-योगेश गायकवाड
तनुश्री दत्ता नावाची एक अभिनेत्री दहा वर्षांच्या अवकाशानंतर भारतात परत आली आणि एका मुलाखतीत तिला #MeToo मूव्हमेण्टबद्दल विचारल्या गेलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना तिने थेट नाना पाटेकर नावाच्या दिग्गज कलाकारावर शारीरिक छळ केल्याचा गंभीर आरोप केला. योगायोगाने मीडियाचा स्लॉट रिकामा होता, त्यांनी विषय उचलून धरला आणि सोशल मीडियाने लावून धरला. जो कोणी सेलिब्रिटी, जिथे कुठे भेटेल त्याला या विषयावरील प्रतिक्रिया विचारली जाऊ लागली. त्या प्रत्येक प्रतिक्रि येवर सोशल मीडियावर मुक्त प्रतिक्रि यांचा पूर आला. काही लोक तनुश्रीच्या बाजूने, तर काही लोक पाटेकरांच्या बाजूने बोलू लागले. तनुश्रीलापण मग तोच विषय सर्व चॅनल्स समोर पुन: पुन: बोलावा लागला. नानासाहेबांना पण त्यांची बाजू मीडिया समोर मांडण्याकरिता आपल्या वकिलांना पुढे आणावं लागलं. मनसेचं नाव पुढे आलं, प्रत्यक्षदर्शी म्हणून काही मुली पुढे आल्या, जुने व्हिडीओ शोधून काढण्यात आले. आणि वातावरण मस्त तापत गेलं. ‘मी तू आणि मीडिया’च्या या गदारोळात एक सामान्य माणूस म्हणून मी मात्न तुमच्या सारखाच गोंधळून गेलो होतो. नेमकं कोण खरं बोलतंय, समजायला मार्ग नव्हता. सोशल मीडियावरच्या चर्चेत भाग घ्यायचा तर कोणाच्या बाजूने बोलावं, तेच समजत नव्हतं. आपण भूमिका घ्यावी की एक फालतू पब्लिसिटी स्टण्ट म्हणून या सगळ्याकडे दुर्लक्ष करावं? असापण संभ्रम मनात निर्माण झाला होता. आपल्या मनातली ही अस्वस्थता कमी करण्यासाठी आज सगळ्याचा थोडा वेगळा विचार करून बघुयात.चित्रपट निर्मितीच्या व्यवसायाबद्दल आपण थोडं समजून घेतलं तर हे असे वाद का उभे राहतात हे समजून घ्यायला सोपं जाईल. सिनेमा तयार करणं हे एक अत्यंत जिकिरीचं काम आहे कारण त्यात तुमचं माझं जगणं प्रतिबिंबित केलं जातं. आणि ते करत असताना त्यातल्या भावभावना कलाकारांना अलमोस्ट जगाव्या लागतात. आणि मग बहुतेक वेळा मामला इतका भावनिक होऊन जातो की व्यवहार आणि व्यक्तिगत भावना यांच्यातली सीमारेषा लवचिक होते आणि कधी कधी पुसलीपण जाते.
- एका सिस्टीममध्ये चालणा-या ऑफिसमध्ये आणि सिनेमा निर्मितीच्या कामात नेमका हाच फरक आहे. आणि म्हणून इथे असे विचित्न वाद निर्माण होतात आणि चव्हाट्यावर येतात. (सिनेमा निर्मिताच्या जगात हे काम कसं चालतं, याचा तपशील स्वतंत्र चौकटीत पाहा - नॉट ओके, प्लीज!)
- हॉर्न ओके प्लीजच्या सेटवर तनुश्री दत्ताच्या बाबतीतपण यापेक्षा वेगळं काही घडलं असेल असं वाटत नाही. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे करारात ठरल्यानुसार ते एक सोलो गाणं होतं. रिहर्सलपण त्याप्रमाणेच करवून घेण्यात आली. मात्र प्रत्यक्ष चित्रीकरणाच्या वेळी तनुश्री सोबत नाना पाटेकरपण नाचत होते. त्यांचं काम झाल्याच्या नंतरही सेटवर बसून तनुश्रीकडे बघत होते. त्यांना इकडे-तिकडे ओढून नाच शिकवण्याचा प्रयत्न करत होते. आपल्या कामाबद्दल कमालीचे उत्साही असलेल्या नाना पाटेकरांचं यात काही चुकलं असं अजिबात वाटलं नाही.
