शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
3
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
4
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
5
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
6
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
7
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
8
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
9
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
10
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
11
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
12
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
14
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
15
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
16
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
17
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
18
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
19
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
20
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे

ऑस्ट्रेलियामधल्या 'जर्मनीत' भटकताना…

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 6:02 AM

आमच्या ॲडलेड जवळचं एक टुमदार गाव म्हणजे हॅंडॉर्फ! हान हे इथे सगळ्यात आधी वसलेले जर्मन वंशीय ख्यातनाम रंगचित्रकार सर हान यांचं नाव आणि जर्मन भाषेत ‘डोर्फ’ म्हणजे गाव. त्याचं झालं हॅंडॉर्फ.

ठळक मुद्देज्या रंगचित्रकाराच्या नावानी हे गाव वसलं, त्या सर हान हेयसन यांची चित्रं, पुरातन वस्तू, गावचा इतिहास याबरोबरच त्याकाळचे लोक आणि त्यांचे व्यवसाय यांची मजेशीर यादी हॅंडॉर्फ आर्ट गॅलरीमध्ये आहे.

- हिमानी नीलेश

ऑस्ट्रेलिया देशातल्या ॲडलेड या शहरात मी राहते. आमच्या ॲडलेड जवळचं एक टुमदार गाव म्हणजे हॅंडॉर्फ! हान हे इथे सगळ्यात आधी वसलेले जर्मन वंशीय ख्यातनाम रंगचित्रकार सर हान यांचं नाव आणि जर्मन भाषेत ‘डोर्फ’ म्हणजे गाव. त्याचं झालं हॅंडॉर्फ. डेरेदार झाडांच्या कमानीतून तुम्ही इथे प्रवेश करता.

इथलं लाकडी बांधकाम आणि जागोजागीच्या पाट्यांवर १८३९ सालचा उल्लेख यामुळे आपोआपच जुन्या जर्मन धाटणीच्या गावाची झलक मिळते. महाबळेश्वरच्या बाजारपेठेची आठवण व्हावी, अशी इथली रचना. इथे प्रत्येक दुकानाला स्वतःची ओळख आहे. म्हणजे एका दुकानात सगळ्याच वस्तूंची भरताड नसते. तर बरीचशी दुकानं आपापली खासियत विकतात. प्रत्येक दुकानाची आकर्षक सजावट अगदी घरंदाज असल्यासारखी. कँडल शॉपमध्ये मंद सुगंध भरून राहिलेला असतो. लव्हेंडर, व्हॅनिला अशा हरतऱ्हेच्या सुगंधी मेणबत्या सुबकपणे मांडलेल्या असतात. त्यांचे वास तर इतके हुबेहूब की चॉकलेट मेणबत्ती तर मला अनेकवेळा चाखण्याचा मोह झाला आहे.

अस्सल मधाचं दुकान असो, जाईजुई गुलाब पाकळ्या असे जिन्नस मूळ स्वरूपात घातलेल्या सुगंधी साबणाचं दुकान असो, वा कोंबडा येऊन आरोळी देतो ते ककूज क्लॉक अशा कुठल्याही दुकानात गेलात तरी तुम्हाला माणसांना भेटल्याचा भास व्हावा, इतकं त्यांना स्वतःचं असं व्यक्तिमत्व आहे.

लेदरच्या दुकानाची तर तऱ्हाच न्यारी. पुणेरी पाट्यांप्रमाणे इथे हज्जार ग्राफिटी पाट्या आहेत. तेल, पाणी केलेल्या लेदरचा वास इथे जाताच नाकात भरतो. इथले दुकानदारही काऊबॉय हॅट आणि घुडघ्यापर्यंत चामड्याचे शूज असा पोशाख करून माहोल निर्माण करतात. हे दुकान मला राकट रावडी स्वभावाचं वाटतं.

ज्या रंगचित्रकाराच्या नावानी हे गाव वसलं, त्या सर हान हेयसन यांची चित्रं, पुरातन वस्तू, गावचा इतिहास याबरोबरच त्याकाळचे लोक आणि त्यांचे व्यवसाय यांची मजेशीर यादी हॅंडॉर्फ आर्ट गॅलरीमध्ये आहे. जवळच अबोरिजिनल आर्ट गॅलरीदेखील आहे. इथलं वातावरण एकदम गूढगंभीर झालेलं असतं. गोल गोल ठिपक्यांची ती अर्थवाही चिन्हचित्र बघताना छान वेळ जातो.

भटकंतीनंतर खादाडी हवीच! इथली कॅफेजही बघत राहावी अशी! दुकानाप्रमाणे त्यांनाही स्वतःचं व्यक्तिमत्व आहे. लीटरभर बाटलीएवढे बिअर मग्स हातात धरून फेसाळलेली बिअर रिचवत नि भले मोठे जर्मन सॉसेज् खात लोक मनसोक्त आनंद लुटत असतात. जेवण झाल्यावर इथला जर्मन बी स्टिंग केकसुद्धा खायला लोक गर्दी करतात. फज शॉपपेक्षाही पलीकडे असलेलं चॉकलेटच्या दुकानात परडी भरून चॉकलेट घेताना मौज येते नि इथले फज बार्स घेतल्याशिवाय आम्ही इथून घरी परतत नाही. इथला स्ट्रॉबेरीचा मळा आणि शेतावरच्या पाळीव प्राण्यांना बघण्यासाठी कोण झुंबड उडते.

टुमदार लाकडी जर्मन बांधकामाची दुकानं, कॅफेज् याप्रमाणे अजून एक दिसणारी नित्याची गोष्ट म्हणजे जागोजागी सुरेल वादन करणारे वादक. काहीजण तर चक्क पारंपरिक जर्मन पोशाख घालून अकॉर्डीयन वाजवतात.

इथले एक आजोबा आता आमच्या चांगलेच परिचयाचे झाले आहेत. ‘घुटन टाग’ हिमानी असं म्हणून ते कायम हसून अभिवादन करतात. या आजोबांच्या तीन पिढ्या इथे नांदल्या! ते दुसऱ्या पिढीतले. मला ते इथल्या प्रत्येक बदलाचे एखाद्या पुरातन वटवृक्षासारखे साक्षीदार वाटतात. कोरोनाच्या काळात त्यांची एक बहीण कशीबशी जीव मुठीत धरून पोहोचली त्याची कथा सांगून त्यांनी मला एका कवीची इंग्रजी कविता ऐकवली. कायम हसतमुख असणारे हे आजोबा आज हळवे झाले होते ते त्या कवितेमुळे. त्यांच्या त्या कवितेचं मी केलेलं हे मराठी रुपांतर... 

स्मगलर

विमानतळावरच्या इमिग्रेशनच्या रांगेत उभे होतो आम्ही !

इमिग्रेशनचे अधिकारी आले, त्यांनी सामान उचकटलं,

खिसे चाचपले, कागदपत्रं तपासली,

कुठले कुठले खण तपासले!

सहीसलामत सुटलो आम्ही.

सहीसलामत अशासाठी म्हटलं,

कारण स्मगल करून आणलेली आमची संस्कृती

आणि ज्या मूळ देशात आम्ही वाढलो

तिथले सूर्योदय नि सूर्यास्ताच्या आठवणी

सुटल्याच शेवटी त्यांच्या नजरेतून!!!

(ॲडलेड, ऑस्ट्रेलिया)

himanikorde123@gmail.com