- डॉ. राजेंद्र बर्वे
पराकोटीचं दु:ख, हतबल हताशा, भीती व्यक्तिगत स्तरावर असते, तेव्हा त्या दु:खाला सामोरे जाण्याची प्रत्येकाची म्हणून एक पद्धत घडते, पण हे दु:ख एकाच वेळी अवघ्या जगावर कोसळलेलं असेल तर?- सध्या आपण त्याच अवस्थेतून जातो आहोत. जगावर मृत्यूची कृष्णछाया पसरलेली आहे. एका श्वासासाठी तडफडत प्राण सोडणारे जीव ज्यांचे आप्त असतात, त्यांच्या वाट्याला येणारं दु;ख तर अपार; पण ही अशी दृश्य जे पाहतात, त्यांच्या मनात वस्तीला येणारी मृत्यूची भीतीही तितकीच भयानक असते. कोरोनाच्या महामारीने सध्या अवघ्या जगाला अशा दुःखाच्या, वेदनेच्या धाग्याने एकत्र बांधून घातलं आहे. दहशत सगळ्यांच्याच मनावर, पण त्या दहशतीतली दिलासा एवढाच की, हे फक्त माझ्याच नव्हे, तर सगळ्यांच्याच आयुष्यात घडतं आहे. अख्ख्या जगाने एकत्रितरीत्या अशा भयावह काळाचा सामना करण्याचे प्रसंग इतिहासात तुरळक असले, तरी एका मोठ्या जनसमूहाला अशा सामूहिक भयग्रस्ततेची अनुभूती महायुद्धे, ११ सप्टेंबरसारखे दहशतवादी हल्ले, भूकंप - त्सुनामीसारखी नैसर्गिक संकटे यांनी दिलेली आहे. अशा काळात सामूहिक भीतीच्या भावनेला जनसमूह कसे सामोरे जातात, ‘भीती फक्त मला नव्हे, तर सर्वांनाच आहे’ या भावनेची तगून राहण्यासाठी मदत होते की, त्याने धास्ती उलट वाढते, अशा अनेकानेक मुद्द्यांवर सामूहिक मानसशास्त्रामध्ये प्रदीर्घ अभ्यास झालेले आहेत. आजवरच्या या अभ्यासातली निरीक्षणे, शास्त्रज्ञांनी काढलेले निष्कर्ष आणि दाखवलेल्या दिशा या सगळ्या संचिताचा आत्ता कोरोनाच्या महामारीचा सामना करणाऱ्या आपणा सर्वांना काही उपयोग होईल, असे वाटल्याने या लेखमालेचा प्रारंभ करतो आहे. अशी सार्वत्रिक आपत्ती ओढावते, तेव्हा सगळा समाज भावनिक आंदोलनांच्या वेगवेगळ्या टप्प्यातून जात असतो, असे मानसशास्त्रीय अभ्यास सांगतात.
काय असतात हे टप्पे? या साखळीच्या शेवटच्या हतबल टप्प्यात येऊन पोहोचल्यावर पुढे काय करायचं? या नव्या काळजीतून स्वत:ला कसं सावरायचं? या अस्वस्थ काळात कोणत्या सावळ्या विठ्ठलाची मूर्ती हदयाशी घ्यायची, याविषयी पुढील लेखात..
------------------
पहिली अवस्था- भीती-हुरहुर
मोठ्या साथीच्या आधी समाजातल्या लहान मुलांना त्याची चुणूक लागते. त्यांच्या मनावर टगेपणाचे संस्कार न झाल्यानं ती पटकन रिॲक्ट करतात. ही प्री डिझॅस्टर फेज. अनामिक भीती, हुरहुर आणि अनिश्चिततेची लक्षणं. खरं म्हणजे कोविडच्या बातम्या सुरू झाल्यावर आपल्या मनातही भीती उगवली होती, पण प्रौढ मनानं ते नाकारलं.
