- किरण अग्रवाल
राज्यातील सत्ताधारी महाआघाडीत राहूनही दणक्यात स्वबळाची भाषा करणाऱ्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात प्रदेश काँग्रेसची फेररचना करण्यात आल्याने या पक्षातील सक्रियता वाढीस लागण्याची अपेक्षा बळावून गेली आहे. विशेषत: पश्चिम विदर्भातील बुलडाणा जिल्हाध्यक्षांची फेरनियुक्ती वगळता अकोला व वाशिमचे जिल्हाध्यक्ष बदलण्यात आल्याने या ठिकाणचे पक्षातील साचलेपण दूर होणे अपेक्षित आहे.
काँग्रेस पक्ष राज्यातील सत्तेत सहभागी असला तरी संघटनात्मक पातळीवर असलेली मरगळ झटकण्यासाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अलीकडेच राज्यात झंझावाती दौरे केले. एकीकडे पक्षातील ज्येष्ठ नेते व बाळासाहेब थोरात यांच्यासारखे माजी प्रदेशाध्यक्ष आगामी निवडणुका महाआघाडीने लढण्याचे सांगत असताना, पटोले यांनी मात्र पक्षात चैतन्य आणण्यासाठी स्वबळाची भाषा केली आणि जागोजागच्या दौऱ्यात पक्षांतर्गत फेरबदलाचे संकेतही दिले होते. पश्चिम विदर्भातील अकोला, वाशिमच्या दौऱ्यातही त्यांनी यासंबंधीचे सूतोवाच केले होते; त्यानुसार या दोन्ही जिल्ह्यांत त्यांनी सांधेबदल घडवून आणला असून पक्ष विस्ताराच्यादृष्टीने आगामी काळात त्याचा उपयोग होणे अपेक्षित आहे.
काँग्रेसमध्ये कार्यकर्त्यांपेक्षा नेत्यांचे प्रमाण मोठे आहे, त्यामुळे राज्यात सत्ता असली तरी तीन पक्षांच्या सरकारमध्ये काँग्रेसच्या सर्वच नेत्यांना समाधानकारक स्थान मिळू शकलेले नाही. विविध शासकीय समित्यांच्या घोषणाही लांबल्याने कार्यकर्तेही मरगळलेल्या अवस्थेत आहेत. विशेषतः अनेक ठिकाणी तीच ती जुनी मंडळी महत्त्वाची पदे अडकवून बसल्याने संधीच्या शोधातील कार्यकर्ते दुसऱ्या वाटा शोधू लागले आहेत. त्यामुळे नव्या-जुन्यांचा संगम घडवून फेरबदल करणे गरजेचे बनले होते. यात अकोल्यात पक्षामध्ये तसे नवखे असलेल्या अशोक अमानकर यांची जिल्हाध्यक्षपदी वर्णी लागली आहे. या पदासाठी इच्छुक असलेल्या इतर वरिष्ठांना प्रदेश समितीत सामावून घेतल्याने व प्रदेशाध्यक्षांच्या जवळचे असल्याने मानकर यांना विरोध होण्याची शक्यता नाही, पण म्हणून त्यांची वाट पूर्णत: निर्धोक आहे, असेही म्हणता येऊ नये. अमानकर यांना नेमून पटोले यांनी सामाजिक गणित साधले, परंतु दिल्ली दरबारपर्यंत संबंध व वजन असलेले मान्यवर नेते त्यांना किती काम करू वा टिकू देतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरले आहे. शासकीय सेवेच्या वरिष्ठ पदावरून निवृत्त असलेले अमानकर यांनी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी बऱ्यापैकी मोर्चेबांधणी करून ठेवली आहे. स्थानिक पातळीवरील अन्य निवडणुकातही त्यांनी आपल्या संघटन कुशलतेची झलक दाखवली आणि स्थानिक ज्येष्ठांच्या दबावात न येता स्वतःच्या मर्जीने कारभार केला तर पक्षाला पुन्हा ‘अच्छे दिन’ येऊ शकतात.
