शहरं
Join us  
Trending Stories
1
"अजित पवारांना घोटाळ्यावरुन ब्लॅकमेल केलं"; जयंत पाटलांच्या आरोपांवर फडणवीस म्हणाले, "त्यांचा चेहरा बघा"
2
मनसेचा एकनाथ शिंदेंविरोधात डाव; ठाकरे गटाच्या उमेदवाराला मदत करण्याची भूमिका
3
निवडणूक आयोगाची भलतीच डोकेदुखी; एका मतदारसंघात प्रत्येक बुथवर लावावी लागणार ९ EVM
4
Video - इथे ओशाळली माणुसकी! पतीच्या मृत्यूनंतर गरोदर पत्नीने साफ केला रुग्णालयातील बेड
5
"पोलिसांच्या गाड्यांमधून महायुतीला रसद"; पवारांच्या दाव्यावर फडणवीस म्हणाले, "त्यांच्या काळात..."
6
एकच आमदार असणाऱ्यांविषयी...; राज ठाकरेंच्या टीकेनंतर शरद पवारांकडून खरपूस समाचार!
7
विना गॅरेंटी इतक्या कमी व्याजावर मिळेल ३ लाखांपर्यंतचं कर्ज; पाहा काय सरकारची PM Vishwakarma योजना
8
दिवाळी संपताच सुरू होणार राजकीय दिवाळी; मनधरणीसाठी अनेकांनी केली दिल्ली वारी
9
Shubman Gill ची सेंच्युरी हुकली; पण पुजाराला ओव्हरटेक करत साधला मोठा डाव
10
Girish Mahajan : संकटमोचकाने घेतली नाशिकमधील नाराजांची भेट; आहेर, भुजबळांच्या बंडखोरीचे आव्हान
11
अनिल अंबानींच्या कंपनीला SEBI ची नोटीस; ₹४ चा शेअर, ५ दिवसांपासून ट्रेडिंग आहे बंद 
12
बोरिवलीत गोपाळ शेट्टी माघार घेणार?; देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतरही संभ्रम कायम
13
अरेरे! लग्नासाठी बनावट IPS; किराणा दुकानात काम करणाऱ्या तरुणाची 'अशी' झाली पोलखोल
14
IPL 2025: गेल्या वर्षी २० लाख, यावेळी थेट १४ कोटी... रिटेन होऊन 'हे' ७ खेळाडू मालामाल
15
KBC 16 मध्ये 'मृच्छकटिक' नाटकासंबंधी विचारला १२ लाख ८० हजाराचा प्रश्न! तुम्हाला माहितीये का उत्तर?
16
Adani Power नं बांगलादेशचा अर्धा वीज पुरवठा रोखला, घरांपासून कंपन्यांपर्यंत बत्ती गुल
17
स्पेनमध्ये  'महापूर', 205 जणांचा मृत्यू, 1900 बेपत्ता, 130000 हून अधिक घरांची वीज गुल; पंतप्रधानांनी पाठवले 2000 सैनिक
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: "मी जे काही काम करतो ते पक्ष हितासाठी करतो", निवडणूक लढवण्यावर गोपाळ शेट्टी ठाम
19
जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराची मोठी कारवाई; अनंतनागमध्ये ३ ठिकाणी चकमक, दोन दहशतवादी ठार
20
IND vs NZ: पहिल्या २ कसोटीतील बिघाडीनंतर अखेर टीम इंडियानं घेतली अल्प धावांची आघाडी

व्हॉल्टेअर ते मुरुगन

By admin | Published: July 15, 2016 5:05 PM

आपली परंपरा अश्लील नाही. ती खुली व मोकळी आहे. परंपरा आंधळ्या असतात. त्यांचे डोके भूतकाळात अडकलेले असते. त्यांना वर्तमान पाहता येत नाही आणि आजचा विचार करता येत नाही. असहिष्णुतेचे नख लागलेले मुरुगन नशीबवान ठरले, हे मात्र खरे!

