- सचिन जवळकोटे
कोण, कुठेही असू द्या.. दिवाळीच्या सणाला प्रत्येक जण आपापल्या घरी परततोच.पण सणावाराचा आनंद आपल्या कुटुंबीयांसोबत वाटून घेण्याचं सुख लष्करी जवान आणि त्यांच्या घरच्यांना कुठे?सीमेवर असलेल्या तणावामुळेआणि २४ तास जागता पहारा द्यावा लागत असल्याने यंदा दिवाळीभेट आणखीच मुश्कील झालीय.दिवाळीत अंगण पणत्यांनीउजळलेलं असलं,जवानांची निष्पाप लेकरं फटाक्यांचा आनंदलुटत असली, तरी घरातल्या बायकांचं लक्ष मात्र टीव्हीवरच्या गोळीबाराकडे आणि‘दिवाळीनंतर नक्की येतो’ या मेसेजकडे..दिवाळीच्या तोंडावर घरासमोरचं अंगण पणत्यांनी उजळून निघालेलं. वेगवेगळ्या रंगांची सुरेख रांगोळी रेखाटताना घरातली सून संगीता मोबाइलवर बोलण्यातच गुंतलेली. खरंतर इतरवेळी तिच्या सासूला हे आवडलं नसतं.. पण आजचा दिवस वेगळा होता. संगीताच्या एका डोळ्यात सणाच्या आनंदाची पणती तेजाळूून निघाली होती, तर दुसऱ्या डोळ्यात पतीच्या काळजीनं काजळीही झाकोळून गेली होती; कारण प्रसंग तसा बाकाच होता.संगीताचा पती नीलेश लष्करात जवान. यंदाच्या वर्षी त्याची पोस्टिंग कुपवाड्यातली. त्यामुळे ‘उरी’ हल्ल्यापासून घरात साऱ्यांचीच अस्वस्थता वाढलेली. एकीकडे लेकरे अंगणात फटाके उडवण्याचा आनंद लुटत असताना, दुसरीकडे टीव्हीवर गोळ्यांचा आवाज ऐकताच मोठ्यांच्या काळजात धस्सऽऽ व्हायचं. लाडू वळता वळता सुनीताचा हात गप्पऽऽकन थबकायचा. चॅनेलवाल्यांच्या ‘ब्रेकिंग’मधून काही विचित्र तरी ऐकायला मिळणार नाही ना, या जाणिवेनं तिचा श्वास आतल्या आत अडकायचा. भरल्या घरातही खूप गलबलून यायचं. मात्र, छोटं लेकरू कुशीत येऊन बिलगलं की मळभ दूर पळून जायचं. ‘दिवाळीनंतर मी नक्की येतो,’ हा नवऱ्याचा ‘मेसेज’ आठवून प्रतीक्षेतली हुरहुर वाढायची. सणाचा आनंद लुटण्यासाठी हुरूपही यायचा.अंगापूरच्या संगीता कणसे सांगत होत्या, ‘‘यंदा आमच्या लग्नाला आठ वर्षे पूर्ण झाली. आजपावेतो ते एकदाच दिवाळीला आलेले. त्यांच्याविनाच आमचा प्रत्येक सण साजरा झालेला. गावात सुटीला आलेल्या इतर जवानांबरोबर मग मी त्यांना फराळाचा डबा पाठवायचे. मुलांच्या वाढदिवसालाही ते क्वचितच गावी आलेले. आता तर त्यांच्याशिवाय सण साजरा करायची सवय झाली असली तरीही रोज सकाळी उगाचच वाटतं.. ते अचानक दारात येऊन उभे राहतील अन् आम्हाला सरप्राईज देतील.’’ संगीतासारख्या शेकडो सुवासिनी आजही आपल्या घराच्या उंबरठ्यावर उभ्या राहून लष्करातल्या पतीची प्रतीक्षा करताहेत. शेजारच्या घरातली ‘संपूर्ण फॅमिली’ दिवाळी साजरी करण्यात व्यस्त असताना, ‘आपणच एकटे का?’ असा दुखरा प्रश्न काहीजणींच्या नजरेसमोर फेर धरून नाचतोय. मात्र, लष्करातल्या सुटीची सिस्टिम ज्यांना-ज्यांना माहीत, त्या मात्र मळभ-बिळभ बाजूला ठेवून दिलखुलासपणे दिव्यांच्या लखलखाटात रमल्यात.लष्करासाठीही यंदाची गोष्ट थोडीशी वेगळी. जम्मू-काश्मीरमधला संवेदनशील भाग गेल्या दोन-अडीच महिन्यांपासून अत्यंत धगधगता राहिल्यानं इथल्या पोस्टिंगवरच्या बहुतांश जवानांची सुटी पुढे ढकलली गेलीय. विशेष म्हणजे, ‘दिवाळीत आपल्याला सुटी मिळणारही नाही,’ याची मानसिक तयारीही तिथल्या जवानांनी यापूर्वीच केलीय, कारण.. ..