वाशिममध्ये आमदार अमित झनक या तरुण नेतृत्वाकडे जिल्हाध्यक्षपद सोपविले गेल्याने तरुण फळी अधिक सक्रिय होऊन पक्षात ऊर्जितावस्था येणे अपेक्षित आहे. तिसऱ्यांदा आमदारकी भूषविणाऱ्या झनक यांना कुटुंबातून राजकारणाचा वारसा लाभला असून गट-तट बाजूला सारून त्यांनी स्वतःची स्वतंत्र प्रतिमा निर्माण केली आहे, जनसंपर्कही दांडगा आहे; त्यामुळे वाशिममध्ये जिल्हाध्यक्षपदासाठी त्यांना फारशी स्पर्धा नव्हतीच. ज्येष्ठ नेते दिलीपराव सरनाईक यांना प्रदेश समितीवर स्थान देण्यात आले आहे तर अनंतराव देशमुख नाराज असल्याने पक्षाशी दुरावलेले आहेत. अशा स्थितीत झनक यांची वाट तशी मोकळी असली तरी स्वतःचा मतदारसंघ सांभाळतानाच जिल्ह्यातील प्रबळ असलेल्या भाजपशी त्यांना स्पर्धा करावी लागणार आहे. हे काम वरकरणी दिसते तितके सोपे नाही, म्हणून तर अमित झनक यांच्यासारख्या तरुण व धडाडीच्या नेतृत्वाकडे पक्षाने जबाबदारी सोपविली आहे.
बुलडाण्यात मात्र फेरबदलाची चर्चा असताना माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्यावरच विश्वास व्यक्त करीत पक्षाने जिल्हाध्यक्षपदी त्यांची पुनर्नियुक्ती केली आहे. मातब्बर नेते मुकुल वासनिक यांचा प्रभाव म्हणविल्या जाणाऱ्या या जिल्ह्यात जिल्हाध्यक्षपदासाठी इच्छुक भरपूर होते, पण बोंद्रे यांना पर्याय नाही हेच अखेर स्पष्ट झाले. या जिल्ह्यात काँग्रेसच्या सहयोगी शिवसेनेचे वर्चस्व आहे; पण अकोला व वाशिमच्या तुलनेने काँग्रेसची संघटनात्मक स्थिती बरी आहे. बोंद्रे स्वतः पराभूत झाले, पण नांदुरा येथे पक्षाचा आमदार निवडून आला आहे. जिल्हा परिषदेतही सत्ता आहे, त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीत त्यांना आपल्या फेर निवडीबद्दलचा विश्वास सार्थ करून दाखवावा लागणार आहे. शिवसेनेशी मैत्रीपूर्ण स्पर्धा करतानाच भाजपशी टक्कर घ्यायची आहे. गेल्या निवडणुकीत वंचित आघाडीनेही या जिल्ह्यात दमदार शिरकाव केल्याने त्यांचेही आव्हान मोठे आहे. जिल्ह्याचे कार्यक्षेत्रही मोठे असल्याने घाटाच्या खालच्या भागात कार्याध्यक्षाची नियुक्ती करून जबाबदारीचे विकेंद्रीकरण केले तर वेगळे चित्र निर्माण करता येऊ शकेल. खामगावमध्ये राणा दिलीप कुमार सानंदा, जळगाव जामोदमध्ये डॉ. स्वाती वाकेकर, प्रकाश पाटील अवचार यांच्यासारखे मातब्बर नेते पक्षाकडे आहेत. सर्वांना सोबत घेऊन काम केले तर बुलडाणा जिल्ह्यात पक्षाला गतवैभव मिळवून देणे अवघड नाही.
काँग्रेसला विरोधासाठी विरोधकांची फारशी गरजच नसते, स्वकीयच परस्परांच्या विरुद्ध शड्डू ठोकून उभे राहतात. शिवाय या पक्षात नेत्यांचीच गर्दी झाली असून, कार्यकर्ते फारसे उरलेले नाहीत. यातून ओढवलेली मरगळ झटकण्यासाठी अकोला व वाशिम जिल्ह्यात नेतृत्वबदल करून बुलडाण्यात आहे त्यांच्यावरच विश्वास व्यक्त केला गेला आहे. आता जिल्हास्तरीय अन्य पदाधिकारी बदलून नाना पटोले यांच्या या नवीन टीमकडून जनतेला पटेल, असे काम उभे केले जाते का हेच बघायचे.