- शुभा प्रभू साटम
गेल्या काही वर्षात सगळीकडे भरपूर लोकप्रिय झालेला चीझ हा प्रकार. त्याआधी चीझ म्हणताना कस्टम फ्री दुकानात टीनमध्ये मिळणारे महाग चीझ फक्त अभिजन,महाजन यांना माहीत होते आणि ते खाणे श्रीमंत वर्गाची मक्तेदारी होती. आजच्या घडीला मात्र हे चीझ सगळीकडे मस्त पसरले आहे. अगदी कोपऱ्यावर असणारा मॅगी आणि डोसावला असा चीझ वापरतो की बास! तर हे सर्वश्रुत चीझ खूप खूप प्राचीन आहे. याचा उगम कुठं झाला याबाबतीत पण भिन्न मते आहेत. कोणी म्हणतं, युरोप, कोणी मध्य पूर्व, एक नक्की की चीझचा शोध अपघाताने लागला..
चामड्याच्या पाखालीत दूध ठेवले, ते तिथच राहिले, आंबले आणि चीझ आले. मग त्यात प्रदेशानुसार वेगवेगळ्या कृती, पद्धती आल्या.. पण प्रत्येक देशाचे आपले असे खास चीझ असते.
चीझमध्ये प्रोसेस म्हणजे प्रक्रिया केलेले आणि फ्रेश चीझ अशा मुख्य पद्धती. आपण जे सामान्य चीझ खातो ते प्रोसेस्ड केलेले असते. ते स्वस्त असते.. फ्रेश चीझ करायला कठीण आणि अनेक टप्प्यावर बनते. म्हणून महाग असते.
चीझ खाणारे फ्रेश चीझला प्राधान्य देतात.. यातही मच्युअर चीझ म्हणजे जुने चीझ प्रचंड महाग असते.
चीझचे प्रकार अगणित आहेत.. चेडार, मोझरेला, पर्मेसियान, फेटा, गोट, गौडा, मस्कारपून, ब्राई, ब्ल्यू, रीकोटा.. आणि त्यातही कडक, मऊ, साल असणारे, जुने मुरवलेले, प्रवाही, असेही वर्ग असतात. आणि किंमत पण दणदणीत असते.
भारतात म्हणाल तर आपले जे पनीर आहे ते एक प्रकारचे फ्रेश चीजच. आपले राष्ट्रीय चीझ.
मग आपल्याकडे चीजचे प्रकार का नाहीत? - तर परंपरागत भारतीय खाणे /आहार हा डाळ भात, भाजी, चपाती या चतुसूत्रीवर आधारलेला आहे. त्यामुळे ते सर्व ताजे करावे लागते, परत हवामान उष्ण असल्याने तो घटक महत्त्वाचा ठरतो.. म्हणून पारंपरिक भारतीय आहारात चीझ आढळणार नाही.
अर्थात परदेशात चीझ हे दर्दी खाणे समजले जाते. म्हणजे तिथेही स्वस्त चीझ आहे जे बर्गर, नाचो, पिझ्झा यावर वापरतात. पण याव्यतिरिक्त चीझ अधिक नजाकतीने खाल्ले जाते.. म्हणजे वाइन आणि वेगवेगळी चीझ क्रेकर्स ही जोडी असते. कोणत्या पेयासोबत कोणते चीझ जाईल याचे शास्र असते. परदेशात ‘ब्रंच’ म्हणून प्रकार असतो, तेव्हा वेगवेगळी चीझ, द्राक्षे, बिस्किटे आणि कोल्ड कट्स पेश केले जातात. सोबत हवामानानुसार पेये. इथे चीझ जे खाल्ले जाते ते त्याच्या मूळ रूपात.. म्हणजे सोबत क्रकर, पेये असतात, पण चीझचे मूळ रूप तेच असते. ओरिजनल.
भारतात मात्र आपण चीझ वापरण्यामधील ही फिरंगी मक्तेदारी आणि पद्धत पूर्ण मोडलीय. बघा की..
चीझ डोसा,चीझ ढोकळा,चीझ पावभाजी,चीझ परोठा, चीझ मॅगी, चीझ पकोडे, चीझ इडली, चीझ शेवपुरी, चीझ पाणीपुरी, चीझ वडापाव, चीझ पुलाव, चीझ भेळ, फाफड्यावर चीझ..
तुम्ही फक्त सांगा, अनेक गोष्टींवर आपण चीझ घालतोय... आपल्या भारतीय लोकांची गोष्टच वेगळी आहे. कोणत्याही पदार्थाचे देशीकरण करण्यात आपल्याला तोड नाही.. जिथं आम्ही आलू टिक्की बर्गर आणि फ्लॉवर मांचुरिया आणून लोकप्रिय केला तिथं इतर गोष्टींचं काय!!
बरोबर की नाही!!!?
आता फक्त चीझ पुरणपोळी आणि चीझ उंधियु यायचा बाकी आहे.. कदाचित आलाही असेल.. लॉकडाऊनमध्ये तर घरोघरी शेफ उदयाला आले होते..
हम कुछ भी ‘चीझ’ छोडते नही !
(लेखिका खाद्य संस्कृतीच्या अभ्यासक आहेत.)
shubhaprabhusatam@gmail.com