पवन देशपांडे
पाच मिनिटं मोबाइलचं ‘टिंग टाँग’ झालं नाही की अस्वस्थ व्हायला होतं हल्ली. जगणं डिजिटल आणि व्हर्च्युअल करणाऱ्या या स्मार्ट असण्यानं खाली मान घालण्याची सवयही लावली अनेकांना. जगाच्या स्पीडनं आपण चाललोय अन् आपण कुठंच मागं नाही असं ‘फिलिंग’ देणारं वातावरण मोबाइलनं निर्माण केलंय. पण जे काही चाललंय ते बरंच स्लो आहे. आपला स्पीड खूप कमी आहे. बरेच अडथळे आहेत. आपली स्मार्ट गाडी रडत-खडतच चाललीय, हे असं का?
चैन पडत नाही. कोणालाच. अगदी मिसरूडही फुटलेलं नसणाऱ्यांपासून ते म्हाताऱ्या-कोताऱ्या जनांनाही. व्हिडीओ पाहण्याची अन् गेम खेळण्याची सवय लागलेल्या (लावलेल्या) गोंडस चिमुकल्यांनाही...
कारण, स्मार्ट फोन.
पाच मिनिटं मोबाइलचं ‘टिंग टाँग’ झालं नाही की अस्वस्थ व्हायला होतंय. जगणं डिजिटल आणि व्हर्च्युअल करणाऱ्या या स्मार्ट असण्यानं खाली मान घालण्याची सवयही लावली अनेकांना. जगाच्या स्पीडनं आपण चाललोय अन् आपण कुठंच मागं नाही अस ‘फिलिंग’ देणारं वातावरण मोबाइलनं निर्माण केलंय.
पण जे काही चाललंय ते बरंच स्लो आहे... आपला स्पीड खूप कमी आहे. बरेच अडथळे आहेत.
आपली स्मार्ट गाडी रडत-खडतच चाललीय, असं म्हणा ना!!
कळत नसेल काही तर जरा स्पष्टच सांगतो... आपण स्मार्ट होत सुटलोत पण फसतही आहोत. कारण आपल्याला नेमकं रडत-खडत चालणं म्हणजे काय अन् वेग काय, याची माहितीच नाही. आपण फक्त म्हणतो, आज इंटरनेट जरा स्लो आहे. किंवा फारफार तर म्हणतो, माझं टू-जी आहे.. स्पीड कमी आहे. तुमच्याकडे स्मार्ट फोन असेल तर कदाचित तुम्हाला हा अनुभव नक्कीच आला असेल. किंवा नसेल तर अशी काही वाक्यं तुमच्या कानी नक्कीच पडली असतील.
कारण अनेकदा आपण ज्या इंटरनेट स्पीडसाठी (टू-जी, थ्री-जी किंवा फोर-जी) पैसे मोजतो तेवढा स्पीडच आपल्याला मिळत नाही.
दऱ्याखोऱ्यात, कोणत्याही उंच शिखरावर आणि कितीही धावत्या ट्रेनमध्ये-जंगलात अगदी सगळीकडे नेटवर्क मिळेल-इंटरनेट कनेक्शन मिळेल-स्पीड मिळेल अशा जाहिराती करून मोबाइल सेवा देणाऱ्या कंपन्या ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करतात. इंटरनेट स्पीड अन् स्वस्ताईचे एकसेएक दावे करतात. पण हे दावे खरंच खरे असतात का? बहुतांश नाहीत. कारण आपल्या ‘डेटा पॅक’मध्ये सांगितला जाणारा इंटरनेट स्पीड आणि प्रत्यक्षात मिळणारा स्पीड यात जमीन-आसमानाची तफावत असल्याचं दिसून आलंय.