सुरेश द्वादशीवार

(लेखक लोकमतच्या नागपूर आवृत्तीचे  संपादक आहेत.)

समाजाने मारले, धर्माने संपवले पण मूल्यांनी जागविले अशी मुरुगन यांची कहाणी आहे.आपली परंपरा अश्लील नाही. ती खुली व मोकळी आहे. परंपरा आंधळ्या असतात. त्यांचे डोके भूतकाळात अडकलेले असते. त्यांना वर्तमान पाहता येत नाही आणि आजचा विचार करता येत नाही.असहिष्णुतेचे नख लागलेले मुरुगन नशीबवान ठरले, हे मात्र खरे!त्यांच्या बाजूने ना समाज उभा राहिला, ना धर्म, ना परंपरा! त्यांच्या मदतीला आली ती केवळ राज्यघटना,कायदा आणि कायद्याची बूज राखणारे न्यायालय!मला तुमचे म्हणणे एखादेवेळी मान्य होणार नाही; मात्र ते मांडण्याच्या तुमच्या अधिकारासाठी मी प्राणपणाने लढत देईन’ - फ्रेंच तत्त्वज्ञ व नाटककार व्हॉल्टेअर यांचे हे प्रसिद्ध वचन आपल्या निकालपत्रात नोंदवून मद्रासच्या उच्च न्यायालयाने पेरुमल मुरुगन या लेखकाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे समर्थन केले आहे. मुरुगन यांनी लिहिलेल्या ‘माथोरु मागन’ (एक अपुरी स्त्री) या कादंबरीवरून त्यांच्याविरुद्ध पुराणमतवाद्यांनी दक्षिणेत एवढे जोराचे वादळ उठविले की त्याला कंटाळून मुरुगन यांनी ती कादंबरी मागे घेतली व तसे करताना त्यांनी आपली लेखननिवृत्तीही जाहीर केली. मुरुगन यांच्या प्रकाशकांना व वितरकांनाही धमकावण्याचे तंत्र त्या वादळवीरांनी चालूच ठेवले. या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी करीत त्यांनी त्यांचे आंदोलन दोन वर्षं चालू ठेवले. त्या प्रकरणाची न्यायालयीन दखल घेत मद्रासचे न्या. संजय किशन कौल आणि न्या. पुष्पा सत्यनारायण यांनी त्यांच्या निकालपत्रात मुरुगन यांना दोषमुक्त तर केलेच; शिवाय आपल्या निकालपत्रात ‘एखादे पुस्तक वाचायचे की नाही हे वाचकाने ठरवायचे असते. नको असेल तर ते फेकून देण्याचा अधिकारही त्याचा असतो; मात्र त्यासाठी कुणाचेही लेखनस्वातंत्र्य हिरावून घेता येत नाही’ असा अभिप्रायही त्याचवेळी नोंदवला. मुरुगन यांची ही कादंबरी एका अपत्यहीन दांपत्यावर लिहिली आहे. अपत्यप्राप्तीसाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांवर व अनुष्ठानादिक अन्य बाबींच्या चित्रणावर तिचा भर आहे. ती तामिळ भाषेत जेव्हा प्रथम प्रकाशित झाली तेव्हा साऱ्या साहित्यविश्वाने तिला डोक्यावर घेऊन तिचा गौरव केला. पुढे तिचे इंग्रजीत भाषांतर झाले. ते वाचून बिथरलेल्या काही बुरसटलेल्यांनी ती कादंबरी परंपरा, धर्म आणि नीती यांच्या विरोधात जाणारी असल्याचे जाहीर केले आणि मुरुगन यांना त्यांनी मारायचेच तेवढे बाकी ठेवले. परिणामी मुरुगन यांनी लेखनसंन्यास जाहीर केला तेव्हा देशभरच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यवाद्यांनी