-अमृता हर्डीकर
2005मध्ये ‘द सिस्टरहूड ऑफ ट्रॅव्हलिंग पॅन्ट्स’ हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. चार किशोरवयीन, अगदी घट्ट मैत्रिणी उन्हाळ्याच्या सुटीत आपापल्या कुटुंबाबरोबर वेगवेगळ्या ठिकाणी जाणार म्हणून नाराज असतात.
सहज खरेदीला गेलेल्या असताना त्यांना सगळ्यांना त्या वेगवेगळ्या उंची, आकाराच्या, कमी-जास्त वजनाच्या असल्यातरी चौघींना व्यवस्थित फिट होईल, अशी एक जीन्स सापडते. अर्थात ती पॅन्ट एक प्रतीक आहे. वेगवेगळे अनुभव वाट्याला येऊनही चौघींच्या भावविश्वात त्या एक टप्पा एकत्न लांघून जातात.
किशोरवयाचा टप्पा उलटून गेला असला तरी, तो सिनेमा मला आणि माझ्या मैत्रिणींना खूपच भावला होता. कॉलेज संपल्यावर, नोकरी, लग्न वेगवेगळ्या कारणांनी रोज नजरेसमोर असणा-या मैत्रिणी जेव्हा अनेक महिने भेटेनाशा झाल्या, मैलोन्मैल लांब गेल्या तेव्हा हा सिनेमा आठवायचा. सिनेमासारखी एकच जीन्स आम्हाला बसत नसली तरी स्टोल, दागिने, कवितांची पुस्तकं, एकमेकींबरोबर आम्ही शेअर करायचो. उद्मेखून आठवण आली की या उसन्या निर्जीव वस्तूसुद्धा एक उबदार मिठी मारतात.
माझ्या चार वर्षांच्या मुलीच्या निमित्ताने या सगळ्या आठवणी परत भावविश्व मुग्धित करून गेल्या. इराच्या शाळेतली मैत्नीण पिया जर्मनीला परत गेली. तिचे वडील, सेबास्तिअन केवळ वर्षभर त्यांच्या कामासाठी कॅलिफोर्नियामध्ये आले होते; बरोबर बायको लॉटी, पिया आणि पियाचा धाकटा भाऊ लेनी. पहिल्या भेटीत सेबास्तिअन आणि निकीत, मी आणि लॉटी, आमची छान तार जुळली.
आपल्या मुलांच्या सगळ्याच मित्रमैत्रिणींच्या पालकांबरोबर आपलं जमतंच असं नाही. पिया आणि इराला एकमेकींमध्ये फारसा रस नव्हता. इराला लेनीशी खेळायला जास्त आवडायचं. पिया आणि इराची मैत्री अगदी वर्षाच्या शेवटी झाली. जीन्स आणि टी-शर्टमध्ये रमणारी इरा, तिला अचानक टूटू स्कर्ट आवडायला लागले. लेगो आणि ट्रेन ट्रॅकबरोबर भावल्या आणि बेकिंग सेट आवडायला लागले. सगळा प्रभाव पियाचा नव्हता, इतर मैत्रिणींचापण होता; तरीही माझ्या मनात असे काय काय विचार येऊन गेले. इरा पियामध्ये गुंतायला लागली होती आणि काहीच दिवसात पिया खूप लांब जाणार होती, याचा मी खूप जास्त विचार करत होते.
पिया निघायच्या आधीच्या शेवटच्या महिन्यात, साधं बागेतून आपापल्या घरी परतताना या तिघी-चौघी मैत्रिणी एकमेकींना मिठी मारून, ‘बाय बाय, आय विल मिस यू’ म्हणायला लागल्या. तीन आणि चार वर्षांच्या या मुलींचा, एकमेकींना मिठीत घेतलेला घोळका पाहून, बागेतल्या इतर आया ‘ऑ’, ‘सो क्यूट!’, असं काय काय कौतुकाने म्हणायला लागल्या. ते ऐकून यांना आणखीन चेव चढायला लागला. मग खेळता खेळता मध्येच एकमेकांना मिठी मारणं, स्वत:चा आवडता खाऊ एकमेकींना भरवणं वगैरे. मैत्रीचा शेवटचा महिना त्यांनी पुरेपूर उपभोगला.
