श्री श्री रविशंकरमी इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला आहे. आजकालच्या आधुनिक जगात बऱ्याच कुटुंबांत बेबनाव पाहायला मिळतो. कुटुंबातील वातावरण दिवसेंदिवस बिघडत चालले आहे. या वातावरणाला मुले वैतागतात. त्याचा अप्रत्यक्ष परिणाम त्यांच्या मानसिक स्थैर्यावर होतो. काही वेळेला कुटुंबाचाही आधार नसतो. करिअरच्या महत्त्वाच्या टप्प्यावर त्यांना कौटुंबिक समस्यांकडे लक्ष द्यावे लागते. अशावेळी विद्यार्थ्यांनी काय करावे? - ऋतुजा लांडेश्री श्री : एक गोष्ट प्रत्येकाने लक्षात ठेवली पाहिजे, की जीवनात सर्व काही बदलत असते. कोणतीही परिस्थिती कायम राहत नाही. सर्व काही बदलत असते ही गोष्ट एकदा मनात पक्की ठसली की परिस्थिती कितीही वाईट असली तरी आपल्याला पुढे जायला शक्ती मिळते. भोवती सगळीकडे गोंधळ चाललेला असतानाही, आपली स्वत:ची अशी स्पेस, मनाची स्थिती कायम ठेवायला एकप्रकारचे कौशल्य लागते. परिस्थितीमुळे डगमगून न जाण्याचे कौशल्य प्राप्त करण्यात ध्यानधारणेने मदत होते. बाहेर काहीही घडत असले तरी आपल्यात खोलवर एक असे स्थान आहे जिथे आपण स्थिर होऊ शकतो. सुरुवातीला परिस्थितीने आपण गांगरून जाणे शक्य आहे, पण आपण जसजसे स्वत:मध्ये स्थिर होत जाऊ तसतसे भोवतालच्या परिस्थितीपेक्षा आपण शक्तिवान बनत जातो. बाह्य गोष्टींचा प्रभाव आपल्यावर पडण्यापेक्षा आपणच परिस्थितीवर प्रभाव पाडू लागतो. काहीवेळा अशी एखादी समस्या येते, ज्यामुळे आपले हातपाय गळून जातात आणि ती समस्या आपल्याला खूप मोठी वाटू लागते. पण प्राणायाम आणि ध्यान या अशा गोष्टी आहेत, ज्यामुळे आपल्याला शक्ती मिळते. सर्जनशीलता आणि उत्साह याद्वारे आपण त्यातून मार्ग काढू शकतो. त्यामुळे यदाकदाचित काही बिकट, कठीण प्रसंग आपल्यावर आलेच, तरी काही झाले तरी आपली ऊर्जा उच्च ठेवा. असे कठीण प्रसंग आपल्याला जीवनात सामर्थ्यवान बनवण्यासाठी आणि आपला विकास करण्यासाठी येतील. अशावेळीच आपल्यातील सूक्ष्म गुण फुलून येतात आणि आपले कौशल्य विकसित होते. आपले सर्वस्व पणाला लावून अशा विश्वासाने पुढे जा की तुमच्या बाबतीत सर्व उत्तम तेच होईल. गुरुजींशी संवाद-संधीबदलते जग नवे पर्याय देणारे, नवी उत्तरे शोधणारे, अकल्पित अशा शक्यता वास्तवात उतरवण्याची शक्ती धारण करणारे आहे; तसेच ते मनाला कुरतडणाऱ्या नवनव्या प्रश्नांचेही जंगल बनते आहे. असे अंधारे, अगम्य, गूढ अरण्य; की बाहेर पडण्याची वाट दिसू नये, काही फटच सापडू नये. गर्दीतला एकटेपणा, तुटल्या नात्यांचे व्रण, धावत्या पायांना पडलेला वेगाचा फास, न शमणारा मनातला कोलाहल असे कित्येक डंख प्रत्येकालाच डाचत असतात. अशा संभ्रमित प्रश्नांना उत्तरांची दिशा सुचवणारे हे सदर! आर्ट आॅफ लिव्हिंग या जगन्मान्य विचार-आचार प्रणालीचे गुरू श्री श्री रविशंकर या सदरातून वाचकांच्या प्रश्नांच्या आधाराने त्यांचे चिंतन मांडत आहेत. फक्त एवढंच, की तुमचे प्रश्न अति-व्यक्तिगत स्वरूपाचे नसावेत. व्यक्तिगत अडी-अडचणींपेक्षा आधुनिक जगण्यातले पेच मांडणाऱ्या निवडक प्रश्नांना गुरुजींनी दिलेली उत्तरे या सदरातून प्रसिद्ध होतील. प्रश्न पाठवण्यासाठी ईमेल पत्ता :srisri.lokmat@gmail.com
स्वागत
By admin | Published: January 28, 2017 4:27 PM