हुमायून मुरसल
(दीर्घकाळ डाव्या चळवळीशी संबंधीत असलेले लेखक सध्या मुस्लीम समाजातील शिक्षणादी सुधारणावादी प्रयत्नांमध्ये सक्रीय आहेत.)
बेसुमार, अवाढव्य परसलेल्या सैनिक छावण्या आणि रस्तोरस्ती गस्त करणारे शस्त्रधारी सैनिकी दस्ते हे खोऱ्यातले चित्र.
ते सतत दिसत राहाते.
तरुणांच्या डोक्यात तो राग भिनला आहे.
ना पारंपरिक कशिदाकारीत पैसा, ना पर्यटनात स्थानिकांना वाव!
डोकी भडकतील, नाहीतर दुसरे काय?
काश्मीरहून परतून मला अजून महिना उलटला नाही. या काळात मी काश्मीर टेक्स्टाईल इंडस्ट्रीमध्ये काम करणारे कारागीर, छोटे उत्पादक, संस्था, मोठे व्यावसायिक यांच्याशी संवाद साधला. शिक्षित तसेच कारागीर स्त्रिया, पर्यटन व्यवसायातील घोडेवाले, स्किइंगवाले, गाइड, ठेकेदार, ड्रायव्हर अशा अनेकांशी मनमोकळ्या गप्पा झाल्या. शैक्षणिक संस्थांना भेटी दिल्या, अनेक बुद्धिजीवींशी चर्चेची संधी मिळाली. असे एक काश्मीर पाहून, अनुभवून मी परत येतो, तोच एकाएकी चित्र बदलले. अचानक बुऱ्हान वानी मारला गेला आणि टीव्ही चॅनलसह सर्व माध्यमातून काश्मीरच्या दहशतवादाबाबत जोरदार चर्चा सुरू झाली. सगळी चर्चा नव दहशतवाद, नवा आयकॉन, भारताला असलेल्या धोक्याभोवती स्वाभाविकपणे केंद्रित झाली. सुरक्षारक्षकांकडून भाऊ मारला गेल्याने वयाच्या १५व्या वर्षी बुऱ्हान या काश्मिरी तरुणाने बंदूक उचलली. वयाच्या २१व्या वर्षी तो मारला गेला. काश्मिरी जनतेने त्याच्या समर्थनार्थ केलेल्या उठावाने साऱ्यांनाच चकित केले आहे. नव्वदीच्या दशकात दहशतवादाने विक्राळ रूप घेतले होते. याच दशकात सरकारी म्हणण्याप्रमाणे जवळपास १५ एक हजार अतिरेकी मारले गेल्यानंतर दहशतवाद काहीअंशी निवळला होता. पण आता स्थानिक तरुणांनी दहशतवादाला नवा आयाम दिला आहे. पूर्वी नव्हता इतका जनतेचा पाठिंबा या नव्या फुटीरतावादी तरुणांना मिळतोय. उण्यापुऱ्या १४० बाय ५० चौरस किलोमीटर काश्मीर घाटीत १० लाखांहून अधिक अत्याधुनिक आयुधांनी सज्ज सुरक्षारक्षकांना २००हून कमी संख्येने असलेले दहशतवादी आव्हान देतात, हे कसे शक्य आहे? याची काहीएक कारणे मला या प्रवासात दिसली. जाणवलीही. जागोजागी बेसुमार, अवाढव्य जागेत परसलेल्या सैनिकांच्या छावण्या आणि रस्तोरस्ती गस्त करणारे शस्त्रधारी सैनिकी दस्ते हे खोऱ्यातले चित्र. ते सतत दिसत राहाते. भारत किंवा भारतीयांबद्दल काश्मिरी जनतेत किंवा तरुणांमध्ये मला तरी टोकाचा तिरस्कार अथवा शत्रुत्व दिसले नाही; पण लष्कराचे असे अस्तित्व खासकरून तरुणांना खूप खटकते. या दृश्यांनी, भारताने लष्करी बळावर काश्मीर अंकीत केल्याची/ठेवल्याची भावना तरुणांमध्ये बिंबल्याचे मला जाणवले.