नेमकं भारतीय सणाच्या वेळीच बॉर्डरवर मुद्दामहून खोडसाळपणा करण्याची पाकिस्तानची विकृती साऱ्यांनाच ठाऊक झालीय.अनेक वर्षे कुपवाड्यात ड्यूटी बजावल्यानंतर आता गांधीनगरला पोस्टिंग झालेले विकास माहिती देत होते, ‘‘चौकीबाग, तंगधार, मच्छल, पूंछ अन् बांदीपुरा सेक्टरमध्ये काम करणाऱ्या सैनिकांसाठी प्रत्येक दिवस संघर्षाचा असतो. सलग अनेक दिवस बाजारपेठा बंद असल्यानं ताजी भाजी मिळणंही मुश्कील. मग आहे त्या जुन्या रेशनवरच पोट भरायचं. अशावेळी मग शिळा का होईना दिवाळीचा फराळ घराकडून येतो, तेव्हा स्वर्गसुखाचा भास होतो. वरची बुरशी कशीबशी बाजूला काढून आम्ही डबा चाटून-पुसून संपवितो.’’विकासला यंदा प्रथमच दिवाळीला सुटी मिळालीय. पाहिजे त्यावेळी सुटी मिळणं म्हणजे जवानांसाठी जणू ‘लॉटरी फुटणं’च असतं. वर्षातून साठ दिवस अॅन्युअल अन् वीस दिवस कॅज्युअल सुटी मिळते. किमान तीनवेळा वेगवेगळ्या टप्प्यात ही सुटी घेता येते. शीख, जाट अन् राजपूत जवानांना ‘बैसाखी’लाच सुटी हवी असते, तर मराठी जवानांचा ओढा गणपतीच्या सणाला अन् गावच्या यात्रांसाठी जास्त. दिवाळीत सुटी मागूनही मिळत नाही, हे माहीत असल्यानं असे वेगवेगळे पर्याय शोधण्यावर अनेकांचा भर.लष्करातून निवृत्त झालेले भागवत यांचा अनुभव तर खूपच वेगळा होता. ‘‘मी सतरा वर्षांच्या ड्यूटीत फक्त दोनवेळा दिवाळी घरात साजरी केली. बाकी पंधरा वर्षे बॉर्डरवरच. त्यात पुन्हा अकस्मात युद्धाची परिस्थिती निर्माण झाली की वरून रिकॉल सुटायचा. मग सुटी अर्धवट टाकून तत्काळ पळावं लागायचं. त्यामुळं सुटी काढून गावी आल्यानंतर घरात पहिलं पाऊल ठेवताना दुसरं पाऊल परत जायच्या तयारीतच असतं.’’लष्कराचे सुटीचे नियमही अत्यंत कडक. एकदम शिस्तीचे. ज्या दिवशी सुटी संपणार, त्या दिवशीच ड्यूटीवर जॉइन झालंच पाहिजे नाहीतर ‘पिटू परेड’ची शिक्षा ठरलेलीच. म्हणजे खांद्यावर पंचवीस किलो वाळूचं पोतं घेऊन रोज चार तास पळायचं. बापरेऽऽ बाप.. अन् ही शिक्षाही तब्बल सात ते अठ्ठावीस दिवसांपर्यंत ठरलेली. त्यात भर म्हणून एक महिन्याचा पगारही कट.मात्र, सुटी संपवून ड्यूटीवर परतताना प्रवासात रेल्वेचा अपघात झाला किंवा दुसऱ्या काही तांत्रिक कारणानं खोळंबा झाला तर संबंधित रेल्वे स्टेशन मास्तरकडून लेखी पत्र घ्यावं लागतं. गावी असताना आजारी पडल्यावर उपचार मिलिटरी हॉस्पिटलमध्येच घ्यावा लागतो. तिथल्या डॉक्टरांनी दिलेलं सर्टिफिकेटच सादर करावं लागतं. देशात सर्वात मोठी मिलिटरी हॉस्पिटल्स तीनच. दिल्ली, कोलकाता अन् पुणे. सुटीत घरी परतणाऱ्या जवानाच्या पाठीवरची ‘बॅग’ म्हणजे एक भलंमोठं प्रश्नचिन्हच. याला लष्करी भाषेत ‘रुकसुक’ म्हणतात. तब्बल पस्तीस किलोचं सामान यात बसतं. गावी येताना महिनाभराच्या सामानासोबतच काश्मीरमधले सफरचंद, अक्रोड, बदाम याच ‘रुकसुक’मध्ये पहुडलेले. सोबतीला कधी-कधी आग्य्राचा पेठाही. परत जाताना मात्र आपल्या सहकाऱ्यांसाठी आठवणीनं ‘सातारी कंदी पेढे’.