- गजानन दिवाण
दारूबंदीमुळे बायकांच्या डोक्याला
वाढलेला उच्छाद थांबावा,
व्यापा:यांचे भले व्हावे म्हणून
धूमधडाक्यात दारूचे दुकान
पुन्हा उघडणा:या गावाची गोष्ट..
दारूमुळे पिणारा स्वत: उद्ध्वस्त होतोच; सोबत कुटुंबासह गावालाही उद्ध्वस्त करत असतो.
म्हणून उभी बाटली आडवी करणारी अनेक गावे सापडतील; पण गावातल्या कुटुंबाच्या, व्यापा:यांच्या आणि स्वत: पिणा:यांच्या भल्यासाठी कुठल्या गावाने आडवी बाटली पुन्हा उभी केली तर?
लातूर जिल्ह्यातील हडोळती (ता. अहमदपूर) या गावात हे घडले आहे.
ग्रामसभेत महिलांनी तसा ठराव मंजूर केला आणि तब्बल 11 वर्षानंतर पुन्हा या गावात देशी दारूचे सरकारमान्य दुकान सुरू झाले.
चक्रावून टाकणा:या हडोळतीच्या यू-टर्नचे रहस्य शोधण्याचा एक प्रयत्न.
लातूर-मुखेड रस्त्यावर परिसरातील जवळपास 25 गावांची बाजारपेठ असलेले गाव : हडोळती. अहमदपूर हे तालुक्याचे ठिकाण 12 कि.मी.वर. शिरूर ताजबंद ही दुसरी बाजारपेठ नऊ कि.मी.वर आणि जांब ही तिसरी मोठी बाजारपेठ नऊ-दहा कि.मी. अंतरावर. शिरूरवरून अध्र्या-अध्र्या तासाला मुखेडला जाणारी एसटी महामंडळाची बस मिळते. शिवाय मुखेडला जाणा:या जलद गाडय़ांनाही येथे थांबा आहे. मोठीच वर्दळ.
या गावाने अकरा वर्षापूर्वी एकमताने केलेला दारूबंदीचा निर्णय (एकमताने) फिरवला आणि ग्रामसभेत रीतसर मतदान घेऊन ‘आडवी’ बाटली पुन्हा ‘उभी’ केली, अशी एक चतकोर बातमी एप्रिलच्या पहिल्या आठवडय़ात प्रसिद्ध झाली.
अकरा वर्षापासूनची दारूबंदी उठलेल्या हडोळतीमध्ये सरकारमान्य देशी दारूचे दुकान मोठय़ा उत्साहाने व धूमधडाक्यात सुरू झाल्याचाही उल्लेख त्या बातमीत होता.
अनेक शहरे आणि आता राज्येही दारूबंदीच्या मार्गाने जात असताना, मराठवाडय़ातल्या कोप:यात हे असले आक्रित कसे आणि का घडले? आणि एरवी ज्या बायका बाटली आडवी करायला पदर खोचतात, त्याच देशी दारू दुकानाच्या उद्घाटन समारंभात कशा?
- ते शोधायला भर रणरणत्या उन्हात हडोळतीला पोचलो.
वेळ सकाळचीच. बसस्थानकाजवळच मुख्य रस्त्यावर दोन्ही बाजूंनी दुकाने. हीच गावची बाजारपेठ. मुखेडच्या बाजूने थोडे पुढे गेल्यानंतर दोन हॉटेलांच्या मधोमध नवी कोरी पाटी लावलेले देशी दारूचे दुकान दिसले. बाजूलाच शुद्ध शाकाहारी उडपी हॉटेल. तिथेच चहा घेतला. दुसरा झाला, तिसरा झाला. दहा वाजून गेले तरी दुकानाचे शटर वर होईना.
बाजूच्या माणसाला विचारले तेव्हा कळले ‘आज ड्राय’ डे आहे. मग सुरू झाल्या भेटीगाठी. गप्पांच्या अड्डय़ात हळूहळू सगळी ‘स्टोरी’ उलगडत गेली.
