- अविनाश पाटीलमंत्रतंत्रानं तूच माझ्या मुलाला आजारी पाडलंस, तू डाकीण आहेस, मी तुला आता राहू देणार नाही.. असं म्हणत सुकलाल पावरानं सख्ख्या भावजईच्या; चिकीबाईच्या डोक्यात लाकडी दांडक्यानं वार करून तिचा खून केला. काही दिवसांपूर्वीच, म्हणजे सगळं जग प्रेमाचं प्रतीक असणारा ‘व्हॅलेण्टाइन डे’ साजरा करत असताना १४ फेबु्रवारीला ही घटना घडली.चार दिवसांपूर्वीच एका ३५ वर्षीय महिलेला डाकीण समजून तिची नग्न धिंड काढण्याचा प्रयत्न झाला..या दोन्ही घटना नंदुरबार जिल्ह्याच्या धडगाव परिसरातील.बऱ्याचदा अशा घटना बाहेर येत नाहीत, त्यामुळे असला काही प्रकार आहे, असेल हे अनेकांना खरेही वाटत नाही. पण नंदुरबारसाख्या आदिवासी भागात या प्रश्नाचं गांभीर्य खूप मोठं आहे आणि अनेक आयुष्यं त्यामुळे उद्ध्वस्त झाली आहेत.‘डाकीण’ प्रथा संपावी, हा प्रश्न समूळ मिटावा यासाठी बऱ्याच वर्षांपासून शासन, पोलीस आणि सामाजिक संस्थांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत; पण अजूनही त्यात म्हणावे तितके यश मिळत नाही, याच्या मुळाशी अनेक कारणे आहेत. मुळात या परिसरात अंधश्रद्धा अतिशय खोलवर रुजल्या आहेत. त्यातून लोकांना बाहेर काढणं अवघड आहे, हे खरं असलं तरी प्रबोधनाचे प्रयत्नही कमी पडताहेत, हेही मान्य करावं लागेल. यासाठी साऱ्यांनाच आणखी झटून काम करावं लागेल, आदिवासींच्या जीवनात, मनात प्रवेश करावा लागेल,मंत्र-तंत्राच्या आधारे लोकांचे वाईट करण्याची क्षमता महिलांमध्ये असते, अशा समजातून आदिम काळापासून आदिवासी समाजात ‘डाकीण काढली जाते.’ अपवादात्मक घटनांमध्ये पुरु षालादेखील ‘डाकीण’ ठरवल्याचे समोर आले आहे.हा प्रश्न अतिशय गंभीर आहे, असे लक्षात आल्याने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने या प्रश्नाला वाचा फोडण्याचे काम पहिल्यांदा २००२च्या अखेरीस हाती घेण्यात आले. २००३ ते २००८ या पाच वर्षांच्या कालावधीत नंदुरबार जिल्हा प्रशासन व जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटनांच्या सहभागाने डाकीण प्रथाविरोधी प्रबोधन मोहीम राबवली गेली.जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासकट जवळपास ३० संस्था-संघटनांचे प्रमुख प्रतिनिधी सहभागी असलेल्या समितीच्या पुढाकाराने डाकीण प्रश्नाच्या विविध अंगांना स्पर्श करत डाकीण ठरविले जाणे आणि यानंतर त्या महिला व तिच्या कुटुंबीयांना त्रास सहन करायला लावणे, या अमानुष परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. त्याचा परिणाम म्हणून या अत्याचाराच्या विरोधात निदान दाद मागण्यासाठी तरी काही नागरिक पोलीस प्रशासनाकडे येऊ लागले. त्यामुळे अनेक महिला व कुटुंबीयांना संरक्षण मिळू शकले आणि काही प्रकरणांमध्ये डाकीण ठरवण्यापासून व्यक्ती, कुटुंब व गावाला परावृत्त करण्यातदेखील यश मिळाले; परंतु अजूनही डाकीण प्रश्न समूळ नष्ट झालेला नाही, हे नुकत्याच घडलेल्या घटनांमुळे पुन्हा समोर आले आहे. त्यामुळेच यापुढील काळात अधिक आक्र मक प्रबोधनाने डाकीण प्रश्न हाताळण्याची आवश्यकता असल्याचे ठळकपणे दिसून येते. त्यासाठी शासन, प्रशासनासह आदिवासी समाजातील शिक्षित वर्ग आणि युवांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे.आरोग्य व शिक्षण विभागातील यंत्रणांच्या मदतीने आदिवासी समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन व सारासार विचार करण्याची पद्धती विकसित करायला प्राधान्य द्यावे लागेल. प्रामुख्याने धडगाव, अक्कलकुवा या तालुक्यांतील शैक्षणिक संस्था आणि शासकीय यंत्रणा यांच्या सोबत नियोजनबद्धरीत्या ‘डाकीण प्रथाविरोधी युवा एल्गार’ उभारण्याचा महाराष्टÑ अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा प्रयत्न राहील.लोकांची मानसिकता बदलणे, शास्रीय विचार त्यांच्यात रुजवणे हा या संदर्भातला कळीचा मुद्दा आहे.आधी काही दिवसांपासून सुकलाल पावरा चिकीबाईवर डाकीण असल्याचा आरोप करीत होता. अशावेळी त्याला रोखण्याची, समजावण्याची आणि परावृत्त करण्याची गरज होती; परंतु हे करण्यासाठी परिसरातील आदिवासी समाजातील शिक्षित लोकांकडून आणि पोलीस यंत्रणेशी संबंधित घटकांकडून कुठलीही कृती करण्यात आली नाही.गावातील शिक्षित, जाणकार यात काहीच भूमिका घेत नाहीत. शासन यंत्रणेचे प्रतिनिधी असणाºया गावपातळीवरील कर्मचाºयांमध्ये पोलीसपाटील, अंगणवाडीसेविका, आशा सेविका, तलाठी, ग्रामसेवक, शिक्षक या प्रतिनिधींकडून अशा स्वरूपाच्या संवेदनशील व गंभीर प्रश्नांबद्दल जबाबदारीचे वर्तन दिसून येत नाही. त्यामुळेही गावागावांत अंधश्रद्धा आणि त्यासदृश व्यसन आणि कायदा-सुव्यवस्थेचे प्रश्न गंभीर अवस्थेत गेलेले दिसतात.यासाठी एका बाजूला अंधश्रद्धा, व्यसन, संवैधानिक कायदा, त्याच्या जबाबदाºया याविषयी आक्रमक प्रबोधन करण्याची निकड जाणवते. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आपल्या क्षमतेने या परिस्थितीला सामोरे जाताना परिवर्तन घडवून आणण्यासाठी कटिबद्ध राहणार आहे.(लेखक महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष आहेत.)