सध्या टीव्ही चॅनेल्सवर रोज एकतरी बातमी काश्मीरमधल्या धुमश्चक्रीची आहेच. त्यामुळे ज्या-ज्या घरातील कर्ता पुरुष काश्मीर पट्ट्यात ड्यूटीवर, त्या-त्या हॉलमध्ये बातम्यांच्या हेडलाइन्सवर प्रत्येकाचं बारीक लक्ष. एकवेळ अंगणातल्या दिवाळी फटाक्याचा मोठा आवाज कानावर पडणार नाही; पण टीव्हीवरच्या गोळीबाराचा छोटासा आवाजही लक्ष विचलित करणारा ठरतोय.कौसल्याबार्इंचा एकुलता एक लाडका मुलगा सुनील. तो दोन वर्षांपूर्वी लष्करात दाखल झालेला. तोंडाला पदर लावून कौसल्याबाई सांगत होत्या, ‘‘सहा म्हैन्यापास्नं माजा सुनील बॉर्डरवरच हाय. त्याचा आजारी बा इथं हांथरुणाला टेकलाय. परवा दिशी त्याचा फ्वॉन आला हुता तवा सांगितलं बी हाय त्याला संमदं, पन सुटी न्हाय मिळणार म्हंतुया त्यो. तवा म्या म्हनलं त्याला, तू बी जादा टेनशन घिवू नगंस. म्या घ्येते तुज्या बाची काळजी. फकस्त तू ये लवकर. आवंदा लगीनबी उरकू तुजं.. म्हंजी म्हातारा-म्हातारीची सोयबी हुईल रोजच्या खाण्या-पिण्याची.’’कौसल्याबार्इंच्या बोलण्यात एकीकडं आजारी नवऱ्याबद्दल चिंता होती, तर दुसरीकडं कर्तृत्ववान लेकाबद्दल कौतुकही होतं. अशा हजारो कौसल्याबाई आज याक्षणी लष्करातल्या जवान मुलाची वाट पाहत साजरी करताहेत आपल्या घरात दिवाळी. लखलखत्या पणत्यांनी.. ..मिणमिणत्या पापण्यांनी!पंधरा दिवसांतून एकदा दीड मिनिटाचा आवाज..काश्मीरच्या अनेक खोऱ्यांमध्ये मोबाइल रेंजचा प्रॉब्लेम. त्यामुळं मिलिटरीच्या लँडलाइनवरून घरच्यांसोबत साडेतीन मिनिटं बोलण्याची संधी, पण तीही पंधरा दिवसांतून एकदा. फोन लावण्यात अर्धा मिनिट. हॅलोऽऽ हॅलोऽऽ चा आवाज नीट ऐकू येण्यात एक-दीड मिनिट. शेवटच्या मिनिटभरात पत्नीचा किंवा आईचा आवाज ऐकला की कान तृप्त. ड्यूटी बजवायला हुरूप. जगण्या-मरण्याच्या संघर्षाला तोंड द्यायला पुन्हा चेव.नो चॅटिंग.. ओन्ली टॉकिंग !ऐन सणात फॅमिलीपासून दूर राहणाऱ्या जवानांसाठी आजकाल मोबाइलची सेवा अत्यंत लाभदायी ठरलीय. पूर्वीच्या काळी फक्त पत्र पाठवून खुशाली कळविली जायची. त्यात खूप वेळ जायचा. दसऱ्यासाठी पाठविलेल्या शुभेच्छा तुलसी-विवाहाला पोहोचायच्या. आता मात्र एका कॉलवर थेट घराशी संपर्क; परंतु देशाच्या सुरक्षेसाठी काश्मीर खोऱ्यातील जवानांसाठी ‘स्मार्टफोन’ला पूर्णपणे बंदी. त्यामुळं चॅटिंग-बिटिंग नाहीच. ड्यूटी संपल्यावर फक्त साधा फोन वापरता येत असला तरीही कॉल करण्यात कैक प्रॉब्लेम. प्रीपेड मोबाइल सेवा बंद असल्यानं महागडा पोस्टपेड प्लॅन घेण्याशिवाय पर्याय नाही. त्यात पुन्हा अनेक भागात रेंजच्या नावानं ठणाणाऽऽ. चार दिवस यायला.. चार दिवस जायला !वीस-पंचवीस दिवसांची सुटी घेऊन गावी परतणाऱ्या जवानांचे सात-आठ दिवस नुसते प्रवासातच जातात. काश्मीरच्या बर्फाळ प्रदेशात ड्यूटी बजावणाऱ्या सैनिकाला चेतक हेलिकॉप्टरमधून कुपवाडामार्गेे श्रीनगरला यावं लागतं. तिथून मिलिटरी विमानानं दिल्ली. मग तिथून रेल्वेनं मजल-दरमजल करत आपापल्या गावी. चार दिवस यायला. चार दिवस जायला. मग बाकीचे मिळतील तेवढे क्षण प्रियजनांसोबत गुजगोष्टी करण्याचं ठरवून घरात.. परंतु शेतीची, इस्टेटीची अन् बँक व्यवहाराची कामं करण्यातच निम्मी सुटी वाया.