- विश्राम ढोले
'ये वही गीत है’ या सदराचा हा शेवटचा लेख. आधुनिक भारतातील एक विलक्षण सांस्कृतिक आविष्कार असलेल्या हिंदी गाण्यांची थोडी वेगळी ओळख करून देण्याच्या उद्देशाने वर्षभरापूर्वी हे सदर सुरू केले होते. खरंतर हिंदी गाण्यांवर तसं भरपूर लिहून येत असतंच आणि ते साहजिकही आहे. कारण ती आपल्या केवळ दैनंदिन जगण्याचाच भाग आहे असे नाही, तर मनामनात खोलवर रु जलेली आहेत. सा:या सांस्कृतिक वैविध्यांवर मात करीत या गाण्यांनी गेली आठेक दशके लाखो लोकांच्या भावविश्वामध्ये अढळ स्थान मिळविले आहे. ‘ये वही गीत है. जिसको मैने धडकन में बसाया है’ (मान जाईए- 1972) या गाण्यातील ओळींचा आधार घेऊन म्हणायचे तर ही गाणी म्हणजे भारतीयांच्या हृदयाची सांस्कृतिक स्पंदने आहेत. 1931 च्या ‘आलमआरा’पासून सुरू झालेल्या या स्पंदनांमधून उभा राहतो तो भारतीय मनाने अनुभवलेल्या भावभावनांचा एक विशाल पट. सांस्कृतिकदृष्टय़ा अतिशय धामधुमीच्या या काळात परंपरेची ओढ, आधुनिकतेचा ताण आणि उत्तर आधुनिकतेचे आकर्षण अनुभवणा:या भारतीय मनाचे ही गाणी म्हणजे एक स्वगत आहेत. म्हणूनच नॉस्टॅल्जिया, रसास्वाद, आठवणी वा किस्स्यांच्या पलीकडे जाऊन हे गाण्यांमधून प्रकटणारे भारतीय मनाचे स्वगत समजून घेण्याचा हा सदर म्हणजे एक प्रयत्न होता.
हे स्वगत समजून घेण्यासाठी हजारो गाण्यांमधून पंचवीसेक गाण्यांची निवड करणो अर्थातच अतिशय कठीण होते. इथे गाण्यांचे सौंदर्य आणि लोकप्रियता तर महत्त्वाची होतीच; पण फक्त तेवढे पुरेसे नव्हते. त्या गाण्यांमधून परंपरा आणि आधुनिकता यातील द्वंद्वाचा खोलवरचा किंवा उत्कट आविष्कार होणो गरजेचे होते. म्हणूनच लताची शेकडो गाणी जरी प्रसिद्ध आणि सुंदर असली, तरी ‘आएगा आनेवाला’चे मूल्यात्मक वेगळेपण सांगणो आवश्यक होते. कारण या गाण्याने केवळ लता मंगेशकर नावाची एक महान गायिकाच प्रस्थापित केली होती असे नाही, तर सार्वजनिक ध्वनिविश्वात स्त्रीत्वाचा फक्त कोवळा, पवित्र सूरच मध्यवर्ती व प्रमाणभूत स्थान राहील याची खबरदारीही घेतली होती. पन्नासीच्या दशकातील नवस्वतंत्र भारताची स्वप्ने सांगणारी सुंदर गाणी तशी बरीच होती. पण जुता, पतलून आणि टोपीसह अनेक गोष्टींसाठी जगावर अवलंबून असणा:या पण तरीही या सगळ्यांची सरमिसळ करून ‘फिर भी दिल है हिंदुस्थानी’ म्हणणा:या ‘मेरा जुता है’ या गाण्याची निवड महत्त्वाची होती. कारण आधुनिक होऊ पाहणा:या भारताच्या अपरिहार्यतेची आणि आशेची फार सुंदर अभिव्यक्ती या गाण्यांमध्ये होती. प्रेमाची महती सांगणारी तर शेकडो गाणी आहेत. पण सारी सांगितिक, भाषिक सरमिसळ करीत ‘बंदे को खुदा करता है इश्क’ असा प्रणयी प्रेमाचा उच्चरवात घोष करणारे ‘ये इश्क इश्क है इश्क इश्क’ ही कव्वाली त्यातील मेरुमणी ठरते. सांगितिक शैलीने आणि त्यातील संदेशानेही. शब्द, सूर आणि चित्र यांचा सौंदर्यपूर्ण समसमा संगम ठरू शकतील अशीही गाणी बरीच आहेत. पण ते साध्य करतानाच आधुनिकतेने स्त्रीच्या मनात जागविलेले प्रतिष्ठेच्या, स्वायत्ततेच्या स्वप्नांची करुण किनार घेऊन येणारे पाकिजातील ‘चलते चलते’ गाणो आणि त्यातील रेल्वे इंजिनाच्या शिटीतून डोकावणारी