शहरं
Join us  
Trending Stories
1
युगान्त... रतन टाटा पंचत्वात विलीन; उद्योग विश्वातील युग संपले, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
2
अलविदा... रतन टाटा यांच्या निधनाने संपूर्ण देश भावुक; सोशल मीडियावरुनही श्रद्धांजली
3
विमानांत रतन टाटा यांच्या स्मृतींना उजाळा! गुंतवणूकदारांचा विश्वास कायम, शेअर्स वधारले
4
रतन टाटा यांचे कलाटणी देणारे धाडसी निर्णय; जेएलआरचे अधिग्रहण ते एअर इंडियाची घरवापसी
5
राज्यात तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता; परतीच्या पावसाला अद्याप सुरुवात नाही
6
नॉन क्रिमिलेअरची मर्यादा १५ लाख करण्याची शिफारस; केंद्राला प्रस्ताव, VJNT, SBCचा समावेश
7
आणखी पाच समाजांच्या कल्याणासाठी महामंडळे; प्रत्येकी ५० कोटींचे भाग भांडवल दिले जाणार
8
विजयादशमीचा मुहूर्त टळणार; मविआत पेच, विदर्भ, मुंबईतील जागांवरील तिढा कायम
9
‘एक देश, एक निवडणूक’ धोरण अमान्य; ‘या’ राज्याने विधानसभेत ठराव पारीत करत केला विरोध
10
‘ज्ञानराधा’ला ईडीचा दणका; १ हजार कोटींची मालमत्ता जप्त; मुंबई, बीड, जालना येथील संपत्ती
11
विशेष मोहीम राबवून राजकीय होर्डिंग्ज हटवा; उच्च न्यायालयाचे राज्यातील सर्व पालिकांना आदेश
12
धनगर ऐवजी धनगड वाचावे, शुद्धीपत्रक एका रात्रीत रद्द; संबंधित अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी
13
अक्षय शिंदेसाठी ‘ते’च वाहन का निवडले? पोलिस चकमकप्रकरणी सीआयडीचा पोलिसांना सवाल
14
चीनने आपल्या ताकदीचा वापर शांततेसाठी करावा: तैवानचे राष्ट्राध्यक्ष लाइ चिंग-ते
15
Mumbai Rains: मुंबईला पावसाने झोडपलं; उपनगरांसह ठाण्यातही मुसळधार बरसला!
16
जातीय समीकरण आवश्यकच, मात्र हिंदुत्वापासून दूर जाऊ नका; संघाने टोचले भाजप पदाधिकाऱ्यांचे कान
17
एक मतदारसंघ अन् ३ तगडे नेते इच्छुक; माढ्याच्या मैदानात शरद पवार कोणता पैलवान उतरवणार?
18
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई; 2000 कोटी रुपयांचे कोकेन जप्त, आठवडाभरात दुसरी कारावई
19
शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असणाऱ्या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; ७ हजार गावांना होणार फायदा
20
हरयाणानंतर आता महाराष्ट्रातही भाजपला 'फ्रीबीज'चा फायदा होईल का?

जायगावची ‘वॉटर बँक’

By admin | Published: August 26, 2016 5:11 PM

गावाच्या पाचवीलाच जणू दुष्काळ पुजलेला. गावाला पाणीपुरवठा करणारी एकच विहीर गाव ओढ्यात, ती देखील जानेवारी-फेब्रुवारीपर्यंत कशी तरी टिकायची की नंतर सगळा खडखडाट!

-  साहील शहा

गावाच्या पाचवीलाच जणू दुष्काळ पुजलेला.गावाला पाणीपुरवठा करणारी एकच विहीर गाव ओढ्यात, ती देखील जानेवारी-फेब्रुवारीपर्यंत कशी तरी टिकायचीकी नंतर सगळा खडखडाट!मग अख्ख्या गावाने शासनाच्या टँकरकडे डोळे लावून बसायचं....जायगावने फक्त दीड महिन्यातहे वि-चित्र बदलून टाकले आहे.आज गावाकडे थोडाथोडका नव्हे तर४ अब्ज लिटर पाण्याचा स्टॉक आहे.हे कसे घडले?

