- डॉ. अभय बंगतीन प्रश्नांवर मी तुमचं मत घेणार आहे. तीन कसोटीचे प्रसंग. त्यांची मनोमन कल्पना करा. क्षणभर समजा की तुम्ही खरोखरच त्या प्रसंगात आहात.पर्वतीय प्रदेशातील विमानतळावर विमान उभे आहे. तुम्ही विमानात येऊन बसला आहात. सीटचे पट्टे बांधलेत. थोडे काळजीत आहात कारण बाहेर हवामान वादळी आहे. हे उड्डाण कठीण व धोक्याचं आहे. वैमानिक विमानाच्या पायºया चढतो आहे.तो दारू प्यालेला व नशेत असलेला तुम्हाला चालेल का?तुम्ही गंभीर आजारी आहात. आॅपरेशन शिवाय गत्यंतर नाही. तुम्हाला आॅपरेशन टेबलवर झोपवलंय. पोट उघडं करून त्यावर हिरव्या रंगाचे निर्जंतुक कपडे टाकलेले. तुम्ही जीव मुठीत घेऊन सर्जनची वाट बघत आहात. आॅपरेशन थिएटरमधे गंभीर शांतता. सर्जन आलेत. हातात चाकू घेऊन त्यांनी तो तुमच्या पोटावर टेकवला.सर्जन या क्षणी दारू प्यालेला असावा का?तुमची महत्त्वाची केस कोर्टात आहे. प्रश्न अख्ख्या आयुष्याचा आहे. केस तशी कठीणच आहे. सर्व पुरावे मांडले गेले आहेत. दोन्ही बाजूंच्या वकिलांनी आपापले तर्क, पुरावे, वक्तृत्व व भावुकता पणाला लावलेली. सर्व ऐकून आज न्यायाधीश आपला अंतिम निकाल देणार आहेत. निर्दोषी की फाशी?अशा क्षणी न्यायाधीश दारूच्या नशेत असावे काय? तीही एका पक्षाकडून फुकट घेतलेली दारू?या प्रसंगांशी मिळताजुळता क्षण आपल्या सर्वांवर मतदानाच्या दिवशी येतो. येणार आहे. शासन व राजकीय नेत्यांच्या चांगल्या-वाईट कामगिरीवर रोजच आपली मतं आपण मनात किंवा खाजगीत व्यक्त करत असतो. आता मात्र मतदानाचा दिवस आला आहे. गेली ३६५ दिवस ७ ५ वर्षे हेलकावे खाणारं आपलं मन पक्क करून पुढची पाच वर्षे देशाची दिशा काय असावी या विषयी आपला निर्णय विवेकबुद्धीनुसार एका मताद्वारे प्रकट करायचा आहे. निर्णय कठीण आहे. प्रसंग बाका आहे. आज आपण त्या विमानातले प्रवासीही आहोत आणि वैमानिकही. रुग्णही आहोत आणि सर्जनही. आरोपीही आहोत आणि न्यायाधीशही.या क्षणी आपली बुद्धी, निर्णयक्षमता कशा स्थितीत असावी? दारूच्या नशेत? तोल गेला, चूक झाली तर?मद्यग्रस्त लोकशाहीआणि तरीही आपली लोकशाही मद्यग्रस्त आहे. मतदानाच्या दिवशी दारूचा पूर येतो. उघडपणे मुक्त हस्ताने दारू वाटली जाते. दारू पाजून, मतदाराचा ‘फ्री चॉईस’, मतदान स्वातंत्र्य जणू हिरावून घेतले जाते. का?अगोदरच बहुतेक राज्यातली सरकारे ही दारूवरील कराच्या पैशावर अवलंबित आहेत. (तीन वर्षांपूर्वी महाराष्ट्र शासनाला दारूपासून वार्षिक कर-उत्पन्न २२ हजार कोटी रुपये होतं.)दुसरं, अनेक राजकीय पक्ष व त्यांचे स्थानिक उमेदवार हे दारूवाल्यांच्या देणग्यांवर अवलंबून आहेत. विजय मल्ल्या व चढ्ढासारखे अनेक स्थानिक दारूसम्राट स्वत:च उमेदवार किंवा त्यांचे बोलविते धनी झाले आहेत. लोकसभेच्या निवडणुकीतील कोणकोणते उमेदवार किंवा त्यांचे फायनान्सर दारू व्यवसायाशी संबंधित आहेत यादी करून बघा. उद्या लोकसभेत-विधानसभेत बसून हीच मंडळी दारूसंबंधी कायदे बनवणार आहेत.पण तरीही मतदाराने स्वत:च्या बुद्धीने मतदान केल्यास काय? जणू या भीतीने अनेक जागी निवडणुकीतले उमेदवार व त्यांचे प्रचारक, समर्थक मतदानापूर्वी ४८ तास मुक्तपणे दारू वाटून पुरुष मतदारांना उपकृत व मद्यधुंद करतात. आणि त्या अवस्थेत हा वैमानिक, सर्जन, न्यायाधीश मतदान करतो.परिणाम स्पष्ट आहे. तो आपण पुढील पाच वर्ष मुकाट्याने भोगतो.पण आम्ही काय करू शकतो?आपण गडचिरोली जिल्ह्याला भेट देऊ.