आधुनिकतेची साद हृदयाला स्पर्श करते. आधुनिक होऊ पाहणा:या स्त्रीचा आत्मसन्मान प्रेमाच्या भावनेतून व्यक्त करणारी ‘प्यार किया तो डरना क्या’, ‘काँटों से खिचके ये आँचल’ सारख्या गाण्यांमधूनच नव्हे, तर अनारकलीच्या मिथकाला उलटपालट करून टाकणा:या ‘अनारकली डिस्को चली’सारख्या गाण्यांमधूनही प्रकटतो. म्हणूनच त्यांची नोंद घ्यावी लागते. तशीच नोंद घ्यावी लागते ती ‘सजनवा बैरी हो गये हमार’सारख्या गाण्यांमधून प्रकटणा:या व पारंपरिक राहिलेल्या विवाहितेच्या अपार व्यथेची.
एरवी पुरु षी वर्चस्ववादी पारंपरिक समाजात कायम कठोर, निश्चयी, धैर्यवान वगैरे राहण्याची अपेक्षा असलेला पुरु ष आधुनिकतेने जागविलेल्या प्रणयी प्रेमाच्या (रोमॅण्टिक लव्ह) प्रांतात कसा हळवा, नाजूक आणि शोकविव्हळ होतो हे ‘फिर वही शाम वही गम वही तनहाई’ पठडीतली गाणी विलक्षण उत्कटतेने दाखवितात. म्हणून या पठडीचीच दखल घ्यावी लागते. हाच पारंपरिक पुरु ष आधुनिक शहरात येताना कसा बिचकतो, भांबावतो आणि एकाकी वाटून घेतो, तर दुसरीकडे ओळख व स्वत्व नाकारलेल्या स्त्रीला शहराची अनामिकता आणि संधी कशी जवळची वाटते याचे सूत्ररूप वर्णन ‘ये है बॉम्बे मेरी जान’ सारख्या लोकप्रिय गाण्यामधून येते. आधुनिकतेचे अवकाश असलेल्या शहराची ही दोन मिथकेच जणू हे गाणो व्यक्त करते. एकीकडे आधुनिकतेने जागविलेल्या राष्ट्र नामक कल्पनेचा गाण्यांमधून जयघोष करतानाच हिंदी गाणी परंपरेला भावणारी देश किंवा वतन नावाची सांस्कृतिक संकल्पनाही कशी उत्कटतेने मांडत असतात हे सांगण्यासाठी मग ‘ए मेरे प्यारे वतन’ सारख्या गाण्याचा या मोजक्या गाण्यांमध्ये समावेश करावा लागतो. आपला-परका या सांस्कृतिक संकल्पनांमधून मग इतर संस्कृतींविषयी साचे किंवा स्टिरिओटाईप्स कसे तयार होतात हे ‘एक चतुर नार’ किंवा ‘लुंगी डान्स’ सारख्या गाण्यामधून उलगडून दाखवावे लागते. ‘अल्ला तेरो नाम’ सारख्या गाण्यांमधून आधुनिक जगात वावरू पाहणा:या सश्रद्धाची प्रार्थना दिसते, तर ‘डॅडी मुझको बोला’ आणि ‘तुझको पता है ना माँ’ सारख्या गाण्यातून बदलत चाललेल्या कौटुंबिक नात्यांचे दर्शन घडते. म्हणूनच याही गाण्यांची या स्वगतात गांभीर्याने नोंद घ्यावी लागते. समाजावर टीका करणारी गाणी तर बरीच आहेत. पण आधुनिकतेची स्वप्ने पाहणा:या कवीच्या वैफल्यातून आलेला ‘ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या है’ या खोलवरच्या नकाराची जशी नोंद घ्यावी लागते, तेवढय़ाच गांभीर्याने दखल घ्यावी लागते ती ‘साड्डा हक एथ्थे रख’ मधून प्रकटणा:या समाजाविरु द्धच्या टिपिकल उत्तर आधुनिक संतापाची. भूत व भविष्यापासून नाळ तोडत फक्त क्षणभंगूर उपभोगामध्ये रममाण होण्याचा संदेश देणा:या ‘आगे भी जाने ना तू’ किंवा ‘कल हो ना हो’ सारखी गाणी एकीकडे दिसतात, तर दुसरीकडे उपभोग किंवा क्षणभंगूरतेच्या पलीकडे जात स्थैर्याचे, संयमाचे, धीराचे, शांतीचे खोलवर आवाहन करणारी ‘मन रे तू काहे न धीर धरे’ किंवा ‘रे कबीरा’ सारखी गाणीदेखील याच स्वगतामध्ये येत राहतात. आधुनिक जगात मंत्रहीन, क्रि याहीन, भक्तिहीन होत चाललेल्या रु क्ष मनाला धीर देण्याचे आश्वासन देत राहतात.