यासंबंधी नुकत्याच दोन गोष्टी प्रकर्षानं समोर आल्या आहेत. पहिली म्हणजे, टेलिकॉम रेग्युलेटरी अॅथॉरिटी आॅफ इंडिया अर्थात ट्रायनं (दूरसंचार कंपन्यांवर वचक ठेवणारी यंत्रणा) नुकतंच एक अॅप लाँच केलं. हे अॅप ट्रायला लाँच करावंसं वाटलं यातच मोबाइल सेवा देणाऱ्या कंपन्यांच्या सेवांवर विश्वास नसल्याचं अधोरेखित होतं. ट्रायचं हे अॅप तुमच्या मोबाइलवर मिळणारा इंटरनेटचा स्पीड मोजतं. तुमचं नेटवर्क कोणतं, तुमच्या मोबाइलवर इंटरनेटचा डाउनलोडिंगचा वेग किती आणि अपलोडिंगचा वेग किती याची माहिती चुटकीसरशी तुम्हाला देतं. ही माहिती तुम्ही ट्रायसोबत शेअर करावी, जेणेकरून कंपन्या कशी सेवा देतात आणि कशाप्रकारे फसवतात याची माहिती ट्रायला मिळेल. त्यातून कंपन्यांच्या दाव्यांमधला खोटेपणा ट्रायसमोर उघड होईल, हा यामागचा हेतू आहे. हे अॅप केवळ चार एमबी एवढ्या छोट्या आकाराचं असल्यानं ते कमी क्षमतेच्या मोबाइलवरही इन्स्टॉल करणं सोप्पं आहे.
दुसरी गोष्ट म्हणजे, मोबाइल इंटरनेट स्पीड संदर्भात कंपन्यांकडून होणाऱ्या फसवणुकीविरोधात एक आॅनलाइन मोहीम उघडण्यात आली आहे. ‘द लॉजिकल इंडियन’ या जागृत लोकांनी चेंज डॉट ओआरजी (change.org) या संकेतस्थळावर ही मोहीम हाती घेतली असून, त्याला आतापर्यंत दीड लाख नेटकरांनी पाठिंबा दिला आहे. आता ही याचिका ट्राय आणि दूरसंपर्कमंत्र्यांकडे दिली जाणार आहे. या याचिकेत मांडण्यात आलेल्या गोष्टी धक्कादायक आहेत. आपल्याला २१ एमबीपीएस आणि त्याहून पुढे जाऊन १०० एमबीपीएस एवढ्या इंटरनेट वेगाची आश्वासनं दिली जातात. प्रत्यक्षात २ एमबीपीएस एवढाही वेग मिळत नाही. मोबाइल फोनला मिळणारं नेटवर्कही तर चीड आणणारं असतं. कॉल ड्रॉपची समस्या त्यातूनच आलेली. शिवाय तीन वर्षं होऊनही थ्री-जीची हवी तशी अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. थ्री-जीच्या मोठमोठ्या जाहिराती करून कंपन्या आता फोर-जी आणि फाय-जीवर येऊन पोहोचल्या आहेत. पण सेवेचं घोडं अजूनही थ्री-जीच्या वेगावरच अडलेलं आहे. कारण थ्री-जी सेवा पुरवू शकणाऱ्या मोबाइल टॉवर्सची संख्या खूप कमी आहे. देशातील मोबाइल टॉवर्समध्ये प्रत्येक तीन टॉवरपैकी केवळ एका टॉवरमध्येच थ्री-जी सेवा देण्याची क्षमता आहे.
ट्रायने थ्री-जी सेवेसाठी कमीत कमी १ एमबीपीएस एवढा इंटरनेट वेग ठेवा असं कंपन्यांना सांगितलंय आणि त्याखाली येऊ नका असंही म्हटलंय खरं... पण त्यासंबंधी अजून कंपन्यांनी निर्णय घेतलेला दिसत नाही. कारण अर्ध्याहून अधिक वेळा तर थ्री-जीचा वेग टू-जीसारखा असतो.
याबाबत इरिक्सन या कंपनीनं नुकताच एक सर्व्हे केला होता. त्यानुसार टू-जी आणि थ्री-जी या सेवातील इंटरनेट वेगात फारसा फरक नसल्याचं ४८ टक्के लोकांनी म्हटलं आहे. याशिवाय टू-जी, थ्री-जी आणि फोर-जी यांच्या इंटरनेट वेगासंदर्भात स्पष्टता असण्याबाबतही ट्रायनं कंपन्यांकडे विचारणा केलीय. पण त्याचं घोडंही अडलेलंच आहे.
