- डॉ. राजेंद्र बर्वे
सरिताचा नवरा काकुळतीला येऊन म्हणाला, काही तरी करा मदत सरिताला! हल्लीच्या दिवसात ती कमालीची हळवी झालीय. तीच तीच चिंता करीत राहाते. किती समजवा तिला, आमच्या तशा खात्या-पित्या संसारात चिंता सतत घुसत राहाते. विशेष म्हणजे छान गप्पा मारता मारता एकदम मनातून सरकते आणि कुठच्या कुठे हरवून जाते. कुठल्यातरी भविष्यकाळात. तिच्या मनातल्या चिंतेच्या लाटा.. त्या कोणाचाही हात धरणार नाहीत. उंडारलेल्या वाऱ्यासारखं भटकत राहातं तिचं मन. आणि विषय कुठला? उद्या आपल्या कुटुंबातल्या कोणाला काही झालं तर?.. असं म्हणता म्हणता. हुदंके देऊन रडू लागते. माझं मन ना माझंच वैरी झालंय. डंख मारतं मला. एकवेळ कोविडनं मला पछाडलं तरी बरं, त्याला उपाय तरी सापडेल, पण मनातल्या या चिंतेच्या ताणावर काय उतारा? चिंता करता. करता म्हणजे त्याच गोष्टींचं विश्लेषण करून मनात विचित्र घटनांचा फापट पसारा करुन ठेवते. बरं, समजतं सगळं, म्हणजे आपण उगीच नाही नाही ते विचार करतो, भलत्या सलत्या घटना घडतील किंवा घडत आहेत, आपल्या मनातली भीती खरीच होणार, किंवा खरीच झालीय असं गृहित धरते. तिला म्हटलं की या फक्त तुझ्या मनातल्या वाईट कल्पना आहेत. तिला हे पटत नाही !! आपल्याच मनातल्या खोट्या गोष्टींवर विश्वास ठेवते!"
मित्र हो, ‘घरोघरी मातीच्या चुली’, या चालीवर ‘घरोघरी कोविडची भीती’ अशी परिस्थिती आहे आणि यातूनच मार्ग काढायचा तो कसा, तर आपल्या मनाशी संवाद साधून, सुसंवाद करुन, कधी प्रेमानं आंजारुन गोंजारुन तर कधी ठाम आग्रहीपणे, तर कधी शिस्त लावून !
मन नाठाळ नाठाळ
बहिणाबाईची मन वढाय वढाय ही कविता वाचूनच सरिताचं मन वावरत होतं. त्यातच थोडा बदल करुन मन नाठाळ नाठाळ म्हटलं पाहिजे.
आपलं मन आपल्याशी खोटं बोलतं. चिंता वाटू लागली की मनाचा खोटारडेपणा वाढू लागतो. पुढे काय काय होईल याच्या थापा आपलं मन मारतं आणि या थापांवर आपण विश्वास ठेवतो तेव्हा या खोटारड्या, थापाड्या आणि नाठाळ मनाला वठणीवर ठेवावं लागतं. वठणीवर ठेवायचं म्हणजे ओरडून गप्प करायचं का? मनाला शिक्षा करायची का?
-अजिबात नाही. अगदी मनाच्या गुप्त खजिन्यातलं एक गुपित सांगतो. तुम्ही सरिता असा की सागर किशोर किंवा किशोरी, आपल्या मनाला शंभर टक्के ठाऊक असतं की आपण स्वत:शी खोटं बोलतोय. स्वत:च्या मनातल्या चिंतेला काही अर्थ नाहीये मनानं मारलेल्या बाता आहेत! आपल्या मनाला जे शंभर टक्के ठाऊक आहे, त्यावर विश्वास ठेवा.
मनाला काय हो, दिलं सोडून की जातं भरकटत आणि वावरतं दु:खाच्या वावरात! पण या नाठाळ मनाच्या पलीकडे एक ‘स्व’ असतो. तो आपल्या मनाचा साक्षीदार. ते गाणं आहे ना, माझिया मना, जरा थांब ना! हे मनाला उद्देशून ‘स्व’ हाक मारत असतो. ती आपली साक्षी भावना. कोणी या साक्षित्वाला दिव्यांश म्हणतात तर कोणी प्रज्ञा.
तर ही साक्षी भावना जागृत केली की ती मनाकडे पाहू लागते आणि म्हणते, मनातल्या या निरर्थक विचारांना दाबून टाकलंस तर ते उफाळून येतात आणि कोणाला सांगत बसलास तर ते वाढत जातात. धरले तर चावतात आणि सोडले तर सुटतात.
अशा विचारांच्या नादी लागायचं नाही, अशा नकारात्मक भावना मनातून काढून टाकायच्या नाहीत. आपल्या थापाड्या, खोटारड्या, नाठाळ मनावर विश्वास ठेवायचा नाही. असल्या भावना आणि विचार आपल्या मेंदूमधल्या विशिष्ट केंद्रातील जीवरसायनांच्या उद्रेेकानं उत्पन्न होतात. त्यांच्याकडे लक्ष दिलं तर त्या वाढतात. आगीत तेल टाकावं तसंच.
आता आणखी लाख मोलाची गोष्ट सांगतो. मनाचं खास गुपित. आपला मेंदू फार हुशार असतो. आपण मनानं दुर्लक्ष केलं तर आपोआप त्या रसायनांचं उत्पादन बंद होतं. थापांवर विश्वास ठेवला नाही, अफवांकडे दुर्लक्ष केलं, खोटारड्या विचारांकडे कानाडोळा केला की काय होतं? या सगळ्या मनोनिर्मित कल्पना विरुन जातात. वादळ जसं आपोआप थांबतं तस्संच..त्यासाठी मनातला
साक्षीभाव जागा करायचा. कसा ते सोबत दिलंय चौकटीत ! मग हळूच साक्षित्वाची जाणीव मनाच्या आकाशात नाजूक चंद्रकोरीसारखी उमलेल आणि म्हणता म्हणता ती पूर्ण चंद्राकार होईल. साक्षित्वाची भावना चंद्रासारखी शीतल असते. तिच्या राज्यात थापाड्या, खोटारड्या मनाला ठावच राहात नाही.
सुन रही हो ना सरिता?..
नाठळ मनाला वठणीवर कसं आणावं?
- ते तर सोपं आहे. त्याची अट एकच. सराव करायला हवा. - कसला?
१. आता आहात तिथे स्थिर व्हा. पाठीचा कणा ताठ ठेवा. पण ताणून ठेऊ नका. खांदे रूंद करा.
२. पाय जमिनीवर पक्के ठेवा. पायाच्या तळव्यांना सहज स्पर्श होऊ दे जमिनीचा वा फरशीचा.
३. डोळे मिटून श्वासावर लक्ष केंद्रित करा. श्वासाची नाकावाटे होणारी हालचाल, तिथेच लक्ष द्या.
४. श्वास घेण्याचा वा सोडण्याचा आवाज होता नये. चार आकडे मोजून श्वास घ्या, चार आकडे श्वास रोखून धरा आणि सात आकडे मोजून हलकेच श्वास सोडा.
५. असं साधारण दहा-वीस मिनिटं रोज करा. हो, केव्हाही करा. भरल्यापोटी करु नका इतकंच.
सरावाला पर्याय नाही. एकदा करुन हे जमणार नाही.
(ख्यातनाम मनोविकारतज्ञ)