-राजा माने
छोट्या-छोट्या समारंभांनाही ‘इव्हेंट मॅनेजमेंट’ची जोड देण्याचा आजचा जमाना आहे. कार्यक्रम हिट करायचा तर चांगली इव्हेंट मॅनेजमेंट हवीच, अशी एक सार्वजनिक धारणा झालेली आहे. पण कुठलेही प्रशिक्षण अथवा विशेष मोहीम न राबविता शेकडो वर्षांपासून एक इव्हेंट दरवर्षी लाखोंच्या साक्षीने यशस्वी होतो.. तो म्हणजे पंढरीची आषाढी वारी ! या इव्हेंटचे खरे मॅनेजर कोण? या प्रश्नाकडे कधी गांभीर्याने पाहिले गेले नाही.. महाराष्ट्र शासन आणि शासकीय कर्मचारीदेखील या इव्हेंटचे भाग असले तरी हा इव्हेंट यशस्वी करणारे मात्र वारकरीच ! पंढरपूरची आषाढी यात्रा हा विषय उभ्या महाराष्ट्राला नवा नाही. युगेन्युगे पंढरीत 12 लाखांहून अधिक वारकरी दाखल होतात. काहींना विठुरायांचे थेट दर्शन होते, काही दुरूनच मुखदर्शन घेतात, बरेच जण नामदेव पायरी आणि विठुरायाच्या मंदिर कलशाचे दर्शन झाले तरी कृतकृत्य झालो, या भावनेने आनंदित होऊन गावाची वाट धरतात. निमंत्रण पत्रिका नाही, राहण्या-खाण्याच्या सोयींची हमी देणारा कुठलाही संयोजक नाही, कुठल्याही वाहनाची निवड अथवा वाहनाचा हट्टही नाही! - वारकरी सांप्रदाय आणि विठुरायाची भक्ती याच श्रद्धाधाग्याने बांधल्या गेलेल्या या इव्हेंटची मुहूर्तमेढ 1685 साली तुकाराम महाराजांचे चिरंजीव नारायण महाराज यांनी रोवली. तेव्हापासूनच जगद्गुरू तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माउलींच्या पादुका पालख्यांचा सोहळा सुरू झाला. विठ्ठलावरील र्शद्धा आणि वारकरी संप्रदायाने त्या सोहळ्यात सहभागी होणा-या दिंड्यांची संख्या वाढत गेली. वर्षभर नेटाने व प्रामाणिकपणे आपल्या सांसारिक जबाबदार्या पार पाडाव्यात व आषाढीसाठी दरवर्षी पायी पंढरीची वाट धरावी, हा संस्कार अनेक पिढय़ांवर रुजला. या संस्काराला केवळ महाराष्ट्राच्या सीमा राहिल्या नाहीत तर हा संस्कार कर्नाटक, आंध्र प्रदेशसह देशभरातील अनेक भागांवर झाला. दरवर्षी ज्ञानेश्वर आणि तुकोबांच्या दोन प्रमुख पालख्यांबरोबरच नऊ मानाच्या पालख्या आषाढीच्या सोहळ्यासाठी लाखो वारक-याच्या दिंड्यांसह पंढरीत दाखल होतात.
पालख्या आणि दिंड्यांची स्वयंशिस्त हा अभ्यासाचा विषय ठरावा. दिंडी प्रवासात होणा-या माउलींच्या आरत्या, विसावा, नैवेद्यापासून ते झेंडेकरी, तुळसधारी महिला, वीणेकरी, टाळकरी, मृदंग व पखवाजवादक, चोपदार या प्रत्येकाच्या भूमिका ठरलेल्या असतात. स्वयंपाकाच्या साहित्यापासून ते मुक्काम सरल्यानंतर तेथे राहिलेल्या प्रत्येक वस्तूचे व्यवस्थापन ठरलेले असते.संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे उदाहरण घेऊ या.. दरवर्षी कार्तिकी एकादशीला आळंदीत दिंडीकर्यांसोबत आषाढी सोहळ्यासंदर्भात बैठक होते. या बैठकीत मानकरी, सेवेकरी, रथ आणि अगदी 21 दिवसांच्या दिंडी व्यवस्थापनाचे क्षणा-क्षणांचे नियोजन ठरते. या पालखीच्या पुढे 27 व मागे 300हून अधिक दिंड्या सहभागी झालेल्या असतात. गुरु हैबतबाबांचे वंशज, र्शीमंत शितोळे सरकार, वासकर महाराज, लिंबराज महाराज, आळंदीकर यांचा या नियोजनात सक्रिय सहभाग राहतो. राज्यभरातून निघणा-या शेकडोदिंड्यांचे नियोजनही असेच ठरते. गावेच्या गावे दिंडीच्या स्वागतासाठी आणि आदरातिथ्यासाठी उत्स्फूर्तपणे सज्ज राहतात.स्वयंशिस्तीने आणि वारकर्यांच्या र्शद्धेने पार पडणार्या या सोहळ्याला नवे आयाम देण्याचे र्शेय 1832 सालापासून डोक्यावर माउलींच्या पादुका घेऊन वारीचा प्रारंभ करणारे गुरु हैबतरावबाबा आरफळकर यांच्याकडे जाते.शतकानुशतके लोटली. काळाबरोबर पंढरीत दाखल होणा-या वारक-याची संख्या लाखोंनी वाढली. पण आजही सोहळ्यातील विधी, परंपरा, पद्धती आणि व्यवस्थापन शैली तीच आहे.. गर्दी असली तरी बंदोबस्ताला महत्त्व नाही. समारंभ असला तरी सूचनांचा भडिमार करण्याची गरज नाही. ज्याचे त्याचे काम जो तो करीत राहतो. इव्हेंट मॅनेजमेंटच्या ‘टार्गेट’च्या युगात इथे प्रत्येकाचे एकच टार्गेट असते ते म्हणजे विठुरायाची भक्ती आणि दर्शनच.. म्हणूनच तर लाखो मॅनेजमेंट गुरु वारकरीच हा इव्हेंट स्वत:च्या खांद्यावर घेऊन यशस्वी करतात.. त्या मॅनेजमेंट गुरुंचीच ही खरी आषाढी वारी!
