नितीन जगताप, प्रतिनिधी, मुंबई
गेल्या आठवड्यात मुंबई पोलिसांनी मुंबईत दुचाकी चालविणाऱ्या व्यक्तीसोबतच आता मागे बसणाऱ्या व्यक्तीलाही हेल्मेटची सक्ती केली आहे. हेल्मेट सक्तीचा विषय निघाला की, राज्यातील विविध शहरांत त्याचे वेगवेगळे सूर ऐकायला येतात. पुण्यासारख्या शहरात तर हेल्मेट सक्ती लोकांनी झुगारून दिलेली आहे. कायदा जर सर्वांसाठी समान आहे, तर एका शहराला एक न्याय आणि दुसऱ्या शहराला दुसरा न्याय, हे कसे चालेल? हेल्मेटला विरोध करून नेमके आपण काय साधतो, आपल्या सुरक्षेपेक्षा आपला हेल्मेटविरोध मोठा आहे का?
कोरोनामुळे मानवी आयुष्य फार झपाट्याने बदलले आहे. प्रत्येकाच्या जीवनात आमूलाग्र बदल दिसून येत आहेत. लोकांच्या आरोग्यविषयक सवयी बदललेल्या आहेत. सतत २० सेकंद साबणाने हात धुणे, हाताच्या बोटांचा डोळ्याला/तोंडाला स्पर्श होऊ न देणे, घसा कोरडा राहणार नाही, याची काळजी घेणे. विशेष म्हणजे, व्यक्ती बाहेर जात असेल तर मास्कचा नियमित वापर करणे. लोकांनी मास्क वापरणे किती कमी कालावधीत स्वीकारले आहे. मग हेच हेल्मेटच्या बाबतीत दुचाकीस्वारांकडून का होत नाही? ‘मास्क घालू नका, न्यायालयात जाऊन आपली बाजू मांडा’, असे कोणी म्हणत आहेत का? एकट्या पुण्यात मागील १५ वर्षांत किमान ८-१० वेळा हेल्मेट सक्तीची कारवाई झाली; पण लोकांनी ती हाणून पाडली.
२०१८ मध्ये हेल्मेट न घातल्यामुळे दुचाकीस्वारांनी गमावला जीव ४३,६१४ - भारत५,२५२ - महाराष्ट्र
जर त्यांनी हेल्मेट घातले असते, तर त्यापैकी ४०% लोकांचा जीव नक्कीच वाचला असता. तरुणांचे सर्वाधिक बळी मुंबई वाहतूक पोलिसांच्या २०२०च्या आकडेवारीनुसार दुचाकी अपघातात तरुणांचा सर्वाधिक बळी गेला आहे. एकूण अपघाती मृत्यूंपैकी २० ते ३४ या वयोगटातील तरुणांचे प्रमाण ५७ टक्के आहे. हे मृत्यू टाळण्यासाठी वाहतूक नियमांच्या अंमलबजावणी सोबतच जनजागृतीची गरज आहे.
मुंबईत सर्वाधिक अपघाती मृत्यूमुंबईत २०१५ ते २०२० या पाच वर्षांत १६६ दुचाकीस्वारांनी जीव गमावला. त्यानंतर १४८ पादचारी, २२ वाहनचालक, ६ सायकलस्वारांचा मृत्यू झाला. कोरोनामुळे आपण मास्क घालायला लागलो; पण ज्या देशात १.५ लाख लोक रस्ते अपघातामुळे मरण पावतात, त्या देशात लोक हेल्मेट कधी घालणार. - संदीप गायकवाड, वाहतूक अभ्यासक, परिसर संस्था