- डॉ. राजेंद्र बर्वे
‘‘सुरुवात कशी झाली ते आधी सांगतो. माझं छान चाललं होतं. कोरोना-बिरोनाची भीती वाटत नव्हती. कोविडला घाबरणाऱ्या लोकांची मी त्यांच्यासमोरच खिल्ली उडवत असे. माझा स्वभावच तसा चेष्टेखोर. पण अचानक माझ्या मित्रालाच कोविडची लागण झाली!’’ - माझ्या समोर बसून बोलता बोलता तो एकदम आवंढा गिळून गप्प झाला. मग म्हणाला,
‘‘मित्राला ॲडमिट केलं. दोन-चार दिवस बरा होता आणि अचानकच तो गेला असं कळलं. माझ्या पायातली शक्तीच गेली. मी सुन्न होऊन बसून राहिलो. आठ-पंधरा दिवस गेले. घरून काम करीत होतो पण लक्ष लागत नव्हतं. मी नुसताच कॉम्प्युटरच्या स्क्रीनकडे बघत राहात असे. शेवटी कोणीतरी फोन करून सांगायचं, सर तुमचं कनेक्शन बरोबर नाहीये का ? तुम्ही काही बोलतच नाही.. मग भानावर येऊन उत्तर देत असे!’’ ‘करता करता २-३ महिन्यांत हा सावरला, पण त्याचा खेळकरपणा हरवला’- त्याची पत्नी म्हणाली.
मग दोघेही गप्प.
सुकलेल्या ओठावरून कोरडी जीभ फिरवत तो म्हणाला, ‘मित्राचं निधन झाल्यानंतर मला भीतीचा अटॅकच आला. आपण मराठीत म्हणतो ना, गाळण उडणे, बोबडी वळणे, गलीतगात्र होणे, चलबिचल होणे.. हे सगळे शब्दप्रयोग अनुभवले!’
‘..आणि डॉक्टर,पहिल्या लाटेतली गोष्ट आहे ही!’ - त्याची पत्नी म्हणाली.
हे जोडपं खूप मनमिळाऊ आणि आमच्या मित्रवर्गात लोकप्रिय. आता कोणाच्या संपर्कात नाही, प्रत्यक्ष तर नाहीच पण फोनवरदेखील नाही.
‘अच्छा, मग आता?’
तो बोलायचा थबकला. तशी त्याची पत्नीच म्हणाली, ‘मी सांगते, तो ना आता भीतीला भीतो. त्याला सारखं वाटतं, पुन्हा तसा भीतीचा अटॅक नाही ना येणार? मी त्याला म्हणते, तू सदैव चिंताग्रस्तच असतोस. तुझ्या भीतीचं रूपांतर आता चिंता आणि काळजीत झालंय. तो या प्रॉब्लेममधून बाहेरच पडत नाही. त्याला दुसरं काही सुचत नाही. पर्याय सुचत नाही.’
‘मधे मधे मी बरा असतो पण मनात हे चिंतेचं पार्श्वसंगीत चालू असतं. बरोबर. मला वाटतं, मला आता कसलीही भीती वाटते. भीतीचीच भीती आणि चिंतेची चिंता!’
- हे सगळं चालू असताना माझ्या मनात विचार आला, कितवी बरं ही केस असावी?- मोजदाद नाही!! सगळ्यांना तेच झालंय. भीतीची भीती वाटतेय!
‘मी काय करू आता?’- त्यानं विचारलं.
‘निदान एवढं लक्षात ठेव की स्वत:ला बोल लावू नकोस, स्वत:शी संवाद करतांना काळजी घे. स्वत:ला याक्षणी धीर देणं महत्त्वाचं आहे.’- मी म्हणालो.
‘अगदी बरोबर, मी हेच सांगते त्याला!"- (हे वाक्य पत्नी सोडून अन्य कोणाच्या तोंडी शोभत नाही!!)
मी त्याला म्हणालो, ‘‘तुझी समस्या केवळ भीतीची भीती वाटण्यापुरती मर्यादित नाही. तू स्वत:ला ‘घाबरट, भित्रट, फालतू विचार करणारा मूर्ख’ अशी विशेषणं लावणं ही चुकीची गोष्ट आहे. तू स्वत:चा स्वीकार करीत नाहीस!’’
‘म्हणजे?’- त्याने विचारलं.
‘‘हे बघ, कोणतंच व्यक्तिमत्त्व मुळात कमकुवत नसतं. आपल्या मनात काही विचार आणि भावना वारंवार येतात. भीती, चिंता, त्यानुसार येणारे नकारात्मक विचार आणि आपण वेगळे असतो. मनातली ही वादळं परिस्थितीजन्य आहेत. प्रसंग असा ओढवला की तू त्या गोष्टींना स्वाभाविक प्रतिक्रिया दिलीस आणि परिस्थिती न बदलल्यानं तशाच प्रतिक्रिया देण्याची तुला सवय जडली. पण ती सवय म्हणजे तू नव्हेस. आपल्या प्रत्येकात स्वत:ला बदलण्याचं सामर्थ्य असतं. फक्त आपल्याला त्याचा विसर पडतो!’’
- ‘मग मी काय करू?’ - त्यानं उत्सुकतेनं विचारलं.
‘‘आपल्याला भीती वाटते. पण आपण भित्रट, भेदरट नाही, हे स्वत:ला सांग. स्वत:ला घाबरट म्हटलं की आपण स्वत:ला मदत करू शकत नाही.’’
भीतीचा स्वीकार केला की आपण भीत नाही, तर भीतीचे साक्षीदार होतो. स्वत:कडे त्रयस्थ, तटस्थपणे पाहू शकतो. आपण आणि भीती यात अंतर निर्माण होण्याचा सर्वात मोठा फायदा हा की, भीती मावळताना दिसते. त्यामुळे भीतीची भीती वाटत नाही. भीती उसळते आणि शमते.. भीती वाटू लागली की म्हणायचं, ती पाहा भीती! पण ती किती काळ टिकेल? जाईल आल्या पावली!
भीतीच्या होडक्यात श्वासानं हवा भरायची!
१- छातीत धडधड, अस्वस्थपणा जाणवू लागला की मनातल्या मनात म्हणायचं, ही चिंतेची लक्षणं आहेत. मला त्यांच्याकडे त्रयस्थपणे पाहायचं आहे. त्यांना प्रतिसाद द्यायचा नाहीये, उलट समजून घ्यायचंय की हा माझ्या मनानं आणि शरीरानं परिस्थितीला दिलेला प्रतिसाद आहे!
२- मग थांबून दीर्घ श्वास घ्यायचा आणि हलके हलके सोडायचा. कल्पना करायची, की भीतीच्या होडक्याच्या शिडात आपण श्वासानं हवा भरतो आहोत.
३- अशी कल्पना केली तरी हसू येतं आणि भीतीचं तारू आपल्या मनाचा किनारा सोडून देतं. मग उच्छवासाचा वारा दिला की हळूहळू दूर जातं. जाऊ दे भीतीला तिच्या वाटेनं.
४- मनातली भीती, चिंता अशी मावळते, विरते, नाहीशी होते... भीतीपेक्षा आपण खूप मोठे असतो!
(ख्यातनाम मनोविकारतज्ज्ञ)