दारूबंदीच्या पूर्वी या गावात दारूची दोन दुकाने होती. एक बसस्टँडवर आणि दुसरे ग्रामपंचायतीच्याच इमारतीत. बसमधून उतरताच या दुकानाचे दर्शन व्हायचे. मंगळवारी बाजारच्या दिवशी मुंगी जायलाही जागा मिळायची नाही. दोन-चार लोक दुकानातून झुलत बाहेर पडताना दिसायचे. कोणी रस्त्यावर लोळताना दिसायचे. बाईमाणूस पाहायचे नाही, शाळेच्या मुली पाहायच्या नाहीत, कुठेही लघुशंका करायचे, शिवीगाळ करायची. हे नेहमीचे चित्र झाले. त्यामुळे हे दुकान गावातच दुस:या ठिकाणी नेण्याची विनंती गावक:यांनी केली. दुकानदाराने पैशाच्या जोरावर दंडेलशाही सुरू केली.
गावक:यांना आधी दुकानाचे फक्त ठिकाण बदलायचे होते. दुकानदार दमबाजी करू लागल्याने गावकरीही इरेला पेटले. ग्रामपंचायतीच्या इमारतीत असलेल्या दुकानदाराने स्वत:च दुकान गुंडाळले. दुसरे दुकान घालविण्यासाठी जीआर मागविला. महिलांचे मतदान घेतले. रांगा लावून महिलांनी हक्क बजावला. 1629 विरुद्ध 118 अशा विक्रमी मतांनी बाटली आडवी झाली.
दारूविना गावक:यांचे दीडेक वर्ष चांगले गेले. गाव सुखाने नांदत होते. पुढे हळूहळू चित्र बदलू लागले. गोरगरीब पोरे चोरून बाटली-दोन बाटल्या विकू लागली. या पोरांवर दबाव आणून पुढे पुढारीच हा धंदा करू लागले. सरकारी दुकान बंद झाले म्हणून गावातली दारू मात्र थांबली नाही. उलट ती अधिक भावाने विकली जाऊ लागली. गाव चालविणारे स्वत: या धंद्यात उतरले. गावात दुधाच्या आधी दारूची गाडी येऊ लागली. दोन ओमनी गाडय़ा भल्या पहाटे गावात माल पुरवठा करू लागल्या. अमाप पैसा मिळू लागला. शेजारच्या घरावरचे पत्रे गेले आणि स्लॅब आला. मग त्या ईर्षेतून शेजारीही तोच धंदा करू लागला. एरवी घरात खायला महाग असलेले कित्येक महाभाग बंदीच्या काळात आठ-दहा लाखांचे धनी झाले.
शेतात मालाचा स्टॉक! फोन केला, की होम डिलिव्हरी! कोण रोखणार? 4क् रुपयांची बाटली 7क् रुपयांना. यामुळे अनेक जण झटपट श्रीमंत झाले. बसस्टँडवर काळ्या कोटात बाटल्या घेऊन मिशा न फुटलेली पोरे दारू विकताना दिसू लागली. घरोघरी बायकांनीही पैशाच्या मोहाने बाटल्या विकणो सुरू केले. एखाद्याचा मृत्यू, कुणाघरचे लग्नकार्य हा तर सुगीचा काळ. माणूस मेला म्हटले की बाटल्या खिशात घेऊन दोन-चार लोक घरासमोर थांबून राहायचे. शेजारी दारूविक्री वाढल्याने स्वत:च्या घरात राहणो कठीण झाले.
हडोळतीमध्ये जी भेटे ती बाई हेच सांगत होती. एका आजीबाईने तर हात धरून तिच्या शेजारचे एक घर दाखवले. घर कसले चांगला वाडाच तो. दारूतून मिळालेला सगळा पैसा!
बसस्टँडवर एक पडदा लावलेले दुकान होते. तिथे आम्लेट मिळायचे ते नावालाच. मुख्य विक्री दारूची! पाच-सहा वाजता हे दुकान सुरू व्हायचे. गावच्या दोन बाजूला दोन ढाबे. एक पोलीसपाटलाचा, दुसरा सरपंचाचा. जेवायला मिळायचेच, त्याआधी दारूही मिळायची. हवी तेवढी हवी तेव्हा. बाटली उभी होताच ऑम्लेटचे हे दुकान बंद झाले आहे.
