शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दिकी हत्याकांडातील चौथ्या आरोपीची ओळख पटली; पोलीस जसीन अख्तरच्या मागावर
2
Baba Siddique : 'ती' पोस्ट करणारा अकोल्याचा शुभम लोणकर भावासह फरार, पोलिसांकडून शोध
3
Baba Siddique यांना खरंच वाय दर्जाची सुरक्षा होती का? अखेर उत्तर मिळालं
4
नाशिकमध्ये अग्निवीरांचा मृत्यू; राहुल गांधींचे पंतप्रधान मोदी-राजनाथ सिंहांना तीन सवाल
5
'महाराष्ट्र राजकीय परिवर्तनासाठी सज्ज', विधानसभा निवडणुकीबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
6
१६ ऑक्टोबरला नवीन पल्सर लाँच होणार? पहिल्या सीएनजी बाईकला टक्कर देणार!
7
चांदीने १ लाखाचा टप्पा केला पार; जाणून घ्या कोणत्या शहरात किती दर?
8
बाबा सिद्दिकी हत्या : एका आरोपीला पोलीस कोठडी, तर दुसऱ्याला..., न्यायालयाचा आदेश काय?
9
बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी केली फेसबुक पोस्ट; पोलिस घरी पोहोचले, त्याआधीच शुभम झाला गायब
10
Baba Siddique : "२०१९ ला जेलमध्ये गेला, जामीन कसा मिळाला माहीत नाही; ११ वर्षांपूर्वीच घरातून हाकलून दिलं"
11
"उद्धव ठाकरे, सारखं वाघनखं काढतंय; एकनाथ शिंदे, ते एक पुष्पा वेगळंच"; राज ठाकरे बरसले
12
"मी तुमचा चित्रपट बनवेन - एक था MLA", दाऊद इब्राहिमनं एकदा बाबा सिद्दिकींना दिली होती धमकी
13
मोदींच्या 'त्या' विधानावर शरद पवारांनी ठेवलं बोट; म्हणाले, "आम्ही बदनामी करू इच्छित नाही, पण..."
14
"धानाला हेक्टरी २५ हजार रुपये बोनस देणार", देवेंद्र फडणवीसांची ग्वाही
15
"मी त्यांना कधीही हसताना..."; रतन टाटांच्या निधनाच्या तीन दिवसानंतर शंतनु नायडूंनी केली भावूक पोस्ट
16
"मला एक खून माफ करा...", राज ठाकरेंची थेट राष्ट्रपतींकडे विनंती; मेळाव्यात असं का म्हणाले?
17
Baba Siddique : "पुण्याला जातो सांगितलं, माझा मुलगा..."; बाबा सिद्दिकींची हत्या करणाऱ्या शिवाच्या आईची प्रतिक्रिया
18
'या लोकांना संपूर्ण देशात गुंडा राज आणायचे आहे', बाबा सिद्दिकी हत्याकांडावर केजरीवाल संतापले
19
"गृहमंत्र्यासोबत मुख्यमंत्र्यांची जबाबदारी आम्ही नाकारत नाही"; बाबा सिद्दिकींच्या हत्येवरुन शिंदे गटाचे मंत्री स्पष्टच बोलले
20
झोपडीत राहिला, ४० रुपयांसाठी केली मजुरी; पंचायत फेम अभिनेत्याने सांगितला संघर्षमय काळ

ऐक्याचा मार्ग

By admin | Published: August 05, 2016 7:16 PM

भारतात सर्वाधिक बोलली जाणारी भाषा हिन्दी. त्या तुलनेत तमीळ अगदीच जेमतेम. तरीही त्या भाषेतील रजनीकांतचा चित्रपट इतका उन्माद का निर्माण करतो?

हेमंत कुलकर्णी
(लेखक लोकमतचे सहयोगी समूह संपादक आहेत.)
 
धर्म आणि सेक्युलरवाद केवळ पराभूतच नव्हे तर संदर्भहीन होत चाललाय?
 
भारतात सर्वाधिक बोलली जाणारी भाषा हिन्दी. 
त्या तुलनेत तमीळ अगदीच जेमतेम.
तरीही त्या भाषेतील रजनीकांतचा चित्रपट  इतका उन्माद का निर्माण करतो?
सीरिया, इराकसारखे देश ज्यांना नकाशावरही शोधता येत नाही असे अनेक युवक इसिसचे अनुयायी का होतात?
वैदिक धर्माच्या प्रचारासाठी देशाच्या चारही बाजूला स्थापन झालेल्या मठांपासून तर अलीकडे भाजपाला मिळालेल्या यशापर्यंत आणि ‘एआयएमआयएम’च्या उदयापर्यंत अनेक गोष्टी..
धर्म आणि भाषेचा गोंद दिवसेंदिवस अधिक चिकट होत जातोय का?
 