त्यांचे दु:ख जाहीर करत मुरुगन यांना आपला पाठिंबा असल्याचेही सांगितले. मद्रासच्या न्यायालयाने मुरुगन यांच्यावरील किटाळ दूर करताना डी. एच. लॉरेन्सपासून कालिदासापर्यंतच्या मोठ्या लेखकांचा हवाला आपल्या निकालपत्रात दिला आहे. प्रत्यक्ष धर्मग्रंथांत (अगदी वेदांपासून बायबलपर्यंतच्या) अशा तऱ्हेचे लिखाण आले असल्याचे सांगून त्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकाराला बळकटी दिली. जगात सर्वमान्य होतील असे नीतीचे कोणतेही निकष नाहीत आणि वाङ्मयीन अभिरुचीच्या कक्षाही कोठे निश्चित नाहीत, असे सांगून न्यायालय म्हणते, एखाद्या लिखाणाने सामाजिक शांततेचा भंग होणार असेल तर त्या अशांततेचा बंदोबस्त करणे हे शासनाचे काम आहे. मात्र ते करताना सरकारनेही लेखकाच्या अभिव्यक्तीवर मर्यादा आणण्याचे कारण नाही.पेरुमल मुरुगन हे त्यांच्या खऱ्या अभिव्यक्तीसाठी आणि उदारमतवादी लिखाणासाठी ख्यातनाम असलेले लेखक आहेत. मात्र लेखनस्वातंत्र्यावर मर्यादा आणण्याच्या प्रवृत्तीचा इतिहासही मोठा आणि अतिशय जुलमी आहे. आयर्व्हिंग वॅलेस याच्या ‘द सेव्हन मिनिट््स’ या गाजलेल्या कादंबरीत याच नावाच्या एका छोटेखानी कादंबरीवर बंदी घालण्यासाठी चाललेल्या खटल्याची कहाणी आहे. ती लिहिताना वॅलेसने लिखाणबंदीचा कैक शतकांचा इतिहास तीत आणला आहे. अखेरच्या क्षणी प्रत्यक्ष बायबलातलेच अनेक उतारे अश्लील या सदरात कसे मोडतात हे त्या कादंबरीविरुद्ध दावेदारांकडूनच वदवून घेत त्याने त्यातील लेखकाची सुटका दर्शविली आहे. आपल्याकडील पुराणमतवाद्यांचा पुराणाभिमान पुराणे न वाचताच उभा झाला आहे. महाभारतातील अनेकांच्या जन्मकथा, रामायणातील तशा कथा, हरिवंशापासून ब्रह्मवैकल्य पुराणापर्यंतचे वंदनीय धर्मग्रंथ आणि प्रत्यक्ष वेदातील काही भाग आजच्या काळातही अनेकांना धक्के देणारे आहेत याची जाण नसलेल्यांचा हा वर्ग आहे. या माणसांनी कोणार्क पाहिले नाही आणि खजुराहोलाही कधी भेट दिली नाही. आपली परंपरा अश्लील नाही. ती खुली व मोकळी आहे. मानवी संबंधांची अतिशय स्पष्ट चर्चा करणारी आहे. रोमन कॅथलिक चर्च हे याबाबतीत कमालीचे कर्मठ व जुनाट भूमिका बाळगणारे म्हणून ओळखले जाते. मात्र त्याचे आताचे पोप फ्रान्सिस यांनी त्यांच्या चर्चने इतिहासात ‘गे’ लोकांच्या केलेल्या छळासाठी त्या साऱ्यांची आता क्षमा मागितली आहे. स्त्रियांना स्वातंत्र्य नाकारल्याबद्दल आपल्या पंथाच्या वतीने खेद व्यक्त केला आहे. वर्णभेदाविरुद्ध उभे राहण्याचा आणि अन्य धर्मीयांनाही आपले मानण्याचा उपदेश त्यांनी आपल्या अनुयायांना केला आहे. सारे धर्म, धार्मिक समजुती, रूढी आणि परंपरा या कालानुरूप बदलल्याच पाहिजेत आणि वर्तमानाशी सुसंगतच राखल्या पाहिजेत, असा त्यांचा आग्रह आहे. ही बाब आपल्या धर्ममार्तंडांनाही बरेच काही शिकवू शकणारी व त्यांना अंतर्मुख करणारी आहे.