-
अपर्णा वेलणकर
एखादं शहर ‘स्मार्ट’ असतं म्हणजे काय? डिजिटल टेक्नॉलॉजीने गुंफलेल्या या व्यवस्थेत नागरी जीवनाची प्रत कशी असते? शहराच्या नियोजन-नियंत्रणात सहभाग मिळालेल्या नागरिकांच्या ‘रिअल टाइम कनेक्ट’ मधून समूहजीवनाचं स्वतंत्र मॉडेल उभं राहतं का? ऑनलाइन आणि डिजिटल शहरव्यवस्थापनामुळे शोषणाच्या आणि भ्रष्ट व्यवहारांच्या शक्यता कमी होतात/संपतात का?
कॉम्प्युटर आणि स्मार्टफोन यांचा वापर न करता येणारे/न परवडणारे, आधीच डिजिटल डिव्हाइडच्या फाळणीने मागे सुटलेले नागरिक या ‘स्मार्ट’ शहरात अधिकच मागे ढकलले जातात का?
तुझ्या देशात परत जाशील, तेव्हा तिथल्या लोकांना एक साधा नियम सांग, स्मार्ट सिटीच्या ‘प्रेझेंण्टेशन’साठी आलेला कुणीही तज्ज्ञ, राजकीय नेता किंवा सरकारी अधिकारी आपल्या प्रेझेंण्टेशनमध्ये बार्सिलोना, लंडन नाहीतर शांघाय किंवा सिंगापूरचे देखणो फोटो दाखवील आणि म्हणोल, की या पाहा स्मार्ट सिटीज्, आपलं शहर असंच देखणं, चकाचक होईल; तर त्याला सरळ सांगा, बंद कर तुझा कॉम्प्युटर. जस्ट शट अप अॅण्ड गो होम! स्मार्ट सिटी म्हणजे कुठल्यातरी देखण्या फोटोतलं चित्र प्रत्यक्षात उतरवण्याचा अट्टहास नव्हे. प्रत्येक शहर ही स्थानिक पर्यावरणाशी, त्या शहरात राहणा:या नागरिकांशी, त्यांच्या सवयी-स्वभाव-संस्कृतीशी सुसंगत असणारी अशी एक जिवंत आणि लवचिक व्यवस्था असते. त्यामुळे भारतातल्या स्मार्ट सिटीज् भारतीय मुशीतूनच उन्नत झाल्या पाहिजेत, अन्य कुणाची विचारशून्य कॉपी करून नव्हे.’’
- झोहर शेरॉन सांगत होते. इस्नयलमधल्या तेल अवीव या शहराचे हे चीफ नॉलेज ऑफिसर. ‘स्मार्टेस्ट सिटी ऑफ द वल्र्ड’ असा किताब मिळालेल्या या शहरात मी फिरत होते ती उत्सुक भारतीय नागरिकाची नजर घेऊन! ‘हे स्मार्ट सिटी प्रकरण म्हणजे नक्की असतं काय? अशा शहरात राहणा:या नागरिकांच्या आयुष्यात या ‘स्मार्टनेस’मुळे नेमका काय फरक पडतो?’ - अशा दोन साध्या पण समकालीन भारतातल्या अत्यंत कळीच्या प्रश्नांची उत्तरं शोधायला मी तेल अवीवमध्ये गेले होते.
तिथे भेटलेले शेरॉन हे फार महत्त्वाचे गृहस्थ. कारण मला भेटले तेव्हा ते नुकतेच पुण्यात जाऊन-राहून आले होते. पुण्यात ‘स्मार्ट सिटी’वरून चाललेलं घमासान युद्ध त्यांनी प्रत्यक्ष अनुभवलं होतं. मूळ विषयाची फारशी माहिती नसताना केवळ पक्षाचा अजेण्डा राबवण्यासाठी स्मार्ट सिटीच्या बाजूने नाहीतर विरोधात पोकळ भाषणबाजी करणारे राजकीय नेते, अतिशय किचकट अशा तांत्रिक संकल्पना पेरून इंग्रजाळलेल्या चमकदार स्वप्ननगरीची प्रेङोण्टेशन्स करण्यात गढलेले प्रशासकीय अधिकारी आणि या सगळ्या स्मार्ट कल्लोळाने विटून हजार समस्यांनी वेढलेलं आपलं रोजचं शहरी जगणं रेटत राहणारे निराश नागरिक हे खास भारतीय चित्र शेरॉन यांनी पुण्यात अनुभवलं होतं. ‘इथे संडास नाहीत पुरेसे, स्मार्ट सिटय़ा कसल्या बांधताय?’ - असा मुद्दय़ाचा सवाल टाकून या सगळ्या हलकल्लोळाकडे अतीव तिरकस दृष्टीने पाहणारी आणि तंत्रधारित रचना आणू इच्छिणा:या प्रत्येक प्रकल्पावर तिरकस, बोचरी टीका हेच नागरी हित मानणारी भारतीय माध्यमंही शेरॉन यांच्या परिचयाची होती.
‘तुम्ही लोक चर्चा फार करता प्रत्येक गोष्टीची’ - शेरॉन म्हणाले.
‘म्हणजे? लोकशाही आहे आमच्या देशात’ - आपण मध्यपूर्वेच्या देशात आहोत, याचं भान अचानक जागं झालं.