हिन्दी भारताची राष्ट्रभाषा आहे वा नाही हे ठाऊक नाही. तो वादविषय आहे. पण ती देशात सर्वाधिक बोलली आणि समजली जाणारी भाषा आहे यात शंका नाही. तिच्या प्रचार आणि प्रसारात हिन्दी सिनेमांचे मोठे योगदान असल्याचे मानले जाते. तुलनेत तमीळ भाषा अवगत असलेल्या लोकांचे प्रमाण एकूण लोकसंख्येच्या जेमतेम सहा ते सात टक्के असल्याचे सांगतात. असे असताना त्या भाषेत निघणारा रजनीकांत (की रजिनीकांत?) या नटाचा प्रत्येक सिनेमा हिन्दी सिनेमातील कोणत्याही अति लोकप्रिय नटाच्या सिनेमाच्या तुलनेत कैक पटींनी अधिक उन्माद निर्माण करतो. लहान लहान व्यावसायिकांपासून थेट विमान कंपन्यांपर्यंत सारे या उन्मादात वाहून जातात. का आणि कशामुळे?
 
सीरिया कुठे, इराक कुठे, नकाशावर ते शोधायचे कसे, याचादेखील पत्ता नसलेले मुस्लीम समाजातील अनेक युवक आणि युवतीदेखील त्या देशांमध्ये अस्तित्वात आलेल्या इसिस म्हणजे इस्लामिक स्टेट आॅफ सीरिया अ‍ॅण्ड इराक नावाच्या संघटनेचे अनुयायीत्व पत्करण्यास तयार होतात. या इसिसला सारे जग दहशतवादी संघटना म्हणून ओळखते. अलीकडच्या काळात बांगला देशापासून युरोपापर्यंत ज्या काही घातपाती कारवाया झाल्या त्यांची जबाबदारी ही संघटना आपणहून स्वीकारीत असते. पण याच संघटनेकडे आकृष्ट होणाऱ्या युवक-युवतींना ती दहशतवादी नव्हे तर स्वातंत्र्याचा हुंकार देणारी संघटना वाटते आणि तसे वाटणारे अशिक्षित वा अर्धशिक्षित नव्हे तर चांगले उच्च शिक्षित असतात. 
 
असे का आणि कशामुळे?
वरील दोन वास्तवदर्शी घटना असे तर दर्शवित नाहीत ना की, समाजाला एकत्र बांधायचे म्हणजेच समाजात ऐक्य निर्माण करायचे तर भाषा अथवा धर्म यांचा आधार घेण्याला दुसरा पर्याय नाही. कारण या दोहोंच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या भावनिक आवाहनाइतके प्रभावी आणि आत्मिक आवाहन अन्य कोणतेही नाही? याचा अर्थ राष्ट्रीय धर्म आणि सेक्युलरवाद दिवसेंदिवस केवळ पराभूतच नव्हे तर संदर्भहीन होत चालले आहेत?
अर्थात हे सारे अगदी आज नव्यानेच घडले आहे वा घडते आहे असेही नाही. दोन विभिन्न व्यक्ती वा व्यक्तिसमूह यांना सांधणारा दुवा म्हणजे एक तर भाषा, नाही तर धर्म ही बाब तशी सनातनच नव्हे काय? 
आदि शंकराचार्यांनी वैदिक धर्माच्या म्हणजे प्रचलित भाषेत हिन्दू धर्माच्या प्रसारासाठी ज्या चार मठांची किंवा पीठांची स्थापना केली ते कोणते आणि कुठे होते? देशाच्या पूर्वेला जगन्नाथ पुरी, पश्चिमेला द्वारका, उत्तरेला बद्रीनाथ आणि दक्षिणेला श्रृंगेरी. देशाच्या चारही दिशांना हे मठ स्थापन करण्यामागे आसेतू हिमाचल हिन्दू धर्मीयांचे चलनवलन व्हावे, त्यांच्यात संवाद होत राहावा आणि त्यातून एकात्मता सिद्धीस जावी असाच तर हेतू नव्हता? हिन्दू धर्मात काशीची गंगा रामेश्वराला घेऊन जाण्याची जी परंपरा सांगितली जाते तिच्यामागे तरी कोणता वेगळा हेतू असावा? 
इतिहासकालाचा विचार केला जातो तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना जी उपाधी बहाल केली जाते ती असते हिंदवी साम्राज्याचे संस्थापक. म्हणजे काय? 
अगदी अलीकडच्या काळाचा विचार करायचा तर भारतीय जनता पार्टीला जे यश मिळाले आणि मिळत गेले त्याचे गमक काय? बाबरी मशिदीच्या पतनानंतर भाजपाने देशात जो काही उन्माद निर्माण केला त्याचे मूळ आणि मुख्य सूत्र धर्म हेच नव्हते तर अन्य कोणते होते? 
अलीकडच्या लोकसभा निवडणुकीत याच पक्षाला एकट्याला स्वबळावर देशाची सत्ता मिळाली ती केवळ त्या पक्षाने विकासाची स्वप्ने विकली म्हणून? तसे गृहीत धरणे म्हणजे आपणच आपली फसगत करून घेणे. त्या आधीची जवळजवळ तीसेक वर्षे भाजपाने हिन्दू ऐक्याचा सतत जो धोशा लावला होता आणि समाजाचे जे ध्रुवीकरण केले होते, त्याचा या यशात काहीही वाटा नसेल? खरे तर त्याचाच वाटा अधिक होता. 
भाजपाच्या विरोधात सेक्युलरवाद (या शब्दाला मराठीत तंतोतंत प्रतिशब्द नाही. निधर्मी, धर्मातीत, धर्मनिरपेक्ष वा सर्वधर्मसमभावी यात ती छटा नेमकी उतरत नाही) घेऊन काँग्रेस तर साम्यवादाची
 
