समीर परांजपे, मुख्य उपसंपादक, मुंबई
जगभरातील अनेक घडामोडींत गुंतलेले पुतिन, बोरिस जॉन्सन, इम्रान खान, शाहबाज शरीफ यांच्या रंगील्या आयुष्यावरही खूप चर्चा सध्या सुरू आहे. त्याचा हा आढावा.
२४ फेब्रुवारीला सुरू झालेल्या युक्रेन युद्धाला आता ५०हून अधिक दिवस लोटले आहेत. अमेरिका, युरोपमधील देशांनी रशियावर अनेक निर्बंध लादले आहेत. भारताचा शेजारी देश पाकिस्तानमध्ये वेगवान राजकीय घडामोडी सुरू आहेत. जगभरातील अनेक घडामोडींत गुंतलेले पुतिन, बोरिस जॉन्सन, इम्रान खान, शाहबाज शरीफ यांच्या रंगीला आयुष्यावरही खूप चर्चा सध्या सुरू आहे. लफडेबाज नेते म्हणून हे नेते (कु) प्रसिद्ध आहेत. या नेत्यांची खासगी आयुष्यावर नेहेमीच चर्चा होते.
पुतिन यांचे अनेकींशी संधान -रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी ल्यूडमिला स्क्रेबनेवा हिच्याशी २८ जुलै १९८३ रोजी विवाह केला. त्यानंतर १९९०पर्यंत पूर्व जर्मनीमध्ये सुखाने नांदत होते. या दांपत्याला मरिया व येकतेरिना या दोन मुली आहेत. मात्र स्वेतलाना क्रिव्होनोगिख या महिलेशी आलेल्या संबंधांतून पुतिन यांना लुईझा रोझोवा किंवा एलिझावेता ही मुलगी झाली असा खळबळजनक दावा २०२० साली एका नियतकालिकाने केला होता. २००८ साली पुतिन यांनी ल्यूडमिला हिला घटस्फोट दिला व ऑलिम्पिक पदकविजेती रशियन जिमनॅस्ट ॲलिना काबेवा हिच्याशी संधान बांधले. पुतिन व ल्यूडमिला कधीकधी एकत्र दिसत असले तरी त्यांचे नाते केव्हाच संपुष्टात आले आहे. पुतिन यांच्यापासून ॲलिनाला दोन मुले झाल्याचीही चर्चा ऐकायला मिळते. ॲलिना आपल्या दोन जुळ्या मुलांसह स्वित्झर्लंडमध्ये राहते. पुतिन यांना पौरुषत्व मिरवायला आवडते पण ते आपल्या भानगडी बाहेर येऊ देत नाहीत. केजीबीचा गुप्तहेर अधिकारी असल्याचा हा परिणाम तर नसावा?
शाहबाज शरीफ फक्त नावानेच शरीफ -पाकिस्तानचे नवे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी आजवर पाच विवाह केल्याचे सांगण्यात येते. म्हणजे ते याबाबत माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यापेक्षाही वरचढ आहेत. शाहबाज यांचा पहिला विवाह बेगम नुसरत शाहबाज यांच्याशी १९७३ साली झाला. त्यांना चार मुले आहेत. मात्र नुसरत यांच्या निधनानंतर शाहबाज यांनी १९९३ साली आलिया हनी हिच्याशी दुसरा विवाह केला. पाकिस्तानातील राजकीय घडामोडींमुळे शाहबाज यांना सौदी अरेबियामध्ये काही वर्षे परागंदा अवस्थेत घालवावी लागली. त्यावेळी त्यांनी आलियाशी तलाक घेतला व त्यानंतर काही महिन्यांतच ती मरण पावली. त्यानंतर १९९३ साली शाहबाज यांनी निलोफर खोसाशी लग्न केले व काही कालावधीनंतर काडीमोड घेतला. चौथा विवाह शाहबाज यांनी तहमीना दुर्राणी या लेखिका, सामाजिक कार्यकर्तीशी केला. त्यांचे प्रेमप्रकरण सुमारे आठ वर्षे सुरू होते. तिथेही बिनसल्याने शाहबाज यांनी वयाच्या साठाव्या वर्षी कलसूम हायी या मुलीशी विवाह केला. मात्र हा विवाहही टिकला नाही. त्यामुळे शाहबाज सध्या मोकळे आहेत.
