केवळ नाटकच नाही, तर कथा, कादंबऱ्यांपासून ते वैचारिक लेखनापर्यंत साहित्यातले वेगवेगळे घाट अभिवाचनातून जिवंत करणारे अतुल पेठे सध्या माधव आचवलांच्या ‘किमया’च्या अभिवाचनाचा प्रयोग करीत आहेत. त्यानिमित्त त्यांच्याशी संवाद...* नाटकांमधून बरंच काही उभं झालेलं असताना ‘अभिवाचन’ प्रयोगाची कल्पना कुठून आली?- गेली अनेक वर्षं मी वाचन आणि अभिवाचन करायचा प्रयत्न करतो आहे. ‘डायरीची दहा पाने’ नावाचं मीच लिहिलेलं एक वाचन मी करायचो. पुढे नाशिकला ‘संवाद’ नावाचा एक गट होता त्यांच्यासाठी मी कथा वाचायचो. मुळातच मला वाचून दाखवायला आवडतं. त्याचा एक भाग म्हणून कविता, कथा, नाटकं, कादंबरी वाचणं असे उपक्र म मी माझ्यासाठी राबवले. त्यातून मला मराठी भाषेचे विशिष्ट पोत, वजनं, शब्दांचे विविध अर्थ, स्वल्पविराम, उद्गारचिन्ह, प्रश्नचिन्ह या सगळ्या गोष्टींचे अर्थ लागत जातात. त्याचबरोबर दोन वाक्यांमध्ये न लिहिलेली वाक्यंही दिसू लागतात. म्हणून मला अभिवाचन फार आवडतं. भालचंद्र नेमाडेंची प्रसिद्ध कादंबरी ‘कोसला’चे पंचवीस भागांमध्ये प्रयोग केले. लिखित साहित्याला जेव्हा उच्चारित गोष्टींची जोड मिळते तेव्हा ध्वनी आणि संगीत याच्या सहाय्याने मूळ आशयाला वेगळेपणा येऊ शकतो, असं प्रत्यंतर मला आलं. शिवाय ध्वनी, संगीत यामुळे ‘कोसला’ अधिक जिवंत झाली. ती रेडिओ मालिका अत्यंत गाजली.पुढे मी जयंत पवारांची ‘तर्काच्या खुंटीवरून निसटलेलं रहस्य’ ही एक अत्यंत वेगळी अनेक स्तरीय, रहस्यमय कथा वाचली, ज्यामुळे मी ध्वनींचा विचार केला. एरवी तुम्ही वाचत असताना एक पान उलटू शकता, थांबू शकता, स्वत:ची कथा रचू शकता. इथे मात्र वाचनामध्ये तो अवसर तुम्हाला मिळणार नाही; पण एक नाटकवाला माणूस कथा वाचतो तेव्हा त्याला वेगळं डायमेन्शन येऊ शकेल, असा विचार करून मी कथा वाचली. त्याचे पन्नास प्रयोग झाले.‘परवा आमचा पोपट वारला’ हे डॉ.चंद्रशेखर फणसळकर लिखित एक एकपात्री नाटकच आहे. त्यातही एक वेगळा प्रयोग केला.हे सगळे प्रयोग करत असताना मी काही वेळा प्रकाशयोजना, संगीत, छोटं नेपथ्य वापरलं. ‘पोपट’ मी एका खुर्चीत बसून करतो, त्यातली अब्सर्डिटी दाखवायला त्यातून मजा येते.आणि आता माधव आचवलांच्या ‘किमया’चं अभिवाचन करतो आहे. ‘किमया’मधली विशेषत: अशी की त्याच्यामध्ये कथा नाही, कविता नाही. एका वास्तुशिल्पकलेच्या विषयक, त्याची जाणीव वाढवणारं, दृष्टी देणारं एक तात्त्विक लिखाण आहे. वैचारिक लिखाण आहे. त्या जोडीने काही दृश्यरूप देता आलं तर पाहावं असं वाटलं, त्याला आम्ही इन्स्टॉलेशन्स म्हणजे मांडणीशिल्प म्हणतो, म्हणजे ऐकण्याच्या जोडीने बघण्याची जोड देता आली तर करावं असं वाटलं.
* गोष्टीत श्रोते हमखास गुंततात. ‘किमया’मधल्या वैचारिक आशयाची रिस्क नाही वाटली?- अपयशाची मला भीती वाटत नाही, उलट अपयश हा प्रयोगशीलतेचा अलंकार वाटतो मला. कारण अपयश स्वीकारायची तयारी नसेल तर नवे प्रयोगच करता येणार नाहीत. प्रायोगिकतेची शपथच अपयशाची माळ तुमच्या गळ्यात पडेल ही असते. जर तुम्हाला खरोखर वाचनकृतीचा गाभा, साहित्य, आशयमूल्य कळलं असेल, त्याच्या केवलरूपाकडे जाता आलं असेल तर मला वाटतं लोकांना ते जाणवतं. स्पर्श करतं. कधी कधी कमीपण पडतं; पण लोक सांगतात, मदत करतात व त्यातून सामूहिक शहाणपण येतं. ते मला जास्त महत्त्वाचं वाटतं.