सदरातील ही गाणी म्हणजे तर फक्त काही मोजकी उदाहरणो होती. ती जशी संख्येने मर्यादित होती तशीच संकल्पनांनीही. वैयक्तिक आवडीनिवडीच्या त्यावर मर्यादा होत्या. सदराला जरी अशा स्थळाच्या, काळाच्या आणि वैयक्तिक आकलनाच्या व आवडीनिवडीच्या मर्यादा असल्या, तरी प्रत्यक्षातील हिंदी गाण्यांनी साकारलेला हा परंपरा-आधुनिकता यांच्यातील संघर्ष व संवादाचा पट खूप मोठा व गहिरा आहे. त्यात या ऐंशी-शंभर वर्षांत जे जे जसजसे येत गेले त्याचे अगदी आरशासारखे स्वच्छ वा थेट नसले, तरी मूल्यात्मक पातळीवर तसतसे प्रतिबिंब पडत गेले. कधी जरा मोठे, तर कधी लहान. कधी स्वच्छ, तर कधी धूसर. कधी आनंदाने स्वीकारलेले, तर कधी अपरिहार्यतेतून सामावून घेतलेले. एका विचित्र तटस्थ गुंतवणुकीतून हिंदी गाण्यांच्या सांस्कृतिक मानसिकतेने या सा:या खोलवरच्या संवाद-संघर्षाला शब्दसुरांच्या कोंदणात बसवून आपल्यापुढे मांडले. अगदी ‘मै जिदंगी का साथ निभाता चला गया’तल्या भावनेप्रमाणो. जे हरवले त्याचा ना फार शोक केला, ना जे गवसलं त्याला फार डोक्यावर बसवलं. कोणत्याही ‘इझम’चा ना कधी प्रकल्प मांडला, ना कोणत्या सत्तेसाठी संकल्प सोडला. कधी जगणो म्हणजे ‘फिर से उड चला मै’ मधल्या ‘रंगबीरंगे वहमो में मै उडता फिरू’ असे शेवरीच्या फुलासारखे भिरभिरणो आहे असे मानले, तर कधी जगणं म्हणजे ‘मै जिंदगी का साथ निभाता चला गया’तल्या प्रमाणो सुखदु:ख समेकृत्वा लाभालाभौ असा स्थितप्रज्ञाच्या प्रांताकडे केलेला प्रवास आहे असे म्हटले. एकाचवेळी विविध रंगांच्या, परस्परविरोधी छटांच्या अनेक गोष्टींना सारख्याच उत्कटतेने किंवा तटस्थतेने सामावून घेत हिंदी गाण्यांनी भारतीय मनाचे हे स्वगत साकारले आहे. ‘ये वही गीत है’ हे सदर तर केवळ त्या स्वगतगीतांची तोंडओळख होते.
(समाप्त)
(लेखक माध्यम, तंत्रज्ञान आणि संस्कृती
या विषयाचे अभ्यासक आहेत.)
vishramdhole@gmail.com