरांवर आणि लोकांच्या जीवनावर अक्षरश: बुलडोझर फिरविले गेले. खेड्यांच्या खुणा पुसून तेथे आखीव-रेखीव रस्ते, इमारती आणि आवश्यक त्या नागरी सेवांचे जाळे अंथरले. एका छापातून काढलेल्या त्या शहराच्या कोणत्याच भागाला ना स्वतंत्न रूप होते, ना आकार, ना व्यक्तिमत्त्व. तीस हजार वस्तीचे गाव वीस लाखांच्या वस्तीला सामावून घेण्यासाठी नियोजित केले होते. परंतु सुरुवातीला बेदखल झालेल्या खेड्यातील लोकांचा तळतळाट घेतल्यावर तेथील नगररचना पद्धतीवर मोठी टीका झाली. त्यानंतर मात्न पुढच्या नगरविकासाच्या टप्प्यात हे टाळून खेडी आणि तेथील लोकजीवन सामावून घेण्यासाठी नियोजन झाले. अशा खेड्यांमध्ये नव्याने स्थलांतरित झालेले लोक स्वस्त घरांमुळे सहज सामावून घेतले गेले. अशा खेड्यांमध्ये राहणारे लोक केवळ गरीबच आहेत असे नाही तर तेथील राहणी आणि सामाजिक वातावरण आवडणारे अनेक मध्यम आणि र्शीमंत वर्गातील लोकही तेथे दिसतात. त्यामुळे अशी खेडी एकसुरी न दिसता रंगीबेरंगी आणि कायम चहलपहल असलेली सजीव गावे दिसतात. आधुनिक सेवा आणि जुन्या प्रकारचे समाजजीवन याची ही सरमिसळ लोकांना आवडते आहे. असेच एक जुने गाव बीजिंग शहराच्या मध्यवस्तीमध्ये बघायला मिळाले. तेथील चौकांची जुनी घरे आणि वास्तुरचना नव्याने रंगरंगोटी, दुरु स्ती केल्यावर चांगलीच आकर्षक दिसू लागली. अशा वस्तीमध्ये अनेक वास्तू र्शीमंत लोकांनी विकत घेऊन तेथे दुकाने, खाद्यगृहे आणि पर्यटकांना आकर्षित करतील अशी हस्तकलेची बुटिक आणि कार्यशाळाही आल्या. त्या विभागातही वाहनांना मज्जाव होता; पण सायकलरिक्षातून छान फेरफटका मारण्याचा आनंद घेणारे अनेक पर्यटक होते.
आधुनिक शहरांच्या नियोजनात अशी खेडी सामील करून घेतलेली असली तरी त्यांचे जुने, स्थानिक वेगळेपण, संस्कृती अतिशय विचारपूर्वक राखली जाईल यासाठी आता तेथे नगरनियोजनात विशेष प्रयत्न केले जात आहेत. बीजिंगमध्ये अशाच एका जुन्या लहानशा चार खोल्यांच्या घरात आम्ही एक दिवस राहिलो. खोल्या लहान असल्या तरी आरामदायी होत्या. आधुनिक स्वच्छतागृहे त्यात नव्याने सामील केली होती. मधला चौक, उतरती कौलारू छपरे, लाकडी खांबांची, भिंतीवरची कलाकुसर, चिनी मातीची आणि दगडाची भांडी, जुन्या शैलीतील चित्ने आणि कुंड्यांतील वेगवेगळी झाडे. या ठिकाणी राहायला खूपच मजा आली. तेथे खाण्यापिण्याची सोय नव्हती, त्यामुळे सकाळी सकाळी बाहेर काय मिळते ते बघायला गेलो तेव्हा तेथे पदपथावर ताजे ताजे पदार्थ, चहा, फळे विकणारे आणि विकत घेणारे खूप लोक होते.
देश-विदेश बघताना प्रत्येक ठिकाणची अशी वैशिष्ट्ये ही अनेकदा मोठय़ा जगप्रसिद्ध स्थळांपेक्षा खूप वेगळा अनुभव देणारी असतात. स्थानिक लोकांचे जीवन उद्ध्वस्त न करताही आधुनिकता आणता येते. वीज, पाणी, सांडपाणी अशा सेवा तेथे दिल्या की आपोआप जुन्या वस्त्या आपणहून बदलू लागतात. मात्न स्थानिक नगरपालिका आणि नगरनियोजनकारांना संस्कृती जतनाची दृष्टी असावी लागते. केवळ स्थानिकतेचा अभिमान पुरेसा नसतो. त्यात जाणीवपूर्वक आधुनिकतेलाही जागा करून द्यावी लागते. जुन्या गावांच्या वस्त्या, वैशिष्ट्ये, वास्तू, देवळे, चौक, गल्ल्या, तलाव, मोठे वृक्ष असलेल्या जागा, चौथरे यांच्याकडे नव्या दृष्टीने बघावे लागते. स्थानिक रहिवाशांना सामील करून घेत नियोजनकार, वास्तुकलाकारही खूप शिकू शकतात, स्फूर्ती घेऊ शकतात. जुन्या खेड्यांनाही नवे आकर्षक रूपडे मिळते. यातूनच गेल्या दोन दशकांमध्ये वास्तुकलेच्या शिक्षणात पुरातन वास्तू जतन करण्याची विशेष शाखा निर्माण झाली आहे. जुन्या पद्धतीची बांधकामे, वास्तुशैली, तेथील लोकजीवन आणि कलाकौशल्ये जपण्यातून शहरे अधिक आकर्षक आणि आर्थिक दृष्टीने भरभराटीला येत आहेत. जुन्या-नव्याचा संगम, नव्याचे स्वागत आणि जुन्याचा आदर असे अनेक फायदे त्यात आहेत. पैशाच्या आणि नफ्याच्या लोभापायी विकासकांना बोलावून, मोठी गुंतवणूक करून जुने सर्व काही बुलडोझर फिरवून नष्ट करून आपण आपल्याच परंपरांना नष्ट करतो याची जाणीव वाढते आहे. त्यामुळेच एका छापाची, एकसुरी आणि कंटाळवाणी, ठोकळेबाज आधुनिक वास्तुकला आता आकर्षक वाटत नाही. वाहनांनी अतिक्रमण करण्यासाठी तयार केलेले प्रशस्त रस्ते टाळून शहरे, महानगरे जास्त छान, टुमदार आणि लोकप्रेमी होत आहेत आणि लोकही नागरी होत आहेत.sulakshana.mahajan@gmail.com(लेखिका प्रख्यात नगरनियोजनतज्ज्ञ आहेत.)