जायगावचं नाव घेतलं की डोळ्यासमोर उभा राहतो तो उंचपुरा रामेश्वराचा डोंगर. कोरेगाव तालुक्याच्या एका कोपऱ्यात अन् तिन्ही बाजूंनी डोंगराच्या सान्निध्यात वसलेलं हे गाव अवघे तेराशे लोकवस्तीचं. कायम दुष्काळ उराशी घेऊन वाटचाल करणाऱ्या या गावाने अवघ्या दीड महिन्यात जलक्रांती करून दाखवत आज अब्जावधी लिटर्स पाण्याचा साठा केला आहे. शासनाच्या ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ योजनेच्या घोषणेत या गावाने अलगदसा बदल केला असून, गावकऱ्यांनी आता ‘पाणी अडवा, पाणी जिरवा.. पाणी साठवा’ अशा घोषणा देत दुष्काळावर विजय मिळविला आहे. ग्रामस्थ, युवक वर्ग, आर्ट आॅफ लिव्हिंगचे साधक आणि प्रशासनाच्या सहकार्याने जायगावनं नेत्रदीपक यश संपादन केलं आहे. राजकारणाचे जोडे बाजूला ठेवत, श्रमदानातून या गावाने स्वत:मध्ये खूप बदल घडविला असून, आता गाव मोठ्या जलक्रांतीसाठी सज्ज झाले आहे. जायगाव हे राजकारणातील धगधगते केंद्र. गावात दोन ते तीन पार्ट्यांचे राजकारण आणि त्यात वेगवेगळ्या पक्षांची लुडबूड ठरलेली असायची. जायगावला जायला कोरेगाव आणि रहिमतपुरातून दोन रस्ते. डोंगराकडेला असलेल्या या गावाकडे आजवर कोणत्याही राजकीय पक्षाने विशेष लक्ष दिलेले नव्हते. १९७२ च्या दुष्काळात रामेश्वराच्या डोंगराच्या पायथ्याला तीन दिशेला तीन पाझर तलावांची निर्मिती शासनाने केली. १९७२ पासून २०१५ पर्यंत केवळ दोन वेळेसच प्रचंड पावसामुळे हे तलाव पूर्णत: भरले आणि त्यानंतर कोरडे ठणठणीत पडले होते. गावाला पाणीपुरवठा करणारी एकच विहीर गाव ओढ्यात, तीदेखील जानेवारी-फेब्रुवारीपर्यंत कशी तरी चालते आणि त्यानंतर शासनाच्या टँकरद्वारे पाणीपुरवठा हाच पर्याय गावकऱ्यांपुढे असायचा. गावाच्या पश्चिमेला दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या कण्हेरखेड गावाच्या शिवारातून गेलेल्या धोम डाव्या कालव्यावरून हाताच्या बोटावर मोजण्याइतपत शेतकऱ्यांनी ‘लिफ्ट इरिगेशन’ स्कीम करून आपली शेती ओलिताखाली आणली. त्यांनासुद्धा विजेचा प्रश्न. पण शेती ओलिताखाली, त्यामुळे उसाला प्रथम पसंती. गावच्या पूर्वेला असलेल्या शेतकऱ्यांना केवळ निसर्ग साथीला असल्याने ते पावसावर आधारित ज्वारी हेच पीक घ्यायचे. दरवर्षी लॉटरी पद्धतीप्रमाणे पिकले तर चार पैका; अन्यथा तोटा आणि तोटाच. शेती पिकत नसल्याने शाळा नाही आणि शाळा नाही म्हटलं तर कामधंदा करायला पुणे आणि मुंबईच गाठायची, अशी परिक्रमा या गावाची. जायगावमधील होतकरू युवक पुण्या-मुंबईत ड्रायव्हर आणि रंगारीची कामे करण्यात धन्यता मानतात. हे चित्र बदलण्याच्या दृष्टीने गावाची पावले पडू लागली आहेत. आमीर खान यांच्या ‘पानी फाउंडेशन’च्या वतीने घेण्यात आलेल्या ‘सत्यमेव जयते वॉटर कप’ स्पर्धेत जायगावने विभागून दुसरा क्रमांक पटकावला आहे. प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या वेळूच्या खांद्याला खांदा लावून दुसरा क्रमांक खेचून आणणाऱ्या जायगावची कहाणी चित्तथरारक