काश्मीरचे लोक अत्यंत प्रेमळ, मनमिळाऊ, आदरातिथ्य करणारे आणि कोणत्याही प्रकारे मदतीला आतुर असेच भेटतात. मृदु स्वभाव त्यांच्या संस्कृतीचाच भाग आहे.
मी राजकीय स्वरूपाचे प्रश्न विचारले तेव्हा न कचरता माणसे बोलत होती. महापुराच्या काळात नॅशनल कॉन्फरन्सने मदत न दिल्याचा मोठा राग दिसला. पीडीपीबद्दल तुलनेत सहानुभूती आढळली; पण तरुण वर्गात गिलानी ‘क्रेडिबल’ आहे. त्यांच्या एका हाकेला प्रतिसाद देत संपूर्ण काश्मीर खोरे बंद होते, असे त्यांचे म्हणणे होते. प्रधानमंत्री मोदींबद्दल विशेष आकर्षण जाणवले नाही. गुजरात प्रकरणामुळे आपल्या प्रांतात बहुतांश मुस्लिमांच्या मनात राग दिसतो. तशा प्रकारचा राग काश्मिरात फिरताना मला जाणवला नाही. पण ३७०व्या कलमाबद्दल ते ठाम आहेत. कोणतेही सरकार आले आणि त्यांनी ते हटवण्याचा प्रयत्न केला तर आम्ही सहन करणार नाही, असे त्यांचे म्हणणे होते. उच्चशिक्षित, बुद्धिजीवी माणसे ३७० या कलमाला ‘राजकारण्यांचे आवडते खेळणे’ अशी उपमा देतात. मुलाला खेळण्याचा काहीच फायदा नसतो, तरी मूल त्यात रमते. मुलाचे लक्ष वळवण्याला, मुलाला गुंतवून ठेवायला पालकांच्या दृष्टीने ते जास्त फायद्याचे असते. तसेच ३७० कलमाचे, असे इथले मत! गॅ्रज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट झालेली बरीच मुले भेटली. ते पर्यटकांच्या घोड्यांचे लगाम धरून डोंगर चढत होते. पर्यटकांना गाड्यावर बसवून बर्फाच्या डोंगरावर ओढत नेत होते. प्रत्येक पर्यटनस्थळावर दोन तीन हजार तरुण तिष्ठत असायचे. एक चौरस इंच जागेत आठशे गाठी मारून सात-आठ तास गालिचा विणणाऱ्या अत्यंत दर्जेदार कारागिराला दिवसाकाठी ३०० रुपये मिळतात. अशा गालिच्यांचा चौरस फुटाचा दर पाच हजार ते लाखापर्यंत आहे. परदेशी आणि देशी श्रीमंत ग्राहक तसेच खानदानी व्यापारी यांनाच ते परवडते. इथल्या कारागिरांच्या पोटाची खळगी तशीच! पर्यटन हा सर्वात मोठा व्यवसाय; पण पर्यटनस्थळांचा अजिबात विकास नाही. चांगले रस्ते नाहीत. बाजारपेठेची रचना नाही. पर्यटनांसाठी डोंगरदऱ्यांत घोडे हेच मुख्य साधन, शिवाय दल लेकमध्ये शिकारा व हाऊसबोट हे दुसरे महत्त्वाचे साधन; पण त्यासाठी सरकारी योजना, आर्थिक मदत, सोयी नाहीत. मोटारगाड्या किंवा इतर मोजक्या साधनांचे ठेकेदार सारा पैसा बळकावून बसलेले, बाकी वेठबिगार. पर्यटन व्यवसायात आमजनतेचा काही सहभागच नाही. पर्यटनात अनेक नव्या कल्पना राबविता येण्याजोग्या आहेत. कॉटेज इंडस्ट्रीमध्ये प्रचंड आर्थिक ताकद आहे. सफरचंद, आक्रोड, बदाम, केशर यांना मोठी बाजारपेठ आहे. पण सगळी अंदाधुंदी..
