- डॉ. यश वेलणकरमानवी मेंदूमध्ये अब्जावधी मेंदुपेशी म्हणजे न्युरोन्स असतात. एक मेंदुपेशी तिच्या असंख्य शाखांच्या माध्यमातून दुसऱ्या मेंदुपेशींशी जोडलेली असते. या पेशीमधून विद्युतधारा वाहत असते. गंमत म्हणजे ही धारा सलग नसते. सलग धारा काही अंतरावर क्षीण होऊ शकते, तसे होऊ नये म्हणून दोन मेंदुपेशींच्या मधे सूक्ष्म फट असते. या मधल्या जागेत मेंदू रसायने असतात. ते मागील पेशीतील संदेश पुढील पेशीपर्यंत नेतात. पुन्हा पुढील पेशी त्या संदेशानुसार विद्युतधारा तयार करते. अशा प्रकारे सर्व शरीरात संदेशवहन होते. आपण दृश्य पाहतो, आवाज ऐकतो, स्पर्श अनुभवतो, वास व चव घेतो ती सर्व या विद्युतधारा आणि मेंदू रसायने यांची करामत असते. आपल्या मनातील विचार आणि भावना हादेखील यांचाच खेळ असतो. आपले मन म्हणजे मेंदूतला हा केमिकल लोच्या आणि मेंदूच्या पेशीतील विद्युतधारा यांचा परिणाम असतो.आपल्या मेंदूतील या विद्युतधारा तपासता येतात, त्यांची वेव लेंग्थ आणि फ्रिक्वेन्सी मोजता येते, त्यांचा आलेख काढता येतो. या आलेखालाच इलेक्ट्रो एनसेफालोग्राफ (ईईजी) म्हणतात. या आलेखावरून मेंदूतील लहरींचे पाच प्रकार असतात. असे लक्षात येते हे प्रकार त्यांच्या फ्रिक्वेन्सीवरून केले जातात.सर्वात संथ डेल्टा लहरी, त्यांचे प्रमाण आपण गाढ झोपलेलो असतो त्यावेळी जास्त असते. त्यांची फ्रिक्वेन्सी ० ते ४ हर्टझ असते. नवजात बालकांमध्ये यांचे प्रमाण सर्वात जास्त असते, वय वाढते तसे ते कमी कमी होत जाते. अशा लहरी असलेली झोप माणसाला ताजेतवाने करते. या लहरींचे प्रमाण कमी असेल तर त्या माणसाला शांत झोप लागत नसते, त्याच्या मेंदूला खरी विश्रांतीच मिळत नाही. मात्र यांचे प्रमाण खूपच जास्त असेल तर ते मतिमंदत्वाचे लक्षण असू शकते. मेंदूला इजा झाली असली तरीदेखील यांचे प्रमाण वाढते.डेल्टापेक्षा गतिमान लहरी म्हणजे थिटा. त्यांची फ्रिक्वेन्सी ४ ते ८ हर्टझ असते. या लहरीदेखील झोपेच्या काळात अधिक असतात. जागृतावस्थेत या लहरी अधिक असतात. त्यावेळी अंतर्प्रेरणा किंवा आभास होण्याची शक्यता जास्त असते. संमोहित अवस्थेतदेखील या लहरी जास्त असतात. या लहरींच्या काळात नवीन कल्पना सुचू शकतात; पण यांचे प्रमाण जास्त असेल तर औदासीन्य, नैराश्य वाढू शकते.