वेळ संपत आलीय किंवा काही काळाने आपण एकमेकींच्या हजारो मैल लांब जाणार आहोत, कदाचित मोठय़ा होऊ तेव्हा एकमेकींना विसरून जाणार आहोत, असल्या जाणिवा त्या मुलींना अजिबात नव्हत्या. हे सगळे विचार, दु:ख मुलींच्या आयांच्या मनात, कधी डोळ्यात तरळत होतं. पिया जाणार तशीच लॉटी जाणार याची मला खंत वाटायला लागली होती. देशांतरामुळे अनेक मैत्रीच्या गाठी घट्ट असल्या तरी उसवत जातात, याचा मला अनुभव होता.जायच्या आदल्या दिवशी आमचा निरोप समारंभसुद्धा मुलींच्या आवडत्या बागेतच झाला. जाता जाता लॉटीने एक फाटकी कापडी पिशवी काढून दिली, त्यात पियाचे गुलाबी बूट, अगदी गुलाबी रेन बूट्स होते. मी कधीही बाजारातून निवडून आणले नसते असे ते बूट. त्या गुलाबी बुटांवर ‘युनिकॉर्न्स’ (काल्पनिक घोडा). इरा पियापेक्षा लहान आहे, तर तिला ते येणार्या पावसाळ्यात वापरता येतील म्हणून लॉटीने ते मला दिले. मुली एकमेकींना मिठय़ा मारून रडल्या नाहीत; पण आम्ही दोघी मात्र रडलो..
पिया गेली त्यानंतर शाळा सुरूच होती. एक-दोन दिवस पियाचं नसणं इराला खटकलं नाही; पण आठवडा गेला तसे प्रश्न पडायला लागले. पिया र्जमनीहून कधी येणार? कामासाठी जसा बाबा प्रवास करतो; पण आठ-दहा दिवसांत घरी हजर होतो तशीच पिया खेळायला बागेत येईल किंवा आपण जसे भारतात सुटीला जातो, महिना-दीड महिना आजी-आब्बू, अज्जाला भेटतो आणि परत आपल्या घरी येतो, तशीच पिया सुटी संपवून परत बर्कलीला येणार, असे वेगवेगळे निष्कर्ष इराच्या मनात घोळायला लागले. मग चार दिवसांनी, भर उन्हाळ्यात तिला शॉर्ट्सखाली रेन बूट्स घालून बाहेर जावंसं वाटायला लागलं..
आता या गोष्टीला दोन महिने होत आले आहेत. पियाला भेटायला आपण र्जमनीला जाऊया, तिच्याशी फोनवर बोलूया, असे सगळे उपाय सुचवून झाले. फायनली शाळेला उन्हाळ्याची सुटी लागली. शाळा सुरू झाली की पियापण शाळेत परत येणार अशी अजूनही इराची समजूत आहे. तिला कितीही संदर्भासहीत स्पष्टीकरण दिलं तरी तात्पुरतं तिला पटतं, मग काही दिवसांनी पुन्हा ते चक्र सुरू होतं.शाळेचं पुढचं वर्ष सुरू होऊन इरा शाळेत जाईल आणि तेव्हाही पिया नसेल तेव्हा कदाचित तिचा खूप मोठा भ्रमनिरास होईल, तिला त्रास होईल, कदाचित तिला लोकांचे देशांतर थोडेसे उमगायला लागेल. तिच्या आजी -आजोबांशी व्हिडीओ कॉलवर बोलताना तिला नव्याने आलेली ही समजूत कळते. तिने तिच्या ‘मा’ला सांगितलेही, ‘मा तू येतेस का प्लेडेटला? पण तू खूप लांब आहेस, विमानात खूप वेळ लागेल. तुझ्याकडे रात्र, तेव्हा माझ्याकडे दिवस.’- भारतातून परत अमेरिकेला यायला निघाल्यावर ती माझ्या वडिलांना थोपटवत म्हणाली, ‘अब्बू, मी बर्कलीला गेल्यावर तू मला दिसणार नाहीस..’प्रेत्झेल्स खाताना आणि कुठल्याही ऋतूत ते गुलाबी युनिकॉर्न बूट पायात चढवताना आताही इराला पिया आठवत असते का, हे माहीत नाही; पण पिया जाण्यामुळे इराच्या डोक्यात प्रवासाची अनेक चक्रं सुरू झाली. आम्ही अनेक नवीन पुस्तकं वाचली. ‘धीस इज हाऊ वी डू इट’ नावाचं मॅट लामोठ या लेखकाचं सात देशातल्या, सात मुलांच्या दिनचर्येचा, त्यांच्या कुटुंबाचा आढावा घेणा-या पुस्तकाची आम्ही पारायणं केली. जग कसं बनलंय? वेगळे देश का? वेगळ्या भाषा का? विमान कसं उडतं? इतकं लांब उडायला विमानाची टाकी किती मोठी असते? विमानाचे नकाशे कसे असतात? कोण चालवतं? विमानापेक्षा पटकन कसं उडता येईल?. असे चौकस प्रश्न तिच्या मनात आले आणि ज्ञानात भर पाडून गेले. मैत्नीच्या विरहातून काहीतरी तुटेल, घडेल. इरा छोट्या सहवासातून, अनुभवातून काहीतरी संचित करायला शिकेल. इरा अजून थोडी मोठी होईल.
