भीष्मराज बाम
प्रश्न :- शिक्षक विचारतात, ‘‘विद्यार्थ्यांना कशांतच रस नसतो. त्यांना नुसते चकाट्या पिटत बसायला आवडते. त्यांचे अभ्यासात लक्ष लागावे, यासाठी काय करावे?’’
दोष आपल्या शिक्षण पद्धतीचा आहे. परीक्षार्थी जास्त आहेत आणि विद्यार्थी फार कमी. पालकही मुलांचा दृष्टीकोन ‘चांगले गुण मिळवून भरपूर पगाराची नोकरी मिळवणे म्हणजे शिक्षण’ असा करुन देतात. मुलांच्या आयुष्यातील सर्व महत्त्वाची वर्षें अशा शिक्षणात आणि मग पैसे मिळवण्यात वाया जातात. या भानडीत जगणे बाजूलाच पडते, चुकीची मूल्ये रुजवली जातात. हे विद्यार्थी जेव्हा पालक किंवा शिक्षक होतात, तेव्हा त्यांना पुढल्या पिढीला काय आणि कसे शिकवावे, याचा प्रश्न पडला तर नवल वाटण्याचे कारण नाही.
ज्ञानसंपादन हा शिक्षणाचा मूळ उद्देशही आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये जवळ-जवळ दुर्लक्षिला जातो. ज्याच्याजवळ जास्त पदव्या आणि प्रमाणपत्रे असतील तो विद्वान, असे समजले जाते. ‘अथा तो ज्ञानजिज्ञासा’ हे सूत्रच हरवून गेले आहे. अर्थ जिज्ञासा तेवढी उरली आहे. अर्थात हा अर्थ शब्दांना अंत:करणात उमटणार्या ‘भावा’कडे न नेता ‘बाजार भावा’कडे नेणारा आहे. ज्ञान मिळवून ते स्वत:च्या जीवनात मुरवणे आणि त्याच्या साह्याने आपल्या समाजाचे भले साधणे हे जर होणार नसेल, तर ते ज्ञान देणारे पालक आणि शिक्षक, ते घेणारे विद्यार्थी हे सारेच स्वत:चीसुद्धा फसवणुक करीत असतात. या खटाटोपातूनच ग्राहकाला चकवण्यात टाकून भलतेच काहीतरी त्याच्या गळ्यात बांधणारे अर्थशास्त्र निर्माण झाले आहे.
शिक्षकांसोबत मी पालकांचाही मुद्दाम उल्लेख करीत आहे. वयाने मोठी होणारी पिढी तुमच्याकडे आदर्श म्हणून पाहत असते. ‘आपले पालक फार ग्रेट आहेत’ या समजापासून ते ‘त्यांना फारसे काही कळत नाही.’.. इथपर्यंत मुलांचा प्रवास व्हायला काही वर्षें जावी लागतात. शिक्षकांच्या बाबतीत हा भ्रमनिरास फार लवकर होऊ शकतो. याचे कारण, आपण आपली विद्यार्थी दशा संपवून टाकण्याच्या घाईत असतो. ज्ञानसंपादनाची ओढ कधीच संपू द्यायची नसते. शिक्षक हा आपल्या विद्यार्थ्यांच्या काही इयत्ता पुढे असलेला विद्यार्थीच असायला हवा. विद्यार्थ्यांसोबत शिकायला मिळत असते, हे शिक्षकांचे भाग्य, तर काही काळ तरी मुल होऊन बालपण जगायला मिळते, हे झाले पालकांचे भाग्य!
मुलांची मानसिकता समजून घेणे, फारसे अवघड जाऊ नये. कारण, आपण ही त्या अवस्थेत जगलेले असतोच की! आपण जे अनुभव घेतलेले असतात, ते आठवणे सोपे असते. उपनिषदांत सामाची व्रेते दिलेली आहेत. त्यामध्ये आपणचं हे सारे आहोत, अशी कल्पना करणे हेही एक व्रत आहे. दुसर्याच्या भूमिकेत जाऊन विचार करता येणे साधायला लागले, तर विनाकारण मनाचा प्रक्षोभ होणे टाळता येते. मग मनाचे संतुलन राहाते. ज्या भूमिकेत आपण जगलेला आहोत, त्या भूमिकेत परत जाणे केव्हाही सोपे.
