-आदिल सुमारीवाला
भारतीय अँथलेटिक्स खेळाडूंनी जकार्तामध्ये 7 सुवर्ण, 10 रौप्य व 2 कांस्य पदके जिंकून आतापर्यंतच्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट कामगिरी नोंदविलेली आहे. केंद्रीय क्रीडा मंत्रालयअंतर्गत काम करीत असलेल्या भारतीय क्रीडा प्राधिकरण (साई) आणि अँथलेटिक्स महासंघाने गेली दोन-तीन वर्षे प्रशिक्षण शिबिरे घेतली त्यामुळे हे यश मिळाले.
भारताच्या संघातील नीरज चोपडा, महम्मद अनिस, जिन्सन जॉनसन, तेजिंदरपालसिंह तूर, अर्पिंदर सिंह, स्वप्ना बर्मा, दुती चंद, हिमा दास, निना वर्किल, अरोकिया राजीव, सरिताबेन गायकवाड, व्हिसमंजा कोराथ, पूवम्मा, सुधा सिंग, संजीवनी जाधव या सर्व खेळाडूंना आपण काही देशांमध्ये तेथील मार्गदर्शकांच्या देखरेखीखाली सरावासाठी पाठविले होते. त्याचबरोबर तेथील काही स्पर्धांमध्येसुद्धा आपण त्यांच्या प्रवेशिका पाठविल्या होत्या. केंद्रीय क्रीडा मंत्रालयाच्या आर्थिक सहकार्याशिवाय हे शक्यच नव्हते. ‘टॉप्स’ (टारगेट ऑलिम्पिक पोडियम स्कीम) या योजनेचा लाभ अँथलेटिक्स महासंघाला पूर्ण मिळाला. अन्यथा भारतातील कोणत्याही क्रीडा महासंघाकडे एवढा निधी नाही की ज्यामुळे ते त्यांच्या खेळाडूंना दोन-तीन वर्षे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रशिक्षणासाठी पाठवू शकतील. कारण आपल्या देशात क्रिकेटशिवाय कोणताही महासंघ र्शीमंत नाही. आगामी 2020 टोकियो ऑलिम्पिकचे ध्येय ठेवून केंद्राने आणि अँथलेटिक्स महासंघाने आधीपासूनच नियोजन सुरू केले आहे. आता जकार्ता येथून खेळाडू थोडे दिवस आपल्या घरी गेले आहेत. पण लवकरच ते पुन्हा त्यांच्या-त्यांच्या प्रशिक्षण शिबिराच्या ठिकाणी पोहोचणार आहेत. त्यांच्यासाठी दोन दिवसांपूर्वी नवी दिल्ली येथे झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय क्रीडामंत्री राज्यवर्धनसिंह राठोड यांनी 2020 टोकियो ऑलिम्पिकच्या तयारीसाठी आपल्या खेळाडूंच्या तयारीत कोणतीही कसर ठेवली जाणार नाही, असे आश्वासन दिले आहे.
(लेखक अँथलेटिक्स महासंघाचे अध्यक्ष आणि माजी ऑलिम्पियन आहेत)