- डॉ. व्यंकटराव घोरपडे
गवा जंगलात होता. नंतर तो शेतात येत होता, मग गावात आला आणि शेवटी पुण्यासारख्या मोठ्या शहरातदेखील अधून मधून येऊ लागला. खरंतर त्याचं येणं जाणं,दिसणं, हल्ला करणं, आपण त्याच्याभोवती गर्दी करणं, आरडाओरडा करून हुसकावणं हे सर्व नित्यनियमाचं होऊन गेलंय. तसंच दोन चार दिवसाआड वृत्तपत्रातदेखील तो सहज जागा मिळवू लागला आहे.
खरंतर गवा हा जंगली प्राणी, खूर असणाऱ्या प्राण्यातील महाकाय वजनदार प्राणी, साधारण सातशे ते एक हजार किलोपर्यंत त्याचे वजन असू शकते. हा रवंथ करणारा प्राणी मुख्यत्वे सकाळी, पहाटे किंवा अगदी उशिरा सायंकाळी चरायला बाहेर पडतो. दुपारी उन्हात तो निवांत दाट झाडीत रवंथ करत बसतो. मोकळ्या कुरणातील गवत, झाडपाला, कोवळ्या फांद्या विशेषतः कोवळे बांबू हे त्याच्या आवडीचे खाद्य. नेहमी कळपाने राहणारा हा प्राणी ३० ते ५० च्या संख्येत एकत्र असतो. पूर्ण वयात आलेला नर हा स्वतंत्र राहतो. या कळपाचे नेतृत्व मादी गावा करत असते. गवे मुळातच तृणभक्षी असून दिवसभर कार्यरत असणारा हा दिवाचर प्राणी आहे. साधारणपणे पंचवीस ते तीस वर्षे त्याचं आयुष्यमान असतं. अत्यंत मोठं डोकं, स्नायुयुक्त शरीर आणि बाजूला वळलेली भरीव शिंगे असं त्याचं रूप असतं. मादी गव्यात मात्र शिंगे थोडी आखूड असतात. एकूणच त्यांचा आकार आणि अत्यंत संवेदनशील असणारे घ्राणेंद्रिय हीच त्यांची बलस्थाने आहेत. नर आणि मादी दोघांमध्ये शिंगे असतात. विशेषतः गवा अत्यंत लाजाळू प्राणी आहे. दोन ते तीन वर्षात वयात येऊन तो पुनरुत्पादनासाठी सक्षम होतो. सक्षम झाल्यानंतर मादी गव्याच्या आकर्षणाने खूप दूरपर्यंत सहज मोठा प्रवास करू शकतो. त्याच बरोबर २७० ते २८० दिवस हा गव्याचा गर्भारकाळ आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी अभयारण्य हे मूळ अधिवास असलेला हा प्राणी भीमाशंकर, पानशेतसह कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा, कागल, राधानगरी, भुदरगड तालुक्यात नियमित दर्शन देत असतो. गव्यांना खरं तर मीठ, खारट माती, खडक चाटायला आवडते. जंगलात ज्या ठिकाणी खारट जमिनी, खडक आहेत त्या परिसरात त्याचा वावर असतो. रासायनिक खते वापरून खारफुटी वाढल्यामुळे देखील या गाव्याचा वावर शेतात वाढू लागला आहे. त्याचबरोबर मांसभक्षक प्राणी, वाघ आणि बिबट्या यांची संख्या कमी झाल्यानेदेखील गाव्यांची संख्या वाढून ते आपल्या अधिवासाच्या बाहेर येत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यासह महाराष्ट्रात महाबळेश्वर, पंढरपूर, सांगली, ठाणे (घाटघर जलविद्युत प्रकल्पाजवळ) गवे आल्याच्या नोंदी आहेत. काही दिवसांपूर्वीच महाबळेश्वर येथील एका हॉटेल चालकाचा गव्याला पाव खायला घालत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. सुरुवातीला दुरून खायला टाकत टाकत नंतर तो स्वतः भरवू लागला आणि त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. मानवनिर्मित खाद्य वन्य प्राण्यांना भरवणे हा गुन्हा आहे. पण एकूणच मानवापासून त्याचं अंतर कमी होऊ लागलं आहे हे मात्र निश्चित.
