- प्रा. डॉ. द. ता. भोसले
शाळेतल्या जगापेक्षा जगाची शाळा माणसाला अधिक शिकवित असते. चार भिंतींच्या शाळेत आपणाला खिडकीच्या आकाराचा आभाळाचा तुकडा दिसतो. तोसुद्धा आपली नजर मलूल आणि गढूळ असल्यास, तो तुकडाही मळलेल्या वस्त्रासारखा वाटतो, पण, शाळेच्या बाहेरचे आकाश सार्या सृष्टीला अलिंगन देण्यास, आसुसलेल्या प्रियकरासारखे वाटते. म्हणून कुणीतरी असं म्हटलेलं आहे, की ‘कवितेतील निसर्ग वाचण्याऐवजी निसर्गाची कविता अनुभवणे केव्हाही श्रेयस्कर.’ कारण तिथं ‘वाचणं’ नसतं, तर ‘अनुभवणं’ असतं. आणि तेच आपल्या जीवनावर खूप खोलवर परिणाम करतं. म्हणून शालाबाह्य बाबींचे नाना उपक्रम राबविणे म्हणजे, दोन्ही शाळांचे एकत्र शिक्षण देणं होय.
जगाच्या शाळेची ओळख करून घेण्याची जी नानाविध साधने आहेत, त्यातील एक साधन म्हणजे शैक्षणिक सहल. वेगवेगळ्या विषयांच्या शैक्षणिक सहलीचा माहोल पाहून आमच्या मराठीच्या प्राध्यापकांच्या देहातही सहल संचारली. आणि मला सोबत येण्याचा आग्रह केला. मागच्या एका सहलीचा माझा अनुभव फारसा सुखदायक नव्हता. नाठाळ जनावरं सांभाळताना गुराख्याला जेवढा वैताग यावा, तेवढा मी अनुभवला होता. तोंडाळ सासू, खादाड नणंद व हट्टी जाऊ असलेल्या घरात एखाद्या सुनेचे जे हाल होतात, ते या सहलीबरोबर जाणार्या प्राध्यापकांचे होतात. दावं तुटलेल्या वासरानं शेपटी वर करून वाटेल तसं हुंदडावं, तशी ही मुलं सहलीत वागतात. कुणाचा वचक नसलेली, तारुण्यामुळे विवेकाला विसरलेली, आतल्या लैंगिक उर्मीमुळे फुरफुरणारी, पैशाची मस्ती असलेली, आणि कोणतंही बंधन पाळायचं नसतं अशा मनस्थितीत वागणारी ही गाळीव रत्ने असतात. वर्गातली सारी टपोरी पोरं अशा सहलीत उत्साहाने सहभागी झालेली असतात. सहकारी प्राध्यापकांच्या आग्रहानं मी या सहलीला येणार म्हटल्यावर, आधीच चार-पाच उत्साही मुलांचा गट आम्हाला वर्गातल्या शिस्तीप्रमाणे वागवू नका. आम्हाला जरा मोकळं वागू द्या. तुम्हीही आमच्यात सामील व्हा, पण रिंगमास्टर म्हणून नको. हसत हसत त्यांना मी म्हटलं, ‘अरे बाळांनो, सहल ही मौज-मजा करण्यासाठीच असते. पण, ती करताना कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करू नका- लाज वाटेल असं वागू नका- बोलू नका- निकोप विनोद करा. गाणी म्हणा. नकला करा. स्वच्छ मनानं मुलींशी बोला. काय हवं ते खा, पण आमच्या शिव्या मात्र खाऊ नका. आम्हीही तुमच्यात सहभागी होऊ. मात्र जर कुणाच्या तोंडाचा घाण वास आला तर...’ पुढचं काहीच मी बोललो नाही. त्यांनी मला काय म्हणायचं ते समजून घेतलं असावं.