मोठी होऊन तिला तिच्या भवतीच्या सुरक्षित विश्वापलीकडच्या वास्तवाची जाणीव होईल तेव्हाचे तिचे प्रश्न खूप टोकदार असतील.देशांतर म्हणजे फक्त गुलाबी बदाम असलेल्या गुळमुळीत कागदात गुंडाळून दिलेलं, नाजूक साजूक गिफ्ट नाहीये हे तिला जेव्हा कळेल, तेव्हा कदाचित तिला माझा राग येईल. आर्शित, विस्थापित स्थित्यंतराचा हिंसक इतिहास तिच्या पिढीपासून लपणार नाही. इरा आणि तिच्या मैत्रिणीच्या मैत्रीमध्ये आलेल्या विरामाबद्दल हे लिहायला घेतलं आणि स्वत:च्या सुखवस्तू अनुभवात गुंग असण्याचा थोडा राग मलाही आला. पेपर आणि आंतरजालावर, टेक्सासमध्ये अमेरिकन बॉर्डर पेट्रोलच्या डीटेन्शन सेंटरमध्ये, आपल्या आईवडिलांशिवाय राहणारी, जमिनीवर झोपणारी, तुरुंगवजा गजांआड कोंबलेली मुलं आणि त्यांच्या चेह-यावरची प्रश्नचिन्हं आठवली. या वास्तवाची धग सहन करणं कठीण आहे. आश्रयाच्या अपेक्षेने, मुलांचा विरह सहन करणारे ते आईवडील, किती दांडगी असेल त्यांची आशावादी मनाची भरारी? किंवा सगळं सोसून, अन्यायाला वाचा फोडण्याची मुभाच नसल्याने, आयुष्य पुढे ढकलत राहण्याची जिद्द? उन्हात, रबरी बूट तापतील म्हणून व्याकुळ होणारी मी, माझ्यासारख्या हळव्या आयांचे काय कर्तव्य आहे या अशा परिस्थितीत? सुखवस्तू कुटुंबातलं, एक सृजनशील, संवेदनशील आणि एम्फथीज करू शकणारं मूल मी घडवण्याचा प्रयत्न करू शकते. बास !हे सगळं विचारचक्र पुन्हा त्या गुलाबी युनिकॉर्न असणा-या बुटांवर येऊन थांबतं.खरं तर युनिकॉर्न खरे नसतात, हे मुलांनापण खूप लवकर उमगत असतं; पण तरीही त्यांच्या आयुष्यात युनिकॉर्न असणं खूप महत्त्वाचं असतं. युनिकॉर्नसारख्याच, मनाच्या नाजूक कोपर्यात ठेवलेल्या, इतर जगाला अवास्तव वाटणार्या गोष्टी, मित्नांपुढे आपसूक मांडल्या जातात, कधी कधी मित्रांमुळेच आपल्या भावविश्वात येऊन त्या अवास्तव कल्पना विसावतात, कधी पंख पसरून उडून जातात..युनिकॉर्नची गरज काही वेळा मुलांपेक्षा जास्त आपल्याला असते, कदाचित लॉटीने ते ओळखून मला ते बूट दिलेले असणार..
(लेखिका अमेरिकास्थित रहिवासी आहेत.)
amrutahardikar@gmail.com