यापेक्षा अधिक गतिमान लहरी या ८ ते १२ हर्टझच्या असतात. त्यांना अल्फा लहरी म्हणतात. जागे असताना आपण डोळे मिटून शांत बसतो त्यावेळी यांचे प्रमाण वाढते; पण मनात चिंता असतील, तणाव असेल तर यांचे प्रमाण कमी असते. यापेक्षा वेगवान लहरी बीटा. त्यांची फ्रिक्वेन्सी १२ ते ४० हर्टझ असते. या जागृतावस्थेत सर्वाधिक प्रमाणात असतात. आपण तर्क, विचार करीत असतो त्यावेळी यांचे प्रमाण वाढते. चहा, कॉफीसारखे उत्तेजक पेय या लहरींचे प्रमाण वाढवते. पण या लहरी सतत अधिक प्रमाणात असतील तर ते तणावाचे लक्षण असते.मेंदूत सतत बीटा लहरी असणे चांगले लक्षण नाही; या अवस्थेला अल्फा ब्लोकिंग असे म्हणतात. म्हणजे सतत मोठ्या प्रमाणात असणाºया बीटा लहरी, अल्फा लहरींना निर्माण होऊ देत नाहीत, त्यांना ब्लॉक करतात.ध्यानामुळे हे अल्फा ब्लोकिंग कमी होते असे काही संशोधनात आढळले आहे. मंत्रचळ, चिंता रोग असणाºया माणसाच्या मेंदूत सतत बीटा लहरीच राहातात, अल्फा लहरी निर्माण होत नाहीत. या उलट दारू प्याल्यानंतर अल्फा लहरींचे प्रमाण वाढलेले आढळते. कारण त्यावेळी मेंदूतील विचार करणारी केंद्रे बधिर झालेली असतात. माणूस डोळे मिटून शांत बसतो आणि रिलॅक्स होतो त्यावेळीही मेंदूत अल्फा लहरी वाढलेल्या असतात.अल्फा लहरी असताना माणूस शांतता स्थितीत असतो. पण या लहरींचे प्रमाण सतत जास्त असेल तर मात्र तो माणूस फार बौद्धिक कामे करू शकत नाही. त्याला एकाग्रता साधत नाही. म्हणजेच माणूस तन-मनाने शांतता स्थितीत असतो त्यावेळी अल्फा लहरी अधिक प्रमाणात असतात; पण तो सतत शांतता स्थितीतच राहात असेल तर तेदेखील स्वास्थ्याचे लक्षण नाही. याचा अर्थ तो प्रगतीसाठी आवश्यक असलेला चांगला तणावही घेत नाही असा होतो.ध्यानाचा सर्वाधिक आश्चर्यकारक परिणाम मेंदूतील ग्यामा लहरींवर दिसून येतो. डिजिटल ईईजीचा शोध लागेपर्यंत ग्यामा लहरी माणसाला माहीत नव्हत्या. जुन्या ईईजी तपासणीत २५ ते ५ पेक्षा अधिक वेगवान लहरी नोंदवता येत नसत. आधुनिक यंत्रांमुळे त्यांची नोंद शक्य झाली आहे. या लहरी मेंदूच्या थलामास या भागात उत्पन्न होतात आणि सर्व मेंदूत पसरतात. मतिमंद आणि गतिमंद मुलांमध्ये या लहरी कमी प्रमाणात असतात. या लहरी ज्याच्या मेंदूत अधिक असतील तो हुशार आणि आनंदी असतो. सर्जक कलाकार, खेळाडू उत्तम कामगिरी करत असतात त्यावेळी त्यांच्या मेंदूत अशा लहरी असतात. अशा लहरी असतात त्यावेळी त्या माणसाची संवेदनशीलता आणि स्मरणशक्ती वाढलेली असते. असे अनेक मेंदू संशोधकांचे मत आहे. १९८८ मध्ये फ्रान्सिस क्र ीक यांनी प्रथम अशा प्रकारच्या लहरींचा सिद्धांत मांडला. एखादे मनोवेधक दृश्य पाहात असताना मेंदूच्या सर्व भागात अशा वेगाने वाहणाºया लहरी त्यांना आढळल्या.