काय करायचा आपल्याला इंटरनेटचा वेग, असाही प्रश्न उपस्थित होऊ शकतो. इंटरनेटच्या वेगवान असण्यानं आपली सारीच कामं सोपी करून ठेवली आहेत. आता एखादा ईमेल पाहण्यासाठी किंवा पाठवण्यासाठी आपल्याला डेस्कटॉप कम्प्युटरवर किंवा लॅपटॉपवर बसण्याची गरज भासत नाही. किंवा एखाद्या इंटरनेट कॅफेवरही जावं लागत नाही़ ही सारीच सुविधा आपल्या स्मार्टफोनमध्ये उपलब्ध आहे. त्याचा वेग जर अधिक असेल तर आपल्याला अशा पर्यायांचा वापर करणं कटकटीचं किंवा अधिक खर्चाचं वाटणार नाही.
आणखी एक बाब म्हणजे आॅनलाइन खरेदी, मोबाइलवरून रेल्वेचं बुकिंग करणं असो किंवा एखाद्या मुव्हीचं तिकीट काढणं असो, स्मार्ट तरुणांंसाठी ही नित्याची बाब बनली आहे. परंतु, इतर प्रगत देशांच्या तुलनेत आपण या साऱ्यात खूप मागे आहोत.
इंटरनेटवर कायम पडून असणाऱ्यांच्या क्रमवारीत भारत दुसऱ्या स्थानी आहे. भारतात ४० कोटी इंटरनेट वापरकर्ते असे आहेत, जे इंटरनेटवर अॅक्टिव्ह असतात. त्यात मोबाइलवर इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या अर्ध्याहून अधिक आहे आणि ती वाढतेच आहे. मात्र, त्या तुलनेत अजून भारतातील सरासरी इंटरनेट स्पीड वाढताना दिसत नाही़
ग्रामीण भागात अजूनही सरासरी केवळ ५१२ केबीपीएस एवढ्या कमी क्षमतेचा इंटरनेट स्पीड मिळतो. भारतातील दुर्गम भागापर्यंत इंटरनेट कनेक्शन पोहोचावं यासाठी गूगलसारखी कंपनी पुढे आली असली तरी आणि त्यांनी बलून इंटरनेट प्रकल्प हाती घेतला असला तरी मोबाइलवरून इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या इतर इंटरनेट सेवांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे मोबाइल इंटरनेट सेवा देणाऱ्या कंपन्यांनाच आपल्या इंटरनेट स्पीडमध्ये वाढ करावी लागणार आहे. किमान तसा नियम तरी ट्रायनं करणं भाग आहे.
ट्रायनं नुकत्याच आणलेल्या अॅपच्या माध्यमातून जो डाटा गोळा होईल त्यातून पुढचं पाऊल उचलणं सोप्पं होईल खरं, पण ते प्रत्यक्षात उतरावं आणि मोबाइल इंटरनेटचा रास्त स्पीड मिळावा, एवढीच साऱ्यांची अपेक्षा आहे.
मोबाइलवर इंटरनेटचा स्पीड कमी का असतो?
१ केवळ ३०टक्के भारतीय मोबाइल टॉवर हे थ्री-जी सेवा पुरवू शकतील अशा क्षमतेचे आहेत. बाकी सारे टॉवर टू-जी सेवा देतात. त्यामुळे तुम्ही कोणत्या टॉवरच्या नेटवर्कमध्ये आहात त्यावर तुमच्या इंटरनेटचा वेग ठरतो. तुम्ही जर टू-जी टॉवरशी कनेक्टेड असाल तर थ्री-जी घेतलेली असूनही तुम्हाला इंटरनेटचा वेग टू-जीनुसारच मिळेल.