आहे. ‘आर्ट आॅफ लिव्हिंग’ने दिलेली दमदार साथ, ग्रामस्थांचे अहोरात्र परिश्रम आणि निसर्गाची साथ यामुळे आज जायगाव वॉटर बँक बनले आहे. पाणी अडवून साठविण्याची ‘वॉटर रिसायकलिंग स्कीम’ या गावाने राबविली असून, ओढ्यातून वाहून जाणारे पाणी पुन्हा उचलून मोठ्या पाझर तलावात सोडण्याची किमया यशस्वी करून दाखविली आहे. सध्या विजेच्या पंपावर पाणी उचलले जात असले, तरी नजीकच्या काळात सौरऊर्जेवर आधारित पंप बसविण्याचा जायगावकरांचा मानस आहे. सुभाष महादेव कदम ऊर्फ नाथाभाऊ हे गावातील जागरूक युवक. गावात शालेय शिक्षण घेतल्यानंतर नोकरीसाठी पावले बाहेर पडू लागली. कला शाखेच्या पदवीनंतर पहिलवानकीसोबत ड्रायव्हिंग करण्यासाठी नाथाने थेट मुंबई गाठली. गावातील अनेक युवक तेथे असल्याने कसलीच अडचण नव्हती. कामाला सुरुवात झाली आणि एकेदिवशी ‘आर्ट आॅफ लिव्हिंग’कडे पावले वळली. कोर्सेस केल्यानंतर गावाचा रस्ता धरला. शेती करत योगा सुरू केला आणि वीस-पंचवीस जण योगासाठी येऊ लागले. योगा करता करता गावकऱ्यांशी गट्टी जमली. मग समाजकारणामध्ये लक्ष घातले आणि ग्रामपंचायत निवडणूक जिंकली. एक वर्षातच उपसरपंचपदाची माळ गळ्यात पडल्यानंतर गावचा विकास खुणावू लागला. सहकारी शिवदास कदम आणि सोमनाथ सोनवणे ऊर्फ आबा यांच्या साथीने गावचा विकास साधण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. टायर क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय कंपनी असलेल्या गुडइअर कंपनीबरोबर सहकार्याने जायगावमध्ये आर्ट आॅफ लिव्हिंगने तब्बल ७७ व्यक्तिगत शौचालये उभारली, तीदेखील तयार स्वरूपात. शौचालयांमुळे गावातील अस्वच्छता संपुष्टात आली. त्यानंतर गावात वेगवेगळी शिबिरे झाली आणि सर्वांनाच गावासाठी काही तरी केले पाहिजे, असे वाटू लागले. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या राळेगणसिद्धीमध्ये आयोजित केलेल्या युवक नेतृत्व शिबिराला गावातील वीस युवक गेले. अण्णा हजारे यांनी त्यांना मार्गदर्शन केले आणि गावासाठी काय केले पाहिजे, याबाबत मोलाचा सल्ला दिला. गावातील युवक चांगले चार्ज झाले. त्यांनी जायगाव गाठताच गावकऱ्यांना एकत्र केले आणि जलसंधारणाची कामे श्रमदानातून हाती घेण्याचा निर्धार केला. सुरुवातीला गावकऱ्यांना वाटले, शिबिराचा परिणाम असेल, असते तरुण पोरांची हौस! पण गावातली तरुण मुले थांबायचे नाव घेईनात. त्यांनी शौचालये उभारलेल्या ७७ जणांना एकत्र केले आणि प्रत्येकी लोकवर्गणी काढण्याचा निर्णय घेतला आणि तेथेच जलक्रांतीची मुहूर्तमेढ रोवली गेली. जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात सर्वत्र जलयुक्त शिवार योजनेचा डंका वाजत होता. वृत्तपत्र असो वा दूरचित्रवाहिनी, न्यूज चॅनेल्स सर्वच ठिकाणी या योजनेबाबत आणि अनेक गावांमध्ये सुरूअसलेल्या कामांची माहिती मिळत होती. आपले गाव जलयुक्त शिवार योजनेत सहभागी नसले तरी युवकांनी पुढाकार घेऊन श्रमदानातून गाव पाणीदार करण्याचे ठरवले आणि कामाला सुरुवात झाली. गावातील एका शेतकऱ्याचा ट्रॅक्टर-ट्रॉली आणि कुदळ-फावडी घेऊन चला श्रमदानाला चला... ‘जय गुरुदेव.. जय गुरुदेव...’ चा नारा घुमू लागला. सुरुवातीला म्हणावा असा प्रतिसाद नव्हता; मात्र एका आठवड्यात काम दिसू लागल्यानंतर गावकऱ्यांनी श्रमदानाचे महत्त्व ओळखले आणि घराला कुलपे लावून तिन्ही पिढ्या श्रमदानाला रामेश्वराच्या डोंगर पायथ्याला रखरखत्या उन्हाची पर्वा न करता जाऊ लागल्या. गावासाठी असलेले कृषी सहायक अजय कांबळे यांनी गावकऱ्यांना प्रोत्साहन दिले, त्यांनी आपल्या वरिष्ठांनादेखील गावातील कामाची माहिती दिली. त्यानंतर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कधी नव्हे ती जायगावची वाट चोखाळली. दिवसागणिक काम उभे राहू लागले. त्यातच आमीर खान यांच्या ‘पानी फाउंडेशन’च्या वतीने जाहीर झालेल्या ‘वॉटर कप’ स्पर्धेची माहिती मिळाली. या स्पर्धेत कोरेगाव तालुक्याचा समावेश असल्याचे समजल्यानंतर गावकऱ्यांनी या स्पर्धेत सहभागी होऊन यश खेचून आणण्याचा ठाम निश्चय केला. पाणी क्षेत्रातील जाणकार डॉ. अविनाश पोळ यांच्याशी संपर्क केला गेला आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली जायगाव या स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी पूर्ण ताकदीने उतरले. गावकऱ्यांनी एकत्रित होऊन लोकवर्गणी गोळा केलीच; त्याचबरोबर भूमिपुत्र पण पुणे जिल्ह्यात उद्योजक म्हणून ख्याती असलेल्या पोपटराव गवळी यांनी मदतीचा भरीव हात देऊ केला. त्यांनी लोकवर्गणीत भर न घालता स्वखर्चातून तीन सीमेंट बंधारे बांधण्याचा विडा उचलला. तांत्रिक क्षेत्रात कार्यरत असल्याने त्यांनी अत्यंत उच्च तंत्रज्ञानाचा वापर करत गावातील दोन ओढ्यांवर तीन सीमेंट बंधारे अल्पकालावधीत बांधले. या बंधाऱ्यातून ओव्हर फ्लो होणारे पाणी पुन्हा लिफ्ट करून रामेश्वर डोंगराच्या पायथ्याला असलेल्या मोठ्या पाझर तलावात सोडण्याचा अभिनव प्रयोग त्यांनी केला. सध्या विजेच्या मोटारवर हा प्रयोग सुरू आहे; मात्र नजीकच्या काळात सौरपंपाचा वापर करण्याचा त्यांचा मानस आहे. मध्यंतरीच्या पावसात मुख्य पाझर तलाव अर्धा भरला; मात्र इतर पाझर तलावांबरोबरच सीमेंट बंधारे ओव्हरफ्लो झाले आहेत. सांडव्यावरून पाणी वाहत असल्याने सध्या मोठ्या पाझर तलावात २४ तासांत साडेतीन लाख लिटर पाणी सोडले जात आहे. या तलावाकडे जाणारी पाइपलाइन थोडीथोडकी नाही तर सहा हजार फुटांची आहे. वॉटर कप स्पर्धेत सहभागी असलेली बहुतांश गावे जलयुक्त शिवार योजनेत होती. जायगाव मात्र त्याला अपवाद होते. या स्पर्धेत पहिल्या नऊ आलेल्या गावांपैकी आठ जलयुक्त शिवार योजनेतली आहेत. पोपटराव सांगत होते, ‘आम्ही पाणी अडविण्याबरोबरच ते साठविण्याचा निर्धार केला. सीमेंट बंधारे उभारताना अनेक अडचणी आल्या; मात्र जिद्दीच्या जोरावर त्याला मात देत यशस्वी झालो. आज गावाकडे थोडाथोडका नव्हे तर चार अब्ज लिटर पाण्याचा स्टॉक आहे.’ त्यांच्यासह सीमेंट बंधाऱ्याकडे फेरी मारली, तेव्हा लहान मुले मस्त पोहण्याचा आनंद घेत होती. हे चित्र जायगावला नवीनच आहे, असे म्हटले तर चुकीचे होणार नाही. आजवर मुलांना पोहायचे झाले तर शेतातील विहिरींशिवाय पर्याय नव्हता. या विहिरी तर चार महिने पाण्याने भरलेल्या व इतर आठ महिने कोरड्या पडायच्या नाही तर तळ गाठायच्या. गावाची अनेक वर्षे धुरा सांभाळलेले ज्ञानदेव कदम यांनी थेट लेखाजोखा मांडला, ‘गावाला क्षेत्र मोठे असले तरी पाच टक्केदेखील बागायत नव्हते. युवकांनी ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पुढाकार घेतल्याने आज आम्ही बागायती गावांच्या यादीत जाऊन बसू शकतो, एवढा आम्हाला विश्वास आहे. मनरेगाबरोबरच श्रमदानाला सर्वोच्च महत्त्व दिले, त्याचबरोबर आर्ट आॅफ लिव्हिंगच्या चमूने दिलेली साथ लाख मोलाची ठरली. त्यांनी साडेचार लाखांची, तर जयवंत प्रतिष्ठानने ५१ हजारांची मदत केली. श्री सद्गुरू साखर कारखाना, सह्याद्री व किसन वीर कारखान्यांनी अवजड यंत्रसामग्री पुरविल्याने काम हलके झाले आणि लवकरात लवकर पूर्ण झाले. गावात झालेली एकी आणि श्रमदानातून मोठे काम उभे राहिले असून, ते टिकवण्याची महत्त्वाची जबाबदारी आता गावावर येऊन पडली आहे.’ ‘वॉटर बँके’चे खरेखुरे प्रवर्तक ठरलेल्या नाथा कदम यांची छाती तर अभिमानाने फुगलीच होती. ते म्हणतात, ‘आम्ही हम साथ-साथचा नारा देत श्रमदान केले. गावातील लहान मुलांपासून वयोवृद्ध ग्रामस्थांनी मनापासून साथ दिली. शाळेचे शिक्षक, मुख्याध्यापकदेखील श्रमदानात सहभागी झाले. वाढदिवस, लग्नाचे वाढदिवसदेखील श्रमदानावेळी साजरे केले जाऊ लागले. वाढदिवसाच्या खर्चाला फाटा देत ती रक्कम लोकवर्गणीकडे वळविली. कृषी सहायकाच्या मुलाने आपल्या वाढदिवसाचा खर्च न करता वृक्षारोपणासाठी गावाला निधी दिला, यापेक्षा मोठे यश कोणते? भारतीय हवाई दलात कार्यरत असलेले नवनाथ कदम अन् घनश्याम शिंंदे यांनी गावासाठी आपणही काही तरी करावे, या भावनेतून दीड महिना सुटी टाकली अन् थेट श्रमदानाचे ठिकाण गाठले. सकाळचा नास्ता-जेवण तेथेच करत त्यांनी सर्वांना आपलेसे केले. श्रमदानाने आपण बदल घडवू शकतो या भावनेतून जायगावची यशोगाथा पुढे आली.’ ग्रामसेवक उत्तम कचरे, पोलीसपाटील गणेश जंगम हेदेखील गावाच्या एकीला तोड नसल्याचे सांगतात. सरपंच जयश्री रवींद्र संकपाळ यांना आपल्या गावाने मिळविलेले यश आनंददायी वाटत असले तरी प्रथम क्रमांक हुकला, याची खंत त्यांच्या मनात आहे. ‘आमच्या गावाचे काम पाहिल्यावर आम्ही कुठे कमी पडलो नाही, याचा आनंद आहे. मात्र यशाने हुलकावणी दिली असली तरी भविष्यकाळात जायगाव हे आदर्श पाणीदार ग्राम होण्यासाठी आम्ही प्रयत्न सुरूकेले आहेत. आम्ही गावासाठी काय केले नाही, हे विचारा. लग्नाच्या अहेराचे पैसेदेखील लोकवर्गणीसाठी दिले. नववधूंचे श्रमदान.. वाढदिवस असलेल्यांचे श्रमदान... अहो, काय सांगायचे अन् किती सांगायचे. जायगावने केलेली हरितक्रांती हा परिसराच्या विकासामध्ये मैलाचा दगड ठरणार आहे, हे निश्चित.’