सजगता आणि एकाग्रता यांचा मेळ साधला जातो त्यावेळी अशा लहरी निर्माण होतात असे मत आंद्रेस एंजल यांनी मांडले. गंमत म्हणजे या लहरी आपण नैसर्गिकरीत्या पण प्रयत्नपूर्वक निर्माण करू शकतो असे शास्त्रज्ञ म्हणू लागले आहेत. त्यासाठी त्यांनी करुणा ध्यान करणाºया योगींचे संशोधन केले आहे. २००४ मध्ये अनेक वर्षं ध्यान साधना करणाºया आठ तिबेटी योगींवरती संशोधन केले. अनेक वर्षं करु णा ध्यान करणाºया योगींच्या मेंदूत जेवढ्या ग्यामा लहरी आढळल्या तेवढ्या लहरी कधीच कोणत्याही निरोगी माणसांमध्ये आढळलेल्या नव्हत्या. नव्याने करु णा ध्यान करू लागलेल्या स्वयंसेवकांच्या मेंदूतील या लहरींचे प्रमाण अधिक सरावानंतर वाढते असेही लक्षात आले.माइण्डफुलनेस थेरपीमध्ये मेंदूचे व्यायाम म्हणून सजगता ध्यानाचे काही प्रकार करून घेतले जातात. मानसिक अस्वस्थता असेल त्यावेळी मेंदूत बीटा लहरी सतत असतात. ध्यानाचा परिणाम म्हणून काहीकाळ अल्फा लहरी निर्माण झाल्या तर त्या व्यक्तीला मानसिक शांती अनुभवता येते. त्यामुळे तो मेंदूचे व्यायाम करायला प्रवृत्त होतो. हेच व्यायाम नियमित स्वरूपात केले की आनंदाची अनुभूती देणाºया ग्यामा लहरी निर्माण होऊ शकतात. म्हणजेच माइण्डफुलनेस हे केवळ मानसिक त्रास असेल तरच उपयुक्त आहे असे नसून काहीही त्रास नसताना आंतरिक आनंदाचा अनुभवदेखील सजगतेच्या नियमित अभ्यासाने मिळू लागतो.तुम्ही किती ‘लहरी’ आहात?अमुक माणूस कसा आहे, हे आपण त्याच्या वागणुकीवरून ठरवत असतो. पण माणसाचे व्यक्तिमत्त्व ठरते ते त्याच्या मेंदूत असलेल्या पाच प्रकारच्या लहरींवरून.१. डेल्टा लहरी - या लहरी माणसाला फ्रेश ठेवतात. ज्या व्यक्तींमध्ये या लहरींचे प्रमाण कमी असते, त्यांच्यात अस्वस्थता दिसून येते.२. थिटा लहरी- या लहरी जेव्हा मेंदूतसुरू असतात, त्या काळात ती व्यक्तीकल्पनेच्या भराºया घेते. नवनव्या कल्पनात्यांच्या डोक्यात येतात, पण या लहरींचे प्रमाण वाढले, तर ती व्यक्ती नैराश्याच्या गर्तेतही जाऊ शकते.३. अल्फा लहरी - या लहरी व्यक्तीला शांतचित्त ठेवतात; पण त्यांचे प्रमाण वाढले तर तो बौद्धिकदृष्ट्या अस्थिर होतो.४. बीटा लहरी - ज्यावेळी आपण विचारात असतो, त्यावेळी या लहरीही जास्त प्रमाणात असतात. उत्तेजक पेयांमुळे या लहरींचे प्रमाण वाढते.५. ग्यामा लहरी- हुशार लोक, कलावंत, उत्तम खेळाडूंत या लहरींचे प्रमाण जास्त असते. या लहरी ज्याच्या मेंदूत अधिक असतील तो हुशार आणि आनंदी असतो. सर्जक कलाकार, खेळाडू उत्तम कामगिरी करत असतात त्यावेळी त्यांच्या मेंदूत अशा लहरी असतात.
(लेखक मनोविकासाच्या तंत्रांचे अभ्यासक आहेत.)manthan@lokmat.com