या सगळ्या पार्श्वभूमीवर आता आपल्याला बहुतेक या वन्य प्राण्यासह रहावे लागेल की काय अशी शंका वाटते. हत्ती, गवे, बिबटे मानवी वस्तीत येणे आता नवीन राहिले नाही. सर्व नागरिकांचे योग्य प्रबोधन, शालेय अभ्यासक्रमात त्यांच्याविषयी एकूणच माहिती देणे अत्यंत आवश्यक ठरणार आहे. अन्यथा अशा प्राण्यांच्या सहवासात आल्यानंतर होणारे अपघात, जीवित हानी वाढेल आणि त्यातून उभा संघर्ष पेटला तर आपलाच विजय होऊन हे प्राणी आपल्यातून कायमचे निघून जाण्याची भीती आहे. अलीकडे अशा प्राण्यांच्या गावातील, शहरातील प्रवेशानंतर त्यांच्या पाठीमागे होणारी गर्दी, पाठलाग हे सर्व याबाबत अज्ञानाचे निदर्शक आहेत. अशा गर्दीमुळे, पाठलाग केल्यामुळे हरीण, गवे यासारखे प्राणी त्यांचे असे धावणे, पळणे, घाबरणे यामुळे त्यांच्या स्नायूंमध्ये मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होतो. जास्त धावल्याने रक्तस्राव वाढून 'कॅप्चर मायोपॅथी' मुळे ती दगावतात. पुष्कळ वेळा असे तणावग्रस्त प्राणी पशुवैद्यकाच्या मदतीने बेशुद्ध करणे व त्याच्यावर ताबा मिळवणे अवघड बनते. त्यांना योग्य मात्रेत भुलीचे औषध देऊनदेखील ते बेशुद्ध होत नाहीत. पण जास्तीच्या तणावामुळे व कॅप्चर मायोपॅतीमुळे मरण पावले तर तो दोष पशुवैद्यकाच्या माथी मारला जातो.
एकूणच अशा वेळी गव्यांचे शास्त्रोक्त पद्धतीने संवर्धन करावे लागेल. त्यांच्यासाठी गवताळ कुरणे, त्यांच्या आवडीचे वृक्ष व मोठ्या प्रमाणात चाटण विटांची सोय करावी लागेल. सन २००१ मध्ये पुण्यात यशस्वीरित्या गव्याचा बचाव करण्यात आला होता. रेस्क्यु केलेल्या डॉ.अमोल खेडगीकर यांच्या मते गव्यासारख्या प्राण्यांच्या बाबतीत त्यांना पकडणे किंवा त्यांची जादा धावपळ न करता, भूल दिल्यानंतर त्यांना शांत ठेवून, शांत वातावरणात तणाव पातळी कमी करणे अत्यंत आवश्यक आहे.
त्यासाठी स्वतंत्र असे बचाव पथक पशुवैद्यकाच्या मार्गदर्शनाखाली हवे. अशावेळी त्यांना पूर्ण अधिकार प्रदान करून त्यांच्या मदतीला पोलीस खाते व वनखाते देऊन यशस्वीरीत्या त्यांना वनात सोडता येईल किंवा योग्य मार्ग तयार करून जंगलात पाठवता येईल. डॉ. खेडगीकर अमेरिकेत टेक्सास येथे असुन त्यांची स्वतःची रेस्क्यू टीम आहे. अमेरिकेचा राष्ट्रीय प्राणी गवा (बायसन) असल्याने त्याचे शास्त्रोक्त संवर्धन केल्यामुळे त्यांची संख्या वाढली आहे. पण तिथेही त्यांचा मानवाबरोबर संघर्ष सुरू आहे.
एकूणच या सर्व बाबीसाठी लोकांच्या प्रबोधनासह सर्व पशुवैद्यकाना नियमित वन्य पाण्यासंबंधी प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. अशा प्रसंगी जास्तीचे अधिकार देऊन दिनांक १० फेब्रुवारी २०२१ च्या शासन निर्णयानुसार वन्य प्राण्यांबाबत पशुवैद्यकांच्या जबाबदाऱ्या व कर्तव्ये निश्चित करण्याबरोबर वनखात्यात पशुवैद्यकांची संख्या वाढवणे अत्यंत आवश्यक आहे.
(सेवानिवृत्त सहायक आयुक्त पशुसंवर्धन, सांगली)