आधी ठरल्याप्रमाणे गोष्टी प्रत्यक्षात घडत नसलेल्या बघून कदाचित तनुश्री नाराज झाली असेल; पण नाना पाटेकरांनी तिच्या भोवती नाचायचं की नाही हा क्रि एटिव्ह कॉल घेण्याचा अंतिम अधिकार निर्माता/दिग्दर्शकाचा असतो. अशावेळी नाराजी व्यक्त करण्याखेरीज त्या कलाकाराच्या हातात काहीच उरत नाही.परंतु सहकलाकाराची नजर, सूचक बोलणं, नकोसा स्पर्श या गोष्टी तिच्या व्यक्तिगत सन्मानाशी निगडित असतात आणि त्या कोणत्याही कागदी कॉन्ट्रॅक्टच्या पलीकडच्यादेखील असतात. जर अशा कारणांनी एखादी महिला ‘कामाच्या ठिकाणी मला अनकम्फर्टेबल वाटतंय’ असं म्हणत असेल तर तसं म्हणण्याचा तिला पूर्ण अधिकार असलाच पाहिजे. कोणताही व्यावसायिक करार त्याच्या आड येऊ शकत नाही. भले एका कलाकाराची नियत स्वच्छ असेल; पण त्या कलाकाराशी संबंधित स्त्रीला जर त्यांचं वागणं, बोलणं, स्पर्श खटकत असेल तर तिला त्याविरुद्ध बोलण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्याक्षणी, दुस-या दिवशी, महिनाभराने किंवा अगदी दहा वर्षांनीसुद्धा..
तर, कलाकार आणि निर्मिती संस्था यांच्यात आधी ठरलेल्या गोष्टींमध्ये तफावत निर्माण झाली की असे वाद जन्म घेतात. पण मग या दोघांतील वादात राजकीय पक्ष कुठून येतो? महाराष्ट्रात (खरं तर फक्त मुंबईत) राजकीय पक्षांच्या चित्नपट शाखा आहेत. शिवसेना आणि मनसेच्या चित्नपट शाखा त्यातल्या त्यात जोरात आहेत. या शाखा चित्नपट निर्मितीच्या क्षेत्रात काम करणा-या लोकांच्या हक्कासाठी भांडण्याचं काम करतात. अगदी सेटिंग वर्करपासून निर्मात्यापर्यंत कोणीही दाद मागितली तर ही राजकीय मंडळी मदतीला (शब्दश:) धावून जातात. त्यांची मदत करण्याची पद्धत सर्वश्रुत आहे. आजकाल काही मराठी निर्माते, दिग्दर्शक, कलाकार आणि वर्कर्ससुद्धा या राजकीय पक्षांना अमराठी लोकांच्या विरु द्ध हत्यार म्हणून वापरू लागले आहेत. असोसिएशनमध्ये रीतसर दाद मागण्याआधी हे राजकीय सैनिक समोरच्याच्या अंगावर सोडून बघतात. आणि ब-याचदा त्याचा फायदा त्यांना मिळतो. ‘हॉर्न ओके प्लीज’ या सिनेमातील त्या गाण्यावर 2008 साली निर्मात्याचे दीड कोटी रु पये लागलेले होते. आणि अशात अभिनेत्री सेट सोडून गेली आणि शूटिंग बंद पडलं तर त्याचं प्रचंड नुकसान होणार होतं. तो धंदेवाईक माणूस अशावेळी त्या स्त्रीच्या मनाचा, स्वाभिमानाचा, मूलभूत अधिकारांचा विचार करण्याच्या मन:स्थितीत नसतो. त्याला जळणारा पैसा दिसत असतो. अशावेळी अनेक निर्माते राजकीय पक्षांची मदत घेतात. आपल्या माणसांसाठी राजकीय पक्षपण ही मदत तत्परतेने करतात. या राजकीय हस्तक्षेपाकडे मराठी लोक आधार म्हणून बघतात तर अमराठी लोकांना ती गुंडशाही वाटते. दोन्ही बाजू खर्या असू शकतात. फरक फक्त दृष्टिकोनाचा असतो. वरील विशिष्ट प्रकरणात नेमकं काय घडलं आपल्याला माहीत नाही. परंतु साधारणपणे अशा प्रकरणात काय घडतं याची सामान्य माणसाला कल्पना यावी म्हणून हा जर तरचा ताना-बाना.
