- दीपक देशमुख
भूषण पाटील हा मराठवाड्यातील लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा एमबीबीएसच्या तृतीय वर्षाचा विद्यार्थी. भटकंती करीत विविध भागांना भेटी देण्याचा त्याचा आवडता प्रांत. नवनवीन लोकांना भेटणे, त्यांच्याशी संवाद साधणे आणि त्यांची संस्कृती जाणून घेण्याचे वेड त्याला आजपर्यंत विविध भागांत घेऊन गेले.
या प्रवासात त्याने चारचाकी वाहनापेक्षा दुचाकीला अधिक महत्त्व दिले. यामागचे कारण सांगताना तो म्हणाला, जग अधिक जवळून पाहता यावे, लोकांशी अधिक जवळीक साधता यावी, याचसोबत खडतर आणि अवघड वळणांच्या रस्त्यावरून प्रवास करणे सोपे व्हावे यासाठी आवडीची ‘इनफिल्ड थंडरबर्ड’ अर्थात माझी ‘शेरदिल’ निवडली.
दुचाकीवरून सहलीला खरेतर ‘विकएण्ड’मधून सुरुवात झाली. जवळची पर्यटन स्थळे पालथी घालायला सुरुवात झाली. पुढे लांबच्या प्रवासाचे बेत आखले. त्यातील महत्त्वाचा टप्पा म्हणजे नुकतीच पार पडलेली ‘कच्छ’ सवारी! भूषण सांगत होता, पालकांची परवानगी मिळायला फारसा वेळ लागला नाही. कारण ते मला नेहमीच प्रोत्साहन देत माझ्या पाठीशी उभे राहिले. लगेच तयारीला लागलो. आवश्यक ती तयारी झाली आणि ११ जानेवारी २०१९ रोजी पहाटे ५ वाजता औरंगाबादहून मोहिमेवर निघालो. कच्छचे रण साद घालत होते. प्रवास सुरू झाला.
लहान-मोठी गावे मागे टाकत गुजरातमध्ये प्रवेश केला. प्रथम लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचे ‘स्टॅच्यू आॅफ युनिटी’ हे स्मारक गाठले. सारी भव्यदिव्यता डोळ्यात साठवली. धन्य वाटले. त्यानंतर वडोदरामार्गे अहमदाबादला पोहोचलो. साबरमती आणि कांकरिया सरोवर मन भरून पाहिले. गुजरातेतील विविध स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद घेत भुजच्या दिशेने प्रवासाला सुरुवात केली.
नजर पोहोचेल तिथवर रूपेरी, चंदेरी जमीन आणि पांढरे-नळे आकाश बघून त्या मोहक वातावरणात हरवून गेलो. मन आणि विचार ताजेतवाने झाले. त्यानंतर भूजवरून सौराष्ट्रा शिरलो. काठीयावाडी भोजन आणि मोठ्या मनाची माणसे यामुळेच या भागातील पर्यटन अधिक फुलले असावे. द्वारकाधीश मंदिर, सोमनाथ ज्योतिर्लिंग, गीर अभयारण्य ही ठिकाणे डोळ्याचे पारणे फेडतात, याचा अनुभव घेतला. परतीच्या प्रावासात जुनागढजवळ एका संकटात सापडलो; पण स्थानिक लोक मदतीला धावून आल्याचे सांगताना तो म्हणाला, ‘जगात चांगली माणसे आहेत म्हणूनच हे जग सुंदर बनले आहे. माणुसकी जिवंत आहे, सांस्कृतिक वारसा जिवापाड जपला जातो आहे, याचा प्रत्यय पावलोपावली आला. या प्रवासाने ‘स्वप्न’ जगायला शिकविले.’
‘अकेला गया था मै, ना आया अकेलामेरे संग संग आया यादों का मेला....’
म्हणत भूषण पाटील सांगत होता, या प्रवासातून मोलाचे अनुभव आले. खूप शिकायला मिळाले. प्रवासात मदत करणारी माणसे भेटली. कधी ऐकटेपणा जाणवलाच नाही. राजकोट, वडोदरा, सुरत असा प्रवास करीत १० व्या दिवशी दुपारी ३.३० वाजता तो ३२२५ किमी भटकंती करून औरंगाबादेत पोहोचला.