आर्थिक विचारसरणी घेऊन डावे उभे राहिले. पण लोकानी त्यांना नाकारले. त्याचवेळी मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन नावाचा नवाकोरा पक्ष उदयास येतो आणि आपला प्रभाव निर्माण करण्यात यशस्वी होतो याचे कारण काय असावे? पूर्वीच्या काळीदेखील हिन्दू महासभा किंवा मुस्लीम लीग या नावासारखे पक्ष होते पण त्यांना कधीच इतका आणि असा मतदाराश्रय मिळू शकला नाही. 
आज तो मिळतो म्हणजे दरम्यानच्या काळात काय झालेले असते? तरीही धर्माच्या तुलनेत भाषेचे आवाहन कधीकधी अधिक परिणामकारक ठरत असते? बांगला देश हे स्वतंत्र राष्ट्र तसे मुस्लीमबहुल. पण तिथे बंगाली भाषेचे आवाहन (अपील) धर्माच्या तुलनेत अधिक प्रभावी आहे आणि हीच भाषा मग बांगला देशला भारतातील पश्चिम बंगालशी जवळीक निर्माण करणारा सांधादेखील बनत असते? 
पण आता केवळ स्वधर्माचा अभिमान इतका एकच धागा स्वधर्मीयांना एकत्र गुंफण्याबाबत काहीसा कमजोर पडत चालल्याने स्वधर्माभिमानाबरोबरच परधर्म विरोध किंवा खरे तर द्वेष अधिक परिणामकारक ठरत चालला आहे काय? जे भोवताली दिसते ते काहीसे असेच आहे.
अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक तीन महिन्यांवर आली आहे. दोन्ही प्रमुख पक्षांचे उमेदवार नक्की झाले आहेत. त्यातील रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रचाराचा भार मुख्यत्वे परधर्माचा म्हणजे इस्लामचा द्वेष हाच आहे. जोडीला ते परराष्ट्रातील लोकांचाही तिरस्कार करतात. पण मुख्य भर मुसलमानांचा तिरस्कार. इसिसचे हल्ले असेच होत राहिले तर ट्रम्प अधिक बळकट होत जातील आणि कदाचित अमेरिकेचे अध्यक्षही बनतील अशी शक्यता काही जाणकार बोलून दाखवतात. तसे झाले तर जगाच्या पाठीवरील सेक्युलरवाद्यांचा तो फार मोठा पराभव ठरणार नाही?
तरीही भाषेच्या तुलनेत (केवळ तुलनेतच) धर्माच्या एकीकरणाच्या ताकदीला काहीशा मर्यादा पडत असाव्यात की काय असेही जाणवून जाते. हिन्दू धर्म हा तसाही अत्यंत पसरट आणि म्हटले तर भोंगळ. इस्लाममध्येही तसे अनेक पंथ आणि उपपंथ. ज्या इसिसचा उल्लेख वारंवार केला जातो त्या इसिसचा भारतातील बव्हंशी मुस्लिमांकरवी तिटकाराच केला जातो. 
रा. स्व. संघ आणि भाजपा यांच्यावर जहरी वाटेल इतकी कठोर टीका करणारे हिन्दू धर्मातच मोठ्या प्रमाणावर असतात. साहजिकच धर्माच्या तुलनेत भाषेचा गोंद अंमळ अधिक चिकट असावा असेही प्रतीत होत असते.
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर थोड्याच वर्षात राज्यांच्या पुनर्रचनेचा विषय समोर आला. या संभाव्य पुनर्रचनेचा गाभा कोणता होता? भाषेचा! त्याला तेव्हा आणि आजदेखील संबोधले जाते, ‘भाषावार प्रांतरचना’. 
एकच भाषा जाणणारे लोक एकत्र राहतील तर त्या राज्याला एकसंध रूप प्राप्त होईल असाच तर विचार त्यामागे होता. त्यातूनच पूर्वीच्या मुंबई इलाख्यातील गुजराती भाषकांचे गुजरात राज्य उदयास आले आणि मराठी भाषकांचे महाराष्ट्र. 