2008 साली आपण या प्रकरणाला व्यावसायिक भांडण समजून विसरून गेलो होतो. पण 2018 साली त्याविषयाने पुन: डोकं वर काढल्यानंतर आपण ते विसरू शकलो नाही या मागचं महत्त्वाचं कारण म्हणजे आज प्रचंड ताकदवान झालेला सोशल मीडिया. या मुक्त माध्यमाने तनुर्शीचा आवाज करोडो लोकांपर्यंत पोहचवला. याच माध्यमाने टीळची चळवळ आपल्यापर्यंत पोहचवली. आपल्या समाजातल्या स्त्रियांच्या दुर्लक्षित आवाजाला वेगळं बळ दिलं. ‘कामाच्या ठिकाणी शारीरिक छळ भोगलेली मी एकटीच नाहीये, तर माझ्यासारख्या अनेकींना हा त्रास सहन करावा लागला आहे. आणि त्यात महिला म्हणून मला शरम वाटण्याचं काहीही कारण नसून उलट छळ करणा-यापुरुषाला अपराधी वाटलं पाहिजे’ - ही भावना स्त्रियांमध्ये रुजली.
अर्थात, #MeTooची चळवळ केवळ आपल्यापर्यंत पोहचली; पण आपल्यात रु जली नाही. ज्याप्रकारे आपण तनुश्री दत्ताच्या प्रकरणात समाज म्हणून प्रतिक्रि या दिली त्यावरून भविष्यातपण अंधारच दिसतो. हा तिचा पब्लिसिटी स्टण्ट आहे असं आपण म्हटलं. पण प्रसिद्धीच मिळवायची असती तर त्यावेळी ऐन करिअरच्या भरात परिस्थितीशी समझोता करत ते गाणं पूर्ण करून तिला जास्त चांगली प्रसिद्धी मिळवता आली नसती का? आणि कोणती स्त्री ट्रोल्सच मोहोळ आपल्या मागे लावून घेऊन आणि राजकीय पक्षांचा रोष ओढवून घेऊन प्रसिद्धी मिळवण्याच्या फंदात पडेल? खरं खोटं बाजूला ठेवा; पण एक व्यक्ती, त्यात महिला, आपल्यावर गुदरलेला प्रसंग सांगू पाहते आहे. तर आपण तिचं म्हणणं मोकळेपणाने ऐकूनपण घ्यायला तयार असू नये ?? उलट तिचा अपमान करायला आपण अहमहमिकेने उतरावं?
नाना पाटेकरांच्या वकिलांनी एका वाहिनीला प्रतिक्रिया देताना म्हटलं, ‘नाना ने ऐसा क्या किया? हाथ लगाया की कपडे में हाथ डाला?’ - सोपं असेल का एका स्त्रीसाठी याचं उत्तर देणं?
अर्थात, एका स्त्रीने आरोप केला म्हणून लगेच नाना पाटेकर या व्यक्तीचं पूर्वकर्तृत्व पुसून त्यांच्याकडे गुन्हेगार म्हणून पाहिलं जाऊ शकत नाही. तसं करणं अजिबातच उचित नाही. कायद्याच्या कक्षेत या घटनेची शहानिशा जरूर व्हावी. प्रश्न एवढाच आहे की आपला पुरुषप्रधान समाज स्त्रीचं म्हणणं किमान ऐकून घेण्याच्या तरी तयारीत आहे का?दुर्दैवाने तनुश्री दत्ता म्हणाली, ते खरंच तर आहे. #MeToo नावाची चळवळ समजून घेण्याचीसुद्धा आपल्या समाजाची लायकी नाही! महानायक बच्चनसाहेब, बीइंग ह्युमनचा प्रचार करणारा सलमान खान यांच्यापासून तर कुठेतरी खोपच्यात बसून काहीही माहिती नसताना पुरुषी अहंकारी वृत्तीने किंवा प्रादेशिक अस्मितेची बाजू घेत तिला शिवी देणा-या नेटक-यापर्यंत आपण सगळे दांभिक आहोत. एका स्त्नीला आपली बाजू मांडण्याचा अधिकारपण आपण बजावू देत नाही, ही अत्यंत शरमेची बाब आहे.
या सगळ्या गदारोळात एक हलका दिलासा मात्र जरूर आहे. पुरुषांनी पुरुष म्हणून नानांची बाजू घेतली, मराठी माणसाने आपला माणूस म्हणून त्यांची बाजू घेतली; पण मूठभर का होईना, काही लोकांनी चूक की बरोबरचा निवडा न करता एका स्त्रीची बाजू किमान ऐकून तरी घेतली. महिलांना कामाच्या ठिकाणी सुरक्षित वातावरण मिळालंच पाहिजे यासाठी हळूहळू का असेना, भारतीय स्त्रिया आवाज उठवत आहेत आणि काही संवेदनशील पुरुष त्यांना साथ देत आहेत. आज वेगळ्या अर्थाने #MeToo म्हणत प्रत्येक संवेदनशील व्यक्तीने त्या चळवळीत सामील झालं पाहिजे.(लेखक फिल्ममेकर, दिग्दर्शक आहेत.)
yogmh15@gmail.com