हेरंब कुलकर्णी
इंग्रजी’ विषय म्हटला की अनेक विद्यार्थ्यांची घाबरगुंडी उडते. या विषयात अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाणही प्रचंड आहे. ‘इंग्रजी विषय कठीण असल्याने’ या विषयाला पर्याय शोधण्याचे सूतोवाच शिक्षणमंत्र्यांनी केले. विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी हा विषय नावडता आणि खलनायक असल्याचेही अधोरेखित केले.
मात्र इंग्रजी विषयाची चर्चा करताना इंग्रजी विषय अवघड आहे की तो आनंददायी पद्धतीने शिकवला जात नाही म्हणून नावडता आहे, याची चर्चा करायला हवी. इंग्रजी विषय जर उपक्र मातून शिकवला तर तो नक्कीच मुलांचा सर्वात आवडता विषय होऊ शकतो, हे महाराष्ट्रातील अनेक शिक्षकांनी दाखवून दिले आहे.
कन्या शाळा, सातारा येथील शिक्षिका स्मिता पोरे विद्यार्थ्यांसाठी ‘इंग्रजी क्लब’ हा उपक्र म चालवतात. पाचवी ते सातवी व आठवी ते दहावी असे दोन क्लब आहेत. या क्लबमध्ये प्रत्येक वर्गाच्या तुकडीतून तीन विद्यार्थी निवडले जातात. हे विद्यार्थी महिन्यातून एक बैठक घेतात. त्यात महिनाभरात वर्गावर्गातून कोणते उपक्र म करायचे हे ठरवतात व तो उपक्र म संपूर्ण महिनाभर सुरू राहतो. सध्या शिक्षक वर्गात येण्यापूर्वी दिलेल्या विषयावर एक मिनिट इंग्रजीत बोलायचे असा उपक्रम सुरू आहे. या क्लबमार्फत इंग्रजी अंताक्षरी खेळणे, एक शब्द देऊन अनेक वाक्ये तयार करणे, तीन शब्द देऊन त्यावरून वाक्य तयार करणे, स्वत:चा परिचय इंग्रजीत करून देणे, वाचलेली गोष्ट आपल्या भाषेत इंग्रजीत सांगणे.. असे अनेकविध उपक्र म सुरू आहेत. ज्या मुलांना इंग्रजी वाचन करता येत नाही त्यांच्यासाठी चांगले वाचन करणाऱ्या मुलांशी जोडी लावली जाते. या शाळेतील मुलींचा आत्मविश्वास इतका वाढला आहे की मुली सहजपणे इंग्रजीत कविता लिहीत आहेत. काही कविता बघितल्यावर लक्षात येते की मुलींची शब्दसंपत्ती किती दर्जेदार आहे. आठवीत शिकणारी स्नेहा कांबळे ही विद्यार्थिनी लिहिते..
Butterfly butterfly
Fly in the sky
Butterfly butterfly
Up there high
Are you seeking colours
From those flowers?
उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील श्रीकृष्ण विद्यालय गुंजोटी येथील शिक्षक महेश दूधनकर हे इंग्रजी हा विषय म्हणून न शिकवता ‘भाषा’ म्हणून शिकवावी या भूमिकेतून अध्यापन करतात. मुलांचे विविध गट करून त्यांनी पोस्टर स्पर्धा घेतली. मुलांनीच विषय ठरवून इंग्रजी पोस्टर तयार केले. आपल्या पोस्टरविषयी त्यांनी इंग्रजीत माहिती सांगणे अपेक्षित असते. ६५ पोस्टर तयार झाले. महेश सर शाळेच्या वर्गात जाऊन टीव्ही चॅनेलवर जशा बातम्या देतात तशा शैलीत इंग्रजीत बातम्या देतात. पण त्या बातम्या शाळेत घडलेल्या घटनांविषयी असल्याने मुलांना सहज समजतात. त्यातून काही मुलेही अॅँकर बनून बातम्या देऊ लागले आहेत.
विद्यार्थ्यांच्या पाककृती स्पर्धा इंग्रजीत घेण्याच्या स्पर्धाही झाल्या. टू मिनिट अॅक्टिव्हिटी यात दिलेल्या विषयावर दोन मिनिटे बोलायचे असते. मॉक प्रेस कॉन्फरन्स या उपक्र मात शिक्षक कधी पक्षी, कधी राहुल द्रविड, तर कधी चित्रपट अभिनेता होतात आणि विद्यार्थी पत्रकार होऊन मुलाखत घेतात. गडचिरोली जिल्ह्यातील आलापल्लीसारख्या दुर्गम भागात मराठी, तेलुगु, बंगाली, गोंडी माडियासारख्या विविध आदिवासी बोलीभाषा असलेल्या भागात राणी दुर्गावती विद्यालयाचे पुंडलिक कविराज यांनी इंग्रजी विषयाचे (भाषेचे) अध्यापन करताना इंग्रजी संभाषणावर भर दिला. विद्यार्थ्याचे भाषण / संभाषण कौशल्ये विकसित करण्यासाठी पाठ्यपुस्तकांतील विविध कृतींचा पुरेपूर वापर केला. तसेच आवश्यकतेनुसार रायटिंग अॅक्टिव्हिटीचे रूपांतर स्पिकिंग अॅक्टिव्हिटीमध्ये करून बोलण्याचा सराव दिला. स्वत:चा परिचय द्या, गोष्ट सांगा, इंग्रजीत बोलण्याची स्पर्धा, मुलाखती घेणे, एखादी भूमिका घेऊन त्या भूमिकेतून संवाद करणे, रोजच्या घरगुती अनुभवांविषयी बोलणे, दिलेल्या विषयावर काही वाक्ये बोलता येणे, एखाद्या कार्यक्र माचे विद्यार्थ्यांनीच सूत्रसंचालन करणे अशा अनेकविध संधीतून आज गडचिरोलीतील ही मुले इंग्रजी बोलतात.