वाढत्या वयात मुलांसमोर पालक आणि शिक्षक हे आदर्श म्हणून असतात. आता आदर्श दोन प्रकारचे असतात. सकारात्मक आणि नकारात्मक. आपण यांच्यासारखे व्हावे, असे वाटणे आणि यांच्यासारखे मुळीच होऊ नये असे वाटणे. मुलांच्या मनात काय आहे ते ओळखता येणे, हीच तर खरी मेख आहे. शिकायचे काय आणि कसे याबरोबरच जगायचे कसे आणि कशाकरता ते पुढल्या पिढीला जर शिकवता आले, तर ते खरे शिक्षण!
ज्ञानसंपादनाचे रोपटे पुढल्या पिढीच्या मनात रोवून तेच जोपासत जायचे असते. मुळात ते जर आपल्या मनात रोवले गेलेले नसले, तर ते बीज आणणार कोठून? जे ज्ञानाचे क्षेत्र आपण निवडले असेल, त्याची जी शाखा निवडलेली असेल, त्याबद्दलचे कुतुहल, जिज्ञासा आपण सतत वागवत राहायचे असते. आत्तापर्यंत जे सापडले ते तर पुस्तकांतून दिलेले असते. त्यातून पुढे जाण्याची नवेनवे शिकत राहाण्याची ओढ आपल्या मनात सतत जागी असायला हवी. जुन्या चोखाळलेल्या वाटा आपल्याला माहीत असायला हव्यातच; पण जे अज्ञात असे, क्षितिजापलीकडून आपल्याला खुणावत असते, त्याची ओढ आपल्याला सतत जागी ठेवता यायला हवी आणि यासाठी तुम्ही शिक्षण क्षेत्रांत असलात, तर बरोबर येणारे संगीसाथी तुम्हाला सापडू शकतात. तुम्हाला असलेली ज्ञानाची आणि ते अनुभवण्याची गोडी तुम्हाला त्यांच्यामध्ये निर्माण करता येते.
हे सारे करण्यासाठी सर्वस्वी अनुकूल अशी परिस्थिती कधीच नसते. प्रतिकूल व्यक्ती, यंत्रणा, अपुरी साधने असा सारा काटेरी प्रदेश समोर असतो. त्यातून मार्ग काढण्यासाठी लागणारा उत्साह आणि जिद्द आपल्याला धैर्याने स्वत:मध्ये निर्माण करता यायला हवी. आपण इतरांना ज्ञानसंपादित करायला प्रेरित करणार असू, तर आपण निराश आणि निरुत्साही असून कसे चालेल. आपण आपल्या आदर्शाकडे वाटचाल करण्याचे धैर्य आणि उत्साह स्वत:मध्ये निर्माण करू शकलो नाही, तर ते इतरांमध्ये कसे निर्माण करणार?
आपल्या वाट्याला काटे आले आणि पुढेही येतील; म्हणून चीडचीड करीत, कुढत बसून राहिले, तर आपण इतरांना प्रेरणा कशी देणार? काटेकुटे साफ करीत मागून येणार्यांचा मार्ग निष्कंटक करायचा असतो. त्यांच्या वाट्याला काटे न येता फुलेच यावीत, असाच प्रयत्न करीत राहायचे. मग पुढली पिढी आपल्या जवळ यायला आसुसलेली असते. त्यांचा उत्साह आपल्यालासुद्धा प्रेरित करीत राहातो. मग काट्यांची बोच नाहीशी होऊन फक्त आनंद उरतो. यासाठी पुढल्या पिढीच्या प्रेमातच पडावे लागते.
(लेखक ज्येष्ठ क्रीडाप्रशिक्षक व सामाजिक घडामोडींचे अभ्यासक आहेत.)