गावातील एका विधवेचे नाव घेत एक जण म्हणाला, ‘आतार्पयत 43 बायकांचे कुंकू पुसले या दारूने. मुलाने दारूला पैसे दिले नाही म्हणून एका शेतक:याने शेतातली पहार घेऊन दारूचे दुकान गाठले. कोयता, कु:हाड, एवढेच काय जुने कपडेही चालायचे. पैसा नसला की घरातले-शेतातले, शेजारचे दिसेल ते साहित्य देऊन दारू मिळायची. त्यामुळे अशा भुरटय़ा चो:याही वाढल्या. या वस्तूंची किंमत तो दुकानदार कसा ठरवीत होता देव जाणो.?’
यासंदर्भात गावक:यांनी पोलिसांकडे अनेकवेळा तक्रार केली. त्यातलाच एकजण मुख्य रस्त्यावर भेटला. म्हणाला, ‘पोलिसांनी ही अवैध दारूविक्री बंद केली नाहीच. उलट तक्रारकत्र्यालाच त्रस देणो सुरू झाले. मुले शाळेत कमी आणि खिशात बाटल्या घेऊन बसस्टँडवरच दिसू लागली. दारू दुकान नसल्याने बाजार थंडावला अशी ओरडही सुरू झाली.’
दारूचे दुकान बंद झाल्यादिवशी गावातला ज्येष्ठ व्यापारी म्हणाला होता, बाटली आडवी केली ना, आता गाव रंडके होईल..! दारू दुकानाच्या समोर कपडय़ाच्या दुकानात ही आठवण निघाली. गल्ल्यावरले भाऊ सांगत होते, ‘खरेच गाव रंडके झाले. दारूच्या निमित्ताने पंचक्रोशीतले लोक हडोळतीमध्ये बाजाराला येत. जो येई तो भाजीपाला घ्यायचा. कपडेही घ्यायचा. सोबत दारूची बाटलीही घ्यायचा. तुमच्या-आमच्यासारखे चांगल्या कपडय़ातले लोकही साधी काडी आणायची म्हटली की हडोळतीला यायचे. कशाला?- थर्टी-सिक्सटी मारायला. दारूचे दुकान बंद झाल्याने या सर्वाचे येणो बंद झाले. शेजारच्या गावातले लोक जांबच्या बाजाराकडे वळले. कोणी शिरूरच्या बाजारात जाऊ लागले. भाजीपाल्यापासून हॉटेलवाल्यार्पयत सा:यांचाच धंदा बसला.’
याचा परिणाम असा झाला की अनेकांनी गावातले आपले दुकान दुस:या गावात हलविले. काहींनी व्यवसायच सोडून दिला. एक व्यापारी म्हणाला, ‘दारू बंद करणारे आमच्यातलेच चार-पाच लोक होते. त्यांनीच दारू विकायला सुरुवात केली. ते दोन-चार वर्षात चांगलेच गब्बर बनले. गावात चार-पाच आडतवाले होते. बंदीनंतर आडत मात्र नावालाही शिल्लक राहिली नाही.’
दारूचा सर्वाधिक त्रस महिलांना व्हायचा. बंदीनंतर तो आणखी वाढला. घरात रोजची हाणामारी. आणि जिकडेतिकडे दारूचा चोरटा सुळसुळाट झाल्याने सतत राडे. पुरुषांचे पिणो थांबले नाहीच, उलट खर्च वाढले आणि कटकटीही!
महिलांपासून पुरुषांर्पयत, भाजीपाल्यापासून ते कपडय़ाच्या दुकानदारांर्पयत, सामाजिक कार्यकत्र्यापासून ते राजकारण्यांर्पयत सर्वाना दारू मिळणा:या काळापेक्षा दारूबंदीचा काळ जड गेला. नुकसानीचा, भांडण-तंटय़ाचा गेला. - मग अशी दारूबंदी काय कामाची हा विचार पुढे आला. गावातल्या काही लोकांना तेच हवे होते. त्यांनी संधी साधली आणि गावातली प्यादी हलवली.
15 ऑगस्ट 2क्15 ला ग्रामसभा झाली. तिथे आलेल्या (आणवलेल्या) अनेकांना ही सभा दारूबंदीचा निर्णय मागे घेण्यासाठी आहे, हे माहितीही नव्हते म्हणो. शंभरेक महिला असतील. अचानक विषय घेऊन बाटली उभी करण्यासाठी हात वर करून मतदान घेण्यात आले.