जायगावच्या करवंदाची गोडी

जायगावकरांबरोबरच साधकांनीही श्रमदानामध्ये मोठा हातभार लावला. गावकऱ्यांनी नास्त्याची सोय केली असली, तरी बहुतांश जण घरूनच डबा आणत. झाडाच्या सावलीला डबे खाताना डोंगराच्या पायथ्याला असलेली करवंदे सर्वांनाच खुणावत होती. घाट रस्त्यांवर करवंदे म्हणून ओरडत फिरणारी मुले आणि आबालवृद्ध सगळ्यांच्या डोळ्यासमोर येत. करवंदाची चव चाखत श्रमदानाला सुरुवात झाली की काम थांबतच नसे. सातारकरांसह साधकांना करवंदाची एवढी गोडी लागली की ते डबा विसरायचे आणि मधल्या सुटीत करवंदावर तुटून पडायचे.

रामेश्वराच्या डोंगरात गुढी

श्रमदानाने आपण बदल घडवू शकतो या भावनेतून यशाची गुढी उभारत ‘गुढीपाडवा’ रामेश्वराच्या डोंगरात महिलांनी साजरा केला. जायगावने श्रमदानासाठी सर्व प्रकारांचा अवलंब केला. लग्नाच्या अहेराचे पैसेदेखील लोकवर्गणीसाठी दिले. किती काय सांगावे, त्याला सीमाच नाही असे गावातले लोक कौतुकाने बोलतात. नववधूंचे श्रमदान.. वाढदिवस असलेल्यांचे श्रमदान... श्रमदानामुळे जायगावने केलेली हरितक्रांती हा परिसराच्या विकासामध्ये मैलाचा दगड ठरणार आहे.