कशी घडते ‘डाकीण’?डाकीण... हे सातपुड्यातील शापित सत्य... दारिद्र्य आणि अज्ञानात जगत असलेल्या आणि समाजाच्या मुख्य प्रवाहापासून अजूनही लांब असलेल्या सातपुड्याच्या दºयाखोºयात रोज कुठे ना कुठे डाकीण म्हणून महिलेची छेड काढली जाते... अख्खं गाव त्या महिलेला बहिष्कृत करतात... माणुसकीही ओशाळवाणी व्हावी असा अत्याचार त्या महिलेवर करतात... त्या महिलेला एखाद्या मांत्रिकाकडे नेवून तिची नको ती परीक्षा घेतली जाते... आणि तिला कायमचीच गावाबाहेर काढली जाते... अशा कितीतरी महिला आजच्या विज्ञान युगातही अंधश्रद्धेमुळे देशोधडीला लागल्या आहेत.मूल आजारी पडले, एखाद्याच्या घरात वाईट घटना घडल्या तरी त्याचा संशय एखाद्या महिलेवर घेतला जातो. त्या महिलेने जादूटोणा केला म्हणूनच आपल्या घरात अशा दुर्दैवी घटना घडल्या, असा संशय घेऊन त्या महिलेला डाकीण ठरविले जाते.सुरुवातीला शेजारचे लोक असा संशय घेऊन तिचा छळ करतात. नंतर गावात गावपंचायतची बैठक घेऊन त्या महिलेवर आरोप लावला जातो. एकदा पंचांनी ठरवले की कुटुंबातील लोकही त्या महिलेला बहिष्कृत करतात. तिची परीक्षा घेण्यासाठी गुजरातमधील बावनगज येथे एका मांत्रिकाकडे घेऊन जातात. तिथे तिची साखळदंड तोडण्यासह इतर अनेक कठीण परीक्षा घेतल्या जातात. या परीक्षा इतक्या कठीण असतात की कुठलीही महिला सहजासहजी त्यातून बाहेर पडू शकत नाही. अखेर मांत्रिकही तिच्यावर डाकीण असल्याचा शिक्कामोर्तब करतो आणि त्या महिलेला कायमचेच गावातून बहिष्कृत केले जाते. अशा महिला ना आपल्या माहेरी जाऊ शकत ना नातेवाइकांकडे. आजही शेकडो महिला ह्या प्रथेच्या बळी पडल्या आहेत.गेल्या वर्षभरातील चित्र पाहिल्यास नंदुरबार जिल्ह्यात अशा नऊ घटनांची पोलिसांत नोंद आहे. त्यापेक्षा कितीतरी पटीने घटना घडत असतात; पण त्याची नोंद होत नाही. मध्यंतरी अंधश्रद्धा निर्मूलन समिती व जिल्हा प्रशासनाने यासंदर्भात जनजागृतीसाठी पाऊल उचलले होते. अशा घटना घडल्यास त्या गावातील पोलीसपाटलांनाच दोषी ठरविण्याचा निर्णयही पोलीस दलाने घेतला होता. काही काळ त्याचा परिणाम दिसून आला. पण पुन्हा ते प्रमाण वाढले. विशेष म्हणजे त्या काळात पोलिसांनी अशा घटना नोंदवताना ‘डाकीण’ असा उल्लेख करणे जाणीवपूर्वक टाळले. त्यामुळे ‘डाकीण’ या विषयाची चर्चा फारशी झाली नाही. मात्र या घटना संपल्या होत्या अथवा संपल्या आहेत असे नाही.सातपुड्यात अंधश्रद्धेचे प्रमाण अधिक आहे. याबाबत जनजागृतीसाठी अजूनही अपेक्षित परिणाम दिसून येत नाही. आदिवासींच्या विकासाच्या गप्पा मारणाºया संघटना, आदिवासी कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते हेदेखील संस्कृतीच्या नावावर अशा मुद्द्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात. त्यामुळे यासंदर्भात पुन्हा एकदा प्रशासनाने व सामाजिक संघटनांनी कठोर भूमिका घेत सातपुड्यातील ‘डाकीण’ हद्दपार करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.- रमाकांत पाटील(लेखक ‘लोकमत’च्या जळगाव आवृत्तीत उपमुख्य उपसंपादक आहेत.)