- ज्योत्स्ना माईणकर दिवाडकर (डेट्रॉइट)
अमेरिकेतल्या तीस वर्षांच्या वास्तव्यात मी युनिव्हर्सिटीमध्ये बरंच काही शिकले पण युनिव्हर्सिटीबाहेरचं शिक्षण लाखमोलाचं ठरलं. आपण ‘तुझ्या घामामधून तुझ्या कामांमधून पिकलं उद्याचं रान’ म्हणतो पण ते प्रत्यक्षात मला इथे पाहायला मिळालं. मनुष्य कितीही शिकला तरी हाताने काम करायची सवय आणि ते करतानाच आनंद, अभिमान मला बरंच काही शिकवून गेला. मध्यमवर्गात वाढलेली मी, आर्थिक स्थिती सुधारली की ‘नोकरांची संख्या वाढते’ हे साधं समीकरण माझ्या मनात बिंबलेलं होतं. ते इथे पाहायला मिळत नाही, असं नाही पण अगदी उच्चशिक्षित माणसंदेखील कोणत्याही प्रकारचं काम करताना दिसतात. हा धडा मला खूप लवकर शिकायला मिळाला आणि त्याने मलाही पोटासाठी अनेक ‘धंदे’ करायला उद्युक्त केलं.
पाच वर्ष ते १२ वर्षांच्या मुली सांभाळणं हे मी अमेरिकेत आल्यावर केलेलं पहिलं काम. ते अनेकजण करतात पण मागचापुढचा फार विचार मी केला नव्हता. ११ वर्षांची मुलगी, तिची अविवाहित आई. तिला डेटिंग करायला जायची वेळ आली की, ती मला मुलगी सांभाळायला बोलवायची. माझ्याकडे गाडी नव्हती. रात्री बाराला ती आली की मी घरी चालत यायचे. तोपर्यंत पाच तास मी आणि तिची माझ्याशी काहीही नातं न जडलेली मुलगी! काही दिवसांत तो नाद सोडून दिला. थोडेफार पैसे आणि ढेर सारा अनुभव गाठीला आला.
मला खूप लहानपणापासून कागद आणि पत्र दोन्हीची प्रचंड आवड. मग ठरवलं पोस्ट ऑफिसात नोकरी करायची. माझी विद्यार्थीदशा ही काही काळ खऱ्या अर्थाने दशा होती, विद्यार्थीवेतन पुरेसं नव्हतं. मी चक्क जवळच्या पोस्टात गेले. अनेक महिने पत्र पाठवून तोंडओळख झाली होती. ‘मला इथे नोकरी करायची आहे’, मी सांगितलं. त्यांनी अर्ज दिला, मी तो भरला. शिक्षण M.Sc. वाचल्यावर तिथला मुख्य चिडला, ‘एवढं शिकून तुला ही नोकरी का करायची आहे? आणि बारावी उत्तीर्ण मुलांना आम्ही काय देणार?’ मला वाटाण्याच्या अक्षता मिळाल्या!
मग स्टेशनरीच्या दुकानात गेले. रंगीबेरंगी कागद बघून हरखून गेले. फक्त दोन दिवसांचं काम आहे, असं त्यांनी सांगितलं. मी म्हटलं, २ तर २ पण मला या कागदांशी खेळू दे... कर्म माझं! मला खोके मोजण्याचं आणि याद्या करण्याचं काम मिळालं आणि वेतन म्हणजे काय चिरीमिरी!
एक दिवस कोणीतरी सुचवलं, तुला जर्मन छान बोलता येतं, त्या भाषेचा वापर होईल, असं एखादं काम शोध ना! म्हणजे काय, जर्मन कुटुंबाकडे भांडी घासू? शोधाशोध केली आणि युनिव्हर्सिटीच्या जर्मन विभागात चौकशी केली. प्रमुख म्हणाले, ‘आहे ना नोकरी.’ मी हुरळले. बघते तर काय, कारकुनाची आणि जागा पुसण्याची. मी न राहवून विचारलं, ‘माझ्या जर्मन बोलण्याचा काही उपयोग नाही का करता येणार?’ ते म्हणाले, ‘हो बोल ना तू विद्यार्थ्यांशी! पण तुझ्याकडे जर्मनची पदवी कुठे आहे.’ ती नोकरी ३ महिने केली आणि मग त्यांची गरज संपली!
आता काय शोधू? एक शोध लागला - ‘पाणी वाचवा, प्राणी वाचवा’ अशा एका मोहिमेत भाग घ्यायचा. दारोदार लोकांकडून देणग्या आणि त्या संस्थेचं सभासदत्व मिळवायचं. जितके ‘मासे’ गळाला लागतील तितका माझा पगार! पहिले दोन दिवस ठीक गेले. तिसऱ्या दिवशी ज्या वस्तीत गेले तिथे डोळे खाड्कन उघडले. तिथे एकेकटे राहणारे ज्येष्ठ नागरिक, अमेझॉनच्या खोऱ्यातले प्राणी वाचवायच्या आधी त्यांना स्वत:चा जीव सांभाळायचा होता. त्यांनी आशीर्वाद दिले पण वर्गणी नाही. एक आठवडा हे काम केलं आणि वाटलं, हातावर पोट घेऊन जगणाऱ्यांना आपण पर्यावरणावर भाषणं देऊ नयेत. मिळालेले पैसे त्या संस्थेला दान केले. तो शेर तिथेच संपला.
... खूप वर्ष उलटली या सगळ्याला. आता इथे अमेरिकेत सुखवस्तूपणाचा शेर सुरू आहे आणि देवाच्या दयेने तो तसाच चालू राहू दे. पण काही कारणांनी ओटीतल्या नारळाची फक्त करवंटीच धरायची वेळ आली तर dignity of labor हा अमेरिकन वसा घेतला आहेच!
jmdiwadkar@yahoo.com