पूर्वीच्या मध्य भारत आणि वऱ्हाडमधील वऱ्हाड महाराष्ट्राला जोडले गेले तेही भाषेच्याच निकषावर आणि बेळगाव महाराष्ट्रात समाविष्ट झाले पाहिजे हा आग्रहदेखील पुन्हा भाषेच्याच निकषावर. 
तत्कालीन मध्य प्रांताची राजधानी असलेले नागपूर शहर महाराष्ट्रात उप राजधानी म्हणून समाविष्ट झाले आणि यशवंतराव चव्हाण या संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले, तेव्हा ग. त्र्यं. माडखोलकर आणि यशवंतराव यांच्यात झालेला आणि एव्हाना अगदी गुळगुळीत झालेला संवाद काय होता? यशवंतरावांनी म्हणे स्पष्ट शब्दात सांगितले होते की हे राज्य मराठ्यांचे नव्हे तर मराठी असेल!
परंतु महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर अवघ्या सहाच वर्षात मुंबईत शिवसेनेचा अवतार उदयास आला आणि तोदेखील मराठी भाषेचा झेंडा फडकवतच. सेनेच्या तेव्हाच्या भाषेतील यंडुगुंडु (म्हणजे दक्षिण भारतीय व त्यातही तमीळ) लोकांच्या आक्रमणामुळे म्हणे मुंबईचे मराठीपण लयास जाऊ लागले होते व ते थोपविण्यासाठी सेनेचा जन्म. तिला लोकांचा आश्रय आणि आधार मिळाला. महाराष्ट्र म्हणजे मुंबईसह महाराष्ट्र आणि ते मराठीजनांचेच असले पाहिजे हा सेनेचा आग्रह. 
राज्याचे एक माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांची, त्यांच्या म्हणजे काँग्रेस पक्षाच्या कथित हाय कमांडशी अनबन झाली तेव्हा म्हणे त्यांनीच केन्द्राचा मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव असल्याची भूमका उठवून दिली आणि शिवसेनेला तिचा इतका लाभ मिळाला की तेव्हापासून ती एक कायमची सत्ताधारी पक्ष म्हणून मुंबईत वावरू लागली.
अगदी आजचे ताजेच उदाहरण घ्यायचे तर वेगळ्या विदर्भाच्या मागणीचा जोर जरा वाढल्याचे दिसू लागताच महाराष्ट्राचे म्हणजे मराठीजनांचे तुकडे करण्यास प्राणपणाने विरोध करण्याची भाषा सुरू झाली आहे. त्यावर मराठीजनांची एकाऐवजी अनेक राज्ये झाली तर त्यात वाईट काय, असा प्रतिसवाल केला जात आहे. 
म्हणजे पुन्हा निकष आणि विषय भाषेचा व तीच एकात्मतेला कारक आणि पूरक ठरू शकते या विचारास अधोरेखित करण्याचा.
इत्यर्थ काय, तर विभिन्न वर्ग, श्रेणी वा गटातील लोकाना एकत्र बांधून ठेवायचे झाले तर त्याला एक तर धर्माचा आधार असावा नाही तर भाषेचा आधार असावा, असेच काहीसे भोवताली घडताना दिसून येते.
धर्मा-धर्मात भेद नको, साऱ्या भाषा परस्परांच्या भगिनी आहेत तेव्हा त्यांच्यात वाद नको ही तात्त्विक भूमिका तसे सारेच मान्य करतात; पण जेव्हा व्यवहाराचा प्रश्न येतो तेव्हा अन्य तात्त्विक भूमिकांप्रमाणेच या भूमिकेलाही छेद दिला जातो.
देशाच्या दक्षिणेकडील चार राज्यांचा विचार केला तर त्या साऱ्यांचा हिन्दी भाषेला कडाडून विरोध पण आपापल्या भाषेचा कडवा अभिमान. हे सारे कशाचे निदर्शक आहे? ते वास्तवाचेच निदर्शक आहे. 
हे वास्तव स्वीकारणे कदाचित साऱ्यांना अवघड आणि अडचणीचे वाटत असेल. पण त्याने वास्तव बदलत नाही व हेच वास्तव एक प्रश्न बनून वारंवार सामोरे येते, ‘ऐक्याचा मार्ग धर्म आणि भाषा यातूनच जातो’?