या वारीला आता ‘व्यवस्थे’चेही भक्कम पाठबळ मिळू लागले आहे. स्वयंशिस्तीने पंढरीत दाखल होणा-या वारक-यापुढे निवास, स्वच्छ पाणी, स्वच्छतागृहे आणि दर्शन मार्गावरील चांगले रस्ते याच बाबी महत्त्वाच्या असतात. देवस्थान म्हणून असणारे पंढरपूर शहराचे महत्त्व, मंदिर आणि चंद्रभागा नदीवर असणारी सर्वांची श्रद्धा अशा अनेक मुद्दय़ांचा विचार करून आषाढीकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन तत्कालीन जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी प्रथम दिला. आषाढी यात्रेचे नियोजन व व्यवस्थापन एकाच छताखाली झाले पाहिजे ही भूमिका घेत आपत्ती व्यवस्थापनाच्या 2005च्या अधिनियमाचा आधार घेत जिल्ह्यातील सर्वच यंत्रणांची त्यांनी मोट बांधली. एका छताखालील व्यवस्थापनात कमांडर, इन्सिडेन्ट कमांडर, डेप्युटी कमांडर अशी पदे निर्माण केली. त्यातूनच ‘घटना प्रतिसाद प्रणाली’ तयार झाली. त्याच प्रणालीचा भाग म्हणून आषाढी यात्रा व्यवस्थापनासाठी 21 प्रतिसाद व मदत केंद्रांची निर्मिती झाली. त्या प्रत्येक केंद्रात नियोजन विभाग, कार्यकारी विभाग, दळणवळण, पुरवठा, संपर्क, गुप्तवार्ता, सुरक्षा आणि प्रशासन असे विभाग पाडण्यात आले. त्या सर्व विभागांचे समन्वय आणि संवाद राखणारी अत्याधुनिक डिजिटल यंत्रणा तयार करण्यात आली.वारक-याच्या निवासाचा प्रश्न सोडवण्यासाठी मुंढे यांनी 65 एकरांवर एक तळ निर्माण केला. दोन लाख वारक-याना सामावून घेणारा तो तळ आहे. पुढे तो पायंडा मुंढेंनंतर जिल्हाधिकारी रणजितकुमार यांनी अबाधित राखला. आता विद्यमान जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, आषाढीचे समन्वयक डॉ. राजेंद्र भारुड यांनी त्यात भर घालून सुविधांबरोबरच प्रबोधनाचा संदेश उभ्या महाराष्ट्राला देण्याचे माध्यम म्हणून या सोहळ्याकडे पाहावे, असा प्रय} चालविलेला दिसतो. चंद्रभागा स्वच्छ ठेवून लाखो वारक-याचे स्नान सार्थकी लावण्याचा प्रय} प्रशासनाबरोबरच राज्यभरातून आलेल्या पाचशेहून अधिक स्वयंसेवी संस्था करीत आहेत. हजारो शासकीय कर्मचारी आषाढी वारी पार पाडण्यासाठी कष्ट उपसत असले तरी आषाढीचा हा इव्हेंट युगेन्युगे इव्हेंट महागुरु विठुरायाच्या भक्तिरंगात दंग झालेला वारकरीच यशस्वी करतो हे मात्र नक्की..!
पारंपरिक ‘वारी’ला ‘व्यवस्थे’चे भक्कम बळ* पालखी मार्गाच्या मुक्कामी गावांमध्ये 700 मोबाइल टॉयलेट, 12 कलापथके, 1500 स्वच्छतादूत, पिण्याच्या पाण्यासाठी 1210 विहिरी, 885 हातपंप, 221 विद्युतपंप * रस्ते, पालखी मुक्काम स्थळ सुविधा इत्यादींसाठी पालखी मार्गावरील 63 ग्रामपंचायतींना जिल्हा परिषदेतर्फे एक कोटी 13 लाख 50 हजार रुपयांचा निधी * आषाढीसाठी पंढरपुरात दाखल होणा-या 12 लाख वारकर्यांसाठी 65 एकरांवर सुसज्ज तळ.* 2300 सार्वजनिक शौचालये. त्याशिवाय पंढरपुरातील ज्या रहिवाशांनी आपल्या निवासातील शौचालये उपलब्ध केली आहेत, अशा घरांवर पांढरे झेंडे.* दर्शन रांगेतील वारक-याच्या सोयीसाठी तब्बल 8 कि.मी. रस्त्यावर मॅटिंग.* जिल्हा आणि बाहेरून येणारे पोलीस अधिकारी, कर्मचारी, होमगार्ड्स. एसआरपी, कमांडोजसह स्वयंसेवी संस्थांच्या कार्यकर्त्यांची तब्बल 10 हजार लोकांची टीम.
(लेखक लोकमतच्या सोलापूर आवृत्तीचे संपादक आहेत.)
raja.mane@lokmat.com