सहलीचा प्रवास सुरू झाला आणि आमची गाडी इंजिनच्या आवाजापेक्षाही आतल्या आवाजानेच घुमू लागली. मुला-मुलींनी सिनेमातली गाणी म्हणायला सुरुवात केली. एका मुलानंतर जाड काचा असलेला चष्मा आणि जाड काळसर ओठ असलेल्या प्राध्यापकाच्या छातीवर बोट ठेवून ‘तुझे देखा तो मैं पागल हो गया’ हे गाणं सुरू केलं. दुसर्यानं गाडीमध्ये कमरेवर हात ठेवून नाचायला सुरुवात केली. तिसर्यानं बरोबर आणलेल्या डब्यावर ताल धरला. आणि बाकीच्यांनी टाळ्यांची साथ दिली. नंतर नकला झाल्या. गाण्याच्या भेंड्याही म्हणून झाल्या. माझ्या लक्षात आलं, की ज्या मुलांना आपण उनाड बिघडलेली अन् बिनकामाची पोरे समजतो, त्यांच्याकडे हेवा वाटाव्यात अशा कला आहेत. त्यांचा आवाज छान होता. एखाद्या कुशल नर्तकीनं नाचावं तसे ते नाचत होते. त्यांचे पाठांतर चांगले होते. निरीक्षण तर इतके झकास होते, की स्टाफमधल्या आठ-दहा प्राध्यापकांच्या हुबेहूब नकला त्यांनी करून दाखविल्या. त्यात माझीही नक्कल त्यानं केली. आमचे संस्कृतचे प्राध्यापक नाकातून शब्द शिंकरूनच बोलतात, तशीच नक्कल या मुलानं केली. मनात आलं, जगणं सुंदर करायचं असेल तर नुसते सुंदर मार्क्स पडून उपयोगाचे नाही, त्यासाठी इतरही काही गोष्टींची गरज आहे. या सार्या प्रवासात मला दोन गोष्टी विशेष वाटल्या. पहिली म्हणजे, एकाही मुलाने मुलीशी बोलताना आगावूपणा केला नाही. अपशब्द वापरला नाही. निकोप, शुद्ध आणि घनदाट मैत्री कशी असते, याचे जणू त्यांनी प्रात्यक्षिकच दाखवले. एक-दोन मुलींनी तर मुलांचीच रेवडी उडविली होती. दुसरी गोष्ट अशी, की या सार्या आनंदोत्सवात एक विद्यार्थी मात्र अंग चोरून, मोठय़ा संकोचाने वावरत होता. मी सहज विचारले, ‘अरे तो चेहरा टाकून बसलाय. त्याला काही बरे वगैरे नाही काय?’ त्यावर वर्गातला टारगटातला टारगट असणारा दिनेश म्हणला, ‘ सर तो काही आपल्या वर्गातला नाही. रमेशच्या गावचा आहे. खूप गरीब आहे. त्याला सहलीचा आनंद कुठला मिळायला? रमेश आणि आम्ही तीन-चार मित्रांनी त्याचा खर्च भरून आमच्या बरोबर आणलाय. म्हणून तो गप्प गप्प आहे.’ आम्ही हे ऐकले आणि आम्ही प्राध्यापक प्रत्येकाच्या वागण्यावर घाईघाईने वेडेवाकडे शिक्के मारतो, याची जाणीव झाली. या मुलांचे एक वेगळेचे विलोभनीय दर्शन आम्हाला झाले. ज्याला स्वत:चा अमृतघास गिळताना दुसर्याचे डबडबलेले डोळे दिसतात, त्यालाच जीवनाचा अर्थ समजला, असा विचार मनात आला.
सहलीतली सारी मुले पाखरांनी सारे आकाश कवेत घ्यावे, तशी भिरभिरली. दुपारी-जेवताना प्रत्येकजण आपल्या डब्यातील दोन घास शेजारच्याला देत होता. एकाने तर मुलासाठी मिष्टान्न आणले होते. नंतर बाजारपेठेतून जाताना प्रत्येकाने आवडीचे पदार्थ घेतले. वस्तू घेतल्या-रस्त्यात चार शाळकरी मुलं करवंदं विकत होती. एक रुपायाला एक द्रोण : एका मुलाला मूठभर करवंदं खूप महाग वाटली. त्या वेळी तेथे असणारे प्राध्यापक म्हणाले, ‘अरे त्याच्या श्रमाची किंमत कर. काटेरी जाळ्यात घुसून, तापत्या उन्हातून या पोरांनी ती आणली आहेत. तुला जमतात का बघ. मी तुझी दोन रुपयाला द्रोण घेतो.’ अन् हा विद्यार्थी शेजारच्या करवंदीच्या जाळीत घुसला आणि चार कच्ची करवंदं घेऊन रक्ताळलेल्या शरीरानं पराभूत होऊन परतला. या मुलांना श्रमाची किंमत यातून समजली. शाळेबाहेरची शाळा ती हीच. त्या मुलांची सारी करवंदं मग दहा मिनिटांत मुलांनी खरेदी केली.
परतीच्या प्रवासाला निघताना सर्वांनी आइस्क्रीम खाण्याचा धोशा लावला. मी म्हणालो, ‘रस्त्यात आपण एक ठिकाण पाहण्यासाठी थांबणार आहोत. त्या वेळी खाऊ,’ असे म्हणून मी त्यांना वाटेवर असलेल्या बेगर्स होम पाहण्यास नेले. तेथे मरणाची आतुरतेने वाट पाहणारे वयोवृद्ध गलितगात्र, निराधार, खंगून गेलेले अन् प्रेमाला भुकेले हे जीव पाहून ही सारी मुले गलबलून गेली. काही तर फरशीवर सांडलेल्या पाण्यासारखी ती आटत चालली होती. या मुलांनी हे बघितले आणि तेथेच ती तीनचार मुले पाणावलेल्या डोळ्यांनी मला म्हणाली, ‘सर, आम्ही आइस्क्रीम खाणार नाही. ते सारे पैसे यांना द्या. आमच्या बापांनी गोरगरिबांना भरपूर लुबाडले आहे. त्याची परतफेड म्हणून आम्ही प्रत्येकी पाचशे रुपये देतो.’ आणि खरेच प्रत्येकाने आपल्या खिशातून पैसे माझ्यासमोर धरले. या एका सहलीने माणसाला माणसाजवळ आणले. औदार्याचे दर्शन घडविले, यात शंका नाही.
(लेखक ज्येष्ठ साहित्यिक असून, मराठी भाषा,
लोकसंस्कृती यांचे ज्येष्ठ अभ्यासक व नवृत्त प्राचार्य आहेत.)