बोरिस यांचे कायम सोळावे वरीस -इंग्लंडचे विद्यमान पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्याइतके रोमॅन्टिक व वादग्रस्त आयुष्य खूपच कमी लोकांचे असते. बोरिस यांनी १९८७ साली ॲलेग्रा मोस्टिन ओवेन हिच्याशी विवाह केला. पण या दांपत्याने १९९३ साली काडीमोड घेतला. त्यानंतर १२ दिवसांतच बोरिस यांनी मरिना व्हीलर या महिला वकिलाशी विवाह केला. त्यांना चार मुले आहेत. जॉन्सन हे मुळात चळवळ्या स्वभावाचे. २००० ते २००४ या कालावधीत बोरिस यांनी पेत्रोलिना व्यात या स्तंभलेखिकेशी सूत जमवले. त्यातच त्यांनी पत्रकार ॲना फॅजाक्रेर्ली हिलाही जाळ्यात अडकवले. पण हे प्रकरण काही काळच चालले. त्यांच्या प्रेमप्रकरणांतून उद्भवलेले वाद अगदी न्यायालयापर्यंत गेले. अखेर गेल्या वर्षी बोरिस यांनी मान्य केले की, आजवरच्या संबंधांतून त्यांना सहा मुले झाली आहेत. मरिनासोबत २५ वर्षे संसार केल्यानंतर त्यांनी २०२० मध्ये काडीमोड घेतला. या काळात त्यांच्या जीवनात जेनिफर आर्चुरी, कॅरी सिमाँड्स अशा दोन ललना डोकावल्या. पंतप्रधानपदाची सूत्रे हाती असल्याने त्यांनी गेल्या वर्षी २१ मे रोजी कॅरी सिमाँड्स हिच्यासोबत एका चर्चमध्ये विवाह केला. त्याप्रसंगी फक्त ३० निमंत्रित उपस्थित होते.
देखणे पण दिखाऊ इम्रान -पाकिस्तानचा अत्यंत नावाजलेला क्रिकेटपटू ते अपयशी माजी पंतप्रधान असा इम्रान खान यांच्या कारकिर्दीचा आलेख आहे. दिसायला अत्यंत देखणे असलेले इम्रान खान यांच्या व्यक्तिमत्वाची भुरळ अनेक ललनांना पडली. हिंदी चित्रपटसृष्टीतील नामवंत अभिनेत्री रेखापासून ते झीनत अमानपर्यंत सर्वांच्या दिलामध्ये इम्रान यांच्यासाठी धकधक होत असे. इम्रान खान हे लंडनच्या नाईटक्लबमध्ये प्ले बॉय म्हणूनही प्रसिद्ध होते. त्यांच्या आयुष्यात जितक्या महिला आल्या, त्यातील काहींचीच नावे उजेडात आली. बाकीच्या मुलींनी नाव लपवणेच पसंत केले. एम्मा सर्गियंट, सुसी मुरे, सारा क्रॉवले, स्टेफनी बेकहॅम, गोल्डी हॉन, क्रिस्तिन बेकर, सुसान कॉनस्टाईन, मेरी हेल्विन, कॅरोलि केलेट, लिझा कॅम्पबेल, सिटा व्हाईट, हना मेरी रोथ्सचाईल्ड अशा अनेक महिलांची नावे इम्रानशी जोडली गेली. त्यांची पहिली गर्लफ्रेंड एम्मा सर्गियंट ही होती. अगदी बेनझीर भुत्तो यांच्याशीही इम्रानचे नाव जोडले गेले होते. सिटा व्हाईट हिच्यापासून झालेल्या ट्रियन या मुलीला इम्रानने सिटा जिवंत असेपर्यंत ही आपली मुलगी म्हणून कधी मान्यही केले नव्हते. इम्रान खानने वयाच्या ४३व्या वर्षी जेमिमा गोल्डस्मिथ हिच्याशी विवाह केला. १९९५ साली सुरू झालेला हा प्रवास २००४मधील घटस्फोटाने संपला. त्यानंतर इम्रान खान यांनी आयेशा गुलालाई या युवतीवर जाळे फेकायचा अयशस्वी प्रयत्न केला. त्यानंतर इम्रान यांनी पत्रकार रेहाम खान हिच्याशी ६ जानेवारी २०१५ रोजी केलेले लग्न दहा महिन्यांतच मोडले. त्यानंतरचे इम्रान यांचे प्रताप अद्याप उजेडात आलेले नाहीत.
त्यातल्या त्यात बायडेन बरे -अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या विवाहपूर्व व विवाहोत्तर आयुष्याची जी काही थोडीफार माहिती उपलब्ध आहे, त्यावरून त्यांनी इतर नेत्यांच्या तुलनेत खूपच कमी रंग उधळलेले दिसतात. नेता हा संसारी, कुटुंबवत्सल वगैरे असणे भारतीय लोकांना अजूनही आवडते. जगाच्या राजकारणावर प्रभुत्व गाजवणाऱ्या नेत्यांपैकी बहुतांश जणांचे खासगी आयुष्य अनेक भानगडींनी भरलेले असते. अशा नेत्यांना त्यांच्या गुणोदोषासकट तेथील जनतेने स्वीकारले आहे. पण अशी वेळ भारतीय नेत्यांबाबत आली तर काय करायचे?