महाराष्ट्राच्या सर्वात पूर्वेला असलेला हा वनबहुल जिल्हा, १५०० गावांचा व ३८ टक्के आदिवासी लोकसंख्येचा आहे. मोहाची दारू व ताडी हे इथल्या पुरु षांमध्ये विशेष प्रिय व प्रचलित. म्हणून सहा वर्षे व्यापक ‘दारूमुक्ती आंदोलन’ करून इथे शासनाकडून दारूबंदी करवून घेतली. पुढे दारू व तंबाखू दोन्ही व्यसनं कमी करायला २०१६ पासून आम्ही ‘मुक्तिपथ’ नावाचे जिल्हाव्यापी अभियान सुरू केले आहे. जिल्ह्यातल्या ६०० गावांनी गावातली बेकायदेशीर दारूविक्र ी पूर्णपणे बंद केली आहे. अजून ५०० गावांनी दारूविक्र ी बंद करण्यासाठी सामूहिक प्रस्ताव केले आहेत. १२०० गावांतील ‘मुक्तिपथ गाव संघटना’ आणि स्रिया आपापल्या गावांना, पुरुषांना दारूमुक्त ठेवण्यासाठी धडपडत आहेत. आणि तितक्यात ही निवडणूक आली ! निवडणूक म्हणजे दारू पिणाºयांसाठी व मत विकत घेणाºयांंसाठी संधी. पण मग गडचिरोलीच्या, गावांच्या दारूमुक्तीचं काय होणार? दारूबंदीचं जिवापाड जतन करणाºया बायांचं काय होणार? लोकशाहीचं काय होणार?दारूमुक्त निवडणूकया तिन्ही प्रश्नांचं एकत्रित उत्तर ‘मुक्तिपथ’ अभियानाने दिलं आहे - दारूमुक्ती निवडणूक. जिल्ह्यातील जनतेला आमचं आवाहन असं -1) मतदारांनी संकल्प करावा - दारूसाठी मत विकणार नाही.2) गावाने संकल्प करावा - गावात दारू वाटणाºयाला मत देणार नाही.3) स्रियांनी संकल्प करावा - जो माझ्या नवºयाला दारू पाजेल, त्या उमेदवाराला नक्कीच पाडू !आवाहन वर्तमानपत्रातून, गावोगावी पोस्टर द्वारा व तालुका जिल्ह्याच्या शहरात फलकांद्वारे जाहीर झाले. मीडियालाही अगदीच अभिनव मागणी वाटली. तत्काळ व्हायरल झाली. शेकडो गावांनी असा संकल्प केला. वर्तमानपत्रात रोज बातम्या यायला लागल्या. जिल्हा प्रशासनाने अतिशय सकारात्मक प्रतिसाद दिला. निवडणुकीच्या मार्गदर्शक सूचनांचा भाग म्हणून प्रशासन व पोलिसांनी वाहनांची तपासणी, बेकायदेशीर दारूची जप्ती, दारू व्यावसायिकांना तडीपार करणे सुरू केले. पण शेवटचे अस्र बाकी होते.मतदानाच्या दहा दिवस आधी सर्व म्हणजे पाचही उमेदवारांना आम्ही आवाहन केले ‘दारूमुक्त निवडणूक लढवण्याचा संकल्प जाहीर करा’. आणि गडचिरोलीत चमत्कार घडला. पाचही उमेदवारांनी श्री. अशोक नेते (भाजप), डॉ. नामदेव उसेंडी (काँग्रेस), डॉ. रमेश गजबे (वंचित बहुजन आघाडी), श्री. देवराव नन्नावरे (आंबेडकर राइट पार्टी आॅफ इंडिया), श्री. हरिश्चंद्र मंगाम (बहुजन समाज पक्ष) यांनी या अभियानाचे समर्थन करत तसा लिखित संकल्प पाठवला.‘दारूमुक्त निवडणूक’ या आवाहनात एक ‘विन-विन’ स्थिती निर्माण होते. लोकशाही शुद्ध होते, गावांची दारूमुक्ती शाबूत राहते, बायांचे नवरे सुरक्षित राहतात, उमेदवारांचा खर्च वाचतो व प्रशासनाचेही काम सोपे होते.गडचिरोलीत हे अभियान लोकमान्य होत आहे.महाराष्ट्रात अन्यत्र काय?तुमच्या क्षेत्रात काय?तुमच्या गावात काय? मोहल्ल्यात काय?पण सर्वात महत्त्वाचा प्रश्न तुम्ही काय करणार?
तुम्ही काय करू शकता?1. ‘दारू पिऊन मत देणार नाही’ - स्वत: निश्चय करा.2. आपल्या पाच मित्रांना, शेजाºयांंना असा संकल्प करायला प्रेरित करा.3. सोशल मीडियावर हे आवाहन करा.4. आपल्या आॅफिसमध्ये, संघटनेत, कंपनीत किंवा मोहल्ल्यात सभा घेऊन किंवा लिखित संकल्पपत्र फिरवून सामूहिकरीत्या सह्या घ्या.5. सामूहिक संकल्प सोशल मीडियावर जाहीर करा.6. आपल्या क्षेत्रातील उमेदवारांना पत्र लिहून दारूमुक्तनिवडणुकीचे आवाहन करा.7. वर्तमानपत्रात जाहीर आवाहन करा.8. निवडणुकीआधी दारू वाटप करताना आढळल्यास निवडणूक अधिकाºयांंना कळवा.(लेखक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते वगडचिरोली जिल्ह्यात ‘सर्च’ आणि ‘मुक्तिपथ’चे संस्थापक आहेत.)
search.gad@gmail.com