‘..पण काही बाबतीत प्रत्यक्ष अनुभव हेच अनेक प्रश्नांचं उत्तर असतं. चर्चा पोकळ असतात’ - शेरॉन म्हणाले. ‘परदेशात फिरून, राहून आलेले किंवा मग दिल्ली-बेंगळुरू-मुंबईतल्या अत्याधुनिक गेटेड कम्युनिटीत घर घेणं परवडणारे मोजके नागरिक वगळता आधुनिक शहर-नियोजनातल्या व्यवस्थांची चव तुङया देशातल्या किती जणांनी अनुभवलेली असेल? चार चार दिवस पाणी मिळत नाही, वाहतूक कोंडी सुटत नाही, महापालिकेत गेलं तर कुणी विचारत नाही या अनुभवाने विटलेल्या नागरिकांना कुणी अचानक ‘स्मार्ट सिटी’ची स्वप्नं दाखवील, तर विरोध होणारच. चेष्टाही होणार.’ - पुण्यातल्या मुक्कामात शेरॉन यांना सद्यस्थितीतल्या भारतीय दुखण्याची ही ‘स्मार्ट’ नस नेमकी सापडली असावी.
स्मार्ट सिटी तंत्रज्ञानाचा विकास आणि वापराची प्रयोगशाळा ठरलेली बार्सिलोना, रिओ-दि-जानेरिओसारखी शहरं शहरव्यवस्थापनाचे नवनवे (आणि छोटे) प्रयोग करत टप्प्याटप्प्याने स्मार्ट होत गेली. प्रत्यक्ष वापरातून लक्षात आलेल्या चुका सुधारत राहिली. यांच्यापैकी कोणत्याही शहरात ‘चला, आता आपलं शहर स्मार्ट सिटी करूया’ अशा घोषणा झाल्या नाहीत. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराने रोजचं जगणं अधिक सोपं, सुरळीत होतं असा प्रत्यक्ष अनुभव आल्यावरच या शहरांमधले नागरिक अधिक महत्त्वाच्या बदलांना उत्साहाने सामोरे गेले. तुम्ही सुट्टीच्या दिवशी प्रवास करता का, ऑफिसला कोणत्या रस्त्याने जाता यासारख्या नागरिकांच्या अतिव्यक्तिगत माहितीचा वापर करून आकाराला आलेली ‘रेसिडेन्ट कार्ड’ सारखी व्यवस्था तेल अवीव शहराने मोठमोठय़ा घोषणा करून लॉन्च केली नाही वा सक्तीने लादलीही नाही. आपण ऑफिसला कोणत्या रस्त्याने जातो-येतो ही माहिती महानगरपालिकेला दिली, तर रोजच्या प्रवासासाठी आवश्यक असे अॅलर्ट्स आपल्याला मोबाइलवर मिळतात, हे नागरिकांना प्रत्यक्ष दिसू लागलं, तेव्हा त्यांनी स्वत:हूनच या योजनेत सहभाग घेतला. स्वयंस्फूर्तीने आकाराला आलेली हीच ‘डिजी-टेल अॅप’ची व्यवस्था तेल अवीवला स्मार्ट-सिटी तंत्रज्ञानातला जागतिक सन्मान मिळवून देणारी ठरली.
- भारतात नेमका उलटा रस्ता घेतला गेला आहे. स्मार्ट सिटी व्यवस्थापनाच्या जगात या ‘ट्रिकल डाऊन अप्रोच’कडे संशयानेच पाहिलं जातं. हा संशय तेल अवीवच्या मुक्कामात मला भेटलेल्या प्रत्येक जागतिक तज्ज्ञांच्या नजरेत दिसत होता. शहरांमध्ये अंतर्गत स्पर्धा लावून, त्यातून ‘स्मार्ट’ होण्यासाठी लायक अशी शंभर शहरं निवडण्याची ‘टॉप डाउन’ पद्धत या तज्ज्ञांना फारशी रुचलेली नाही. प्रत्येक शहराचा स्वभाव, रूपरंग, पाश्र्वभूमी, गरजा हे सगळं ‘युनिक’ असतं, त्यामुळे एक राष्ट्रीय फुटपट्टी तयार करून शंभर शहरांमध्ये सरसकट ‘स्मार्टनेस’ आणण्याची घाई, हाही ब:या चर्चेचा विषय नाही. ‘भारताने पश्चिमेकडे पाहून आपली स्मार्ट शहरं आखू नयेत, ती मोठी चूक ठरेल. कारण पूर्वेकडल्या नागरिकांच्या राहण्या-फिरण्याच्या, एकत्र जमण्याच्या पद्धती/सवयी/संस्कृती सगळंच पश्चिमेहून वेगळं आहे’ - यावर सगळ्यांचं एकमत दिसलं.
..आणि हेही, की भारतातल्या भांडणांच्या पलीकडे जाऊन जगाचा कानोसा घेत शहर-व्यवस्थापनाचे नवे प्रयोग पाहणं, समजून घेणं हे फार मजेचं आहे. बदलता माणूस आपल्या जगण्याची आणि राहण्याचीही घडी बदलतो आहे. ‘स्मार्ट सिटी’ ही केवळ स्वप्नातल्या अप्राप्य यक्षनगरीची नवलकथा नव्हे, ती आहे जगभरात आकाराला येत असलेल्या रोमहर्षक वर्तमानाच्या प्रश्नांची आणि उत्तरांचीही कहाणी!
- त्या कहाणीच्याच शोधात जगभर फिरण्याच्या प्रयत्नाचा हा प्रारंभ.
‘स्मार्ट सिटीच्या बाबतीत भारतातली परिस्थिती सध्या ‘अॅलीस इन वण्डरलॅण्ड’मधल्या अॅलीससारखी आहे. कुठेतरी जायचंय, पण कुठे ते नक्की नाही.
अशा अनिश्चित वातावरणात नागरिकांचा सहभाग मिळवणं सोपं नाही.
- झोहर शेरॉन
चीफ नॉलेज ऑफिसर, तेल अवीव
(लेखिका ‘लोकमत’च्या फीचर एडिटर आहेत.)
aparna.velankar@lokmat.com