अलीकडे मंदिर-दर्ग्यातून स्त्रियांना प्रवेश देण्याच्या प्रश्नावर महाराष्ट्रात संस्कृती रक्षकांनी मोठा विरोध केला. पण काश्मीरमध्ये मजबूत सुफीपरंपरेमुळे दर्गे आणि मशिदी दोन्ही ठिकाणी स्त्रियांचा मुक्त वावर आहे. वजूचे ठिकाण असो वा मशीद सगळीकडे स्त्रिया मुक्तपणे वावरतात. नमाजपठण करण्यासाठी मोठ्या संख्येने स्त्रिया मशिदीत येतात. शरीरासोबत डोळेसुद्धा जाळीदार कापडाने झाकणारा अफगाणी बुरखा अपवादात्मक दिसला.विद्यापीठांमध्ये तरुण मुलांची संख्या फारच कमी, मुलींची संख्या मात्र जास्त. स्त्रियांचा इतर जगाशी संबंध खूप कमी जाणवला. त्यामुळे उच्चशिक्षण घेणाऱ्या स्त्रियासुद्धा पारंपरिक धर्मविचार मानतात. तलाकचे प्रमाण खूप आहे. आपल्याकडे तुलनेत मुस्लीम स्त्रियांच्या प्रश्नाबाबत जागृती खूपच आहे असे वाटले.
मी काश्मिरी पुरुषांच्या अत्यंत नम्र वागण्याबद्दल बोललो, तेव्हा एका स्त्रीने अत्यंत खोचकपणे सांगितले, पुरुषांचे बाहेरचे प्रेम दिखाव्याचे आहे. घरी आमच्याशी पुरुष अत्यंत क्रूरपणे वागतात. काश्मीरमध्ये राजकीय भ्रष्टाचार खूप आहे, राजकारणी, बुद्धिजीवी मतलबी आहेत... असे तरुणांचे मत होते. आपल्या विपन्नावस्थेची तरुणांना जाणीव आहे. पण ते काश्मिरीयत अस्मिता आणि स्वायत्ततेच्या मुद्द्यावर तितकेच ठाम आहेत. पाकिस्तानबद्दल निदान मला भेटलेल्यांमध्ये काही आकर्षण दिसले नाही. काश्मीर मुस्लीमबहुल असण्याशी याचा संबंध जोडला जाऊ नये. बहुसंख्य हिंदू असणाऱ्या मणिपूरचासुद्धा तोच मुद्दा आहे. ख्रिश्चन बहुसंख्य नागा आणि मिझोरामचाही तोच आहे. धर्माच्या पलीकडे अस्मिता आणि स्वायत्ततेशी निगडित हे प्रश्न आहेत. सांस्कृतिक, भौतिक आणि राजकीय प्रश्नांचा हा गुुंता आहे. सर्वप्रथम, भारताने काश्मिरी अस्मितेला समजून घेतले पाहिजे. खराखुरा विकास करण्यासाठी हात पुढे केला, संगिनी दूर सारून प्रेमाने आलिंगन दिले तर मला वाटते, काश्मिरी तरुण भारतालाच पसंत करतील. लष्कराचे अस्तित्व काश्मिरी जनतेला सतत गुलामीची जाणीव देत राहते. दगडफेक करणाऱ्या तरुणांपासून बंदुक उचलणाऱ्या बुऱ्हानला हे वास्तव दाखवून सहज भडकवता येते. लष्कर हा विषय अत्यंत गुंतागुंतीचा आहे, याचे मला भान आहे. पण तो सोडविल्याशिवाय काश्मीरचे भारताशी मनोमीलन कठीण दिसते.