२ जेवढ्या प्रमाणात मोबाइल ग्राहकांची संख्या वाढतेय त्या प्रमाणात टॉवर्सचीही संख्या वाढायला हवी. मात्र दूरसंपर्क कंपन्यांनी मोबाइल टॉवर्समध्ये फारशी गुंतवणूक वाढवलेली नाही. त्यामुळे क्षमतेपेक्षा अधिक बोजा टॉवरवर पडतो आणि त्यातून कॉल ड्रॉप, इंटरनेटचा वेग कमी अशा समस्यांना ग्राहकांना तोंड द्यावं लागतं.
३ ग्राहकांची वाढती संख्या आणि त्यांचा इंटरनेट वापर हे सर्व क्षमतेबाहेर गेल्यानंतर कंपन्या स्वत:च डेटा स्पीडवर नियंत्रण आणतात, अशीही तक्रार आहे.
वेगवान मोबाइल इंटरनेटचे फायदे -
१. अनेक उद्योगांना आपला उद्योग इंटरनेटद्वारे जगभरात पोहोचवता येतो, शिवाय थेट ग्राहकांशी संपर्क साधता येतो. ग्राहकांनाही थेट उद्योगांपर्यंत पोहोचता येतं.
२. शेतकरी, मच्छिमारांना छोट्या मोठ्या अॅपचा वापर करून पर्यावरणाचा अंदाज घेता येतो. शिवाय एखाद्या अॅपच्या माध्यमातून आपल्या व्यवसायात फायदा करून घेणंही शक्य होतं. बाजारातील किमती तत्काळ कळू शकतात.
३. शिक्षणात मोठ्या प्रमाणात वापर होऊ शकतो. वेगवान इंटरनेट असल्यास शैक्षणिक अॅपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडू शकते.
४. सरकारला वेगवेगळ्या अॅपच्या माध्यमातून थेट जनतेपर्यंत पोहोचता येतं, शिवाय जनतेलाही सरकारपर्यंत पोहोचता येतं.
५. वैद्यकीय क्षेत्रात इंटरनेटमुळे रुग्णाला तत्काळ प्राथमिक उपचार मिळू शकतात, शिवाय आपल्या आरोग्याची काळजीही घेता येऊ शकते.
६. स्वसुरक्षेसंदर्भातील अॅलर्ट पोलिसांना, घरच्यांना पाठवण्यासाठी आणि आपलं जीपीएस लोकेशन पाठवण्यास वेगवान इंटरनेटचा वापर होतो.
७. व्हिडीओ पाहणे, गेम डाउनलोड करणे किंवा आॅनलाइन गेम खेळणे यासाठीही वेगवान इंटरनेट फायद्याचं ठरतं.
८. स्मार्टसिटी बनविण्याचं स्वप्न आपण पाहत आहोत. त्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्चही करणार आहोत. पण अशा शहरांमध्ये वेगवान इंटरनेट नसेल तर तेथे राहणाऱ्या स्मार्ट जनांना आपण स्मार्ट नसल्याची जाणीव बोचत राहील.
१९८०
1G : म्हणजे फर्स्ट जनरेशन. ही एकदम सुरुवातीची सेवा. याचा दर्जा खूप सुमार होता. पण ही केवळ सुरुवात होती.
१९९०
2G : सेकंड जनरेशन मोबाइल सेवेत अनेक गोष्टी वाढून मिळाल्या. यात डिजिटल रेडिओ आला, आपण बोलल्याचा आवाज पुढच्या व्यक्तीला व्यवस्थित ऐकू येऊ लागला. शिवाय जवळपास दीडशे केबीपीएस एवढा इंटरनेट स्पीडही मिळाला.
२०००
3G : थर्ड जनरेशन मोबाइल सेवा. याने डिजिटल तंत्रज्ञानाचे सर्व मापदंड मोडीत काढले. यामुळे वेगवान इंटरनेटच्या सेवा सुरू झाल्या़ त्यातून अनेक प्रकारच्या नव्या सेवा आणि सुविधाही मिळू लागल्या.