खोट्या आग्रहांपायी आपण किती ग्रंथ अंधारात ठेवले याची आपणही आता मोजदाद केली पाहिजे. सरकारने बंदी घातलेली पुस्तके खुली केली पाहिजेत आणि जमलेच तर तत्त्वज्ञ म्हणून जगात मान्यता पावलेल्या चार्वाकांचा एकही ग्रंथ आज शिल्लक का राहिला नाही याचाही शोध घेतला पाहिजे. धार्मिक व पारंपरिक असहिष्णूतेचा सर्वाधिक राग, विचार व कलेच्या अभिव्यक्तीवर असतो. ती मग तसलीमा नसरीनला तिच्या मायभूमीत राहू देत नाही. हुसेनला कुठल्याशा अज्ञात आणि दूरच्या बेटावर एकाकी मरायला भाग पाडते. तिचा रोष कर्नाटकातल्या कलबुर्गींवर असतो. ती कमालीची आक्रमक आणि असंतुष्ट असते. आहे ती स्थिती कशीही असली तरी ती तिला हवी असते. तिच्यात चांगल्या सुधारणा घडविणाऱ्यांच्या जिवावरही ती उठते. ती लिंकनचा खून करते. गांधींवर गोळ्या झाडते. दाभोलकर आणि पानसरेही तिला जिवंत नको असतात. ही असहिष्णूताच मुरुगनला त्यांच्या जिवंतपणी त्यांच्यातला लेखक मारायला भाग पाडते आणि त्यांच्या अभिव्यक्तीचा बळी मागते.या असहिष्णूतेने घेतलेल्या अशा बळींची संख्या मोठी आहे. ‘सगळी ग्रंथालये जाळून टाका, कारण सारे ज्ञान कुराणात आले आहे’ हा तिचाच स्वर असतो. सारे जग हे व्यासांचे उच्छिष्ट आहे असेही तिचे म्हणणे असते आणि बायबलाहून वेगळे शिकवा-बोलाल तर धर्मबाह्य व्हाल हा तिचाच आवाज असतो. या छळवादापासून धर्मसंस्थापक सुटले नाहीत. आचार्य सुटले नाहीत आणि संतांचीही यापासून सुटका झाली नाही. ज्ञानी, प्रतिभावंत, कलावंत आणि विशेषत: नवा विचार व नवी दिशा घेऊन पुढे झालेले कुणीही त्यापासून मुक्त राहू शकले नाही. परंपरा आंधळ्या असतात. त्यांचे डोके भूतकाळात अडकलेले असते. त्यांना वर्तमान पाहता येत नाही आणि आजचा विचार करता येत नाही. मुरुगन नशीबवान आहेत. त्यांच्या बाजूला समाज उभा राहिला नाही, धर्म त्यांच्या बाजूने आला नाही. परंपराही त्यांच्या विरोधात होत्या. त्यांच्या बाजूला केवळ लोकशाही होती, घटना होती, कायदा होता आणि या कायद्याची बूज राखणारे न्यायालय होते. समाजाने मारले, धर्माने संपवले आणि मूल्यानी जागविले अशी मुरुगन यांची कहाणी आहे. मुरुगन यांचे नशीब आणखी असे की त्यांच्या झालेल्या छळवादाने देशात सामाजिक असहिष्णूतेविरुद्ध एक मोठा वर्ग उभा राहिल्याचे आढळले. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची त्यांनी सोडलेली मागणी या वर्गाने हाती घेतली व तिला न्यायालयाचे पाठबळ मिळवून तिला नागरी स्वातंत्र्याचा कायदेशीर आधार मिळवून दिला. - परंपरा हा इतिहास आणि राज्यघटना हे वर्तमान असल्याची ही नवी साक्ष आहे.