गाव : जायगाव

लोकसंख्या : १३०० घरे : २७७ श्रमदानातून केलेली पाणी साठवण्याची एकूण व्यवस्था- १ लाख ७५ हजार क्यूबिक लिटर्स गावासाठी वॉटर बजेट गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या छतावर पडणारे पावसाचे पाणी शोषखड्ड्यात उतरविण्याची व्यवस्था. २७ विहिरी आणि १ विंंधनविहिरीचे पुनर्भरण. ६-७ ओढे खोलीकरण व रुंदीकरण ऊसक्षेत्र कमी करून अन्य पिके घेण्याकडे कल. त्यासाठी ठिबक सिंचन प्रणालीचा वापर. बी. बी. एफ (बेडवर) शेती/पिके. दररोज पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून असलेल्या जायगावात आता वर्षभरासाठी पुरेल आणि नजीकच्या गावांची तहान भागवता येईल एवढा पाणीसाठा असलेली वॉटर बँक. बांधबंदिस्ती : २५० हेक्टर नवीन मातीबांध : ४ जुन्या मातीबांधातील गाळ हटविला. २० दगडी बांध सी. सी. टी. : ३०० एकर

 

वॉटर कप : दोनआमीर खानच्या प्रेरणेतून सुरू झालेल्या ‘पानी फाउंडेशन’ने यावर्षीच्या दुष्काळात महाराष्ट्रातल्या ११६ गावांमध्ये ग्रामस्थांना साद घालत एकत्र केले आणि गावात पडणारा पावसाचा प्रत्येक थेंब गावातच अडवण्यासाठी लोकांच्या हाती कुदळी आणि फावडी आली.सरकारवर अवलंबून न राहता आपले पाणी आपणच अडवण्याचा, जिरवण्याचा, वाचवण्याचा आणि जबाबदारीने वापरण्याचा वसा घेऊन कामाला भिडलेल्या या गावांनी जबरदस्त लढत दिली. पाण्याच्या थेंबाथेंबासाठी झालेल्या या स्वयंस्फूर्त संघर्षाच्या यशोगाथांनी ग्रामीण महाराष्ट्रात एक नवे चैतन्य आणले आहे.पानी फाउंडेशनच्या ‘सत्यमेव जयते वॉटर कप’ स्पर्धेत पहिला क्रमांक मिळवणाऱ्या सातारा जिल्ह्यातल्या वेळू गावात गेल्या रविवारी भटकंती झाली.आज भेट विभागून दुसरा क्रमांक मिळवणाऱ्या गावाची : वेळूच्या शेजारीच.. कोरेगाव तालुक्यातलं जायगाव!तब्बल सहा हजार फुटांची पाइपलाइनजायगावमध्ये ओढ्यांवर उभारण्यात आलेले तिन्ही सीमेंट बंधारे ओव्हरफ्लो झाले आहेत. अत्यंत आधुनिक तंत्रज्ञान वापरल्याने पाण्याची गळती होण्याची शक्यताच नाही. या बंधाऱ्यातून ओव्हरफ्लो होणारे पाणी पुन्हा लिफ्ट करून रामेश्वर डोंगराच्या पायथ्याला असलेल्या व १९७२ च्या दुष्काळात उभारण्यात आलेल्या मोठ्या पाझर तलावात सोडण्याचा अभिनव प्रयोग गावाने केला आहे. साकव पुलानजीक असलेल्या बंधाऱ्याच्या खालच्या बाजूला डोह तयार करून तेथे पाणी अडविले जात आहे. तेथून विजेच्या मोटारद्वारे हे पाणी सहा हजार फुटांच्या पाइपलाइनद्वारे पाझर तलावात सोडले जात आहे. पावसाने आता ओढ दिली असली तरी दररोज फुटाफुटाने पाझर तलावातील पाण्याची पातळी वाढत चालली आहे. सध्या गावाने विजेचा पंप वापरला आहे; मात्र नजीकच्या काळात सौरपंपाचा वापर करण्याचा त्यांचा मानस आहे.