या ग्रामसभेतही काही महिलांनी दारूबंदी उठवण्याला विरोध केला. विरोध करणा:या त्या बाईला शोधत तिच्या घरी गेलो. ती म्हणाली, ‘मी विरोध केला. ग्रामपंचायतीच्या पाच महिला सदस्यांनीही विरोध केला. पण बाकीच्या बायका मात्र दुकान पाहिजेच असा नारा देऊ लागल्या. या सभेचे नियोजन आधीपासून करण्यात आले असावे. प्रत्येक बाईला पैसे वाटले होते आणि काय बोलायचे हेही ठरवून झाले होते. जवळपास 15 लाख रुपये वाटले असावेत. दारूला विरोध करणा:या एकाही बाईला ही सभा ठाऊक नव्हती. ना कुठली दवंडी, ना माहिती. मी सभेला येऊ नये म्हणून निलंग्याच्या एका माणसाने पैसे देण्याचे आमिष दाखवले. तुम्ही फक्त ग्रामसभेला येऊ नका, असे तो म्हणाला. मी कसली ऐकते? स्टेजवर उभे राहून मी विरोध केला; पण कोणीही ऐकले नाही.’
दारूबंदीच्या काळातील दुष्परिणाम पाहिल्यानंतर आताचाच काळ बरा असे नाइलाजाने म्हणावे लागते, हे सांगायलाही ती विसरली नाही.
घराघरात चोरीछुपे चालणा:या 1क्क् दुकानांपेक्षा एक सरकारमान्य दुकान परवडले, ही तिची प्रतिक्रिया.
दारूत संसार उद्ध्वस्त झालेली एक बाई बोलण्याच्या ओघात म्हणाली, ‘बंदी असताना दारूच्या नावाने गावात दंडेलशाही होती, ती तरी आता कमी झाली. शेजार-पाजा:यांमधली भांडणो कमी झाली. बंदी होती तेव्हाही नवरा दारू पीतच होता. उलट, चोरीची घ्यायची म्हणून पैसे जास्त लागायचे. कधीकधी रोजी बुडवून दारू आणायला शेजारच्या गावात जायचा. म्हणजे दुप्पट फटका. आता निदान कमी पैशांत तो नशा करील.’
पोलिसांपासून पुढा:यांर्पयत प्रत्येकाला दारूबंदी हवीच असते, कारण या बंदीच्या काळातच त्यांचा धंदा जोरात चालत असतो, हे गुपित या गावातल्या बायकांना कळून चुकले. आता त्या म्हणतात, त्यापेक्षा हे सरकारमान्य दुकान परवडले. गेल्या 1 एप्रिलला म्हणजे शुक्रवारी दारू दुकान सुरू झाले. त्यानंतर आलेल्या मंगळवारी म्हणजे 5 तारखेला गावचा पहिलाच आठवडी बाजार झाला. हाऊसफुल्ल गेला की.. हे सांगताना एका व्यापा:याचा आनंद गगनात मावत नव्हता. सर्वाचा गल्ला दहा टक्क्यांनी वाढला, असे त्याने सांगितले. दारूच्या दुकानाच्या बाजूलाच एक दुकान सोडून किराणा मिळतो. तोही सध्या खूश आहे. बाजारच्या दिवशी पाच हजारांनी गल्ला वाढल्याचे तो सांगतो. आधी माशा मारत बसावे लागायचे. आता कोणाला बोलायलाही वेळ मिळत नाही, ही प्रतिक्रिया आहे भाजीपाला विकणा:याची. मला म्हणाला, ‘आता बोला, दारूची आडवी बाटली चांगली की उभी?’
जे झाले त्याची उद्विग्नता बाळगणारेही गावात अनेक आहेत. परिसरातले एक ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ सांगत होते, ‘या गावातले तरुण एकत्र नाहीत. जे बाहेर गेले तेच सुधारले. व्यापार वाढवायचा म्हणून दारू दुकान सुरू करणो हे योग्य नाही. नीतिमत्ता ठेवून गाव सुधारायचे की ते गहाण ठेवून? बंदीच्या काळात दारूविक्री होत असताना आडवे जाण्याची कोणी हिंमत दाखवली नाही. म्हणून गुंडगिरी वाढली. याला गावकरीच जबाबदार. लातूरला एक रुपयात मिळणारी वस्तू सव्वा रुपयाला विकावी. ते दोन रुपयांना विकतील तर गि:हाईक कसे येईल? लोक दुसरीकडेच जातील. दारूमुळे कुठे गाव वाढते काय? उलट ते बिघडतच जाते.’