* ‘किमया’ करताना वेगळ्या शक्यता सापडल्या.. म्हणजे काय?- आव्हानांमुळं मजा येते. शोध लागतात. ‘तर्का..’मध्ये माझी आवाजाची जी पट्टी होती ती ‘किमया’ करताना पूर्ण खाली काळी एकपर्यंत आणायचा प्रयत्न मी केला. त्यासाठी मी सतत गायनाचं उदाहरण डोळ्यांसमोर ठेवतो. माझं वाचन गायनासारखं वाटलं पाहिजे. ती मैफल वाटली पाहिजे. मल्लिकार्जुन मन्सूर ज्या सहजतेनं गातात, गाण्यात जी मार्दवता, अर्थपूर्णता आणतात, स्वरातून आशय उभा करतात तसं मला करता येईल का हा माझ्या व्यक्तिगत चिंतनाचा भाग असतो, होता. अशा प्रकारचे प्रयोग करताना एक क्षेत्र दुसºया क्षेत्राला भिडणं ही गोष्ट मला महत्त्वाची वाटते. आज माणसं एकमेकांशी फार बोलेनाशी झाली आहेत. अशा वातावरणात मी सोलापूरच्या अमोल चाफळकरसारख्या वास्तुशिल्पकार मित्राचं काम समजून घेऊ शकतो का? वास्तुकलेचा नि नाटकाचा काय संबंध आहे? हे दोन्ही घटक एकमेकांत असतात का याचा शोध मला घ्यायचा होता. विविध प्रकारच्या संहिता असतात आणि त्या संहितांमध्ये अंतर्संहिता म्हणजे सबटेक्स्ट आपल्याला शोधायचा असतो. उदा. मी ज्या वातावरणात विशिष्ट मजकूर वाचू इच्छितो त्या वातावरणातच मला लोकांना घेऊन जायचंय, त्यांना ते वास्तुशिल्प दाखवायचंय आणि त्याचं केवळ बाह्यदर्शन नाही तर अंतर्दर्शन घडवायचंय हा आशयाचा मुख्य भाग आहे. तुम्ही एका विशिष्ट घराच्या खोलीत, वास्तुशिल्पकारांनी घडवलेल्या रचनेत, शिल्पात तुम्ही बसून ऐकता तेव्हा त्याची वेगळी अनुभूती घेता येते का? तर सगळेजण एका मेडिटेटिव्ह स्वविचारात पडणं, अंतर्मुख होणं हा या प्रयोगाचा एक महत्त्वाचा भाग. दरवेळी नवीन घर हा नवा प्रयोग असतो. शक्यता तिथं दडलेल्या असतात. घर बदललं की खिडक्या वेगळ्या, दारं वेगळी, सबंध भवताल वेगळा, अवकाश वेगळा. ते अवकाश शोधणं, एक्सप्लोअर करणं हे आमच्यासमोरचं आव्हान असतं. बसून ठरवलेला ‘ठामेठोक’ असा प्रयोग होऊ नये अशी आमची इच्छा आहे. प्रयोगाची खुमारी ही वास्तुप्रयोगाची व्यक्तिरेखा कशी बनत जाते यावर ठरते व हाच महत्त्वाचा शोध आहे. वाचनानुभव देणं हाच या प्रयोगाचा भाग आहे.
* मोठ्याने मजकूर वाचल्यानं काय बदलतं?- अभिवाचन नाटकाला पर्याय म्हणून नाही तर नाटकाकडे अधिक जोमानं जाण्यासाठी एक अंतर्पीकपालट असावी असं मी मानतो. नाटक म्हणजे मुख्य पीक महत्त्वाचं, मात्र वाचनाचे असे काही टेक्स्ट असतात जे नाटक असत नाहीत; पण त्या संहितेत वाचून मजा येईल, अशी काही ताकद असते. तिथंवर मी जातो; पण नाटकाच्या मूर्त स्वरूपाच्या अलीकडे थांबतोच नि लोकांच्या विचारशक्तीला मोकळीक देतो.एका प्रयोगादरम्यान नाटकवाली मुलंमुली भेटली होती, ती म्हणाली, आम्हाला नेहमीच चिंता वाटते की आम्हाला नाटक कुठे मिळणार? तुमच्या प्रयोगामुळं आम्हाला असं कळलं की कुठलंही टेक्स्ट घेऊन काम करता येईल. ‘रिंगण’चे प्रयोग असेच केले होते ‘आसक्त कलामंच’ने. जळगावला अभिवाचन महोत्सव होऊ लागलाय. नटांची भाषिक जाण वाढण्यासाठी अभिवाचन हा एक उत्तम व्यायामप्रकार आहे असं मला वाटतं. प्रेक्षकांना यातून तुम्ही बांधता, नवा अवकाश देत जाता. फार पूर्वी मी अरुण कोलटकरच्या ‘भिजकी वही’ आणि ‘जेजुरी’तल्या काही कविता घराघरात जाऊन वाचायचो. पंचवीस प्रयोग केले तसे. मात्र कविता कळतात का? त्यातले तरल भाव कळतात का? ते उच्चारण्याच्या काही पद्धती असतात का? त्यात स्वरव्यंजनांचा संबंध कसा असतो? टोनल क्वालिटी म्हणजे आवाजाचा पोत कसा सुधारता येतो? तो लोकांवर नेमका काय परिणाम करतो? कुणी मुलायमपणे, कुणी रखरखीतपणे, कुणी तीव्रपणे बोलतो... हे जे आपले स्वर लावणं... वादी व संवादी सूर लावणं आहे ते मला वाटतं, वाचकांमध्ये तुम्हाला अधिक लक्ष केंद्रित करून स्वत:मध्ये घडवता येतात. त्याचं तुम्हाला अखेरीस गाण्यामध्ये रूपांतर करता येतं. महत्त्वाचे लोक व त्यांच्या आशयाला परत परत जिवंत करणं हे खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. वाचनानं तेही साधतं.शब्द नेहमी मृत असतात, त्यांना जिवंत माणसंच परत जिवंत करू शकतात. आपण बोट लावलं की शब्द जिवंत होतो. पण त्यासाठी तुम्ही जिवंत असावं लागतं..मुलाखत : सोनाली नवांगुळ
manthan@lokmat.com