लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयरच्या या सोहळ्यात तुमचं स्वागत. आपण २००३ साली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालात. या कार्यकाळातील आपल्या दृष्टीने सर्वोत्तम निर्णय कोणता ? आणखी कार्यकाळ मिळाला असता तर कोणते काम पूर्ण करायला आवडले असते? खरे तर, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मला अचानक राज्यात पाठवले होते. ध्यानीमनी नसताना मुख्यमंत्रिपदाची संधी मिळाली. या काळात पक्षासाठी, जनतेसाठी जे काही करता आले त्या गोष्टी मी केल्या. मुख्यमंत्री म्हणून गरिबांसाठी चांगले काम करण्याची माझी भूमिका होती. आपल्या मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत आपण गरिबांना लागतील तेवढे पैसे देण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी लागेल तो निधी दिला. माकडवाले, दवंडीवाले, गवंडीवाले अशा वर्गासाठी तो निर्णय होता. ही गरीब माणसे.. त्यांना कोणी विचारत नाही. या फाटक्यातुटक्या लोकांसाठी आपण निर्णय घेतले, त्यांच्या चेहऱ्यावरचे हास्य, समाधान पाहताना आनंद झाला. इथून जात असताना समाधानी होतो. अगदी कठीण काळात निवडणुका जिंकल्या. मी इथे आलो तेव्हा जी परिस्थिती होती आणि जाताना काय होती, हे पाहण्यासारखे होते. मी समाधानी होतो. मला जेव्हा सोनियाजींनी सांगितले की, तुम्हाला आंध्र प्रदेशच्या राज्यपालपदाची जबाबदारी घ्यायची आहे, तेव्हा मी आभार मानले. उलट, माझी कायम इच्छा होती एकदा तरी राज्यपाल बनण्याची.
मी लहान असताना गल्लीत एखाद्याशी भांडण व्हायचे तेव्हा म्हणायचो की, ‘तू काय गव्हर्नर लागून गेला का? मला बोलतो आहेस.’
- त्यामुळे राज्यपाल तर व्हायचेच होते. त्यानंतर अगदी वर्षभरात मला सोनियाजींनी थेट केंद्रात ऊर्जामंत्री बनवले. पायाभूत सुविधांसारखी महत्त्वाची जबाबदारी सोपवली. शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीत वीज थकबाकी माफीचा निर्णय घेतला आणि राज्यात सत्ता आली. आपण हमखास मुख्यमंत्री होणार अशी स्थिती होती. त्या तयारीनेच यशवंतराव चव्हाण सभागृहातील बैठकीत आपण आला होतात; पण ऐनवेळी विलासरावांचे नाव पुढे आले. त्याक्षणी आपल्याला काय वाटले?खरे सांगायचे तर मला थोडी कुणकुण लागली होती. मी आधी पोलीस विभागात होतो. त्यातही गुप्तवार्ता विभागात काम केले होते. त्यामुळे दिल्लीत काय चालू आहे याची कुणकुण मला लागली होती. त्यामुळे तुम्हाला आठवत असेल तर मी हसत आलो होतो आणि हसत बाहेर पडलो होतो. सत्ता सोडताना, पद गेल्यावर लोक रडत असतात. पण, मी हसत बाहेर पडलो होतो.कार्यकर्त्यांनी जे काम दिले आहे ते करत राहावे. कोणी सांगितले होते इतक्या जबाबदाऱ्या मला मिळतील? या साऱ्या गोष्टींची काँग्रेस कार्यकर्त्याने फारशी फिकीर करायची नसते. हायकमांडचे लक्ष्य चहूकडे असते. कोण काय करते, याची नोंद असते. त्यामुळे सत्ता आली, गेली हे गौण आहे. मी साधा पोलीस होतो. मला अशी काही पदे मिळतील? असे तेव्हा कोणी म्हटले असते तर त्याला पिटाळून लावले असते. पण, ही सारी पदे मिळाली. हे लोकशाहीतच होऊ शकते.
आपण केंद्रात अत्यंत महत्त्वाची पदे भूषविली, ज्येष्ठ नेते आहात. तुम्हाला काँग्रेसमधल्या जी- २३ गटाचे निमंत्रण कसे आले नाही?मी कायम स्वतंत्र राहिलो आहे आणि गांधी परिवाराचा कायम निष्ठावान राहिलो आहे. अगदी जनता पार्टीचे सरकार असताना इंदिरा गांधी यांना अटक झाली होती. या अटकेविरोधात सोलापुरात आंदोलन उभारले होते. तेव्हा जनता पार्टीचे नानाजी देशमुख माझ्यावर नाराजही झाले होते. मी गांधी घराण्याचा निष्ठावंत असल्याचे सर्वांना माहीत असल्याने कदाचित मला बोलावले नसेल.
जी-२३ चे नेते पक्षातील लोकशाही, निवडणुका, सुधारणा याबद्दल बोलत आहेत. या चर्चेपासून आपण दूर कसे काय?- काँग्रेसमध्ये पूर्वीपासून असे विषय चालत आले आहेत. विविध फोरमच्या माध्यमातून सुधारणांचा, बदलांचा आग्रह धरला जात असे. अगदी १९७३ मध्ये चंद्रजित यादव, चंद्रशेखर अशा नेत्यांचा ‘काँग्रेस फोरम फाॅर सोशॅलिस्ट’ असा गट होता. त्याच्या आधी इकडे शरद पवारांकडे ‘काँग्रेस फोरम फाॅर सोशॅलिस्ट ॲक्शन’ गट होता. मी त्यात सचिवही होतो. काँग्रेसमध्ये नेहमीच असे गट, फोरम कार्यरत राहिले आहेत. त्यात वेगळे, नवीन काही नाही. दिल्लीतील नेतृत्व त्यांचे म्हणणे ऐकेलच!
देशात सशक्त विरोधी पक्ष असावा असे वाटत नाही का?मी तर नेहमीच ही भूमिका मांडत आलो आहे की विरोधी पक्ष सशक्त असायला हवा. एका पक्षाकडे सत्ता राहिली तर हुकूमशाहीकडे वाटचाल सुरू होते.
काॅँग्रेस पक्षातील सुधारणांसाठी काय प्रयत्न सुरू आहेत?एकदा ठेच लागली आहे. त्यासाठी सुधारणांचे काम सुरू आहे. पक्षात आता एक दिशा, विचार यासाठी घुसळण सुरू आहे. सांधण्याचे काम चालू आहे. काही गोष्टी झाल्या नाहीत म्हणूनच तर भाजप सत्तेवर आला ना! ठेच लागली हे खरे आहे...पण सुधारणांचे कामही सुरू आहे.