- घडणो-बिघडण्याचे लोकमान्य चक्र हडोळतीने उलटे फिरवले आहे, हे तर खरेच!
आता पुढे काय घडते ते पाहायचे!
जे झाले ते बरे नाही!
हडोळतीत सत्तरीचे एक आजोबा भेटले. म्हणाले, जे झाले ते बरे नाही. चांगल्या माणसांनी राजकारण सोडले आणि गाव बिघडले. आमच्या काळात असे नव्हते. पिणारे प्यायचे; पण चोरून. प्रमाण खूप कमी होते. आमच्यासमोर तंबाखू मळण्याचीही कुणाची हिंमत नव्हती. आता डोळ्यासमोर दारू पितात. त्यांना काही सांगायलाही भीती वाटते. पंधरा वर्षापूर्वी एकच दुकान होते. त्याच्या आधी तर दुकान-बिकान काहीच नव्हते. आधी दोन-चार लोक हातभट्टीची दारू विकायचे. आता खुलेआम सुरू आहे. आधी दारू पिणा:यांची संख्या बोटावर मोजण्याइतकी असायची. आता न पिणारे बोटावर मोजण्याइतके सापडणार नाहीत. आता धोके वाढत जाणार. नुकसान वाढणार. ते कधीच भरून निघणार नाही..
सत्तरची एक,
ऐंशीच्या दोन बाटल्या!
अकरा वर्षापूर्वी दारूबंदीसाठी पुढाकार घेणारे या नव्या बदलाने अस्वस्थ आहेत.
त्यातले एक म्हणतात, या गावात खूप प्रयोग केले आहेत आम्ही. गावातले किमान 1क्क् युवक बाबा आमटेंसोबत राहून आले आहेत. कमीत कमी दीडशे लोकांनी राळेगणसिद्धी, पोपटरावांचे हिवरे बाजार ही गावे पाहिली. अहमदपूर तालुक्यातला पहिला बचतगट याच गावात सुरू झाला. या गटामार्फत पापडनिर्मिती व्हायची. मागणी एवढी होती की आम्ही कमी पडायचो. पण पुढे हे टिकले नाही.
गाव बदलत गेले. गाव बदमाश नाही. ढोंगीही नाही. अज्ञानी आहे.
आमच्याच आचार-विचारात तफावत वाढत गेली.
15 ऑगस्टला शंभर-दोनशे रुपये मिळाले म्हणून ज्यांनी हात वर केला, त्या अज्ञानी बायकांना तरी कसा दोष देणार? त्यांना वाटले असेल, आपल्या नव:याला 7क् रुपयांत मिळणारी बाटली आता 4क् ला मिळेल आणि 3क् रुपये संसाराला मिळतील. या मायमाउलीला हे माहीत नव्हते की दारूचे दुकान आले की नवरा एका बाटलीवरून दोन बाटल्यांवर जाईल..
आम्ही हे दारूचे दुकानसुद्धा बंद करून दाखवू; पण आता सारी लढाई पुन्हा नव्याने लढावी लागेल.’
वैताग दारूचा नव्हे, गुंडागर्दीचा!
गावात दारू दुकान राहू नये हे 1क्क् टक्के खरे; पण एक सरकारमान्य दुकान बंद केल्याने नवे बेकायदेशीर 1क्क् दुकानदार तयार झाले, हे एक लाख टक्के खरे, ही एका प्रतिष्ठित नागरिकाची प्रतिक्रिया. दारू दुकान सुरू व्हावे असे म्हणणारा समाज दारूचे समर्थन करतो आहे असे नाही, तर बंदीच्या काळात भरपूर पैसा कमावून त्याच्या जोरावर वाढलेल्या गुंडागर्दीला तो वैतागला आहे. ते बंद करण्यासाठी म्हणून मान्यताप्राप्त दुकान सुरू व्हायला हवे, या विचाराचे ते आहेत.
(लेखक मराठवाडा आवृत्तीत उप वृत्तसंपादक आहेत)