दुसरी अवस्था- धक्का
मनावर तीव्र आघात झाला की, आपण वस्तुस्थिती नाकारतो. हिंदी सिनेमातील हिरॉइन तिचा बाप दिल का दौरा पडून, आचके देत मेला की, ‘नहीं.. म्हणून किंचाळते’...तेच! अचानक लॉकडाऊन जाहीर झाला, तेव्हा असाच तीव्र धक्का बसला. तरीही आपण त्या घटनेकडे राजकीय अंगाने पाहत राहिलो, उलटसुलट प्रतिक्रिया देत राहिलो; पण अंतर्मनात आपण समजून चुकलो होतो की, हे काहीतरी वेगळं आहे, भयावह आहे.
तिसरी अवस्था- लढण्याचं शौर्य
तिसरा टप्पा हिरॉइझमचा! तुम्हाला आठवत असेल, गेल्या वर्षी विलक्षण धीराने आणि धिटाईने कोविडशी सामना करणाऱ्या मंडळींची फौज निर्माण झाली. पैकी काही जण नाईलाजाने पुढे आले, पण कर्तव्याची हाक म्हणूनही कोविड वॉरियर युद्धात उतरले. स्वयंस्फूर्तपणे लोकांना उपयोगी पडणारी कामं समाजानं हिरिरीनं हाती घेतली. लंगरपासून ते शिध्यापर्यंत अनेक गोष्टींचं वाटप सुरू झालं. अतिशय हद्य अशी दृश्यं दिसू लागली.
चौथी अवस्था- मधुचंद्र
हळूहळू लॉकडाऊनची सवय झाली. व्हॉट्सॲपवर त्याविषयीचे विनोद धावू लागले. घराघरातून निरनिराळे पदार्थ शिजू लागले. घरी बसलेले नवरे घरकामाला हात लावू लागले. ‘आपण काळजी घेऊ म्हणजे कोविडपासून नक्की बचाव होईल,’ अशा विचारांचा हनीमून सुरू झाला.
पण इथेच अभद्र काळिम्याचे डागही दिसू लागले. घरात कोंडल्याने आक्रमकपणा वाढला. मुलं स्त्रिया त्या हिंसेला बळी पडू लागल्या. वृद्ध माणसांची आबाळ होऊ लागली. शिव्या, अपशब्द यांचा वापर वाढला. मनातली खदखद वाढत गेली.
पाचवी अवस्था- निराशेचा स्फोट
समाजात भयंकर स्थित्यंतर घडत होतं. परगावातल्या कामगारांचे जथ्थे गावी परतू लागले. महासाथीमधल्या बाधितांचे आकडे वाढत गेले. रोजचा मृत्युदर भिववू लागला. घरात आणि बाहेर सर्वत्र धुसफूस वाढली. डॉक्टरांवर आक्रमक हल्ले, दोषांची बोटं टोकदार झाली. या महासाथीचं खापर फोडण्याकरिता शोधाशोध, मग हल्ले आणि अशांतता! कमालीचा कंटाळा, उबग आला. कोणावर रागवावं कळत नाही, नुसतं बसून राहावत नाही आणि कामही करवत नाही. रोज रोज तेच तेच फोन, तोच थकलेला सूर आणि हरलेपणाची जाणीव...
सहावी अवस्था- हतबल थकवा
हलकेहलके आकडेवारी बदलू लागली. बाधितांचे आकडे उतरले.
आशेचे अंकुर फुटले. बदलाची चिन्हं दिसू लागली. लॉकडाऊन संपला. जीवन वळणावर आलंसं वाटू लागलं. आश्वासकतेचा झरा वाहू लागला. गोष्टी स्थिर स्थावर होत आहेत, असं वाटताना पुन्हा एकदा काळरात्र झाली...हाच तो दुसऱ्या लाटेचा अक्राळविक्राळ टप्पा! या टप्प्यात होऊन सुचेनासं होतं. व्यवस्थाही अनेकदा थकून दिशाहीन झाल्यासारख्या भरकटतात. हे सारं आपण आत्ता अनुभवतो आहोतच!
ख्यातनाम मनोविकार तज्ज्ञ