२०१०
4G : फोर्थ जनरेशन ही सेवा आतापर्यंतच्या साऱ्याच सेवांच्या पुढची आणि अति वेगवान इंटरनेट सेवा. ही सेवा भारतात फार मोठ्या प्रमाणात सुरू झालेली नसली तरी त्याचा मोठा फायदा सर्वच स्तरातील लोकांना आणि उद्योगांना होणार आहे.
मोबाइलवर इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या देशात ३० कोटींपेक्षाही अधिक आहे. त्यात दर महिन्याला कोट्यवधी युजर्सची भरही पडत आहे. मोबाइल इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या वाढण्याचा वेग मोठा आहे.
दक्षिण कोरियामध्ये सर्वाधिक सरासरी इंटरनेट स्पीड आहे. जवळपास भारताच्या दहा पट म्हणजे २६.७ एमबीपीएस एवढा स्पीड द. कोरियात इंटरनेट वापरणाऱ्यांना मिळतो.
२०१९ सालामध्ये जगभरात ७१% लोकांपर्यंत मोबाइल इंटरनेट सेवा पोहोचलेली असेल.२०१९ मध्ये मोबाइल इंटरनेट डेटा वापरण्याचं प्रमाण प्रति व्यक्ती तिप्पट होईल.
१९२ देशांमध्ये सध्या थ्री-जी मोबाइल इंटरनेट सेवा आहे. या देशांची एकूण लोकसंख्या जगाच्या अर्धी आहे. टू-जी आणि थ्री-जी या सेवा जवळपास जगभरात उपलब्ध आहेत. फोर जी सेवा ही जवळपास १०२ देशांमध्ये आहे. मात्र त्याचाही फारसा विस्तार झालेला नाही.
ब्रॉडबँडची तऱ्हाही अशीच
( सरासरी इंटरनेट स्पीड )
भारत - 2.5 एमबीपीएस
चीन - 3.7 एमबीपीएस
ब्राझील - 3.6 एमबीपीएस
रशिया - 10.2 एमबीपीएस
ब्रिक्स देशांमध्ये भारताचा इंटरनेट स्पीड सर्वांत कमी आहे.
मोबाइलवर इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या देशात ३० कोटींपेक्षाही अधिक आहे. त्यात दर महिन्याला कोट्यवधी युजर्सची भरही पडत आहे. मोबाइल इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या वाढण्याचा वेग मोठा आहे.
दक्षिण कोरियामध्ये सर्वाधिक सरासरी इंटरनेट स्पीड आहे. जवळपास भारताच्या दहा पट म्हणजे २६.७ एमबीपीएस एवढा स्पीड द. कोरियात इंटरनेट वापरणाऱ्यांना मिळतो.
२०१९ सालामध्ये
जगभरात ७१% लोकांपर्यंत मोबाइल इंटरनेट सेवा पोहोचलेली असेल. २०१९ मध्ये मोबाइल इंटरनेट डेटा वापरण्याचं प्रमाण प्रति व्यक्ती तिप्पट होईल.
१९२ देशांमध्ये सध्या थ्री-जी मोबाइल इंटरनेट सेवा आहे. या देशांची एकूण लोकसंख्या जगाच्या अर्धी आहे. टू-जी आणि थ्री-जी या सेवा जवळपास जगभरात उपलब्ध आहेत. फोर जी सेवा ही जवळपास १०२ देशांमध्ये आहे. मात्र त्याचाही फारसा विस्तार झालेला नाही.
डिजिटल इंडियासाठी तरी...
डिजिटल इंडियाचं स्वप्न प्रत्यक्षात आणायचं असेल तर भारतात इंटरनेटचा विस्तार आणि इंटरनेटचा वेग यावर लक्ष देणं गरजेचं आहे. विस्तार झालेला असेल आणि वेग नसेल तर भारताचं डिजिटायझेशन होण्यासही वेळ लागेल. सध्याच्या सरकारच्या धोरणाला ते पचनी पडणार नाही़ त्यामुळेच इंटरनेटचा वेग वाढवणं गरजेचं आहे.
(लेखक लोकमतच्या मुंबई आवृ्त्तीत मुख्य संपादक आहेत)