श्रीरामपूर येथील शा. ज. पाटणी विद्यालयातील शिक्षक मुकुंद टंकसाळे हे एबीसीडीच्या रांगोळी स्पर्धा आयोजित करतात. स्नेहसंमेलनात पाने, फुले, झाडाच्या काड्यांच्या पांढऱ्या खड्यांचा वापर करून इंग्रजी एबीसीडी अक्षरांची रांगोळी विद्यार्थी बनवतात. पाचवीत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी एबीसीडी वीक असतो. यात रंगांचा वापर करून प्रत्येक शब्दातील अक्षरे लिहिणे, मैदानावर अक्षरे काढून शंख-शिंपले, चिंचोके यांनी आकार देणे, वेगवेगळे रॅपर गोळा करून त्यावरील अक्षरे कापणे असे उपक्र म होतात. प्रोग्रेसिव जनरल इंग्लिश कोर्स हा इंग्रजी सुधारणारा तीन महिन्यांचा कोर्स शाळेत घेतला जातो. तीन महिन्यांनंतर परीक्षा होते. टंकसाळे यांनी विद्यार्थ्यांसाठी इंग्रजीत पुस्तकेही लिहिली आहेत. पालकांनी घरात मुलांशी सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंतच्या विविध प्रसंगातले संवाद दिले आहेत. इंग्रजी अनुलेखनासाठी वही विकसित केली आहे.
भंडारा जिल्ह्यातील नूतन कन्या कनिष्ठ महाविद्यालयातील नदीम खान तंत्रज्ञानाचा वापर करून ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना इंग्रजीचे अॅक्टिव्ह यूजर्स बनवण्याचा प्रयत्न करीत आहेत. यासाठी वेगवेगळ्या कृती, ब्रेनस्टोरिमंग व लँग्वेज गेमचा वापर ते करतात. विद्यार्थ्यांसाठी www.khanenglishacademy.weebly.com नावाची फ्री वेबसाइट व मोबाइल अॅप्लिकेशन त्यांनी तयार केले आहे. पाठावर आधारित ई- साहित्य त्यात आहे. आकलनासाठी कठीण असलेल्या प्रश्नांना कशी उत्तरे लिहावीत याचे आदर्श नमुने त्यांनी तयार केले. लेखनकौशल्यावर आधारित प्रश्नांचा समावेश केला व ४० गुणांची तयारी केली. पाच वर्षांपासून निकाल १०० टक्के लागत आहे.
या सर्व शिक्षकांच्या उपक्र मातून लक्षात येते की भाषिक खेळ व मुलांना जास्तीत जास्त इंग्रजी बोलण्याची संधी दिली तर मुले सहजपणे इंग्रजीत प्रगती करू शकतात.
इंग्रजी माध्यमातून घरवापसी
इंग्रजी माध्यमातून यावर्षी मराठी शाळेत १०,००० विद्यार्थी परत आले. ज्या प्रमाणात मराठी शाळांमधील इंग्रजी शिक्षणाचा दर्जा वाढेल त्या प्रमाणात ही परत फिरण्याची संख्या वाढून मराठी शाळा बहरतील.
तेजस प्रकल्प
महाराष्ट्रातील शिक्षकांचे इंग्रजी विषयज्ञान अद्ययावत करण्यासाठी ब्रिटिश कौन्सिलने टाटा ट्रस्टच्या सौजन्याने महाराष्ट्र शासनाशी करार केला आहे. यातून शिक्षकांना नावीन्यपूर्ण इंग्रजी शिक्षणाची प्रशिक्षणे दिली जात आहेत. सुरुवातीला राज्यातील नऊ जिल्हे घेण्यात आले आहेत. त्यासोबत इंग्रजी प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेचे सक्षमीकरण करण्यात आले आहे. या नऊ जिल्ह्यात शिक्षकांचे टीचर अॅक्टिव्हिटी ग्रुप केले जात आहेत. आजपर्यंत इंग्रजी शिक्षकांचे ७५० ग्रुप स्थापन करण्यात आले आहेत.
संपर्क -
पुंडलिक कविराज :pundalik.kaviraj@gmail.com
नदीम खान : nkindya@gmail.com
महेश दूधनकर : getfriendly2003@yahoo.com
स्मिता पोरे : poresmita@yahoo.com
(लेखक प्रयोगशील शिक्षक आणि शिक्षण चळवळीतील कार्यकर्ते आहेत.)