- मितेश घट्टे
वारी हे वारकर्यांचे आयुष्य आहे.. वारीत मिळणारे सुख. आनंद. समाधान शब्दबद्ध करता येत नाही. ते अनुभवल्याशिवाय उमजत नाही. गेली अनेक वर्षे वारीचा अनूभव मी याची देही याची डोळा घेत आहे. बंदोबस्ताच्या निमित्ताने वारी अनुभवताना वारीतील भक्तीभाव. आनंद. समाधान. सुख पाहात आलो आहे. इतक्या वर्षांचा हा अनुभव यंदा काही वेगळाच होता. यंदाही वारीच्या मार्गावर पोलीस बंदोबस्त लावण्याचे भाग्य माझ्या वाट्याला आले, पण कोरोनाच्या संसर्गामुळे वारीचे बदललेले स्वरूप पाहताना डोळ्यात पाणी उभे राहिले. लाखो वारकरी माऊलीचा गजर करत बेभान होऊन आळंदी ते पंढरपूर चालतात, तेव्हा एक वेगळीच अनुभूती असते. यंदा हे बेभान होणे नव्हते. माऊलींचा गजर होता, पण त्यामधे लाखोंचा श्वास एकत्र नव्हता. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मोजक्या वारकर्यांच्या उपस्थितीत शासनाच्या विनंतीनुसार लालपरी बसमधून ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुका पंढरपूरला पोहचल्या.
वारी जेव्हा पुणे जिल्ह्यातून जायची तेव्हा अख्खं पुणं पांडुरंगाचा, ज्ञानेश्वर माऊलींचा जप करत दर्शनासाठी गर्दी करायचं. माऊलींच्या पादुकांना स्पर्श करून लोक कृतार्थ व्हायचे. यंदा कोरोनाने जगणे बदललेच, पण अध्यात्माची रीतही बदलली. माऊलींच्या पादुका ज्या लालपरीतून जात होत्या, त्या लालपरीच्या स्वागतासाठी दुतर्फा भाविक उभे राहिले होते. वारकरी माऊलींचा जयघोष करत लालपरीच्या दिशेने फुलांचा वर्षाव करत होते. बदललेल्या या वारीचे क्षण पाहताना डोळे ओलावले. माऊलींच्या पादुका घेऊन जाणारी लालपरी पाहून हात जोडले आणि पांडुरंगाला एकच कळकळीची मागणी केली. विठुराया, कोरोना कायमचा हद्दपार होऊ दे! वारीच्या लाखोंच्या गर्दीचा अनुभव पुन्हा येऊ दे.. लाखो वारकरी पुन्हा एकत्र येऊ देत.. भजन, कीर्तन, घरोघरी प्रसादाच्या पंगती, रिंगण सोहळा, गावागावात पालखीचे स्वागत पुन्हा होऊ दे..!!
(लेखक पुणे शहराचे पोलीस उपायुक्त-विशेष शाखा आहेत.)